
कल्याण (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केट परिसरात कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फुलमार्केट, भाजी मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, फळ मार्केट, धान्य मार्केट असा परिसर असून या परिसरात विविध प्रकारच्या मालांच्या गाड्यांचा मोठा राबता असतो. नवरात्री उत्सवामुळे फुल मार्केटमध्ये फुलांची मोठी आवक झाली आहे. परंतु दररोज नित्यनेमाने संध्याकाळी येणारा पाऊस आणि ग्राहकवर्गाने फिरवलेली पाठ पाहता फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील खरेदीला ग्राहकांचा निरउत्साह पाहता फुल मार्केट मधील व्यापऱ्यांवर न खपलेली फुले फेकून देण्याची वेळ आलेली आहे. या कुजलेल्या आणि सडलेल्या फुलांचे कृषी उत्पन्न बाजार समिती रस्त्यालगत ढिगारेच्या ढिगारे दिसत असून धक्कादायक बाब म्हणजे या कचऱ्याच्या फुलांच्या ढिगांमधून फुले वेचून काहीजण ती विक्रीसाठी नेतात, हे दुदैवी असून फुलांच्या कचऱ्याचे ढिग लागेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन करते काय? असा सवाल आता उभा रहिला आहे.
फुल मार्केटचे मनपा, कृषी उत्पन्न बाजार समिती यामधील भिजंत घोगंडे, फुल मार्केटची दूरवस्था, तेथील घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पाहता सर्वसामान्य ग्राहकवर्ग कसा या मार्केटमध्ये पाऊल टाकणार, अशी शोकांतिका झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारातील भाज्यांचा कचरा इतस्ततः पसरलेला असून त्यातून फळभाज्या वेचणारे लोक पाहता आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागरूक असणाऱ्या, भाजी घेणाऱ्या ग्राहकांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही असे दृष्य दिसत आहे. धान्य बाजारात देखील कचारा व गाड्यांची बेशिस्तपणे केलेली पार्किंग पाहता, मोकाट जनावरांचा वावर पाहता ‘स्वच्छ भारत मिशनचे’ तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहटेच्या सुमारास घाऊक खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहता कोरोना नियमवलीला हरताळ फसल्याचे चित्र दिसते. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कचरा, घाणीचे साम्राज्य कधी संपवणार, आवार कसा स्वच्छ करणार? असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सभापती कचाऱ्याचा प्रश्न कसा मार्गी लावणार याकडे खरेदीसाठी येणारा ग्राहकवर्ग यानिमित्ताने मोठ्या आशाने अपेक्षा करीत आहेत.
‘कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल थळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही’. ‘कल्याण - डोंबिवली मनपा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मनपाच्या फुल मार्केटमधील कचरा संकलनासाठी दररोज ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या आवारातील कचाऱ्याची विल्हेवाट करावी याबाबत दोन नोटीसा दिल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने कचऱ्याबाबत गंभीरपणे दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगितले. ‘कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘फुल मार्केटमधील कचरा मनपा नेत नसल्याने फुलांचा कचारा दिसत आहे आणि आम्ही आमचा कचारा उचलतो’ असे त्यांनी सांगितले.