Monday, May 6, 2024
Homeदेशदेशात कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांची प्रगती अत्यंत झपाट्याने होत आहे : नरेंद्र...

देशात कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांची प्रगती अत्यंत झपाट्याने होत आहे : नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली (हिं.स) : देशात कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांची प्रगती अत्यंत झपाट्याने होत आहे, असे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्र आणि राज्य सरकारांसह भारतीय कृषी संशोधन परिषद आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्रे यांसह अनेक घटकांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे, लाखों शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन तोमर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, उत्पन्न वाढलेल्या लाखो शेतकऱ्यांपैकी, ७५,००० शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे संकलन असलेल्या ई-पुस्तकाचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते झाले. त्याशिवाय, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, अशा शेतकऱ्यांची राज्यनिहाय यादीदेखील यावेळी प्रकाशित करण्यात आली. ही ई-पुस्तके आयसीएआरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यावेळी आयसीएआरच्या ९४ व्या स्थापना दिनानिमित्त, तोमर यांच्या हस्ते, कृषिवैज्ञानिक आणि शेतकऱ्यांना पुरस्कारही वितरित करण्यात आले.

आयसीएआरच्या दिल्लीतील, पुसा संस्थेच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात पुढे बोलतांना तोमर यांनी सांगितले की, गेल्यावर्षीच आयसीएआरने असा निश्चय केला होता, की यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५,००० शेतकऱ्यांच्या यशोगाथा एकत्रित करुन, त्यांचा एक दस्तऐवज तयार करायचा, त्यांचा हा संकल्प पूर्ण होत आहे, त्यामुळे हा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे, असे तोमर म्हणाले. इतक्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे हे संकलन देशाच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोंदले जाईल, असेही ते पुढे म्हणाले. आयसीएआर- भारतीय कृषी संशोधन परिषदेचा स्थापना दिवस ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला पाहिजे. यानिमित्ताने वर्षभराचे संकल्प करून ते पुढील स्थापना दिनापर्यंत पूर्ण करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, आयसीएआरची स्थापना होऊन ९३ वर्षे झाली आहेत. आयसीएआरने १९२९ मध्ये स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सुमारे ५,८०० बियाण्यांचे वाण बाजारात आणले आहे. २०१४ पासून आतापर्यंतच्या आठ वर्षात त्यापैकी सुमारे २,००० जातींचा समावेश आहे. ही अतिशय महत्त्वाची कामगिरी आहे. यामध्ये बागायती, हवामानास अनुकूल आणि फोर्टिफाइड वाणांचे बियाणे समाविष्ट आहे. आज आपण हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देत आहोत. वैज्ञानिकांसाठी ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. भारताच्या कृषी निर्यातीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी आपल्याला या दिशेने एक रोडमॅप तयार करावा लागेल आणि त्याचे परिणाम देशासमोर मांडावे लागतील. यामध्ये सर्व कृषी विज्ञान केंद्र आणि आयसीएआर संस्थांच्या शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

आयसीएआरच्या कामगिरीच्या इतिहासाचे दस्तावेज तयार करण्याची सूचना या कार्यक्रमात केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केली. पोषक द्रव्ये वाढविणाऱ्या पिकांच्या नवीन बियाण्याच्या जाती विकसित केल्याबद्दल त्यांनी आयसीएआरचे कौतुक केले. संशोधन केंद्रांना या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच कृषी आणि संबंधित क्षेत्रात होत असलेल्या नवकल्पनांकडे लक्ष वेधले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावर्षी आयसीएआरने १५ विविध पुरस्कारांसाठी ९२ विजेत्यांची निवड केली. ४ संस्था, १ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, ४ कृषी विज्ञान केंद्रे, ६७ शास्त्रज्ञ आणि ११ शेतकरी (यापैकी ८ महिला शास्त्रज्ञ आणि शेतकरी) यांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले खासदार डॉ. अनिल बोंडे, शेतकरी, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -