Monday, May 6, 2024
Homeअध्यात्ममीपणाचे विसर्जन करून राहावे सुखदुःखातीत

मीपणाचे विसर्जन करून राहावे सुखदुःखातीत

ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

भक्ती म्हणजे संलग्न होणे. विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली, तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी, तीत कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून, बैरागी होऊन मठ बांधला, पण मठाच्या बंधनात पडला, देवाला दागिने घातले, का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून! चांगल्या कृत्यांतसुद्धा मी कसा लपून बसलेला असतो बघा! थोडक्यात म्हणजे, मीपणाचे विसर्जन केले पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत कुठे? आपण कर्ते म्हटले; परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? पण नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे, त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे. ‘हे सर्व ईश्वराचे आहे’ हेच सार वेदश्रुती सांगतात.“हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे,” असे संत सांगतात; दोघांचेही सांगणे एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे, हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा, असे म्हणावे.

संताजवळ आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी, नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्समागमात असावे. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार चांगला परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर, उगीच कुणाला मारावेसे वाटेल; ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर त्याने जपच करू, माळेने काही आपण कुणाला मारणार नाही. आपल्या पोषाखात, वागण्यात, बोलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते; म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासरामागून येते, तसे संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात् आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण संताच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की, आपले कर्तृत्व संपले, असे मानले पाहिजे. सत्संगतीने साधकाची वाढ होते.संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. संतांना भक्तीचे व्यसन असते. ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत; म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच खरा उपयोगी पडतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -