PM Narendra Modi : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय! पंतप्रधानांच्या रोड-शो बाबतीत ‘या’ विशेष सूचना जारी

१७ मे च्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना निवडणुकीचे रिंगण चांगलेच तापलेले दिसत आहे. सध्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, कल्याणमधील सभेनंतर मुंबईतील घाटकोपर येथे नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या ‘रोड शो’बाबत मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत होणारी रॅली तर १७ मे रोजी मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडक आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश आज पासून १७ मे च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात येणार आहेत.

पोलिसांकडून दिले ‘हे’ आदेश

विक्रोळी, कांजुरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुनाभट्टी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे, वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे.

पाण्याची बॉटल, झेंडे, माचिस नेण्यास मनाई-

नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होत आहे. यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. संपूर्ण मार्ग बॅरीकेटिंग केलेली असली तरी अनेक ठिकाणी रहिवासी वस्ती आणि रेल्वे स्थानकाला जोडणारे मार्ग आहेत. या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना बॅग, पाण्याची बॉटल, झेंडे, माचिस, लायटर, नेलकटर , टोकदार, धारधार वस्तू , कॅमेरे नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे फलक मुंबई पोलीस या मार्गावर ठिकठिकाणी लावत आहेत.

मुंबईतील पुढील मार्गात बदल-

  • अंधेरी घाटकोपर मार्ग वरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक
  • गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक
  • हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक

असा असेल मोदींचा रोड शो

सायंकाळी ६:३० वाजता पंतप्रधान विक्रोळी येथे हजर होणार आहेत. रोड शो हा ६:४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७:४५ वाजता संपणार आहे. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्क्वेअर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.

नरेंद्र मोदींचा घाटकोपर- मुलुंड दौरा-

नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. या ठिकाणी विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. त्यामुळे या रोड शोचा फायदा मिहिर कोटेचा यांना होऊ शकतो.

PM Narendra Modi : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमधून घणाघात

एक नेता कृषी मंत्री असताना सरकारने शेतकऱ्यांची अजिबात चिंता केली नव्हती; नाव ने घेता मोदींनी केली शरद पवारांवर टीका

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा रंग आणखी चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची एक संधी सोडत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही देशभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि भारती पवार (Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदींनी या सभेत काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणार’, असा घणाघात त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मोदी म्हणाले, ‘तुम्ही मागील १० वर्षात माझे काम पाहिले आहे. मी आज तुमच्याकडे तिसऱ्या टर्मसाठी आशीर्वाद मागण्यास आलो आहे. काँग्रेसचे इतके हाल आहेत की, त्यांचे महाराष्ट्रातील एक नेते म्हणतायत मतदान संपल्यावर काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावे. आपले दुकान बंद करावे. त्यांना वाटते की, सगळे एकत्र आले की विरोधक बनतील, असे त्यांचे हाल आहेत’, असा टोला पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना लगावला.

नकली शिवसेना विलिन झाली की बाळासाहेबांची आठवण येईल

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण हे नक्की आहे. मात्र ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल.बाळासाहेब म्हणायचे की, ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, त्या दिवशी मी माझ्या दुकानाचे शटर खाली घेईन. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही. असा हल्लाबोल मोदींनी केला.

नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले

पुढे ते म्हणाले, बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारले जावे. मात्र काँग्रेसने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पाठ दाखवली. नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहेत. जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० काढून टाकावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्यामुळे सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला येत असल्याचा आरोप नरेंद मोदी यांनी केला आहे.

वीर सावरकरांचा उल्लेख करत ठाकरे गटावर टीका

वीर सावरकरांना दिवसरात्र शिव्या देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही नकली शिवसेना डोक्यावर घेऊन फिरत आहात, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनामधील राग हा सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. मात्र आपल्या अहंकारात नकली शिवसेनेचे नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांचा राग दिसत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. त्यामुळे आता नकली शिवसेनेला शिक्षा करण्याचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे. आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात निवडणुकीत यांना धोबीपछाड देण्याचे काम मतदारांनी केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

शरद पवारांचे नाव न घेता काँग्रेस सरकारवर टीका

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आमचा दहा वर्षातील कार्यकाळ पाहिला आहे. तसेच याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारचा कार्यकाळ देखील शेतकऱ्यांनी पाहिला आहे. त्या काळात तर महाराष्ट्रातील एक नेताच देशाचे कृषी मंत्री होते. मात्र, त्या कार्यकाळात सरकारने शेतकऱ्यांची अजिबात चिंता केली नव्हती. आज पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. म्हणजेच येणाऱ्या पाच वर्षात कमीत कमी साठ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

कांद्याचा बफर स्टॉक तयार केला, निर्यातीत वाढ झाल्याचाही दावा

काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी खोटे पॅकेज जाहीर होत होते. या पॅकेजमधून शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळत नव्हता. नाशिक आणि हा परिसर कांदा आणि द्राक्षं शेतीसाठी प्रसिद्ध आहे. देशामध्ये पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्याची व्यवस्था आमच्या सरकारने सुरू केली. या आधी देशात अशी कोणतीच व्यव्यस्था नव्हती. गेल्यावर्षी शेतकऱ्यांकडून सात लाख टन कांदा खरेदी केला आहे. आता पुन्हा पाच लाख टन कांदा ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. गेल्या काही वर्षात कांदा निर्यातीमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले बंदी आता उठवण्यात आली आहे. तसेच कांदा निर्यातीवर देखील सरकार सबसिडी देत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या रोड-शोमुळे मुंबईत मेट्रो बंद!

सुरक्षेच्या कारणास्तव घेतली खबरदारी

मुंबई : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. अशातच निवडणुकीचे चारही टप्पे पार पडले असून आता पाचव्या टप्प्यासाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. मुंबईत २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून मतदानाला केवळ चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईत सर्व पक्षांकडून प्रचाराला जोर देण्यात आला आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधानांचा आज मुंबईत रोड शो होणार आहे, तर उद्या शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज सायंकाळी रोड शो होत असून या रोड शोसाठी ‘मेट्रो १’च्या प्रवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील जागृती नगर स्थानक – घाटकोपर स्थानकांदरम्यानची सेवा सायंकाळी ६ वाजल्यापासून पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Konkan Railway Recruitment : सरकारी नोकरीची नामी संधी! कोकण रेल्वेत ‘या’ पदांसाठी मेगाभरती

‘अशी’ होणार निवड; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून कोकण रेल्वेकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार कोकण रेल्वेत ४० हून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. जाणून घ्या नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्याचसोबत अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता यासंबंधीची संपूर्ण माहिती.

‘या’ पदांसाठी भरती

  • AEE/कॉन्ट्रॅक्ट – ३ जागा
  • सि. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – ३ जागा
  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – १५ जागा
  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल – ४ जागा
  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल – २ जागा
  • टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल १५ जागा

शैक्षणिक पात्रता

  • AEE/कॉन्ट्रॅक्ट – मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह डिप्लोमा किंवा पदवी
  • सि. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी
  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव
  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह डिप्लोमा किंवा पदवी
  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल – ITI ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आणि Auto CAD चे ज्ञान आवश्यक.
  • टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील ITI पदवी

वेतन

  • AEE/कॉन्ट्रॅक्ट – ५६,१०० रुपये
  • सि. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – ४४,९०० रुपये
  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – ३५,४०० रुपये
  • ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल – ३५,४०० रुपये
  • डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल – ३५,४०० रुपये
  • टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल – २५,५०० रुपये

कोकण रेल्वे अर्ज प्रक्रिया

कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची पद प्रमाणे मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित पाहिजे. मुलाखतीची तारीख ही ०५,१०, १२, १४, १९, २१ जून २०२४ अशी आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

कोकण रेल्वे वयोमर्यादा

कोकण रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३० वर्षापर्यंत उमेदवार या भरतीसाठी पात्र करण्यात येईल. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी एससी/एसटी ०५ वर्ष सूट दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांना ३ वर्षे सूट दिली गेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या वयोगटांनुसार पदांसाठी अर्ज करायचा आहे.

अधिकृत वेबसाइटhttps://konkanrailway.com/

ऑफिशियल नोटीफिकेशन –

https://drive.google.com/file/d/17OUZWu0Pn3cnLVasKQwpbzkyaJa77O13/view

दरम्यान, ही कोकण रेल्वे भरती प्रक्रिया ९ मे पासून सुरु झाली असून याची अंतिम तारीख २१ जून २०२४ असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा पूरेपूर फायदा घ्यावा असे सांगण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक वादातून रचला हत्येचा कट! गोळीबारही केला पण…

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचं (Pimpri Chinchwad Crime) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणाहून सातत्याने गोळीबाराच्या (Firing) घटना समोर येत आहेत. कधीकधी क्षुल्लक कारणावरुनही थेट गोळीबारापर्यंत प्रकरण पोहोचत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शहरामधील चिखली परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकवर थेट गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने गोळी दंडाला लागल्याने त्याचा जीव वाचला आहे.

चिखलीतील या धक्कादायक घटनेत अजय सुनील फुले (वय १९, रा. मोहननगर, चिंचवड) आणि हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेने दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. यामध्ये सुदैवाने अजयचा जीव वाचला पण तो जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलला अटक केली आहे. त्याच्या सह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

अजय फुलेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.

नेमकी कशी घडली घटना?

संबंधित घटनेतील अजय व हर्षल या दोघांचाही गॅस शेगडीचा व्यवसाय होता. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होते. त्यातच अजयला संपवण्याचा विचार हर्षलच्या डोक्यात आला आणि यासाठी त्याने त्याच्या दोन मित्रांची मदत घेतली. श्याम चौधरी आणि कीर्तीकुमार लिलारे हे हर्षलचे दोन मित्र अजयच्या दुकानात वाद मिटवण्यासाठी गेले होते. मात्र, तेव्हाच हर्षलही त्या ठिकाणी आला आणि त्याने थेट पिस्तुल काढून तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली तर दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली. या प्रकरणी हर्षल आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Water Shortage : मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष! शेततळे, विहिरी, धरणे पडली कोरडी

आशिया खंडातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर्सची गरज

छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा तडाखा बसत असून मराठवाड्याला (Marathwada) याचा भीषण फटका बसत आहे. मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले तर दुसरीकडे मराठवाड्यात धरणे आटल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हवामानाची स्थिती बदलली असून कधी ऊन, कधी पाऊस याचा काहीच अंदाज बांधता येत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे.

मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत तब्बल १ हजार ७०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ २३.४३ टक्के असून, मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. मध्यम प्रकल्पांत ३५ टक्के, तर लघू पाटबंधारे प्रकल्पांत २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याविना शेततळी सुकली आहेत. तर ग्रामीण भागातील स्त्रिया दिवसभर पाणी कसं पुरवायचं याचे नियोजन करताना दिसत आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सने पाणीपुरवठा?

छत्रपती संभाजीनगर : ६५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
जालना : ४८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बीड : ३८२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
परभणी : ५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदेड : १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
धाराशिव : १३१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
लातूर : २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

आठ दिवसाला एक टँकर

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण ज्या पैठण तालुक्यामध्ये आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर्सची गरज निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यातील १२४ घरं असलेल्या अब्दुलपुरतांडा गावात आठ दिवसाला एक टँकर पाणी येतं. या गावाच्या घराघरासमोर पाण्याचे ड्रम पाहायला मिळतात. या ड्रमची संख्या जवळपास ५०० आहे.

Bollywood Movies : बॉलीवूड होणार मालामाल! एकाचवेळी प्रदर्शित होणार ‘हे’ बिग बजेट चित्रपट

मुंबई : बॉलीवूड नेहमीच धमाकेदार कामगिरी करत असते. हिंदी सिनेसृष्टीतील सर्व अभिनेते आपला चित्रपट हिट होण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नेहमीप्रमाणे यंदाही बॉलीवूडमध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे मोठ्या बजेटमध्ये बनले आहेत. कार्तिक आर्यन, अजय देवगण आणि अक्षय कुमार या तिन्ही मोठ्या अभिनेत्यांकडे सध्या बिग बजेट चित्रपट आहेत, ज्याच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळीही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणार असल्यामुळे बॉलीवूड मालामाल होणार आहे.

त्याचबरोबर आता बॉलीवूड पुढील वर्षाच्या तयारीला लागली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील किंग शाहरुख खान आणि सलमान खान यासोबत इतर अभिनेत्यांचे येणाऱ्या वर्षी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकाचवेळी पाच मोठ-मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉलीवूड आणखी मालामाल होण्याची चर्चा सुरु आहे. अलीकडेच या चित्रपटांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे २०२५ हे वर्ष खूप स्फोटक असणार आहे.

‘या’ चित्रपटांची होणार भरघोस कमाई

  •  किंग : शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त त्याची मुलगी सुहाना देखील दिसणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे सुहानाचा असणार होता. या चित्रपटात शाहरुख खानने तब्बल २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. पण आता या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने त्याची तयारी पूर्वीपेक्षा मोठ्या स्तरावर केली जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जून २०२४ मध्ये होणार आहे. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग लंडनमध्ये होणार असून, त्यासाठी सुहानाने प्रशिक्षणही सुरू केले आहे. पुढील वर्षीच्या बिग बजेट चित्रपटांपैकी हा एक असणार आहे.
  • लाहोर १९४७ : सनी देओल आणि प्रिती झिंटाचा ‘लाहोर १९४७’ चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग जुलै २०२४ पर्यंत संपणार आहे. या चित्रपटाचे बजेट १०० कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ‘गदर २’ मधून चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपटही सनी देओलच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
  • सिकंदर : सलमान खानने यावर्षी ईदच्या दिवशी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी ईद २०२५ ला तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, त्याचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत आहेत. नुकतीच रश्मिका मंदान्ना या चित्रपटाशी जोडली गेली आहे. त्यामुळे ‘पुष्पा २’ अभिनेत्रीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा ‘सिकंदर’लाही मिळणार आहे. हा एक बिग बजेट ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल.तर या चित्रपटात प्रीतम संगीत देत आहे.
  •  वॉर २ : YRF Spy Universe चा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करेल. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दोघेही सध्या आपापल्या भागाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणीही दिसणार आहे. अलीकडेच या दोघांचाही एक लूक सेटवरून लीक झाला होता. ‘वॉर’चा सिक्वेल प्रत्येक बाबतीत मोठा असेल. यात भरपूर ॲक्शन आणि ड्रामा असणार आहे. त्याचे बजेटही २०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
  •  लव्ह अँड वॉर : संजय लीला भन्साळी यांनी काही काळापूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. यात रणबीर कपूरशिवाय आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचाही समावेश आहे. भन्साळी त्यांच्या चित्रपटांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात, प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी प्रचंड टीम तैनात केली जाते. त्याचबरोबर या चित्रपटात तिन्ही अभिनेते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहेत.

Ghatkopar hoarding news : घाटकोपरमध्ये ४५ तासांनंतरही बचावकार्य सुरु; ३५ ते ४० जण अडकल्याची शक्यता

ढिगारा उपसताना लाल कार दिसली, आतमध्ये…

घाटकोपर : मुंबई आणि इतर परिसरात अवघ्या काही मिनिटांसाठी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. घाटकोपरमधले (Ghatkopar) महाकाय होर्डिंग या वादळी वार्‍यामुळे कोसळून (Hoarding collapse) पेट्रोल पंपावर पडले. यामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ४५ तास उलटून गेल्यानंतरही या ठिकाणी बचावकार्य सुरुच आहे. हे महाकाय होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा ढिगारा हलवणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच या ढिगार्‍याखाली आणखी ३५ ते ४० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

बचावकार्य अंतिम टप्प्यात असून आता मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ आणि मुंबई पोलिसांकडून लोखंडी ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पोकलेन आणि गॅस कटरचा वापर केला जात आहे. गॅस कटरच्या साहाय्याने लोखंडी होर्डिंगचे तुकडे करुन ते क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेतले जात आहे. यादरम्यान बचाव पथकांना होर्डिंगखाली दबलेली एक लाल रंगाची गाडी नजरेस पडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, होर्डिंगच्या एका लोखंडी गर्डरच्या खाली लाल रंगाची गाडी अडकून पडली आहे. लोखंडी होर्डिंगच्या प्रचंड वजनामुळे ही गाडी पूर्णपणे चेपली आहे. या गाडीत एक महिला आणि पुरुष असल्याचे सांगितले जात आहे. गाडीची अवस्था आणि ४५ तासांचा कालावधी लक्षात घेता संबंधित महिला आणि पुरुष वाचण्याची शक्यता फार कमी आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने या परिसरातील अशाचप्रकारची होर्डिंग उतरावयाला सुरुवात केली आहे. ही होर्डिंग्ज लवकरात लवकर उतरवली जातील. जेणेकरुन पावसाळ्याच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये, असा पालिकेचा प्रयत्न आहे.

Vegetable price hike : गृहिणींचं टेन्शन वाढणार; सगळ्या भाज्यांचा जोडीदार बटाटा आणखी महागणार!

भाजीपाल्यांच्या वाढत्या किंमतीमुळे व्हेज थाळीही महागली

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेला खुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच अनेक सवलती, दर कमी होणे अशा गोष्टींना उधाण आले आहे. मात्र, काही गोष्टी महाग होण्यापासून रोखणे सरकारलाही कठीण होऊन बसले आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं व सर्वसामान्यांचं टेन्शनही वाढलं आहे. भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: बटाट्याच्या दरात (Potato Price) मोठी वाढ झाली आहे.

बटाटा म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कोणत्याही भाजीत बटाटा घातला की त्याची चव वाढते. असा सगळ्या भाज्यांचा जोडीदारच महागल्याने बटाटा विकत घ्यायचा की नाही, असा प्रश्न भेडसावत आहे. एका बाजूला उष्णतेचा कहर आहे, तर काही बाजूला अवकाळी पाऊस या हवामानाच्या स्थितीचा बटाट्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे बटाटाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे.

टोमॅटोच्या दरात घट तर बटाट्याच्या दरात वाढ

दिल्लीतील आझादपूरची बाजारपेठ अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. तर बटाट्याचे भाव अजूनही चढेच आहेत. बटाट्याच्या दरात आणखी ५ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी पाच सहा महिने भाव चढेच राहणार

दरम्यान, बटाट्याचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत कमी प्रमाणात बटाटा बाजारात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बटाट्याचे पीक बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी पाच सहा महिने बटाट्याचे दर वाढलेलेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बटाटा आणि भाजीपाल्याच्या किंमती वाढत असल्यामुळे व्हेज थाळीही महाग होत आहे.

Google I/O 2024 : गुगलची ‘ही’ नवी सुविधा; नागरिकांना होणार मोठा फायदा!

जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात आहे. गुगल, अ‍ॅपलसारख्या अनेक कंपन्यांकडून नवनवीन तंत्रज्ञान विविध रुपात जगासमोर आणलं जातं. अशा तंत्रज्ञान क्षेत्रात जग पुढे जात असताना सध्या सर्वत्र नुकत्याच पार पडलेल्या गुगलच्या इवेंटची (Google I/O) चर्चा सुरु आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी यावेळी जेमिनी (Gemini) संबंधित कित्येक प्रॉडक्ट्स आणि फीचर्सची घोषणा केली. त्यातच जेमिनी हे गुगलचं एआय मॉडेल आहे ज्याने इवेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या कार्यक्रमाची सुरुवात जेमिनी संदर्भापासून केली. जगभरात सुमारे दोन अब्ज लोक जेमिनी वापरत असल्याचा दावा सुंदर पिचाई यांनी केला. गुगलच्या या मेगाइवेंटमध्ये एआयपासून गुगलचं व्हिडीओ जनरेटीव एआय मॉडेल VEO लाँच केले आहे. याशिवाय जेमिनी इन गुगल कॅमेरा आणि फोटोज, जेमिनी प्रो, जेमिनी अ‍ॅप या सुविधाही लाँच केल्या आहेत.

याशिवाय कंपनीकडून या इवेंटमध्ये Project Astra सुद्धा लाँच केलं आहे. गुगलच्या या नव्या प्रोजेक्टअंतर्गत भविष्यातील एआय असिस्टंट तयार करण्यासाठी केला जाईल. गुगलचं हे नवं फिचर साधारण, OpenAI आणि GPT 4o सारखंच असून, तुमच्या मोबाईल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची सविस्तर माहिती हे टूल देणार आहे.

Project Astra चा नेमका वापर काय?

गुगलचं हे असिस्टंट टूल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून भविष्यात तो डेटा गरज पडल्यास वापरताना दिसणार आहे. म्हणजेच हे एआय टूल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीसंदर्भात सविस्तर माहिती देणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणताही प्रश्न विचारल्यास त्या संदर्भातील सर्व माहिती देण्याचं कामही हे टूल करणार आहे.