मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवारी दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-१९ लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारी दिली.
राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, शनिवारी दिवसभरात ६ हजार ४७ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ६३५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ८ कोटी ७२ लाख ९३ हजार ८४४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९९ हजार ७१ लस देण्यात आली. त्यापाठोपाठ ठाणे (९०,१३९) आणि मुंबईमध्ये (८८,९९१) लस देण्यात आल्या.
शहरात लसीकरणाबाबत काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका आयुक्तांकडून नियोजन केले जात आहे. शहरात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी डॉ. व्यास विशेष आढावा घेत आहेत.