सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. अनुज थापन असे या आरोपीचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

१४ एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक केली आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू.”

दरम्यान, विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोन आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही बिहारमधील चंपारण येथील रहिवासी आहेत. तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक सुरतमधील तापी नदीमध्ये सापडली. यावेळी काही जिवंत काडतूसही सापडले.

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. येथून ते रेल्वेने भुजला गेले. तेथे प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे पुलावरून पिस्तूल तापी नदीत फेकले.

आज ट्रोल करणारे उद्या तुझे गोडवे गातील

वासीम जाफरचा हार्दिक पांड्याला सल्ला

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याच्यावर लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या पराभवानंतर अनेकांनी टीका केली. मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवरुन हार्दिक पांड्याला टीकेचे लक्ष केले जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापणाने यंदाच्या आयपीएलच्या नेतृत्त्वाची जबाबदारी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे दिली होती. आयपीएल सुरु होण्यापूर्वीपासून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये यासंदर्भात नाराजी होती. मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील हार्दिक पांड्यावर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. मात्र, भारतीय संघाच्या माजी खेळाडूने हार्दिकचं मनोबल वाढवणारी भूमिका मांडली आहे. हार्दिकच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्या खेळाडूचं नाव वसीम जाफर आहे.

तुम्ही हार्दिक पांड्यावर त्याच्या कामगिरीमुळे जितकी टीका करु शकता, तितकी टीका तुम्ही करा. सतत होणारे ट्रोलिंग आणि वैयक्तिक हल्ले होणे हे मात्र चुकीचे आहे. हार्दिक तु ठाम राहा. पुढील महिन्यात वर्ल्ड कपमध्ये तुझ्या दमदार कामगिरीनंतर हेच लोक तुझे गोडवे गाताना दिसतील, असा सल्ला वसीम जाफरने दिला आहे.

Nashik Loksabha : नाशिकची जागाही शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

महायुतीच्या पत्रकार परिषदेत केली घोषणा

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिकच्या जागेवरुन (Nashik Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपा (BJP) हे तिन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण लोकसभेतून माघार घेत असल्याचे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर केले. त्यानंतर अखेर ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. नाशिक येथे महायुतीच्या एकत्र पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

शिवसेनेकडून आज सकाळीच ठाणे व कल्याण या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाणे लोकसभेतून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकचा प्रश्न सुटला नव्हता. आज पत्रकार परिषद घेऊन नाशिकबाबतही महायुतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवार करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचा सत्कार केला.

हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शिवाय महायुतीमधील सर्व नेते पाठिशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.

ठाण्यातील कामगारांना वाली कोण? २ महिन्याच्या उपोषणानंतरही परिस्थिती जैसे थे!

ठाणे (वार्ताहर) : ठाणे येथील तीन हातनाका परिसरातील सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांनी ११ मार्चपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जुलै २०२२ पासून ते मार्चपर्यंत थकित पगार न मिळाल्याने सुपर मॅक्स कंपनीचे कामगार आक्रमक झाले आहेत. सुपर मॅक्स कंपनी बंद पडून जवळपास दीड वर्ष झाले. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्या जाऊन अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशात कंपनीने कामगारांचे थकवलेले पगार कामगारांना द्यावेत या मागणीसाठी कंपनी बाहेर तब्बल १२०० कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या कंपनीचे काही कामगार निवृत्त झाले आहेत, काही आजारी तर काही कामगार हयात नाहीत. कामगारांना अर्धा पगार देण्याचे आश्वासन असुनही त्यांना अजून पगार मिळालेला नाही. आक्रमक कामगारांनी ११ मार्चपासुन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पण तरीही कंपनी प्रशासनाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्याचा कोणताही पाठपुरावा झालेला नाही.

तब्बल २ महिने साखळी उपोषण करुनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कामगार  म्हणतात की “कामगार दिनानिमित्त आनंद व्यक्त करावा की रोजगारासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणीचं दु:ख व्यक्त करावं? हेच समजत नाही.”

साडेसाती कायम; स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर कारवाई

हार्दिक पांड्याला २४ लाख रुपयांचा तर इतर खेळाडूंना ६ लाखांचा दंड

लखनौ : मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये १० सामने खेळले आहेत. त्यामध्ये मुंबईला १० पैकी ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटसने पराभूत केले. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई इंडियन्सवर मोठी कारवाई केली आहे. हार्दिक पांड्याला एका चुकीसाठी दोषी धरत त्याच्यावर २४ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईच्या इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेट प्रकरणी दुसऱ्यांदा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने हार्दिक पांड्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडून म्हणजेच मुंबईकडून अशी चूक पुन्हा झाल्यास कॅप्टन म्हणून त्याच्यावर एक सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.

बीसीसीआयने ही कारवाई करताना म्हटले की, आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून दुसऱ्यांदा ही चूक झाल्याने केवळ हार्दिक पांड्याला दंड करण्यात आलेला नाही तर संघातील इतर खेळाडूंना देखील दंड करण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरसह सर्व खेळाडूंना दंड करण्यात आला आहे. सर्व खेळाडूंना सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के रक्कम यात जी कमी असेल तितक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.

Maharashtra day : महाराष्ट्र दिनानिमित्त अथर्व सुदामेसोबत राज ठाकरेंचं पहिलं रील!

खास संदेश देणारी रील होतेय तुफान व्हायरल

मुंबई : रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अथर्व सुदामेचा (Atharva Sudame) प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या रील्स अपलोड केल्यानंतर झटक्यात व्हायरल होत असतात. आजवर अनेक मोठमोठे कलाकार अथर्वसोबत रीलमध्ये दिसले आहेत. त्याच्या रील्स या अनेक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने तो मराठी चित्रपटांचे प्रोमोशनही करतो. इतकंच नव्हे तर त्याने गानसम्राज्ञी आशा भोसलेंसोबतही (Asha Bhosale) एक रील केली होती, जी खूप व्हायरल झाली. यानंतर आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत अथर्वने एक रील केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra day) ही रील बनवण्यात आली असून यातून एक खास संदेश देण्यात आला आहे.

राज ठाकरेंच्या या रीलमध्ये अथर्व सुदामे महाराष्ट्र दिनानिमित्त एका भाषणाची तयारी करताना दिसतो. सुदामेच्या भाषणात महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींचा उल्लेख आहे. तेवढ्यात राज ठाकरे तिथे येऊन अथर्वचं ते भाषण पाहतात, त्याचं कौतुक करतात आणि म्हणतात, तुझं भाषण चांगलं आहे. अनेक थोरांचे त्यात उल्लेख आहेत. परंतु, आपण आज काय करतोय ते सांगणं देखील गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत ज्याद्वारे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आपण मराठी भाषा रुजवली पाहिजे. आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे. समोरचा माणूस हिंदीत बोलल्यावर आपण घरंगळत त्याच्याशी हिंदीतच बोलतो. त्याची काही आवश्यकता नाही. मराठीचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. ते करताना आपण आपला खारीचा वाटा उचलणं हे आपलं कर्तव्य आहे, असा संदेश राज ठाकरे देतात.

महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी वेगळ्या स्टाईलमध्ये महाराष्ट्र दिनाचा शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिन कसा साजरा करायला हवा, आपल्या भाषेसाठी आणि राज्यासाठी प्रत्येकाने कशी आग्रही भूमिका घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. यासाठी त्यांनी तरुणाईचं आवडतं रील हे माध्यम निवडलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

अथर्वच्या जवळजवळ सर्वच रील्स या पुणे, तिथली संस्कृती आणि पुणेकरांचे बोचरे टोमणे यांवर आधारलेल्या असतात. या सर्व रील्स तो मराठीतून करतो. त्यामुळे तो राज ठाकरेंचाही आवडता आहे. मनसेने तरुणांसाठी आयोजित केलेल्या रीलबाज स्पर्धेमध्ये अथर्व सहभागी झाला होता. तेव्हा राज ठाकरेंनी ‘हा माझा अत्यंत आवडता’ असं म्हणत त्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. अथर्वने रीलबाज हा पुरस्कारही पटकावला. ही गोष्ट देखील प्रचंड व्हायरल झाली होती. यानंतर आता राज ठाकरेंनीही लाडक्या अथर्वसोबत आपलं पहिलंवहिलं रील बनवलं आहे.

TV Star Anupama : अनुपमाचा राजकारणात प्रवेश; भाजपाला दिली साथ!

विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक बड्या बड्या नेत्यांनी भाजपात (Bhartiya Janta Party) प्रवेश केला. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींनीही राजकारणात प्रवेश करताना भाजपची साथ दिली. त्यातच आता ‘अनुपमा’ मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या एका अभिनेत्रीने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश पार पडला. रुपाली गांगुली (Rupali Ganguly) असं या अभिनेत्रीचं नाव असून त्यांच्यासोबत अमेय जोशी यांनीही भाजपा पक्षात प्रवेश केला.

रुपाली गांगुली या सध्या अनुपमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्टार प्लसवरील त्यांची ही मालिका खूप चर्चेत आहे. या पक्षप्रवेशावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप मोठी चाहती आहे. आपल्या देशातील विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही वाटलं यात मी सहभागी झालं पाहिजे म्हणून मी हा पक्षप्रवेश केला. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे.”

भारतीय जनता पक्षाचे सचिव असलेले नेते विनोद तावडे यांनीही यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांवर टीका केली. “विरोधी पक्ष आपल्या प्रचारात खोटं पसरवत आहे. ‘मत जिहाद’ करण्यापर्यंत काँग्रेस आता पोहोचली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही प्रवेशाने पक्षाला बळ मिळेल. दोघांचंही भाजपमध्ये स्वागत. ” असं ते यावेळी म्हणाले.

कोण आहेत रुपाली गांगुली?

रुपाली या ही बंगाली कुटूंबातून आल्या असून त्यांचे वडील अनिल गांगुली हे दिग्दर्शक होते तर त्यांचा भाऊ विजय हा नृत्यदिग्दर्शक आहे. ‘साहेब’ या सिनेमातून रुपाली यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत दोन सिनेमांमध्ये काम केलं. तर सुकन्या या मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. पण त्यांना ओळख मिळाली ती स्टार प्लसवरील ‘संजीवनी’ या मालिकेतून. या मालिकेत त्यांनी डॉ. सिमरन ही खलनायकी ढंगाची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप गाजली. तर त्यांची भाभी ही मालिकाही लोकप्रिय ठरली. अनुपमा ही मालिका तर सध्या धुमाकूळ घालत आहे. काही काळाने नेहमीच्या सास-बहू प्रकारातील मालिकांमधून बाहेर पडत त्यांनी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत काम केलं.

China landslide : चीनमध्ये भूस्खलनामुळे महामार्ग कोसळला !

भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी

बेईजिंग : चीन (China) देशाला आधीपासूनच अनेक दुर्घटनांना, नैसर्गिक आपत्तींना (Natural calamity) तोंड द्यावे लागले आहे. तिथल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे अनेकदा त्सुनामी, पूर, तर कधी भूकंप अशा आपत्ती त्या ठिकाणी येत असतात. त्यातच आज पुन्हा एक दुर्घटना घडली आहे. चीन ग्वांगडोंग प्रांतात भूस्खलनामुळे (Landslide) महामार्गाचा एक भाग कोसळला. या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातामुळे एकूण १८ वाहने घसरली, ज्यामध्ये एकूण ४९ लोक होते. यातील १९ लोकांचा मृत्यू झाला आणि ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्वांगडोंगमधील मीडा एक्सप्रेसवेवर डाबू ते फुजियानच्या दिशेने, चायांग विभागाच्या बाहेर पडण्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर हा महामार्गाचा भाग कोसळला. कोसळलेला रस्ता सुमारे १७.९ मीटर लांब आहे आणि सुमारे १८४.३ चौरस मीटर क्षेत्र व्यापतो.

Thane Loksabha : अखेर ठाणे लोकसभा शिवसेनेचीच! कोणाला मिळाली उमेदवारी?

कल्याणमधूनही श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवरुन (Thane Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. अखेर भाजपाने सामंजस्याची भूमिका घेत ही जागा शिवसेनेला दिली आहे. या ठिकाणी शिवसेनेचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कल्याण लोकसभेची (Kalyan Loksabha) जागा देखील शिवसेनेला देण्यात आली असून या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले होते. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, ठाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नव्हता. आता तोही सुटला असून नरेश म्हस्के लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

ऋतुराज गायकवाडला वगळल्याने कृष्णमचारी श्रीकांत नाराज

मुंबई : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. संघात निवडलेल्या सर्व १५ खेळाडूंवर कोणाचा आक्षेप नाही, परंतु १-२ खेळाडूंच्या जागी दुसऱ्यांना संधी नक्की देता आली असती असे अनेकांचे मत आहे. रिंकू सिंगला न निवडण्यावरून वाद पेटलाच आहे, तर हार्दिक पांड्याची कामगिरी काहीच नसताना त्याला पूर्वपुण्याईवर निवडल्याची चर्चा आहे. सलामीसाठी रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वालला प्राधान्य देण्यावरही नाराजी आहे. त्यात राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिलचे नाव पाहून १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूने तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडसाठी बॅटिंग केली आहे.

ऋतुराजला मिळालेल्या वागणुकीवर भारताचे माजी खेळाडू कृष्णमचारी श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. यू ट्युब चॅनेलवर ते म्हणाले,ऋतुराज गायकवाडच्या पुढे शुभमन गिलची निवड मला चकित करणारी आहे. गिलचा फॉर्म चांगला नाही आणि ऋतुची ट्वेंटी-२० कारकीर्द ही गिलपेक्षा चांगली आहे. गिल अयशस्वी होत राहील आणि त्याला संधी मिळत राहतील, तो निवडकर्त्यांच्या फेव्हरीट लिस्टमध्ये आहे. हा पक्षपातीपणाचा अतिरेक आहे.

आयपीएल २०२४ मध्ये विराटनंतर ( ५००) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऋतुराज येतो. त्याने चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळलेही आणि फलंदाजीत ९ सामन्यांत ६३.८६ च्या सरासरीने ४४७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. असे असूनही राखीव खेळाडूंमध्येही त्याचा विचार केला गेला नाही. ऋतुराजने १९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १ शतक व ३ अर्धशतकांसह ५०० धावा केल्या आहेत. शुभमन गिलने १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १ शतक व १ अर्धशतकासह ३३५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ मध्ये त्याने १० सामन्यांत ३२० धावा केल्या आहेत.