Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाआयपीएलचा चषक उंचावण्यासाठी गुजरात-राजस्थानमध्ये आज महामुकाबला

आयपीएलचा चषक उंचावण्यासाठी गुजरात-राजस्थानमध्ये आज महामुकाबला

जेतेपदासाठी झुंज

सलग दोन महिने सुरू असलेल्या आयपीएल २०२२ स्पर्धेतील आज शेवटचा सामना आहे. एकुण ७३ सामन्यानंतर फायनलचे दोन संघ निश्चित झाले आहेत. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या पहिल्याच वर्षी अंतिम फेरीत प्रवेश करणारा गुजरातचा संघ पदार्पणातच विजेतेपद मिळवून राजस्थानच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. टायटन्सच्या टीमने, तर आयपीएलच्या पहिल्या हंगामात धमाका करून गुजरातच्या टीमने पदार्पणात थेट फायनलमध्ये धडक मारली. दोन महिन्यांपूर्वी हंगाम सुरू झाला, त्यावेळी संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या फायनल टॉससाठी मैदानावर उतरतील, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. मेगा ऑक्शननंतर या दोन टीम्सना क्रिकेटच्या अनेक जाणकारांनी पसंती दिली नव्हती. पण आज त्यांनी आपल्या परफॉर्मन्सने सर्वच टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

ज्योत्स्ना कोट-बाबडे

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अंतिम फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचा महामुकाबला रविवारी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रात्री ८ वाजल्यापासून हा सामना रंगणार आहे. गुजरातने स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला असून, राजस्थान रॉयल्स १४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर अंतिम सामना खेळणार आहे.

राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्वालिफायर-१ मध्ये ते गुजरातकडून हरले. पण क्वालिफायर-२ मध्ये बंगळूरुचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. संजू सॅमसनचा संघ २००८ नंतर पहिल्यांदाच फायनल खेळणार आहे. या १४ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न ते करतील. आयपीएलच्या साखळी सामन्यांमधील सर्वोत्तम संघांपैकी एक, गुजरातकडे डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या आणि राहुल तेवतिया यांची ताकद आहे, दुसरीकडे राजस्थानकडे जोस बटलर रेड-हॉट फॉर्ममध्ये आहे तर युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅकॉय सर्व जोरदार फॉर्मात आहेत.

हार्दिक पंड्या, राशिद खान, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर आणि मोहम्मद शमी हे गुजरातच्या टीमचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. कर्णधार हार्दिकने प्रत्येक सामन्यात जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेऊन डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. राशिद खानने ज्या सामन्यात चेंडूने शक्य झालं नाही, तिथे बॅटने योगदान दिले, तर तेवतिया आणि मिलर या दोघांनी फिनिशरची भूमिका चोख बजावली. दोघांनी शेवटच्या एक-दोन चेंडूंवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. शमीने प्रारंभीच्या षटकात बॉल स्विंग होत असताना विकेट काढल्या. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात गुजरातचा संघ सरस ठरला.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सला शेन वॉर्नसाठी किताब जिंकायचा आहे. काही महिन्यांपूर्वी शेन वॉर्नच निधन झालं. राजस्थानचे हे आयपीएल विजेतेपद ही शेन वॉर्नसाठी योग्य श्रद्धांजली ठरेल. राजस्थानच्या टीममध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल तसेच यंदा सर्वाधिक धावा करणारा जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनसारखे दिग्गज खेळाडू आहेत, जे कर्णधार संजू सॅमसनपेक्षा अधिक अनुभवी आहेत. पण संजूने या सर्व दिग्गजांना सोबत घेऊन यशस्वी टीमबांधणी केली आहे. राजस्थानची टीम फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात संतुलित आहे.

त्यामुळे राजस्थानचा संघही गुजरातप्रमाणेच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. विजयी सातत्य राखल्याने या सामन्यात दोन्ही संघांत बदल होण्याची शक्यता नाही. उत्सुकता ताणल्या गेलेल्या या फायनलमध्ये गुजरात पहिल्याच प्रयत्नात स्पर्धेत खेळताना ट्रॉफीवर कब्जा करून इतिहास रचतो की, राजस्थान दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवतो, हे आज कळेलच. अर्थात जो आज सर्वोत्तम खेळणार तोच विजेता होईल.

शेन वॉर्नला वाहणार राजस्थान श्रद्धांजली

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील अंतिम सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान विजेते ठरले होते. त्यावेळी संघाचा कर्णधार शेन वॉर्न होता. आयपीएलच्या पहिल्या सत्रात शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता आणि संघाने विजेतेपद पटकावले होते. यंदाचे आयपीएल सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे. संजू सॅमसन आणि त्याच्या संघाने या मोसमात सातत्यपूर्ण खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे. या मोसमात विजय मिळवून हा विजय या दिग्गज खेळाडूला समर्पित करावा, असा संघाचा प्रयत्न आहे.

ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद वेळ : रात्री ८ वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -