
शारजा (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२१ हंगामातील प्ले-ऑफ (बाद) फेरीतील दुसऱ्या सामन्यात एलिमेशनमध्ये सोमवारी (११ ऑक्टोबर) शारजा क्रिकेट मैदानावर बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या लढतीतील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने कोण, कुणाचा पत्ता कापणार, याची उत्सुकता आहे.
ताज्या गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ एलिमिनेशनमध्ये भिडतात. १४ सामन्यांत ९ विजयांसह (१८ गुण) विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी तिसरे स्थान मिळवले. त्यांचे आणि दुसऱ्या स्थानावरील चेन्नई सुपर किंग्जचे गुण समसमान आहेत. मात्र, सरस धावगतीच्या (रनरेट) जोरावर धोनीच्या संघाने दुसरे स्थान पटकावले. साखळीतील १४पैकी निम्मे सामने जिंकून १४ गुणांसह कोलकाताने चौथे स्थान नक्की केले. पाचव्या स्थानी असलेला गतविजेता मुंबई इंडियन्स आणि त्यांचे समान गुण असले तरी सरस रनरेट नाइट रायडर्सना तारून गेला. पॉइंट्स टेबलमधील तळातील दोन संघांमध्ये असलेल्या संघांना फायनल प्रवेश तितका सोपा नसतो. त्यांना किमान दोन सामने जिंकावे लागतात. एलिमिनेटरमध्ये जिंकल्यानंतर क्वॉलिफायर १मध्ये अव्वल दोन संघांतील पराभूत संघाशी दोन हात करावे लागतात. कुठलाही संघ एका वेळी एकाच सामन्याचा विचार करतो. त्यामुळे बंगळूरु आणि कोलकातासमोर आजच्या सामन्यात खेळ उंचावण्याचे आव्हान आहे.
आमने-सामनेचा विचार केल्यास यंदाच्या हंगामातील दोन्ही लढतींपैकी प्रत्येकाने एकेक सामना जिंकला आहे. बंगळूरुने पहिल्या टप्प्यात बाजी मारली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोलकाता वरचढ ठरला. युएईत झालेल्या उर्वरित हंगामाचा विचार करता बंगळूरुने सातपैकी चार सामने जिंकले. सलग दोन पराभवांनंतर विजयाची हॅटट्रिक साधताना विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी जबरदस्त कमबॅक केले. तळातील सनरायझर्स हैदराबादने विजयी मालिका खंडित केली तरी शेवटच्या साखळी लढतीत पंजाब किंग्जला हरवत रॉयल चॅलेंजर्सनी अव्वल चार संघांत दिमाखात स्थान मिळवले. इयॉन मॉर्गन आणि कंपनीने उर्वरित हंगामात सर्वोत्तम सांघिक खेळ करताना सातपैकी पाच सामने जिंकण्याची करामत साधली. तसेच बाद फेरी गाठली. साखळीतील शेवटचे दोन सामने जिंकत कोलकाताने कामगिरीत सातत्य राखले आहे. तळातील दोन संघांमध्ये चार गुणांचा फरक असला तरी एलिमिनेटरमध्ये एक रंगतदार लढत अपेक्षित आहे.
बंगळूरु आणि कोलकाताच्या इथवरच्या वाटचालीमध्ये डोमेस्टिक क्रिकेटपटूंचा मोठा वाटा आहे. बंगळूरूकडे कर्णधार विराट कोहलीसह एबी डेविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल असले तरी आघाडी फळीतील देवदत्त पडिक्कलने फलंदाजी उंचावण्यात मोठे योगदान आहे. गेल्या चार सामन्यांत मॅक्सवेलला सूर गवसला. शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्ध यष्टिरक्षक, फलंदाज श्रीकर भरतने अफलातून बॅटिंग केली. गोलंदाजीतही मध्यमगती हर्षल पटेल तसेच लेगस्पिनर युझवेंद्र चहलने सातत्य राखले आहे. कोलकात्याला शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठीने फलंदाजीमध्ये तारले आहे. मात्र, कर्णधार मॉर्गन तसेच माजी कर्णधार दिनेश कार्तिकचा बॅडपॅच चिंतेचे कारण आहे. वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन तसेच प्रसिध कृष्णाने गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अन्य गोलंदाजांकडून त्यांना चांगली साथ अपेक्षित आहे.
एलिमिनेटरमधील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने प्रत्येक प्रमुख क्रिकेटपटूंची कामगिरी निर्णायक ठरेल.
वेळ : सायं. ७.३० वा.