Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यरिलेशनशिपमध्ये असणाऱ्या आयांनो स्वतःच्या मुलांना वेळ द्या!

रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या आयांनो स्वतःच्या मुलांना वेळ द्या!

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

कारण काहीही असो, महिला असो की पुरुष आजकाल बहुतांश लोक विवाहबाह्य संबंधात अडकलेले आहेत. आजच्या लेखाच्या मार्फत महिलांना एकच गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे ती म्हणजे आपल्या लग्नानंतरच्या रिलेशनशिपचा मुलांवर कितपत, कसा आणि काय परिणाम होतोय, हे पहिले लक्षात घ्या. आपल्याकडे मुलांसाठी समुपदेशनला आलेल्या, स्वतःचं अफेअर असणाऱ्या आणि त्यातून आता त्रासातून जाणाऱ्या, मुलांचं नुकसान झालेल्या अशा महिलांशी चर्चा करून काही गोष्टी जाणवल्या. त्यांच्या मुलांच्या बाबतीत जे काही घडलं आहे, घडत आहे त्यावर मार्गदर्शन घ्यायला वेळोवेळी त्यांच्याकडून सांगितल्या गेलेल्या समस्यांचा लेखाजोखा आपण या लेखाद्वारे मांडणार आहोत.

अनेक महिला हे विसरतात की, पुरुष जेव्हा विवाहबाह्य संबंध ठेवतात, तेव्हा त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यायला, हवं-नको पाहायला, त्यांचा अभ्यास घ्यायला, आजारपणात मुलांची काळजी घ्यायला, त्यांना वेळ द्यायला त्यांची पत्नी असते. बायको म्हणून आणि त्याच्या मुलांची आई म्हणून ती मुलांप्रति असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य चोख पार पाडत असते. महिला मात्र जेव्हा अशा संबंधात अडकते, तेव्हा तिच्या माघारी मुलांसाठी तिच्या घरात कोण आहे? हा महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. अफेअर असतानासुद्धा नवऱ्यासोबत राहणारी महिला असेल, तर निदान बाप म्हणून मुलांना आईच्या अनुपस्तीथीमध्ये थोडंफार सांभाळून घेऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये असणारी महिला एकल असेल म्हणजेच विधवा अथवा घटस्फोटिता अथवा नवऱ्यापासून लांब राहणारी असेल, तर मुलांची सर्वांगीण जबाबदारी तिच्यावर असते. अशा वेळी अनेकदा ती मुलांना घेऊन स्वतंत्र राहत असते. खूपदा तिच्यासोबत राहायला इतर कोणी वडिलधारी माणसं अथवा नातेवाईक उपलब्ध नसतात.

समुपदेशनला आलेल्या काही महिलांनी ज्या व्यथा सांगितल्या, त्यांना होणारा पच्छाताप अथवा मुलांबाबत निर्माण झालेली विचित्र परिस्थिती सांगितली, तेव्हा एखादी स्त्री परपुरुषाच्या प्रेमात किती आंधळी होऊ शकते आणि त्यासाठी अगदी स्वतःच्या पोटच्या मुलांनासुद्धा वाऱ्यावर सोडू शकते आणि त्याचे किती भयानक परिणाम तिला तसेच तिच्या मुलांना भोगावे लागू शकतात, हे ऐकून धक्का बसतो. जास्त करून एकल महिलांना एकहाती मुलांना सांभाळणं, पालनपोषण करणं जिकिरीचं असते. त्यातून अशा महिला स्वतःला रिलेशनशिपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतवून घेतात. कारण कुठेतरी नवऱ्याची कमतरता भरून निघते आहे, हा त्यांचा समज असतो. त्या पुरुषाच्या भावना, मन, मर्जी, अपेक्षा सांभाळण्याच्या नादात मुलांच्या प्रति स्वतःच आई म्हणून असलेलं कर्तव्य त्या पूर्णपणे विसरतात.

एकल महिलांच्या मनात परक्या पुरुषाबद्दलंच आकर्षण आणि त्याच्या सहवासाची, प्रेमाची इतकी धुंदी चढते की, त्याच्यापासून तात्पुरत्या स्वरूपात मिळणाऱ्या आर्थिक शारीरिक, मानसिक लाभासाठी स्वतःच्या मुलांचं बालपण, वाढत वय, त्यांच्या गरजा, अपेक्षा, भावना याकडे महिला सपशेल दुर्लक्ष करतात. पुरुषांना तर अशा महिला जितक्या अधिक काळ उपलब्ध होतील, स्वतःचा जितका जास्त वेळ देतील तितकं हवंच आहे. कोणाचा फुकट वेळ कोणत्याही कामासाठी वापरता आला, तर त्यात फायदाच आहे. या ठिकाणी महिला खूप मोठी चूक करतात. ती म्हणजे विवाहित पुरुषासोबत असलेल्या रिलेशनशिपमधून आमचा आर्थिक फायदाच होतोय, आमच्या मुलांच्या शिक्षणाला, कपड्यालत्त्यांना, हौसे-मौजेला पुरुष पैसा पुरवतो. त्या सांगतात, संबंधित पुरुष आम्हाला आर्थिक मदत करतो, आमच्या गरजा भागवतोय, आमच्या मुलांचं शिक्षण, हौस-मौज, दवाखाना सगळं त्याच्याकडून होतं म्हणजेच त्याच माझ्यावर इतकं प्रेम आहे, त्याला माझी, माझ्या मुलांची काळजी आहे, तर मी त्याला का माझा सहवास, वेळ अथवा योगदान देऊ नये?

समुपदेशनदरम्यान मोठ्या प्रमाणात रिलेशनशिपमध्ये खोलवर अडकलेल्या महिला बिनधास्त सांगतात की, मी जरी संबंधित पुरुषासोबत फिरत असेल, राहत असेल किंवा वेळ घालवत असेल तरी माझी मुलं घेतात समजावून. मुलं कळती झाली आहेत, घरी राहतात एकटी, माझ्या माहेरी सोडते मी त्यांना. काही महिला सांगतात, मामाकडे ठेवते त्यांना, काही सांगतात, मैत्रीण सांभाळून घेते मुलांना, कोणी सांगते शेजारी चांगले आहेत, ते बघतात मुलांकडे. मुलांच्या जेवण्या-खावण्याचं काय असं विचारल्यावर बिनधास्त सांगतात की, मी त्यांना ऑनलाइन पैसे पाठवते. मग ते काहीपण पार्सल मागवून खातात, तसं मी सगळा खाऊ घरात भरून ठेवला आहे, कोणी सांगते, मी जेव्हा त्या माणसासोबत हॉटेलला जाते तिथूनच मुलांना पार्सल नेते. मुलं घर पण सांभाळतात, अभ्यास पण करतात. मी आठ-दहा दिवस नसले तरी मुलांना अजिबात काही त्रास होत नाही, त्याचं काही अडत नाही, ते व्यवस्थित राहतात.

मुलांना सोडून प्रियकर, परक्या पुरुषासोबत तासनतास कसं करमतं, मुलांची आठवण येत नाही का, असं विचारल्यावर महिला सांगतात फोन करतोना आम्ही एकमेकांना, दिवसातून खूप फोन होतात, व्हीडिओ कॉल होतात. मुलांना खायला-प्यायला असलं, त्यांच्याकडे पैसे असले आणि मोबाइल असला की मुलं खूष असतात. एक महिला तिचं प्रकरण घेऊन आली. तिथे तर हद्दच होती. सातवीची मुलगी आणि नववीचा मुलगा घर एकटे सांभाळायचे. ही महिला एकटी एका पुरुषासोबत राहायला असायची, काय तर म्हणे त्याला बायको नाहीये म्हणून ते आता मलाच बायको म्हणून वागवतात. या महिलेची सातवीत असणारी मुलगी स्वतः स्वयंपाक करून, घर साफसफाई करून, भांडे घासून शाळेत जायची आणि नंतर परत अभ्यास, घरातील काम सांभाळायची. आई म्हणून ही बाई चार-आठ दिवसांतून मुलांकडे जाऊन काय हवं नको पाहून यायची, त्यांना पैसे देऊन यायची, घरात किराणा सामान भरून द्यायची.

मुलांना जेव्हा स्वतःच्या आईकडून अशी वागणूक मिळते, त्यावेळी त्यांच्या बालपणावर, मानसिकतेवर, भावनांवर काय परिणाम होत असेल हे आपण समजू शकतो. पैसे देऊन मुलांचं तोंड बंद करायचं आणि आपल्या रिलेशनशिपमुळे आपल्या आयुष्याचं, भविष्याचं नुकसान तर होणारच आहे, त्यातून मुलांना पण ते भोगायला भाग पाडायचं. तो पुरुष कसा तुमच्या बापाची उणीव भरून काढतोय, त्याला कसं मी आणि तुम्ही पण प्रिय आहात, जवळचे आहात, तो आपली किती काळजी घेतो, आपल्याला हवं नको बघतो हे सांगून इतक्या लहान मुलांचं मनपरिवर्तन या महिला करतात.

आपली हक्काची आई असतानासुद्धा मुलांनी दुसऱ्याच्या दारात राहायचं, किंवा घरात एकटं राहायचं, जमेल ते करून खायचं किंवा बाहेरचं मागवून खायचं. आईचं कोणाशी तरी प्रेमप्रकरण आहे, म्हणून मुलांनी एकाकी जीवन जगायचं, त्यांचा अभ्यास, त्यांची तब्येत, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्याशी गप्पा गोष्टी या सगळ्यामध्ये त्यांनीच त्यांच्या मनाला समजवायचं. प्रेयसीपेक्षा आईची भूमिका कित्येक पटीने मोठी आणि महत्त्वाची आहे, हे महिलांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपलं भविष्य आपण ज्याच्यासोबत संबंध ठेवलेत तो नसून, आपलीच मुलं आहेत. आपल्याला म्हातारपणी आपली मुलं सांभाळतील की एखादा परका पुरुष? हा साधा विचार तरी महिलांनी करावा असे वाटते. bउद्या हीच मुलं चुकीच्या वाटेवर गेली, चुकीच्या वळणावर गेली, दिशाहीन झाली, त्यांनी काही कटू निर्णय घेतला, ती आपल्याला विसरली, आपला अनादर करू लागली, आपल्याला अपमानस्पद वागणूक देऊ लागली, त्यांच्यासोबत काही चुकीचं घडलं, त्यांना कायमस्वरूपी काही त्रास झाला, त्यांच्या मानसिकतेला, आरोग्याला, शिक्षणात काही मोठी समस्या निर्माण झाली, तर आई म्हणून आपणच आपल्याला माफ करू शकतो का?

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -