Sunday, June 22, 2025

लसीकरणात नवी मुंबईची आघाडी

लसीकरणात नवी मुंबईची आघाडी

नवी मुंबई (वार्ताहर) : कोरोनाला हरवायचे असेल आणि संभाव्य लाटेला थांबवायचे असेल, तर लसीकरणावर भर देऊन, नागरिकांना संरक्षित करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता शहरात शंभराहून अधिक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ५० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली असून ९७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.


लसीकरणाच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेला शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. कोरोनापासून संरक्षित होण्यासाठी सुरक्षा नियम पाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरण करून स्वतःला संरक्षित करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.


त्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून नवी मुंबईत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिकेने हा टप्पा गाठला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबरपर्यंत १६ लाख १६ हजार ११३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ९७ टक्के आहे. दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. यावरून लसीकरणात महापालिका पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Comments
Add Comment