Sunday, April 28, 2024

गृहपाठ

वर्गात शिकविलेल्या भागावर आधारित घरी दिलेला होमवर्क म्हणजे गृहपाठ बहुतेकदा विद्यार्थ्यांना नकोसा असतो. अशात गृहपाठाचा विद्यार्थ्याला बोजा होऊ नये म्हणून गृहपाठ ही संकल्पनाच शिक्षणक्षेत्रातून काढून टाकली तर…? अर्थात गृहपाठ ही संकल्पना शिक्षणक्षेत्रातून काढणे नक्कीच शक्य नाही, कारण गृहपाठ हा घर, शाळा आणि शिक्षण यामधील दुवा आहे. त्यामुळे त्यावर आपल्याला काहीतरी सुवर्णमध्य काढता आला पाहिजे, ज्यामुळे गृहपाठाचा विद्यार्थ्यांना बोजा न होता ते एकूनच शिक्षणापासून लांब पळणार नाही.

विशेष : डॉ. मधुरा फडके

गृहपाठ ही संकल्पना एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत अस्तित्वात आली. गृहपाठ म्हणजे जो वर्गात शिकविलेल्या भागावर आधारित अधिकचा अभ्यास आणि शाळेनंतर त्यावर आधारित नेमून दिलेले काम होय. आताच्या वर्तमान परिस्थितीत जो गृहपाठ दिला जातो, त्यामुळे विद्यार्थी अगोदरच त्रासलेला किंवा तणावात असेल आणि त्यात जर त्याचे पालक त्यासाठी मदत करण्यास सक्षम नसतील, अशा वेळी तो विद्यार्थी खचून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गृहपाठाविषयी त्या विद्यार्थ्याच्या मनात नकारात्मकता आणि एकूणच शिक्षणाविषयीची कटुता निर्माण होऊ शकते.
खरंच जर आपण गृहपाठ ही संकल्पनाच शिक्षणक्षेत्रातून काढून टाकली तर…? याचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असे येईल, कारण हा काही त्यावरील उपाय असू शकत नाही. कारण गृहपाठ हा घर, शाळा आणि शिक्षण यामधील दुवा आहे. त्यामुळे त्यावर आपल्याला काहीतरी सुवर्णमध्य काढता आला पाहिजे, ज्यामध्ये गृहपाठाचा विद्यार्थ्याला बोजाही होणार नाही आणि विद्यार्थी एकूणच शिक्षणापासून लांब पळणार नाही.

मग काय करता येईल…? यावर आपण वेगळा विचार करायला हवा…! असा काही आपण विचार करू शकतो का…? विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना, सर्जनशीलतेला आणि त्याच्या कल्पकतेला वाव देणारा आणि त्यातून शिक्षणाला मजबूतपणाचा जोड देणारा व अभिरुची निर्माण करणारा गृहपाठ आपल्याला देता येईल का? उदाहरणार्थ आई, वडील यांच्यावर निबंध लिहा, असे देण्याऐवजी तुमच्या आई-वडिलांचे कोणते वागणे तुम्हाला जास्त भावते? किंवा कुटुंब वृक्ष व त्यातील तुमची आवडती व्यक्ती याविषयी लिहा किंवा तुमचे घर आणि तुमचा परिसर स्वच्छ ठेवणारे मदतनीस यांचे काम व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंविषयी लिहा. तसेच गणित या विषयात एकअंकी बेरीज शिकवतो, तेव्हा त्यांना घरी सोडविण्यास पाच गणिते देण्याऐवजी तुम्ही घरी जात असताना दिसणाऱ्या वाहनांची अंक पाटी (नंबर प्लेट) पाहून एक आकडी बेरीज करण्यास सांगू शकतो. तसेच भाषेमध्ये अनुस्वरांचे महत्त्व व त्यामुळे होणाऱ्या गमती-जमतीविषयी मुलांना संवाद साधायला सांगू शकतो.

विज्ञान विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना विविध प्रकारची खाली पडलेली झाडांची पाने गोळा करायला सांगून त्यातून विद्यार्थ्यांना पानांच्या शिरांवरून त्या झाडाची मुळे कशी ओळखायची हे सांगता येईल. थोडक्यात वनस्पती शास्त्राची ओळख व आवड विद्यार्थ्यांमध्ये करता येऊ शकते.

तसेच भूगोल हा विषय शिकविताना सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताना जर रोज आपण त्या किरणांचे मापन करण्यास सुरुवात केली, तर रोज ती किरणे आपली जागा कशी बदलतात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी घरीच एक पट्टी व कागदाच्या सहाय्याने करून ते मोजमाप करू शकतो आणि हे करताना विद्यार्थी भूगोल हा विषय शिकेलच, पण त्याचबरोबर त्याच्यात नियमितपणा व शिस्तबद्धताही शिकेल.

एकात्मिक शिक्षण देत असताना जेव्हा आई-वडील घरी लोणचे बनवत असतात, तेव्हा जर मुलांनी त्याची कृती लिहिली व त्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य व ते का वापरण्यात आले त्याची कारणे, प्रमाण व त्याचे सादरीकरण याच्या नोंदी ठेवण्यास सांगितल्यास भाषा, शास्त्र, गणित व गृहशास्त्र यांचा एकत्रित अभ्यास करता येईल.
अशा प्रकारचा जर गृहपाठ दिला, तर विद्यार्थ्यांची अध्ययनात अभिरुची निर्माण होईल आणि त्याचबरोबर या माध्यमातून विद्यार्थी विविध कौशल्यसुद्धा शिकतील.

फ्लीप क्लास रूम टेक्निक यामध्ये कुठल्याही विषयाची जुजबी माहिती वाचून आल्यास क्लिष्ट संकल्पना आणि त्याचे सखोल ज्ञान वर्गात प्रश्न-उत्तराच्या सहाय्याने देता येईल, असे मला वाटते.
थोडक्यात गृहपाठ हा फायद्याचाच आहे. कारण…

  • ही मुलाची पहिली शाळा असते.
  • संकल्पनांचे मजबुतीकरण होते.
  • शिक्षणाप्रती सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो.
  •  घरातील सकारात्मक संवाद आणि एकोपा वाढतो.
  •  विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
  •  विद्यार्थ्यांना विचार करण्यासप्रोत्साहन मिळते.
  •  चाकोरीबाहेरचा विचार करण्यास विद्यार्थी सक्षम होतो.
    (लेखिका ए. एम. नाईक स्कूल, पवई, मुंबई येथील प्राचार्या आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -