Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीराहुल गांधींविरोधात कुन्नूमेल सुरेंद्रन भाजपाचे उमेदवार

राहुल गांधींविरोधात कुन्नूमेल सुरेंद्रन भाजपाचे उमेदवार

वायनाड मतदारसंघाकडे लागले संपूर्ण देशाचे लक्ष

तिरुअनंतपुरम : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीमुळे मागील लोकसभा निवडणुकीपासूनच ‘हाय प्रोफाईल’ झालेल्या केरळमधील वायनाड मतदारसंघातील लढत यावेळी चुरशीची होण्याची शक्यता आहे. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष असूनही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी ॲनी राजा यांना वायनाडमधून उभे केल्यानंतर आज भाजपनेही प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे.

भाजपने आज केरळमधील आपले चार उमेदवार जाहीर केले. सुरेंद्रन यांना वायनाडमधून उमेदवारी देतानाच भाजपने श्री शंकरा संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू के. एस. राधाकृष्णन यांना एर्नाकुलम, अभिनेते जी. कृष्णकुमार यांना कोल्लम आणि माजी प्राध्यापक टी. एन. सरसू यांना अलातूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. केरळमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी आणि माकपच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी यांचेच वर्चस्व राहिले आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या भाजपाने त्यामुळेच केरळमधील राजकारणात मुसंडी मारण्याचा निश्चय केल्याचे सुरेंद्रन यांना दिलेल्या उमेदवारीमुळे स्पष्ट होत आहे.

वायनाड हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला
वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत पारंपरिक अमेठी मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसलेल्या राहुल गांधी यांना वायनाडने साथ दिल्याने त्यांना लोकसभेत प्रवेश करता आला होता. या निवडणुकीत तूर्त तरी राहुल यांनी वायनाड या एकाच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघात त्यांना कोणतेही आव्हान नव्हते. यावेळी मात्र, केरळमधील सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या भाजपाने ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीनंतरही राहुल गांधी यांनी आत्मविश्वास दाखवत हाच मतदारसंघ कायम ठेवला आहे. आता मात्र सुरेंद्रन यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कुन्नूमेल सुरेंद्रन यांच्यावर जबाबदारी
कुन्नूमेल सुरेंद्रन हे केरळमधील भाजपाचा आक्रमक चेहरा मानले जातात. मागील चार वर्षांपासून ते राज्य भाजपाचे नेतृत्व करत आहेत. काही वर्षांपूर्वी शबरीमला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. भाजपाच्या युवा मोर्चाचे वायनाड जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असल्याने त्यांना हा मतदारसंघ नवा नाही. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पतनमतित्त या मतदारसंघातून आणि नंतर पोटनिवडणुकीतही कोन्नी मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र भाजपाने त्यांना थेट राहुल यांच्याविरोधातच रिंगणात उतरवून मोठी जबाबदारी अंगावर टाकली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -