नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात, जोखीम पत्करतात. म्हणून त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय परिणामकारक ठरतो. देश बदलण्यासाठी भाजप सरकार स्थापन झाले आहे. देशात बदल घडवून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले.
पंतप्रधान मोदी यांना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमित शहा यांनी ही मुलाखत दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. पंतप्रधान मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती. मात्र, विकासाची गंगा आणून त्या राज्याला देशातील एक सर्वोत्तम राज्य बनवले, असे शहा यांनी म्हटले. राजकारणात नेते धोका पत्करणे नाकारतात. त्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. पण पंतप्रधान मोदी जिद्दीने जोखीम पत्करतात आणि निर्णय घेतात, असे मुलाखतकाराने विचारले. त्यावर अमित शहा यांनी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. पण हट्टीपणा हा शब्द बरोबर नाही. ते जोखीम पत्करून निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक ठिकाणी पोहोचवायचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला, जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे, असे म्हटले आहे.
मोदींच्या आयुष्यातील आव्हानांविषयी विचारले असता शहा म्हणाले की, त्यांचे सार्वजनिक जीवन तीन भागांत विभागले जाऊ शकते. एक, भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा पहिला काळ हा संघटनात्मक कामाचा होता. दुसरा काळ त्यांचा मुख्यमंत्री आणि तिसरा राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरचा. त्यांना भाजपमध्ये पाठवण्यात आले, तेव्हा त्यांना संघटन मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट होती. त्यानंतर ते संघटन मंत्री झाले आणि १९८७ पासून त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. १९८७ नंतरची पहिली निवडणूक अहमदाबाद महानगरपालिकेची आली. पहिल्यांदाच भाजप स्वबळावर सत्तेवर आला. त्यानंतर भाजपचा प्रवास सुरू झाला. १९९० मध्ये दोघे एकत्र सत्तेवर आलो. त्यानंतर १९९५ मध्ये पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आणि तेथून भाजपने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही,” असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्र्यांशी आजपासून थेट संवाद
भारतीय जनता पक्षाने एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारपासून (११ ऑक्टोबर) आता पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना भाजप मुख्यालयात थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेसाठी असलेला सहकार विभाग कोरोनामुळे काही काळ हा विभाग कार्यरत नव्हता, अशी माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव यांच्यापासून होणार आहे.