भाजपला रोखण्यासाठी एकजूट महत्त्वाची : सोनिया गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘आपल्याला लोकशाही, राज्यघटना आणि यासोबत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे रक्षण करायचे आहे. तसेच, सध्या भाजपकडून होणारा खोटा प्रचार ओळखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे’, असे मत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसच्या मुख्यालयात मंगळवारी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

‘भाजपच्या वैचारिक मोहिमेशी आपणही वैचारिक मुकाबला केला पाहिजे. आपल्याला ही लढाई जिंकायची असेल, तर यासाठी आपण दृढ निश्चयाने लोकांसमोर केले पाहिजे. भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार आपण उघड केला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ‘मी शिस्त आणि एकतेला सर्वोच्च प्राधान्य देऊ इच्छीते.

काँग्रेसमधील आपल्यापैकी प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना मजबूत करणे. सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे’, अशी अपेक्षाही सोनिया गांधींनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान राहूल गांधी यांनी पक्षाचे अध्यपद स्वीकारण्याबाबत आश्वासन दिले आहे असे समजते.

वानखेडे प्रकरणाच्या चौकशीला मुख्यमंत्र्यांकडून वाटाण्याच्या अक्षता?

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे समजते. या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. त्यातून काय निष्पन्न होते ते पाहून एसआयटी नेमण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे स्वतः नवाब मलिक यांनीच प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. दरम्यान, प्रभाकर साईल यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी एनसीबीच्या दक्षता विभागाने तीन जणांच्या एका पथकामार्फत चौकशी चालू केली आहे.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या माध्यमातून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातल्या वादावर ठिणगी पडली. या प्रकरणातले पंच किरण गोसावी खंडणीखोर असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. गोसावी सध्या फरार आहेत. त्यापाठोपाठ याच प्रकरणातील एक पंच व गोसावींचे बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे विविध स्वरूपाचे गंभीर आरोप एनसीबीच्या कारवाईवर केले. या प्रकरणात शाहरुख खान यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली. सारा मामला १८ कोटींवर निश्चित झाला. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना दिले जाणार होते. कोऱ्या कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या, असे अनेक गंभीर आरोप साईल यांनी केले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी साईल यांना पोलीस संरक्षणही पुरवले आहे. साईलकडून हे आरोप होत असतानाच नवाब मलिक यांनी त्यांचे जावई जामिनावर सुटल्याच्या निमित्ताने एनसीबीवर जोरदार टीका केली.

विक्रमी बोलींवरून क्रिकेटची जगभरातील लोकप्रियता अधोरेखित

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी (२०२२) लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांना लागलेल्या विक्रमी बोलीवरून क्रिकेटची लोकप्रियता अधोरेखित होते, असे ऑस्ट्रेलियाचा माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्नने म्हटले आहे.

लखनऊ संघासाठी संजीव गोएंका यांच्या आरपीएसजी समूहाने तब्बल ७,०९० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत लखनऊ संघाची मालकी मिळवली. तसेच सीव्हीसी कॅपिटलने ५,६२५ कोटी रुपयांच्या बोलीसह दुसऱ्या संघाची मालकी मिळवताना घरचे मैदान म्हणून अहमदाबादला पसंती दिली.

दोन्ही नव्या संघमालकांचे मन:पूर्वक अभिनंदन. लखनऊ आणि अहमदाबाद संघांसाठी विक्रमी बोली लागली. क्रिकेट हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रसिद्ध खेळ का आहे, हे या बोलीवरून स्पष्ट होते, असे वॉर्नने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आयपीएलमधील नव्या संघांवर मिळून १० हजार कोटी रुपयांपर्यंतची बोली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अपेक्षित होती. मात्र, आरपीएसजी आणि सीव्हीसी यांनी मिळून तब्बल १२,७१५ कोटी रुपये (साधारण १.७ बिलियन डॉलर) खर्ची करत संघ विकत घेतले. दुबईत झालेल्या लिलावात एकूण १० समूहांनी (फ्रँचायझी) संघांच्या खरेदीसाठी दावेदारी पेश केली होती. इंग्लंडमधील फुटबॉल संघ मँचेस्टर युनायटेडच्या मालकांसह अदानी समूहानेही या संघांसाठी बोली नोंदवली. लिलावात भाग घेतलेल्या समूहांना अहमदाबाद, लखनऊ, कटक, धरमशाला, गुवाहाटी आणि इंदूर यांच्यापैकी एका शहराची निवड करण्याची मुभा देण्यात आली होती.

गौतम अदानींची ५१०० कोटींची बोली

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एक गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाने संघ खरेदी करण्यासाठी ५१०० कोटी रुपयांची बोली लावली, पण ती अपुरी ठरली.

पुढील हंगामात ७४ सामने

आयपीएलच्या पुढील म्हणजेच १५व्या हंगामात एकूण १० संघ खेळणार असून ७४ सामने होतील. प्रत्येक संघ सात सामने घरच्या आणि सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळेल. आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्पर्धेचे स्वरूप २०११ च्या मॉडेलचे अनुसरण करेल. यात साधारणपणे घर आणि बाहेरचे स्वरूप असेल, ज्यामध्ये ७४ सामने असतील. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये ६० सामने खेळले गेले जात आहे.

२०११च्या हंगामाप्रमाणे फॉरमॅट

२०११मध्ये १० संघांचे दोन भाग करण्यात आले आणि स्पर्धेच्या साखळी टप्प्यात ७० सामने खेळले गेले तर चार प्लेऑफ सामने खेळले गेले. साखळी टप्प्यात सर्व संघ १४ सामने खेळले. प्रत्येक संघ त्याच्या गटातील इतर चार घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर (आठ सामने) खेळले. गटाची रचना ड्रॉद्वारे निश्चित केली जाईल आणि कोण किंवा कोणाशी एकदा किंवा दोनदा स्पर्धा करेल हे देखील ठरवले जाईल. आयपीएलमध्ये शेवटच्या वेळी आठपेक्षा जास्त संघ २०१३ मध्ये खेळले होते, जिथे ९ संघांनी भाग घेतला आणि एकूण ७६ सामने खेळले गेले.

परमबीर सिंग यांचे वेतन थांबवले

मुंबई : गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाई करत परमबीर सिंग यांना दिले जाणारे वेतन रोखले असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. परमबीर यांच्यावर खंडणी तसेच बेकायदेशीर कृत्य, ॲट्रॉसिटीअंतर्गत मुंबई, ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

यासंबंधी चौकशीसाठी पोलीस विभागाकडून वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र अद्यापही परमबीर सिंग नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीच माहिती नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना राज्याचे तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये अवैधरीत्या जमा करण्याचा आरोप पत्राद्वारे परमबीर यांनी केला होता.

या आरोपानंतर परमबीर बेपत्ता असल्याची चर्चा आहे. परमबीर सिंग यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पदावरून उचलबांगडी झाली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागांमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही. पदभार स्वीकारण्याआधीच त्यांनी आठ दिवसांची आणि त्यानंतर १५ दिवसांची रजा घेतली. मात्र त्या रजा संपल्यानंतरही परमबीर सिंग पदावर रुजू झाले नाहीत.

रोजगार वाढतोय!

मुंबई (वार्ताहर) : अर्थव्यवस्था ‘रिकव्हरी मोड’मध्ये असल्याने नोकरीच्या संधीही वाढत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत रोजगाराच्या १४ टक्के जास्त संधी उपलब्ध आहेत. ‘मायकेल पेज इंडिया’ या जॉब आणि रिक्रूटमेंट एजन्सीने ही माहिती दिली आहे.

मायकेल पेजच्या मते, सप्टेंबरच्या तिमाहीत सर्वाधिक नोकरीच्या संधी अभियांत्रिकी, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. सप्टेंबर तिमाहीत नोकऱ्यांमध्ये वार्षिक १४ टक्के वाढ झाली, असे कंपनीचे एमडी निकोलस डुमॉलिन म्हणतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोजगार संधींमध्ये पन्नास टक्के वाढ झाली आहे. आज कोरोनाच्या संकटातून देश सावरत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आहे. कंपन्यांना उत्पादन वाढवावं लागत असून त्यासाठी नोकर भरती करावी लागत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ दरम्यान नोकरीच्या संधींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.

अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. लीगल आणि एचआरसारख्या नॉन आयटी भरतीमध्येही वाढ झाली आहे. मायकेल पेज इंडियाच्या अहवालानुसार, तंत्रज्ञान क्षेत्र ५८ टक्के वार्षिक वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ३५ टक्के वाढीसह कायदा आणि २५ टक्के वाढीसह मानवी संसाधनांसारख्या क्षेत्रांचा क्रमांक लागतो.

त्रैमासिक आधारावर अभियांत्रिकी क्षेत्रातल्या भरतीमध्ये २० टक्के वाढ झाली. अहवालात असंही म्हटलं आहे, की गेल्या काही महिन्यांमध्ये लसीकरण आणि आर्थिक क्रियाकलाप वाढल्याने रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रं या बाबतीत आघाडीवर आहेत, तिमाही आधारावर भरती २० टक्क्यांनी वाढली आहे. बहुतांश भरती मार्केटिंगच्या क्षेत्रात होत आहे. त्यात विपणन प्रथम आणि तंत्रज्ञान दुसऱ्या स्थानावर होतं.

स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जून २०२१ नंतर कंपन्यांचं काम पुन्हा सुरू झालं.

सर्पदंश झालेल्या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू

जव्हार (वार्ताहर) : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळशेत ग्रामपंचायतीमधील पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (२१) या आदिवासी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला शेतात काम करताना सर्पदंश झाला होता. तिचा पती व नातेवाइकांनी तातडीने डोली करून दोन किलोमीटर अंतरावरच्या पिंपळशेत आरोग्य पथकात मायाला नेण्यात आले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारा जबाबदार वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने अखेर मायाचा तेथेच मृत्यू झाला. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याने संपूर्ण जव्हार तालुक्यात आरोग्य यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

अतिदुर्गम जव्हारमधील पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीमधील नागरिकांना रस्ता, वीज, पाणी आणि आरोग्याच्या समस्येने स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ग्रासलेले आहे.

येथे वैद्यकीय उपचारांअभावी आजपर्यंत शेकडो बळी गेले आहेत. अशीच घटना पुन्हा शनिवारी घडली आहे. पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (२१) ही आदिवासी गर्भवती महिला दुपारी शेतात काम करताना तिला विषारी सापाने दंश केला.

मायाच्या पती व नातेवाइकांनी तिला डोली करून दोन किलोमीटर पायपीट करत पिंपळशेत आरोग्य पथकात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारे कोणीही उपलब्ध नव्हते. केवळ एक शिपाई होता. अखेर तेथेच मायाचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.

साप, विंचू चावल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचारांसाठी पुरेसा औषधसाठा नसतो. तसेच, पिंपळशेत आरोग्य पथक येथे रिक्त पदे असल्याने व तिथे कर्मचारी राहत नसल्याने अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी. – तुळशीराम भोवर, सामाजिक कार्यकर्ते

पालघर जिल्ह्याऐवजी जव्हार जिल्हा झाला असता, तर आरोग्य सुविधा सुधारली असती. येथील नागरिकांचे आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे जाणारे बळी थांबण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी भरती होणे गरजेचे आहे. शिवाय, पालघर जिल्हा तसेच जव्हार तालुका आरोग्य विभागाकडून भरती होईपर्यंत व्यवस्था होणे अपेक्षित आहे. – कैलास घाटाळ, मनसे, जव्हार तालुका सचिव

या ठिकाणी जे कर्मचारी कामावर नव्हते, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – डॉ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार

१०० दिव्यांग लाभार्थींना मिळाले कृत्रिम हात

मुंबई : ग्रँड मराठा फाउंडेशन आणि इनालि फाउंडेशनच्या माध्यमातून १६ ते ६० वर्षे या वयोगटातील १०० दिव्यांग लाभार्थींना कृत्रिम हात मोफत पुरविण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. रोहित शेलटकर (संस्थापक, जीएमएफ), माधवी शेलटकर (विश्वस्त, जीएमएफ) आणि प्रशांत गाडे (संस्थापक, इनालि फाउंडेशन) यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाविषयी माहिती देताना चित्रपट निर्माते आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले, कृत्रिम हातामुळे लाभार्थी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. मर्यादित आर्थिक स्रोत असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांनी पुढे यावे आणि फाउंडेशनशी जोडले जाऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच ‘गरजूंचे सबळीकरण’ या कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी दात्यांनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://grandmaratha.org/ या वेबसाइटला भेट द्यावी.

बांबूपासून बनवलेल्या आकाशकंदिलांना मोठी मागणी

संजय नेवे

विक्रमगड : दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिव्यांना या सणात विशेष महत्त्व असते. दीप, दिवे, पणत्या आणि आकाशकंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्याने सर्वांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. अशातच विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावात टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्यता महिला समूह सध्या बांबूकलेत रमला आहे. दिवस-रात्र काम करून अतिशय सुबक व बारीक काम, उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील बनवण्यात व्यस्त आहेत.

विविध प्रकारचे हाताने नक्षी काम केलेले १० प्रकारचे आकाशकंदील बनवले जात आहेत. मुंबई तसेच इतर भागांत विविध प्रकारचे हस्त नक्षीकाम केलला एक आकाशकंदील ३०० ते ८०० रुपयांना विकला जात आहे. एक आकाशकंदील बनवण्यासाठी एका महिलेला एक दिवस लागतो. आतापर्यंत या गटाने ७०० ते ८०० आकाशकंदील विकले असून दोन हजार कंदिलांची मागणी असल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच, बांबूपासून बनवलेले व सुबक हस्तकलेने नक्षीकाम केलेले २०० आकाशकंदील अमेरिका येथे पाठवण्यात आल्याची माहिती टेटवाली ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग भुरकूड यांनी दिली. सध्या शेतीची कामे सर्वत्र सुरू असूनही येथील महिला रात्री व आराम करण्याच्या वेळेत एकत्र येऊन सुबक आकाशकंदील तयार करत आहेत.

पूर्ण ताकतीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करत आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवण्याचा मानस आहे. – नमिता नामदेव भुरकूड, अध्यक्षा, टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्य्यता महिला समूह

बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जात आहे. दिवाळी आल्याने आकाशकंदिलांना खूप मागणी आहे. हे कंदील अमेरिकेत पाठवण्यात आले असून विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू इंग्लड, आस्ट्रेलिया व इतर देशांत निर्यात केल्या जातात. -पांडुरंग काशिनाथ भुरकूड, उपसरपंच, टेटवाली ग्रामपंचायत

एसटीचा प्रवास महागला

रातराणी गाड्यांच्या तिकीट दरात ५ ते १० रुपयांनी कपात करत थोडा दिलासा

मध्यरात्रीपासून १७.१७ टक्के भाडेवाढ लागू

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह राज्यात भाडेवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीची ही भाडेवाढ १७ टक्के असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाकडूनही दरवाढीबाबत विचार केला जात होता. या पार्श्वभूमीवर अखेर महामंडळाने मध्यरात्रीपासून तिकिटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसह अन्य गोष्टी महाग झाल्याने आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. अशातच आता एसटीचा प्रवासही महागणार आहे. तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या निर्णयामुळे दिवाळीपूर्वीच एसटी प्रवाशांचे ‘दिवाळे’ वाजले असल्याची चर्चा आहे.

इंधनाच्या दरात झालेली भरमसाट वाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू असणार आहे. सोमवार २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होत असून ती किमान ५ रुपये इतकी असणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दिलासा दिला आहे.

गेल्या ३ वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी अनेक दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत असून २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

तसेच २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा तद्नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकीट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून संबंधित वाहक सुधारित तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकीट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकीट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. तथापि, सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते.

मुंबईत गुरुवारपासून धावणार सर्व लोकल

लसीकरण झालेल्यांनाच प्रवासाची मुभा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून अनेक गोष्टींवरील बंधने हटविण्यात आली आहेत. मात्र, मुंबईत लोकलच्या मर्यादित फेऱ्या सुरू होत्या. आता गुरूवार २८ ऑक्टोबरपासून सर्व लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने सर्व १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, मध्य आणि पश्चिम रेल्वेने १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरीही राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही मुंबईत लोकल प्रवासासाठी हीच अट लागू असणार आहे.