Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यस्वप्नात रंगले मी...

स्वप्नात रंगले मी…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

तरुणपणी माणूस स्वप्नात जास्त वेळ रमतो. मग ते झोपेत पाहिलेले स्वप्न असो की, जागेपणी पाहिलेले दिवास्वप्न! पण एखाद्या रंगीबेरंगी कल्पनेत दंग होणे हेच जिवंतपणाचे, तारुण्याचे लक्षण असते. वृद्धापकाळी तर मनाला भविष्याची भीतीच वाटत राहते. स्वप्ने पडली तर ती भयकारी असतात. त्यामुळे मनाला ‘आता काही चांगले घडणे शक्यच नाही’ असे वाटू लागले की, समजावे माणूस म्हातारा झाला!

मात्र कधी कधी तरुण मनालाही स्वप्नभंगाची भीती अस्वस्थ करते. आपण गाफील राहिलो आणि आयुष्य तर तसेच पुढे निघून जाते आहे ही जाणीव बैचेन करते. अशावेळी मनात ती स्वप्ने जागीच असतात पण डोळ्यांसमोरचे भगभगीत वास्तव सत्याची कठोर जाणीव करून देते. अशाच एका आत्ममग्न अवस्थेचे वर्णन करणारे सुंदर गाणे होते ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या सिनेमात. ऑगस्ट १९६८मध्ये प्रसिद्ध झालेला हा चित्रपट मधुकर कालेलकरांच्या कथेवरचा कमलाकर तोरणे यांनी दिग्दर्शित केलेला होता. तशी ही एका प्रामाणिक उद्योजकाची कथा! ते पत्नी लक्ष्मी आणि कन्या वैजयंतीबरोबर आनंदाने आयुष्य जगत असतात.

वैजयंतीचे (उमा भेंडे) प्रेम श्रीकांत मोघेंवर असते. वडिलांच्या गाफील वागण्यामुळे त्यांना धंद्यातील भागीदाराने फसवले असते. वडिलांच्या साधेपणामुळे आपली प्रेमकहाणी अयशस्वी होणार आणि एका अपंग मुलाबरोबर आयुष्य काढावे लागणार, अशी भीती तिच्यासमोर उभी असते. तिच्या मनातील या भावना आशाताईंनी अगदी भावुक स्वर लावून व्यक्त केल्या –

स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी…”

यावर सुधीर फडकेंच्या आवाजात वैजयंतीच्या प्रियकराचे शब्द येतात –

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी
हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी

अस्सल ग्रामीण मराठीत अप्रतिम ढंगदार लावण्या लिहिणारे जगदीश खेबुडकर हेच असतील का, असा प्रश्न पडावा इतकी सुंदर, समृद्ध आणि सुंदर काव्यरचना या गाण्याची होती.

प्रेमिकांना, आपल्या मनात सुरू आहे तेच अवघ्या विश्वात सुरू आहे, असेच वाटत असते. त्यामुळे पुढच्या कडव्यात वैजयंतीची मिलनातूर भावावस्था व्यक्त करणारे शब्द येतात –

या वृक्षवल्लरींना ही ओढ मिलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी…

प्रेमिक आसुसले आहेत, त्यांना तत्काळ मिलन साधायचे आहे. आताचा एकांतातील क्षण हाच त्या शुभकार्याचा मुहूर्त आहे, असे त्यांना वाटते. निळ्या आकाशाखाली, निसर्गाच्या सान्निध्यात ते शब्दांचेच हार करून एकमेकांच्या गळ्यात घालून मिलनाचा उत्सव साजरा करू इच्छितात –
एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
या नील मंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्दसूर हे हार गुंफिले मी…

प्रियेची मन:स्थिती तर अगदी प्रणयोत्सुक आहे, अधीर आहे, अवघे भावविश्व फुलवणाऱ्या वसंत ऋतूची साक्ष तिला आपल्या मिलनासाठी पुरेशी वाटते. उभ्या आयुष्याच्या सोबतीचे वचन तर तिने प्रियाला आधीच देऊन टाकले आहे –

घेशील का सख्या तू, हातात हात माझा?
हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी…

असेच स्वप्नातील अमूर्त कल्पनांवर बेतलेले एक भावगीत लिहिले होते म. पां. भावे यांनी! संगीत होते अनिल-अरुण या मराठीत एकेकाळी गाजलेल्या जोडीचे आणि पुन्हा स्वर आशाताईंचे!

स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

स्वप्न जोवर अमूर्त आहे तोवरच मजा आहे, एकदा ते उमलले, त्या कल्पना-कळीचे फूल झाले की, संपले त्याचे आयुष्य! जोवर अभिलाषेला परिपूर्तीची ओढ आहे, तोवरच जीवनाला दिशा आहे, वेग आहे, अर्थ आहे! स्वप्न पूर्ण झाले, तर आयुष्य रिते वाटू लागते. यशस्वी झालेल्या बहुतेक प्रेमकथांच्या शेवटी येणाऱ्या रितेपणाचा सूचक संकेतच जणू कवीने या ओळीत केला होता. तो म्हणतो, माणूस मनात सुखाच्या कल्पना करतो, पण त्याच्याच मनातील शंकाकुशंकामुळे त्या हवेत विरून जातात. बहुतेकदा आशेचे ढग विरळ होत अदृश्य होऊन जातात आणि मनाला पुन्हा उन्हाळ्याची काहिली सहन करावी लागते. माणसाला स्वप्नपूर्तीचा आनंद हा क्वचितच मिळणारी गोष्ट आहे –

रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधी सोशिला उन्हाळा, कधी लाभला विसावा…
स्वप्नातल्या कळ्यांनो…

मनाचे आकाश अंधारून येते. निराशेच्या काळ्याकुट्ट ढगाआड आशा कुठे लुप्त होऊन जाते, कळतही नाही. विरहाने प्रीती वाढते म्हणतात, ते खरेच आहे; पण मग ती अधीरही होते ना! कितीही चढउतार चढून आले तरी, शेवटी सफलतेच्या सुखाचा गुलाब तसाच हातात येत नाही. त्याला जोडूनच वेदनेचे काटे येतात. ते सहन करावेच लागतात.

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा…

इथे कवीने जीवनातले एक फार सूक्ष्म, तरल आणि विदारक सत्य सांगितले आहे. स्वप्नपूर्ती माणसातील उत्साह कमी करते. ती त्याला जडत्वाकडे नेते. त्यामुळे जीवनात अतृप्ती असणे गरजेचे आहे, असे काहीसे विचित्र वाटणारे पण सत्य कवितेत क्वचितच मांडले गेले असेल. पण ते म. पां. भावे यांनी केले आहे –

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणी त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा.
स्वप्नातल्या कळ्यांनो…

दिवसेंदिवस आजूबाजूचे वास्तव जास्त रखरखीत होत जाते आहे. त्यावेळी ही अशी ‘स्वप्नामधील गावा’ला घेऊन जाणारी वाट आपलीशी करावी वाटते. त्यातूनच तर येतो हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -