चोळाप्याचे निर्वाण व भक्तांचे रक्षण

विलास खानोलकर

एक वेळ श्री समर्थांची स्वारी सेवेकऱ्यांसह वाडी गावी गेली. तेथे देशपांडे यांनी येऊन सर्व सेवेकऱ्यांसह भोजन घातले. सर्व सेवेकरी भोजन करून रात्री निद्रिस्त झाले. तेथे एक देवीचे उग्रस्थान होते. ती देवी उग्ररूप धारण करून जिकडे तिकडे त्रास देऊ लागली. त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांस त्रास होऊ लागला. इतक्यात समर्थ जागृत होऊन म्हणाले, देवीला उशास घेतो. श्रींनी चोळाप्याचे भविष्य पूर्वीच सांगितले होते. त्याप्रमाणे मध्यान्ह रात्रीच्या समयास चोळाप्पास उपद्रव झाला. चोळाप्पा घाबरलेला पाहून सर्व मंडळीही घाबरली. चोळाप्पाच्या प्रेमाकरिता समर्थास भयंकर ताप भरला. नंतर देशपांडे यांनी समर्थास आपल्या गाडीतून अक्कलकोटास आणले. इकडे चोळाप्पाला अधिक त्रास होऊन (तो) शके १७९९ अश्विन शुद्ध नवमीस दिवसा इहलोक सोडून परलोकांत गेला. त्या दिवशी महाराजांस चैन नसून वृत्ती उदास होती.

राजपत्नीने श्रींस विचारले, महाराज, आज आपली वृत्ती उदास का झाली? समर्थ हळूहळू म्हणाले, काय करू? चोळ्याची संगत तुटली! तो वियोग सहन होत नाही गं! चोळ्यावाचून कोठे धावू? लीला कोणास दाखवू? आज सात जन्माचा सांगाती गेला गं! असे आम्हीही लवकरच जाऊ। हे ऐकून राणी साहेबांस फार वाईट वाटले. चोळाप्पा हा श्रींचा एकनिष्ठ भक्त होता. म्हणूनच महाराज चोळाप्पाची काळजी वाहत असत. असो. श्रींचे जे सेवक झाले, त्याची सर्वस्वी काळजी समर्थासच आहे. कितीही झाले, तरी आई-बाप क्षमा करतात. तसे समर्थाचे आहे. आमच्या हातून कितीही अपराध झाले, तरी निष्ठुरपणा किंवा विषमता या आईच्या (समर्थाच्या) हातून होत नाही. अशी श्रींची लीला अगाध होती.

स्वामींनी हाताळले अनेक रुग्ण
स्वामींची भक्ती सुटका करे रुग्ण
स्वामींच्या सेवेत जर असेल मनोरुग्ण
भिऊ नको मंत्रजपाने पळत जाई रुग्ण ।। १।।

स्वामीभक्त चोळाप्पा झाला आणि रुग्ण
अहोरात्र स्वामी त्याला वाचविण्यास मग्न, शेवटी यमराज घाबरला नेण्यास चोळाप्पा रुग्ण
स्वामींनी परवानगी
देता स्वर्गगमनाचे पूर्णस्वप्न ।। २।।

भक्त चोळाप्पा स्वामींचा दूतखास
स्वामी आणि भक्त एकजीव एकमास
चोळाप्पा करी स्वामी सेवा बारोमास
कृष्णसुदामा कृष्णार्जुन सोळा
तोळा खास ।। ३।।

रामभक्त हनुमान तसा त्याचा मान
सर्व कारभार स्वामी करिती देऊन मान
चोळाप्पाने न राखीला दुराभिमान
चोळाप्पाने झेंडा रोविला चंद्रावर
घेऊन चंद्रयान ।। ४।।

भक्तजन घ्या स्वामींचे नाम
सातासमुद्रापार नेईल स्वामींचे नाम
वल्हवा तुम्ही नाव घेऊन देवाचे नाम
सुवर्णक्षरांनी कोरले
हृदयात राम ।। ५।।

स्वामी समर्थ महाराज की जय

[email protected]

कोण, कुणाचा पत्ता कापणार?

शारजा (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२१ हंगामातील प्ले-ऑफ (बाद) फेरीतील दुसऱ्या सामन्यात एलिमेशनमध्ये सोमवारी (११ ऑक्टोबर) शारजा क्रिकेट मैदानावर बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या लढतीतील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने कोण, कुणाचा पत्ता कापणार, याची उत्सुकता आहे.

ताज्या गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ एलिमिनेशनमध्ये भिडतात. १४ सामन्यांत ९ विजयांसह (१८ गुण) विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी तिसरे स्थान मिळवले. त्यांचे आणि दुसऱ्या स्थानावरील चेन्नई सुपर किंग्जचे गुण समसमान आहेत. मात्र, सरस धावगतीच्या (रनरेट) जोरावर धोनीच्या संघाने दुसरे स्थान पटकावले. साखळीतील १४पैकी निम्मे सामने जिंकून १४ गुणांसह कोलकाताने चौथे स्थान नक्की केले. पाचव्या स्थानी असलेला गतविजेता मुंबई इंडियन्स आणि त्यांचे समान गुण असले तरी सरस रनरेट नाइट रायडर्सना तारून गेला. पॉइंट्स टेबलमधील तळातील दोन संघांमध्ये असलेल्या संघांना फायनल प्रवेश तितका सोपा नसतो. त्यांना किमान दोन सामने जिंकावे लागतात. एलिमिनेटरमध्ये जिंकल्यानंतर क्वॉलिफायर १मध्ये अव्वल दोन संघांतील पराभूत संघाशी दोन हात करावे लागतात. कुठलाही संघ एका वेळी एकाच सामन्याचा विचार करतो. त्यामुळे बंगळूरु आणि कोलकातासमोर आजच्या सामन्यात खेळ उंचावण्याचे आव्हान आहे.

आमने-सामनेचा विचार केल्यास यंदाच्या हंगामातील दोन्ही लढतींपैकी प्रत्येकाने एकेक सामना जिंकला आहे. बंगळूरुने पहिल्या टप्प्यात बाजी मारली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोलकाता वरचढ ठरला. युएईत झालेल्या उर्वरित हंगामाचा विचार करता बंगळूरुने सातपैकी चार सामने जिंकले. सलग दोन पराभवांनंतर विजयाची हॅटट्रिक साधताना विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी जबरदस्त कमबॅक केले. तळातील सनरायझर्स हैदराबादने विजयी मालिका खंडित केली तरी शेवटच्या साखळी लढतीत पंजाब किंग्जला हरवत रॉयल चॅलेंजर्सनी अव्वल चार संघांत दिमाखात स्थान मिळवले. इयॉन मॉर्गन आणि कंपनीने उर्वरित हंगामात सर्वोत्तम सांघिक खेळ करताना सातपैकी पाच सामने जिंकण्याची करामत साधली. तसेच बाद फेरी गाठली. साखळीतील शेवटचे दोन सामने जिंकत कोलकाताने कामगिरीत सातत्य राखले आहे. तळातील दोन संघांमध्ये चार गुणांचा फरक असला तरी एलिमिनेटरमध्ये एक रंगतदार लढत अपेक्षित आहे.

बंगळूरु आणि कोलकाताच्या इथवरच्या वाटचालीमध्ये डोमेस्टिक क्रिकेटपटूंचा मोठा वाटा आहे. बंगळूरूकडे कर्णधार विराट कोहलीसह एबी डेविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल असले तरी आघाडी फळीतील देवदत्त पडिक्कलने फलंदाजी उंचावण्यात मोठे योगदान आहे. गेल्या चार सामन्यांत मॅक्सवेलला सूर गवसला. शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्ध यष्टिरक्षक, फलंदाज श्रीकर भरतने अफलातून बॅटिंग केली. गोलंदाजीतही मध्यमगती हर्षल पटेल तसेच लेगस्पिनर युझवेंद्र चहलने सातत्य राखले आहे. कोलकात्याला शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठीने फलंदाजीमध्ये तारले आहे. मात्र, कर्णधार मॉर्गन तसेच माजी कर्णधार दिनेश कार्तिकचा बॅडपॅच चिंतेचे कारण आहे. वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन तसेच प्रसिध कृष्णाने गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अन्य गोलंदाजांकडून त्यांना चांगली साथ अपेक्षित आहे.

एलिमिनेटरमधील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने प्रत्येक प्रमुख क्रिकेटपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल.

वेळ : सायं. ७.३० वा.

 

ऑर्केस्ट्रा कलाकारांना कोरोनाचा फटका

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सलग दुसऱ्या वर्षी नवरात्रोत्सवात गरब्यावर बंदी असल्याने त्याचा फटका ऑर्केस्ट्रा कलाकारांना बसला आहे. आम्ही पोट कसे भरायचे? असा सवाल हे कलाकार करत आहेत. गरब्यावर बंदी आणल्याने गरबा रसिकांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवात गरबा मोठ्या प्रमाणात होतो. गरब्यादरम्यान ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस असतात. नऊ दिवस विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रादरम्यान या कलाकारांना कामे मिळतात. मात्र गत वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे गरब्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जगायचे कसे? असा सवाल हे कलावंत करत आहेत. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे एका वेबसाईटने म्हटले आहे.

राज्य सरकारने गरब्यावर बंदी घातल्याने दांडियाप्रेमींसह वस्त्र पुरवणारे व्यावसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक, गरबा नृत्य प्रशिक्षकांमध्ये नाराजी आहे.

कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? असा सवाल कलावंत करत आहेत. नवरात्र उत्सव सुरू आहे. या दिवसांमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना खूप मागणी असते. मात्र, यंदा राज्य सरकारने गरब्याला परवानगी न दिल्यामुळे या कलाकारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे.

राज्यात साडेआठ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवारी दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-१९ लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारी दिली.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, शनिवारी दिवसभरात ६ हजार ४७ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ६३५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ८ कोटी ७२ लाख ९३ हजार ८४४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९९ हजार ७१ लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे (९०,१३९) आणि मुंबईमध्ये (८८,९९१) लस देण्यात आल्या.

शहरात लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका आयुक्तांकडून नियोजन केले जात आहे. शहरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी डॉ. व्यास विशेष आढावा घेत आहेत.

शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्वाचे : राज्यपाल

मुंबई (प्रतिनिधी) : केवळ शारीरिक आरोग्य उत्तम असणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्य तितकेच, किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे. कोरोना काळात अनेक लोकांना शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचा देखील सामना करावा लागला. कोरोना आला आणि जाईल देखील, परंतु मानसिक आरोग्य जपणे आवश्यक असून डॉक्टरांनी रुग्णांना आत्मविश्वास व नवी उमेद देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ व डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोढा फाऊंडेशन व लोढा लग्झरीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयरा लोढा या मुलीने मानसिक आरोग्य या विषयावर तयार केलेले ‘व्हाट आर यू वेटिंग फॉर’ हे गीत सादर केले.

राज्यपालांच्या हस्ते मानसोपचार तज्ज्ञ डॉ. झिराक मार्कर, डॉ. झरीर उदवाडीया, डॉ. शशांक जोशी, डॉ. मुझफ्फल लकडावाला, डॉ. चेतन भट, डॉ. अब्दुल अन्सारी, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. पंकज पारेख, डॉ. मनोज मश्रू, डॉ. अंजली छाब्रिया, डॉ. मिलिंद कीर्तने यांसह ४० डॉक्टर्स व तज्ज्ञांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

लसीकरणात नवी मुंबईची आघाडी

नवी मुंबई (वार्ताहर) : कोरोनाला हरवायचे असेल आणि संभाव्य लाटेला थांबवायचे असेल, तर लसीकरणावर भर देऊन, नागरिकांना संरक्षित करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता शहरात शंभराहून अधिक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ५० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली असून ९७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेला शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. कोरोनापासून संरक्षित होण्यासाठी सुरक्षा नियम पाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरण करून स्वतःला संरक्षित करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

त्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून नवी मुंबईत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिकेने हा टप्पा गाठला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबरपर्यंत १६ लाख १६ हजार ११३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ९७ टक्के आहे. दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. यावरून लसीकरणात महापालिका पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कचऱ्याचे साम्राज्य

कल्याण (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केट परिसरात कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फुलमार्केट, भाजी मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, फळ मार्केट, धान्य मार्केट असा परिसर असून या परिसरात विविध प्रकारच्या मालांच्या गाड्यांचा मोठा राबता असतो. नवरात्री उत्सवामुळे फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी आवक झाली आहे. परंतु दररोज नित्यनेमाने संध्याकाळी येणारा पाऊस आणि ग्राहकवर्गाने फिरवलेली पाठ पाहता फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील खरेदीला ग्राहकांचा निरउत्साह पाहता फुल मार्केट मधील व्यापऱ्यांवर न खपलेली फुले फेकून देण्याची वेळ आलेली आहे. या कुजलेल्या आणि सडलेल्या फुलांचे कृषी उत्पन्न बाजार समिती रस्त्यालगत ढिगारेच्या ढिगारे दिसत असून धक्कादायक बाब म्हणजे या कचऱ्याच्या फुलांच्या ढिगांमधून फुले वेचून काहीजण ती विक्रीसाठी नेतात, हे दुदैवी असून फुलांच्या कचऱ्याचे ढिग लागेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन करते काय? असा सवाल आता उभा रहिला आहे.

फुल मार्केटचे मनपा, कृषी उत्पन्न बाजार समिती यामधील भिजंत घोगंडे, फुल मार्केटची दूरवस्था, तेथील घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पाहता सर्वसामान्य ग्राहकवर्ग कसा या मार्केटमध्ये पाऊल टाकणार, अशी शोकांतिका झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारातील भाज्यांचा कचरा इतस्ततः पसरलेला असून त्यातून फळभाज्या वेचणारे लोक पाहता आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागरूक असणाऱ्या, भाजी घेणाऱ्या ग्राहकांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही असे दृष्य दिसत आहे. धान्य बाजारात देखील कचारा व गाड्यांची बेशिस्तपणे केलेली पार्किंग पाहता, मोकाट जनावरांचा वावर पाहता ‘स्वच्छ भारत मिशनचे’ तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहटेच्या सुमारास घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहता कोरोना नियमवलीला हरताळ फसल्याचे चित्र दिसते. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कचरा, घाणीचे साम्राज्य कधी संपवणार, आवार कसा स्वच्छ करणार? असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सभापती कचाऱ्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार याकडे खरेदीसाठी येणारा ग्राहकवर्ग यानिमित्ताने मोठ्या आशाने अपेक्षा करीत आहेत.

‘कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल थळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही’. ‘कल्याण – डोंबिवली मनपा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या फुल मार्केटमधील कचरा संकलनासाठी दररोज ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या आवारातील कचाऱ्याची विल्हेवाट करावी याबाबत दोन नोटीसा दिल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने कचऱ्याबाबत गंभीरपणे दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगितले. ‘कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘फुल मार्केटमधील कचरा मनपा नेत नसल्याने फुलांचा कचारा दिसत आहे आणि आम्ही आमचा कचारा उचलतो’ असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी हट्टाने नाही, तर जोखीम पत्करून निर्णय घेतात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात, जोखीम पत्करतात. म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय परिणामकारक ठरतो. देश बदलण्यासाठी भाजप सरकार स्थापन झाले आहे. देशात बदल घडवून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले.

पंतप्रधान मोदी यांना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमित शहा यांनी ही मुलाखत दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. पंतप्रधान मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती. मात्र, विकासाची गंगा आणून त्या राज्याला देशातील एक सर्वोत्तम राज्य बनवले, असे शहा यांनी म्हटले. राजकारणात नेते धोका पत्करणे नाकारतात. त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पण पंतप्रधान मोदी जिद्दीने जोखीम पत्करतात आणि निर्णय घेतात, असे मुलाखतकाराने विचारले. त्यावर अमित शहा यांनी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही. ते जोखीम पत्करून निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक ठिकाणी पोहोचवायचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला, जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे, असे म्हटले आहे.

मोदींच्या आयुष्यातील आव्हानांविषयी विचारले असता शहा म्हणाले की, त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागांत विभागले जाऊ शकते. एक, भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा पहिला काळ हा संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ त्यांचा मुख्यमंत्री आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरचा. त्यांना भाजपमध्ये पाठवण्यात आले, तेव्हा त्यांना संघटन मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती. त्यानंतर ते संघटन मंत्री झाले आणि १९८७ पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. १९८७ नंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची आली. पहिल्यांदाच भाजप स्वबळावर सत्तेवर आला. त्यानंतर भाजपचा प्रवास सुरू झाला. १९९० मध्ये दोघे एकत्र सत्तेवर आलो. त्यानंतर १९९५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि तेथून भाजपने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही,” असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्र्यांशी आजपासून थेट संवाद

भारतीय जनता पक्षाने एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारपासून (११ ऑक्टोबर) आता पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना भाजप मुख्यालयात थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेसाठी असलेला सहकार विभाग कोरोनामुळे काही काळ हा विभाग कार्यरत नव्हता, अशी माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव यांच्यापासून होणार आहे.

‘सक्षम पिढी घडवणाऱ्या मातृशक्तीचा सन्मान’

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना काळात कितीही संकटे आली तरी न डगमगता कार्यरत राहून सक्षम पिढी घडवणाऱ्या मातृशक्तीचा हा सन्मान आहे, असे गौरवोद्गार आमदार संजय केळकर यांनी काढले. नवरात्रोत्सवानिमित्त ठाणे शहर भारतीय जनता पार्टी, स्लम सेलच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या महिलांचा यथोचित गौरव रविवारी ठाण्यात करण्यात आला. यावेळी आ. केळकर बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजक स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्या कल्पकतेचेही आ. केळकर यांनी कौतुक केले, तर हा सोहळा म्हणजे समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान असल्याचे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे म्हणाले.

रविवारी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, स्लम सेलच्या वतीने विविध क्षेत्रातील नऊ नवदुर्गांचा सन्मान सोहळा ठाणे पूर्वेकडील सर्वसेवा समिती हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, ज्येष्ठ भाजप नेत्या वीणा भाटिया, प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमो अध्यक्ष सारंग मेढेकर, ओबीसी सेल अध्यक्ष सचिन केदारी, मच्छीमार सेल अध्यक्ष अमरिश ठाणेकर, राजेश गाडे, सचिन कुटे, विद्या कदम, उषा पाटील, सिद्धेश पिंगुळकर आणि विकी टिकमाणी आदी उपस्थित होते. याप्रसंगी गृहिणी ते यशस्वी उद्योगिनी जया झाडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी ममता डिसोझा, चार्टर्ड अकौंटंट सोनाली दळवी, संगणक अभियंता मृणाली खेडकर, महिला कीर्तनकार हभप अर्चना आडके, सिंधी भाषा पुरस्कारकर्त्या कशिष जग्यासी, पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, संध्या सावंत, वनिता जेठरा आणि गौरी सोनवणे आदी नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

माथेरानमधील एटीएम बंद, बीएसएनएल नॉट रिचेबल

मुकुंद रांजाणे

माथेरान : माथेरानमधील एकमेव बँक असलेल्या युनियन बँकेच्या सेवेला मागील काही वर्षापासून घरघर लागली असून अनियंत्रित सेवेमुळे माथेरांकर हैराण झाले आहेत ह्या बँकेच्या मार्फत गावातील एकमेव एटीएम सेवा चालविली जाते पण नेमक्या विकेंड लाच हे एटीएम बंद पडत आहे तर बँकेमधील ऑनलाईन सेवाही नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांना पासबुक वर एन्ट्री मिळण्यास विलंब होत असतो व बँकेबाहेर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे माथेरान मधील अनेकांनी ह्या विरोधात तक्रारी करून देखील ही सेवा जैसे थे आहे .

माथेरान या मुंबईपासून सर्वात जवळ असलेल्या पर्यटनस्थळी सुट्टी एन्जोय करण्यासाठी येत असतात . तेथे असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी सर्वात म्हहात्वाचे साधन म्हणजे दूरसंचार सेवा . माथेरानचे आर्थिक नियोजनाचा मुख्य भार असणाऱ्या टेलीफोन सेवेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत .केवळ मनस्ताप नाही तर माथेरान मधील व्यावसायिक यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्यास देखील दूरसंचार सेवा जबाबदार आहे . भारत दूरसंचार निगम च्या अशा भोंगळ कारभारामुळे माथेरान कर दूरसंचारच्या सेवेला पूर्णपणे कंटाळले आहेत . दरम्यान , गेली तीन वर्षे सतत असे प्रकार होत असल्याने माथेरान मध्ये अनेकांनी दूरसंचार निगमच्या सेवेला रामराम करून खासगी कंपनी यांची सेवा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

माथेरान हे पूर्वी पूर्णपणे भारत दूरसंचार निगमच्या सेवेवर अवलंबून होते. माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक, स्थानिक रहिवाशी तसेच लहान सहान उद्योजक यांच्याकडे मिळून किमान पाचशे टेलिफोन होते. त्यानंतर माथेरान मध्ये दूरसंचार निगमच्या मोबाईल सेवेला प्रचंड प्रतिसाद होता. जवळपास आठशे ग्राहक दूरसंचार निगमची सेवा वापरत होते. मात्र आता परिस्थितीत फार बदलली आहे. कारण आजचा विचार करता जवळपास शंभर दूरध्वनी केवळ राहिले आहेत. त्यांची देखील सेवा पर्यटन हंगाम असलेल्या शनिवार आणि रविवारी बंद असते. अशावेळी पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने अनेकांनी आपली मोबाईल सेवा देखील बदली करून घेतली आहे. अन्य नेटवर्क असलेल्या खाजगी कंपनी यांची सेवा चांगली मिळत असल्याने हा बदल सर्वांना व्यवसायासाठी करावा लागला आहे. त्यात महिन्यातून पंधरा दिवस माथेरानमध्ये दूर संचार निगम ची सेवा बंद असते. त्यामुळे युनियन बँकेचे एटीएम, विविध हॉटेल व्यावसाईक यांची बुकिंग, क्रेडीट कार्ड यांची सुविधा बंद पडते . त्यामुळे होणारे नुकसान याची मोजदाद केली असता माथेरान मध्ये भारत दूरसंचार निगमची सेवा कोणालाही फायद्याची नाही.

दुसरीकडे माथेरानमध्ये भारत दूरसंचार निगम जाणीवपूर्वक सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माथेरान कर करीत आहेत . कारण माथेरान मध्ये असलेल्या टेलिफोन कार्यालयात असलेले ऑपरेटर यांचे पाद गेली काही महिन्यापासून रिक्त आहे आहे . त्यामुळे कोणीही तंत्रज्ञ नसल्याने माथेरान मधील कार्यालय ओस पडलेले असते . त्याशिवाय गंभार बाब म्हणजे माथेरान मध्ये असलेल्या भारत दूरसंचार निगम च्या मोबाईल टॉवरला दोन खाजगी कंपनी चे मोबाईल यंत्रे बसविली आहेत. त्यांची सेवा कधीही बंद होत नाही, परंतु बीएसएनएलची सेवा दर आठवड्याला कोलमडून पडते. याचे गौडबंगाल कोणालाही समजून येत नाही. भारत दूरसंचार निगम च्या टॉवरमधून अन्य खासगी कंपनी सेवा देतात.