Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखCongress : काँग्रेसला गळती; राहुल गांधींचे अपयश

Congress : काँग्रेसला गळती; राहुल गांधींचे अपयश

लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १५ दिवसांत कधीही जाहीर होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत एनडीए हा मोठ्या ताकदीशी लोकसभेच्या रणांगणात उतरेल. ‘अब की बार, ४०० पार’चा नाराही भाजपाकडून देण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआयच्या कारवाईत अडकलेले विरोधक इंडियाच्या नावाखाली एकत्र आले असले तरी, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात असलेली उदासीनता आणि नाराजी पाहता, पंतप्रधान मोदींच्या अश्वमेधाच्या घोड्यापुढे काँग्रेस किती काळ तग धरेल, हा आता जनतेपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील नाराजीतून भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या आठ दिवसांचा आढावा घेतला, तर काँग्रेसला कशी उतरती कळा लागली आहे, हे दिसून येईल. राज्यसभा निवडणुकीत बुधवारी झालेल्या क्रॉस व्होटिंगची पुन्हा नव्याने चर्चा सुरू आहे. त्यात हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार राहणार की जाणार याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. खरे तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता; परंतु तरीही भाजपाच्या उमेदवाराला काँग्रेसच्या आमदारांनी मतदान केल्याने काँग्रेसचे सिंघवी यांचे संसदेत जाण्याचे स्वप्न भंगले. राज्यसभा निवडणुकीत तीन अपक्ष आणि काँग्रेसच्या ६ आमदारांनी सरकारची साथ सोडली. क्रॉस व्होटिंगमध्ये भाजपा उमेदवाराचा विजय झाला. हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसवर आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, तर दुसरीकडे भाजपाने राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली आहे. हिमाचल प्रदेशमधील राजकारणात अस्थिरता आली असून, सत्ताधारी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे उघड चित्र आहे. विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला फोन करत सतर्क केले असून, मुख्यमंत्री बदलला नाही, तर राज्यातील सरकार जाईल, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याबद्दलची नाराजी त्यांनी वरिष्ठांना बोलून दाखवली. मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा देण्याची अनेक आमदारांची मागणी आहे. त्यामुळे त्याचा विचार करावा, असे आवाहन विक्रमादित्य यांनी हायकमांडला केले आहे.

राज्यापासून केंद्रीय नेतृत्वापर्यंत म्हणणे पोहोचवले होते, पण त्यात कुणीही ऐकले नाही आणि कारवाई झाली नव्हती. आमदारांना मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याकडून छळले जात होते. काँग्रेस आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात काम करू दिले जात नव्हते. अनेकदा वरिष्ठांना सांगितले, पण त्यावर काहीच केले जायचे नाही. आमदारांची घुसमट होत होती. काम होत नसल्याने लोक प्रश्न विचारायचे, त्यामुळे असा निर्णय का घ्यावा लागला, असे सुक्खू यांच्या सरकारमधील नाराज असलेल्या सुधीर शर्मा यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशात अधिवेशन सुरू असताना भाजपाच्या १५ आमदारांना निलंबित केल्याने विधेयक मंजूर करण्यात काँग्रेस सरकारला यश आले असले तरी, अल्पमतातील सरकारपुढील संकट टळलेले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमधील काँग्रेसच्या एकमेव खासदार गीता कोडा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. झारखंडच्या सिंहभूम मतदारसंघाच्या खासदार कोडा या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी आहेत, तर बिहार राज्यातील काँग्रेसचे दोन आमदार आणि एक राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आमदार यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे मुरारी प्रसाद गौतम आणि सिद्धार्थ सौरव यांनी बिहारमध्ये काँग्रेस कसे नेतृत्वहीन आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपाचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांच्या प्रभावामुळे विरोधी पक्षातील आमदार, खासदार हे भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काल महाराष्ट्रातील लातूरचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील आणि सोलापुरातील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बसवराज पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे लिंगायत समाजातील एक प्रबळ चेहरा काँग्रेसने गमावला आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली, त्याच दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम राम केला होता. तेव्हापासून सुरू झालेली काँग्रेसमधील गळती थांबायला तयार नाही. आता लोकसभा निवडणुका समोर आहेत; परंतु ज्या काँग्रेस उमेदवारांना जनता मतदान करणार आहे ते काँग्रेसचे लोकप्रतिनिधी पुढील पाच वर्षांसाठी पक्षाची एकनिष्ठ राहतील का?, ते दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत याची आता काँग्रेसचे तिकीट देणाऱ्या नेत्यांनाही खात्री नाही, तर मग अशा लोकप्रतिनिधींना निवडून देऊन जनता आता काँग्रेसला मतदान करून चूक करणार नाही, असा बहुसंख्य वर्ग तयार झालेला दिसतो आहे.

इंडिया आघाडीच्या नावाखाली विरोधक एकत्र आले असले तरी, त्याच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने, मत मागताना जनतेला काय तोंड दाखविणार?, असा प्रश्न आता काँग्रेस पुढे उभा राहिला आहे. आपल्या पक्षातील आमदार, खासदारांचे समाधान करण्यात राहुल गांधी यांनाही अपयश आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या यात्रेला रस्त्यावर गर्दी दिसत असली, तरी त्याचे मतांमध्ये रूपांतर होईल, असे वाटत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -