Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआर्थिक वर्षास निरोप

आर्थिक वर्षास निरोप

  • मुंबई ग्राहक पंचायत: उदय पिंगळे

सन २०२२-२०२३ संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले आहेत. आयकर वाचवावा म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुंतवणूक केली जाते. या गडबडीत काही चुका होऊ शकतात. अनेकदा विमा कंपन्यांच्या विविध योजना अगदी अखेरच्या क्षणी फारसा विचार न करता खरेदी केल्या जातात. आर्थिक बाबतीत होणारी कोणतीही चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच, तेव्हा विमा योजना खरेदी करताना होणाऱ्या संभाव्य चुका आणि त्यावरील उपाय याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.

टर्म इन्शुरन्स घेणे –

जर तुम्ही इन्शुरन्स योजना घेण्याचा प्रथमतः विचार करत असाल, तर आपल्या कार्यकालावधी एवढा टर्म इन्शुरन्स घ्या. अतिशय कमी प्रिमियममध्ये आपल्या कुटुंबाला सदस्यांना दुर्धर प्रसंगी आर्थिक आधार मिळतो. अन्य कोणत्याही प्रकारचा विमा यासाठी पुरेसा होऊ शकत नाही. योग्य आणि पुरेसा हे सापेक्ष शब्द आहेत. तरीही सर्वसाधारण संकेत असा की आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २० पट, अधिक आपल्यावर असलेले कर्ज यांच्या बेरजेएवढ्या रकमेचे विमाछत्र हवे.

आता अनेक विमा कंपन्यांनी प्रीमियम परत देणाऱ्या, प्रीमियम अधिक काही विशिष्ट परतावा देणाऱ्या, विशिष्ट वर्ष सलग रक्कम भरल्यावर पुढील कालावधीत विमाछत्र देणाऱ्या अथवा एकदाच रक्कम भरून दीर्घकाळ विमा संरक्षण देणाऱ्या योजना बाजारात आणल्या आहेत. जेव्हा अधिक काहीतरी मिळणार तेव्हा त्यासाठी अधिक प्रीमियम द्यावा लागणार हे सूत्र लक्षात ठेवावे. विमा कंपन्या व्यवसाय करण्यासाठी स्थापन झाल्या आहेत, दानधर्म करण्यासाठी नाहीत. तेव्हा दर वर्षी विशिष्ट रक्कम भरून मिळणारे संरक्षण ज्याला इन्शुरन्सच्या भाषेत प्युअर टर्म इन्शुरन्स म्हणतात, अशाच योजनांचा विचार करावा. अशा योजना लवकरात लवकर घेतल्याने प्रीमियम कमी पडतो. दर वर्षी तो न चुकता भरावा आणि निश्चिंत राहावे.

विमायोजना आणि गुंतवणूक यांची सरमिसळ टाळा –

विमा संरक्षण आणि गुंतवणूक एकत्रितपणे देणाऱ्या योजना घेऊ नका कारण, विमाछत्र मिळावे म्हणून तुम्ही त्या घेत असाल, तर त्याचा प्रीमियम खूप जास्त असल्याने वर उल्लेख केल्याएवढे पुरेसे संरक्षण तुम्ही कुटुंबास देऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही योजना कालावधी पूर्ण केलात तरी मिळणारा परतावा हा बाजारदाराहून कमी असेल तेव्हा अशा योजना टाळा. केवळ करसवलत आणि परतावा पाहिजे असेल म्युच्युअल फंडाच्या युनिट संलग्न गुंतवणूक योजना (इएलएसएस) योजना किंवा पीपीएफ यांचा स्वतंत्रपणे अथवा संयुक्त रीतीने विचार करता येईल.

नाव आकर्षक वाटले म्हणून योजना खरेदी करू नका –

गुंतवणुकीच्या अनेक योजना आकर्षक नावाने बाजारात आणल्या जातात आणि त्यांचा आक्रमकपणे प्रचार /प्रसार केला जातो. खास मुलांसाठीच्या योजना, निवृत्ती नियोजन योजना, आत्मसन्मान / स्वावलंबन / आत्मनिर्भर / समृद्ध जीवन / गोल्डन इयर अशा काहीशा आकर्षक नाव असलेल्या विमा कंपन्यांच्या योजना आपले लक्ष वेधून घेतात; परंतु त्यातून मिळणारा परतावा हा बाजारात उपलब्ध असलेल्या परताव्याच्या तुलनेत कमी असतो.

इंडेक्स फंडात दीर्घकाळ केलेली गुंतवणूक तसेच वर उल्लेख केलेली इएलएसएस मधील गुंतवणूक यांनी दीर्घकाळात उत्तम परतावा दिला असल्याने आपण त्यांचा विचार करू शकतो आणि विमाछत्र हवं असल्यास टर्म इन्शुरन्सची जोड देऊ शकतो.

खात्रीपूर्वक परतावा याचाच अर्थ कमी परतावा –

खात्रीपूर्वक परतावा हे दोन शब्द गुंतवणूकदारांच्या दृष्टीने परवलीचे शब्द आहेत. सहजता, रोकड सुलभता आणि आकर्षक परतावा याचे एकत्रीकरण असलेल्या एकमेव योजनेच्या शोधात सर्व गुंतवणूकदार आहेत; परंतु अनेक योजनांतून सर्व दृष्टीने समाधान करणारी एकही योजना बाजारात नाही. थोड्या लोभापायी अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर निश्चित खात्रीपूर्वक परतावा देणाऱ्या कोणत्याही योजना या नेहमीच बाजारात उपलब्ध परताव्याहून कमी परतावा देत असतात. तेव्हा योजना निवडताना केवळ एवढाच निकष विचारात घेऊ नका.

आरोग्यविमा घ्या –

आरोग्यावरील खर्चात सातत्याने होणाऱ्या वाढीकडे दुर्लक्ष करू नका. आपण आणि आपले कुटुंबातील सदस्य या सर्वाची गरज भागवणारा आरोग्य विमा आपल्याकडे असायलाच हवा. याची प्राथमिक पॉलिसी तरी असावी, तिला टॉप अप करून संरक्षण वाढवता येऊ शकते.
आपण कुठे राहतो? – गावात, शहरात की महानगरात, त्यानुसार आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २ ते ५ पट आरोग्यविमा असणे गरजेचे आहे. आपल्या ऑफिसकडून अशी सुविधा मिळत असेल तरीही आपली स्वतःची योजना असावी. आपण नोकरी सोडताच ऑफिसकडून मिळणारी सुविधा ताबडतोब बंद होते.

विचलित होऊ नका –

हे सर्व तुम्ही आत्ताच वाचलं आणि आजच तुम्ही केलेली चूक तुमच्या लक्षात आली असेल. पण त्यामुळे विचलित न होता, योजना मंजुरी मिळाल्यावर आपणास हवी असलेली योजना कोणतेही कारण न देता पुढील १५ दिवसांत रद्द करू शकतो. असे केल्यास प्रशासकीय खर्च वगळून भरलेल्या प्रिमियममधील बरीचशी रक्कम आपल्याला परत मिळू शकते. या सुविधेचा लाभ घेऊन केलेली चूक दुरुस्त करा. त्याचप्रमाणे अशा चुका भविष्यात करू नका. गुंतवणूक ही आयत्या वेळी घाईघाईने करायची गोष्ट नसून विचार करून घेण्याचा निर्णय आहे. कोणत्याही विमा योजना हा त्यावरील हमखास उपाय नाही, हे लक्षात ठेवून येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाचे नियोजन करण्यास सुरुवात करा.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -