Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखनितीश कुमार आवडे सर्वांना...

नितीश कुमार आवडे सर्वांना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस-राजद बरोबर असलेले आपले सरकार आता संपले असे त्यांनी राजभवनावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्याच दिवशी दुपारी भाजपाच्या ७८ आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊन नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि सायंकाळी भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह स्वत: बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे एकाच टर्ममध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन देशात विक्रम नोंदवला. एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नऊ वेळा शपथ घेणे हासुद्धा त्यांनी उच्चांक निर्माण केला.

नितीश कुमार यांना संधिसाधू म्हणा किंवा पलटूराम. त्यांनी कधी काँग्रेस आणि राजद, तर कधी भाजपा यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले. सरकार कोणत्याही राजकीय पक्षांबरोबर असले तरी मुख्यमंत्री स्वत: नितीश कुमार कायम राहिले. पाटण्यातील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मात्र त्यांची कायम आहे. बिहारच्या राजकारणात ही मालिका गेली वीस वर्षे चालू आहे. नितीश कुमार स्वार्थी आहेत, केवळ स्वत:साठी ते राजकारण खेळतात, विकासापेक्षा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा मोह अधिक आहे, हे सर्व मान्य केले तरी सतत इकडून तिकडे जाणारे नि विचार बदलणारे नितीश कुमार हे राजद-काँग्रेसला आणि भाजपाला मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात? हेच मोठे गूढ आहे. नितीश कुमार बिहार की मजबुरी हैं, हे भाग्य देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्याला लाभले नसावे…

लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवर आलेल्या असताना बिहारमध्ये मुख्यमंत्री व त्यांचा पक्षच आपल्याकडे ओढायचा हा भाजपाचा मास्ट्ररस्ट्रोक आहे की नाही, हे काळच ठरवेल. पण बहुमताचे सरकार स्वत: पाडून नितीश कुमार भाजपाप्रणीत एनडीएच्या तंबूत परतले तेही मुख्यंमत्रीपदाचा मुकुट मस्तकावर कायम ठेवून, यामुळे इंडियातील घटक पक्ष चक्रावून गेले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारच्या जवळ आली असतानाच काँग्रेसचा सहभाग असलेले सरकार स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच पाडले, हा राहुल यांच्या यात्रेला झालेला अपशकूनच आहे.

राजद व काँग्रेसबरोबर नितीश कुमार यांनी काडीमोड घेतलाच. पण इंडिया या भाजपाच्या विरोधकांच्या आघाडीलाही रामराम करीत ते भाजपाच्या कुशीत जाऊन बसले. असे काय घडले की, महाआघाडी सरकारचा राजीनामा द्यावा लागला, असे पत्रकारांनी त्यांना खोदून खोदून विचारले, तेव्हा नितीश कुमार यांनी – “काम करने में दिक्कत हो रही हैं”, असे बिहारीछाप उत्तर दिले. एकीकडे जनता दल युनायटेड या पक्षाचे अध्यक्षपद नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच स्वत:कडे खेचून घेतले व त्या पदावरून ललन सिंह यांना हटवले. आता पक्षाचे अध्यक्षपद व राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे आणि भाजपासारखा शक्तिशाली राष्ट्रीय पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. काँग्रेस-राजदबरोबर नितीश कुमार यांना सुरक्षित वाटत नव्हते. त्यांना स्वत:च्या भविष्याची काळजी जास्त वाटत होती, म्हणूनच एनडीएमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय झट की पट त्यांनी घेतला.

नितीश कुमार हे एका रात्रीत एनडीमध्ये परतलेले नाहीत किंवा भाजपाबरोबर पुन्हा घरोबा करण्याचा निर्णय त्यांनी अचानक घेतलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच बिहारचे भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांची कूटनिती यशस्वी ठरली व लोकसभा निवडणुकीच्या अगोदर व इंडियामध्ये जागावाटप होण्यापूर्वी नितीश कुमार आपल्या आमदार-खासदारांचा फौजफाटा घेऊन एनडीएमध्ये सामील झाले. जनता दल युनायटेडचे मुख्य प्रवक्ते व नितीश कुमार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे के. सी. त्यागी यांनीही नितीश कुमार यांना भाजपाकडे वळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जनता दल युनायटेडचे १६ खासदार आहेत. बिहारमधून भाजपचे १७ खासदार निवडून आले आहेत. या राज्यातून ४० पैकी ३९ खासदार हे एनडीएचे आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहेत, त्यासाठी बिहारमधील जागा महत्त्वाच्या आहेत. जनता दल यू व भाजपा यांची युती झाल्यामुळे बिहारमध्ये २०१९ च्या लोकसभा निकालाची यावेळी पुनरावृत्ती होऊ शकते.

नितीश कुमार यांनी काँग्रेस-राजदला बरोबर घेऊन बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यावर, “मर जाना कबूल है, उनके साथ जाना कबूल नहीं हैं”, असे भाजपाबाबत म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही, “नितीश के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद”, असा खणखणीत इशारा दिला होता. जातीवादाचे विष पसरविणाऱ्या नितीश यांना भाजपा कधीच घेणार नाही, असेही म्हटले होते. पण नितीश कुमार यांच्या एनडीए वापसीनंतर भाजपाने त्यांचे स्वागत केले आहे, जनता दल यू हा आपला नैसर्गिक मित्र असल्याचे म्हटले आहे.

बिहारमधील जात गणनेचे शिल्पकार ही नितीश कुमार यांची देशाला नवीन ओळख आहे. केंद्रातून भाजपा सरकार येत्या लोकसभा निवडणुकीत हटविण्यासाठी त्यांनीच विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. जून २०२३ मध्ये पाटणा येथे भाजपाच्या विरोधात दोन डझन राजकीय पक्षांच्या प्रमुखांची बैठक त्यांनी घेतली व त्यातून इंडिया आघाडी स्थापनेची कल्पना पुढे आली. भाजपाच्या हिंदुत्वाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी सामाजिक न्याय हे शस्त्र प्रभावीपणे वापरायचे ही कल्पना नितीश कुमार यांचीच होती. पण त्यांनीच भाजपाच्या छावणीत अकस्मात उडी मारल्यामुळे ते शस्त्र बाहेर काढण्याअगोदरच बोथट झाले.

बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याच्या घटनेनंतर १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव व मायावती यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. भाजपाला मतविभाजनाचा लाभ मिळू नये यासाठी माया-मुलायम एकत्र आले होते. तोच प्रयोग २०२४च्या लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देऊन करण्याचे इंडिया आघाडीने ठरवले. पण माघार कुणी घ्यायची यावर सारे गाडे अडले. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनी स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. इंडिया आघाडीचे करविते नितीश कुमार, तर भाजपाच्या वळचणीस जाऊन बसलेत. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेशात ११ जागांवर बोळवण करून आपले काम सुरू केले.

नितीश कुमार हे दोन दशके मुख्यमंत्रीपदाच्या मखरात असले तरी त्यांच्या पक्षाला बिहारमध्ये कधीच स्वबळावर बहुमत मिळाले नाही. तसेच भाजपा, काँग्रेस किंवा राजद यांचीसुद्धा स्वबळावर बहुमत मिळवू, अशी ताकद नाही. नेत्यांच्या भाऊगर्दीत नितीश कुमार हे लवचिक असल्याने सर्वांना युती करण्यासाठी परवडतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावे लागते. सन २०२२ मध्ये नितीश कुमार १६ खासदारांसह एनडीएतून बाहेर पडले. पण काँग्रेसने त्याला अपेक्षित महत्त्व दिले नाही. स्वत: नितीश कुमार हे लालू प्रसाद यादव यांना बरोबर घेऊन १० जनपथ, दिल्ली येथे गेले व विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी पुढाकार घ्यावा, अशी त्यांनी सोनिया गांधी यांना विनंती केली. पण चार महिने झाल्यावरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. नितीश कुमार यांनी दिल्लीला जाऊन सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देऊन पाटणा येथे पहिली बैठक घेतली. बंगळूरु, मुंबई बैठकीनंतर इंडिया आघाडीला आकार येऊ लागला होता. जागा वाटपास विलंब का होतो आहे, असे नितीश कुमार यांनी वारंवार विचारूनही काँग्रेसने उत्तर दिले नाही. उलट हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथे जागा वाटप होणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू अशा राज्यांत जागा वाटपांसाठी काँग्रेस आग्रही आहे.

भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या नितीश कुमार यांना भाजपाने का जवळ केले? महाआघाडी सरकार पडावे असे नेमके कोणते कारण घडले? आमचे सरकार आले की, मीडियाला लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य मिळेल, असे विरोधकांच्या मंचावरून आश्वासन देणाऱ्या नितीश कुमार यांना भाजपाची भूमिका एकदम कशी योग्य वाटू लागली? बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्यानंतर भाजपाने मोठा हंगामा तर केलाच, पण स्वत: पंतप्रधानांनीही नितीश कुमार यांची मानसिकता कशी आहे हे जाहीरपणे सांगितले… जे भाजपाला केंद्रातून हटवायला निघाले होते, तेच भाजपाच्या अचानक कवेत जाऊन बसले आहेत… “आपल्या मूर्खपणामुळे जतीराम मांझी मुख्यमंत्री झाले होते”, असे भर विधानसभेत त्यांना उद्देशून नितीश कुमार बोलले होते, तेव्हा मांझी यांचा अवमान झाल्याची चर्चा झाली. भाजपाबरोबर असलेले मांझी व चिराग पासवान आता नितीश कुमार यांचे समर्थक बनले आहेत. जय श्रीराम व जय पलटूराम अशा दोन्ही घोषणा बिहारमध्ये दिल्या जात आहेत.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -