Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखNitesh Rane : आमदार कामगिरी दमदार...!

Nitesh Rane : आमदार कामगिरी दमदार…!

  • संतोष वायंगणकर

कोणत्याही गावातील कोणतीही निर्माण झालेली समस्या असली की, तुमचा आमदार करतो काय? असा प्रश्न उपस्थित केला जायचा. कारण रस्ते, पाणी, वीज गावात आणणे एवढ्याच कामांची मर्यादित अपेक्षा आमदारांकडून असायची. आमदारांसाठी असलेल्या आमदार निधीतून गावातील रस्ता किंवा अन्य कोणत्याही विकासकामांसाठी हा विकासनिधी वापरण्याची पद्धत आहे. शासनस्तरावरून येणारा आमदारनिधी तर खर्च होणारच आहे, त्यात काही फार स्किल असत नाही; परंतु शासनाच्या विविध योजनांमधून आपल्या मतदारसंघात जास्तीत-जास्त निधी आणून विकासकामे करण्यातदेखील एक स्किल आहे आणि हाच तर कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा हातखंडा आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यांतून कोणत्या प्रकारे विकास करावा? याचे त्या-त्या भागाच्या आमदारांचे स्वत:चे असे नियोजन असायला हवे. विकासाचा विधायक आणि वेगळा दृष्टिकोन असायला हवा. ते ‘व्हीजन’ आमदार म्हणून नितेश राणे यांच्याकडे आहे. आमदारकीची दुसरी टर्म असणाऱ्या नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न चालविले आहेत. देवगडला पर्यटन क्षेत्रात प्रचंड वाव आहे. तालुक्यात अनेक पर्यटनस्थळ आहेत; परंतु पर्यटक देवगडकडे वळले पाहिजेत, यासाठी आ. नितेश राणे यांना देवगडच्या बीचला लागून असलेल्या खडकांचा उपयोग करत एक देखणे गार्डन बनवले. वॅक्स म्युझियम, कंटेनर, थिएटर अशा पर्यटकांना आकर्षक ठरणाऱ्या नवनवीन गोष्टी देवगडात उभारल्या. नेहमीच नवीन काही आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खरं तर विकासाचा विधायक दृष्टिकोन कसा असावा, त्या दृष्टिकोनातून विकास प्रकल्प कशा पद्धतीने उभारले जाऊ शकतात? याचा एक वास्तुपाठच त्यांनी राजकारण्यांना घालून दिला आहे. कणकवली शहरातही विविध विकासकामे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली आहेत.

विकास प्रकल्प उभे करणे हे आमदारांचे, लोकप्रतिनिधींचे काम; परंतु त्या प्रकल्पाला जपण्याची जबाबदारी जनतेची असते. रस्ते, पाणी, वीज यापलीकडे विकास असला पाहिजे. विकासाचा असा एक वेगळा विचार, त्याच योग्य नियोजन असावं लागतं. कोकणात तर सर्वच गोष्टींना विरोध हा ठरलेलाच असतो. त्यामुळे कोणताही विरोध नाही, तर तो प्रकल्पच उभा राहाणे मुश्कील आहे; परंतु आ. नितेश राणे जे काम हाती घेतील, ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. अनेक लोकोपयोगी योजनांच्या संकल्पना त्यांचा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहतो. ‘जनतेशी थेट संपर्क ठेवणारा आमदार’ अशी एक वेगळी ओळख आ. नितेश राणे यांची आहे. म्हणून कोणत्याही गावचा सर्वसामान्य शेतकरी आपल्या आमदारांशी संपर्क करतो. आपलं गाऱ्हाण मांडतो आणि विशेष म्हणजे आ. नितेश राणेदेखील त्याच तत्परतेने संबंधित सर्वसामान्य शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतात. समस्या जाणून घेतात आणि ती समस्या सोडवतातही. इतके छान जनता आणि आमदार असे एक वेगळे ‘बॉण्डिंग’ आहे.

विकासकामांच्या बाबतीत जेव्हा आक्रमक भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा आक्रमक भूमिका घेत, वाट्टेल त्या पद्धतीने संघर्ष करण्याची ते भूमिका घेतात. राजकारणामध्ये आवश्यक असणारा संयमीपणा, आक्रमकपणा, तत्काळ निर्णय क्षमता, अहोरात्र परिश्रम करण्याची मानसिकता न थकता महाराष्ट्रभर फिरण्याची तयारी असे असंख्य यशस्वितेसाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्यापाशी आहेत. आक्रमकपणा हा जसा त्यांचा स्वभाव आहे. त्याचबरोबर प्रसंग कोणावरही येऊ देत तो आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे की विरोधी पक्षाचा? हे न पाहता त्याच्या मदतीसाठी धावून जाणे हे ते कर्तव्यभावनेतूनच मदत करीत असतात. आरोग्याच्या बाबतीत धर्म, जात, पक्ष न पाहता समोरच्यांच्या आरोग्यासाठीची गरज लक्षात घेऊन त्याला मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे, याच समजातून त्यांच्याकडून अहोरात्र आरोग्यासाठी मदत केली जात असते.

राजकारणात आवश्यक असणारी समयसूचकता त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच बेरजेचे राजकारण करण्यात ते नेहमीच यशस्वी होत आले आहेत. मोठ-मोठ्या कंपन्यांमार्फत सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून शालेय शिक्षणात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. मतदारसंघातील प्राथमिक शाळातूनही शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच जास्तीत-जास्त शाळांमधून कॉम्प्युटर देण्यासाठी वेगवेगळया कंपन्याद्वारे त्यांनी प्रयत्न केले आहेत. असे हे दमदार कामगिरी करणारे आमदार नितेश राणे यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो यासाठी सदिच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -