Tuesday, May 7, 2024
HomeUncategorizedRajyasabha Election : इच्छुकांची नावे मागे सारत राष्ट्रवादीकडून 'यांना' राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Rajyasabha Election : इच्छुकांची नावे मागे सारत राष्ट्रवादीकडून ‘यांना’ राज्यसभेची उमेदवारी जाहीर

एकाच जागेसाठी १० जण होते इच्छुक

मुंबई : राज्यसभा निवडणुका (Rajyasabha Election) २७ फेब्रुवारीला पार पडणार आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. काल भाजपा (BJP) व शिवसेना शिंदे गट (Shivsena) यांनी आपले राज्यसभेसाठीचे उमेदवार जाहीर केले. मात्र, राष्ट्रवादीकडून (NCP) उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. राष्ट्रवादीला मिळालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी दहा जण इच्छुक होते. मात्र, यांपैकी कोणालाही संधी न देता सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनाच पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. आपल्या सध्याच्या खासदारकीचा राजीनामा देत प्रफुल्ल पटेल पुन्हा उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.

काल भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना (Ashok Chavan, Medha Kulkarni and Ajit Gopchade) यांना तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून राज्यसभेसाठी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अदिक, इद्रिस नायकवडी, माजी मंत्री नवाब मलिक तसेच नुकतेच काँग्रेसमधून आलेल्या बाबा सिद्दिकी यांच्यासह आणखी ३ जण इच्छूक होते. मात्र, यातून प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागली आहे.

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पुन्हा भरणार उमेदवारीचा अर्ज

प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे २०२७ मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच ३ वर्षे आधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील. काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल ३ वर्ष आधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने वाद टाळण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे सावध पाऊल टाकल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पार्थ पवार, बाबा सिद्दिकी यांच्यासह ८-१० इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे इतर कोणाला उमेदवारी देऊन, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नाराजीनाट्य नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल पटेल यांनाच उमेदवारी दिली असावी, अशी चर्चा रंगली आहे.

भाजपाने चौथा उमेदवार देण्याचे टाळले

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीने जय्यत तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपाने चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणे कठीण असल्याचे दिसल्यामुळे भाजपाने चौथा उमेदवार देण्याचे टाळले आहे. भाजपाकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -