Sunday, April 28, 2024
Homeअध्यात्मखरे कनवाळू संतच करू जाणोत

खरे कनवाळू संतच करू जाणोत

  • महिमा गजाननाचा : प्रा. प्रवीण पांडे, अकोला

हरी पाटील हे श्री गजानन महाराजांचे भक्त झाले. त्यांनी महाराजांशी अद्वातद्वा भाषण करणे सोडून दिले. पण इतर बंधू मात्र एक दिवस हरी पटलास म्हणू लागले की, हरी तू त्या जोगड्याला का भितोस. आपण पाटलाचे कुमार आहोत. या गावाचे जमेदर आहोत. असे असून तूच त्या नागड्याच्या पायावर शिर ठेवतोस. त्या पिष्याचे थोतांड गावात माजले आहे. ते थांबवून लोकांना सावध केले पाहिजे. असे जर आपण केले नाही, तर गावातील मंडळी त्याच्या मागे वेडे होतील आणि पाटलाचे कर्तव्यच आहे मुळी गावास हुशार करण्याचे. असे साधूचे वेष घेऊन बायाबापड्यांना फसवितात. आपणदेखील या साधूची सत्यता तपासून पाहिली पाहिजे, असे बोलून हरी पाटील सोडून इतर बंधू ऊस हातात घेऊन श्री महाराजांच्या अंगावर धावून आले. त्यावेळी भास्कर पाटलांनी त्या मुलांना समजविण्याचा प्रयत्न केला. पण ती मुले मुळीच ऐकेनात. त्यांनी मंदिरात येऊन श्री महाराजांना विचारले, अरे पिष्या या उसाला तू खातोस का? तुला जर हे ऊस खायचे असतील, तर आमची एक अट आहे. आम्ही या उसांनी तुला मारू. तुझ्या अंगावर जर वळ उमटले नाही, तरच आम्ही तुला योगी मानू. यावर महाराज काहीच बोलले नाही. या मौनास श्री महाराजांची मूक संमती समजून त्या मुलांनी महाराजांना उसाने मारणे सुरू केले. हा प्रकार पाहून इतर लोक, जे मंदिरात होते ते घाबरून सैरावैरा पळू लागले. भास्कर महाराज पोरांना म्हणाले,

भास्कर म्हणे पोरांसी
नका मारू समर्थांसी
या उसाने आज दिवशी
हे काही बरे नव्हे ll८०ll
तुमचा पाटील कुळात
जन्म झाला आहे सत्य
तुमचे असावे दयाभुत
अंतःकरण दिनंविषयी ll८१ll
हे महासाधू तुम्हासी l
जरी न वाटतील मानसी l
तरी हिन दीन लेखून यांसी l
द्यावे सोडून हेच बरे ll८२ll

हे भास्कर महाराजांचे बोलणे त्या मुलांनी मनावर घेतले नाही आणि समर्थांना मारणे सुरूच ठेवले. हे सर्व सुरू असताना श्री महाराज जरासुद्धा डगमगले नाही. उलट मुलांकडे पाहून हसत बसले. हे पाहून मुले भ्याली. श्रीमहाराजांच्या पाया पडू लागली. महाराज पोरांना म्हणाले :

महाराज म्हणती पोराला
मुलांनो तुमच्या कराला
असेल अती त्रास झाला
मरण्याने मजलागी ll९०ll
त्या श्रमाचा करण्या नाश
काढून देतो इक्षू रस
तुम्हालागी प्यावयास
या बसा माझ्यापुढे ll९१ll

किती ही भक्तांवर माया. ज्या पोरांनी आपल्याला उसांनी यथेच्छ मारले नव्हे, झोडपले त्यांना प्रेमाने बोलून उसाचा रस काढून पाजला. हे फक्त खरे कनवाळू संतच करू जाणोत आणि म्हणून सार जग त्यांना माऊली म्हणते. त्या सर्व उसाची मोळी श्री महाराजांनी पोरांना हाताने पिळून त्यातील रस प्राशन करण्यास दिला. हे श्री महाराजांचे योग सामर्थ्य होय. हे सारे वर्तमान मुलांनी घरी जावून खंडू पाटलास सांगितले. हे ऐकून खंडू पाटील चकित झाले.आणि तिथून पुढे ते श्री महाराजांच्या दर्शनाला येऊलागले. श्री कुकाजी पाटलांचा वृद्धापकाळ जवळ येत चालला होता.

एक दिवस ते खंडू पाटील यांना म्हणाले, “तू प्रतिदिवशी श्री महाराजांच्या दर्शनाला जातोस, मला सांगतोस की महाराज हे साक्षात्कारी संतआहेत. मग त्यांच्याशी बोलतांना तुझी वैखरी का बरे मुग्ध होते? तुला पोरबाळ नाही. मलादेखील नातवंडांचे बोलणे खेळणे डोळ्याने बघावयाची इच्छा आहे. आज तू समर्थ श्री महाराजांना विनंती कर. त्यांना म्हणावे, माझ्यावर करुणा करा. एखादे तरी पोर, अपत्य द्यावे मजला.” खंडू पाटील महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांनी श्रींना विनंती केली. श्री महाराजांनी खंडू पाटलांची थोडी गम्मत केली आणि ते खंडू पाटलाला म्हणाले की, तू आम्हास याचना केलीस. याचना म्हणजे भीक मागणे. हे तू आज केलेस. तुला बालक होईल त्याचे नाव भिक्या ठेवशील. तुला मूल झाल्यास द्विजांना आम रसाचे भोजन घालावे. संप्रदाय (उपक्रम) आज तागायत पाटील मंडळींनी पुढे चालवीला आहे. पुढे कुकाजी पाटील नातवंडाचे मुख्य पाहून स्वर्गवासी झाले. शेगाव या गावात पहिलेपासूनच पाटील व देशमुख यांच्यात दुफळी होती. एकमेकांचे मुळीच पटत नसे. कुकाजी पाटील स्वर्गवासी झाल्यामुळे खंडू पाटील उद्विग्न झाले होते. पुढे देशमुख मंडळींनी पाटलावर बालंट आणले.
ती कथा पुढील लेखात पाहूया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -