सोन्याचा मुलामा

माधवी घारपुरे

आमची ऑस्ट्रेलिया ट्रीप छानच झाली. नुसत्याच भौगोलिक विविध स्थळांव्यतिरिक्त माणसांचे विविध स्वभावही वाचता आले. ‘केल्याने देशाटन…’ हे चूक नाही. ट्रीपमध्ये सर्व सधन आणि उच्चशिक्षित होते. चारच लोक पुण्याचे भाजीविक्रेते आणि रुखवताचं सामान विकणारे होते. शिक्षणही बेताचेच असले तरी स्वभावाने चांगले वाटले. ते चौघे अलग नाहीत हे कळूनही ते अलग पडले होते. विमानात त्यांच्या सीट्स नेमक्या आमच्या मागेच होत्या. काही फॉर्म भरणे, एअर होस्टेस काही म्हणाली, त्यांना कळत नव्हते. साहजिकच त्यांनी माझी मदत घेतली. मला क्षणभर हसू आलं आणि आपण कुणी मोठं असल्याचा भास झाला जो क्षण अत्यंत क्षुद्र होता. मन म्हणालं, तूच त्यांना नीट गोष्टी समजावून सांगितल्या तशी त्यांची भीड चेपली गेली.

सीडनीला पोहोचलो ते थेट हार्बर ब्रीज, मरियम चेअर वगैरे पाहून ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. रूम्स देताना त्या चौघी. दोन रूम आमच्याच उजव्या-डाव्या बाजूला आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही आणि इतरांच्या सुद्धा! कार्ड स्वाइप करून दार उघडण्यापासून माहिती करून घ्यावी लागली. मलाही त्यात आनंद मिळत होता. एक दोनदा त्यांनी ब्रेकफास्ट, लंचला इतरांबरोबर बसण्याचा प्रयत्न केला. पण दुर्लक्षितच झाले. माणसाचा खेडवळपणा माणसाला इतका अडगळीत टाकतो का? हा प्रश्न मला सतावत नव्हता, तर व्यवहारातल्या सत्याची जाणीव करून देत होता. हळूहळू ट्रीप संपत आली. उद्याला मुंबईला रवाना व्हायचं. सकाळचा आजचा वेळ पूर्णपणे ऑपेरा हाऊस बघण्यात गेला. संध्याकाळी एका देखण्या हॉलमध्ये सगळी जमा झाली. खरं तर लोकांनी आपापल्या ओळखी करून घेतल्या होत्या. पण वेळ होता म्हणून टूर मॅनेजरने परत ओळखी, आपापली स्पेशालिटी, छंद, बैठे खेळ असा प्रोग्रॅम आखला होता.

कुणी गाणी, कुणी बॅडमिंटन, कुणी ब्रिलियर्डस, कुणी डान्स आपापल्या हॉबीज सांगितल्या. समाजकार्य हे तर प्रत्येकच करतो, असे सांगत होता. एकाने तर सांगितलं,
“We can not live without society. The person who lives without society he may be the god or the beast. So we must help others. etc….”

आता माझा नंबर आला. मी उठले तोवर ठाण्यावरून मुलाचा फोन आला. हे म्हणाले, “मी सांगतो, तोवर तू बोलून घे.” मी फोन घेतला. मुलगा सांगत होता, “आई तू गेलीस आणि तिसऱ्याच दिवशी आपली कामवाली नीलाबाईच्या मुलाला ट्रेनमधून पडून अपघात झाला. तुला कळवले नाही. आज मात्र त्याचा पाय गुडघ्यापासून काढायचे निश्चित झाले. नंतर आर्टिफिशियल बसवणार आहेत. ६०-७० हजाराला प्रकरण जाईल.” नीलाबाईला आता १५०० चा चेक दिलाय जो तू गरजेसाठी सही करून दिला होतास. बाकी संस्थांकडून बघू असे तिला सांगितले. तू रागावणार नाहीस याची खात्री होती.

मी सांगितले, “Dont Worry. You have done a good job.” मला वाटलं, अगदी योग्य वेळेला लेकाचा फोन आलाय. इथे प्रत्येकाला समाजकार्य करायचं आहे. आपण फक्त १/१ हजाराचं आवाहन करू. २५/३० हजार आरामात जमतील. आताच फोन आलाय. खोटं काहीच नाही.

माझं फोनवर बोलणं होईपर्यंत त्यांच्यानंतर त्या चौघांतील एक पुरुष उभा राहिला. म्हणाला, “आमचा धंदाच असा आहे की, पहाटे चार, साडेचारला भाज्या आणायला मार्केटला जावं लागतं. खूप छंद जोपासावे वाटतात, पण वेळ नाही. पोरांना मात्र चांगलं शिकवतो, पैसा चांगला कमावतो. येळ मिळाला की, पुस्तकं वाचतो. इतकंच शिकलो की, देवाने इतकं दिलंय. मुलं पण शिकताहेत तर मिळकतीतले १०० रु. भाग १० रु. देवाला द्यायचे.” नमस्कार करून तो खाली बसला.

सर्वात शेवटी मी होते. योग्य ती माहिती देऊन सर्वांना एक एक हजार मदत करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने “वा छानच संधी! २-२ हजारही देऊ”, असे सांगितले. माझ्या मनाची झाडं खरं पारिजातकासारखी बहरतात. नंतर मात्र एकेकजण हळूहळू काढता पाय घेऊ लागला. कुणाकडे इंडियन करन्सी नव्हती. कुणाकडे खरेदीनंतर पैसेच शिल्लक राहिले नव्हते. कुणी आधीच उसने घेतले होते. कुणी सांगितले की, इंडियात गेल्यावर तुमच्या खात्यावर ट्रान्स्फर करू. एकूण नन्नाचा पाढा. एक दोघांनी फुलाची पाकळी नाही. पण परागकण तरी म्हणून ५००/५०० रुपये दिले.

बहरलेल्या प्राजक्ताची फुलं लवकरच कोमेजली. दुसरे दिवशी एअर पोर्टवर निघण्यासाठी जमलो, असं लक्षात आलं की, माझी नजर लोकं चुकवताहेत. मुंबई एअर पोर्टवर तर मला लांबूनच टाटा-बाय बाय केला गेला. आम्ही पण ट्रॉलीवर सामान टाकून निघालो तर मागून ताई-ताई आवाज आला. बघते तर भाजीवाले होते. म्हणाले, “ताई, खरेदी करून इतकेच ३५०० शिल्लक राहिले बघा. पुण्याच्या टॅक्सीचे पैसे ठेवून घेतलेत. तो पोरगा त्याच्या त्याच्या पायावर उभा राहिला की, हे पैसे सार्थकी लागतील. बराय! पुण्याला आला की, लेकीच्या लग्नाचं रुखवत आमच्याकडूनच घ्या बरं!” इतकंच बोलून गेले. माझं कोमेजलेलं झाड परत टवटवीत झालं. मन म्हणालं, “सोन्याचे मुलामे जरी समाजात असले ना, तरी निखळ सोनंही असतं बरं. फक्त ते ओळखता आलं पाहिजे.”

रोहिंग्या शरणार्थी नव्हेत घुसखोर……

सुकृत खांडेकर

म्यानमारमधून हाकलून दिलेले आणि बांगलादेशमार्गे भारतात घुसलेल्या रोहिंग्यांचा प्रश्न भारताला डोकेदुखी बनला आहे. त्यांना ठेवायचे कुठे आणि परत पाठवायचे कसे, असा पेच भारतापुढे निर्माण झाला आहे. ते भारताचे नागरिक नाहीत, ते म्यानमारचे रहिवासी असले तरी तो देश त्यांना नागरिक मानायला तयार नाही आणि बांगलादेशातून त्यांनी भारतात धाव घेऊन ते या देशात बस्तान मांडू इच्छित आहेत. कुणाचे ओझे कुणी सांभाळावे, अशी भारताची अवस्था झाली आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी एक ट्वीट करून रोहिंग्यांना बाह्य दिल्लीतील बक्करवाला अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित करण्यात येईल, असे जाहीर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दिल्लीत आपचे सरकार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला केंद्रातील मोदी सरकारशी संघर्षाला एक नवे निमित्त मिळाले. हरदीप पुरी यांच्या घोषणेला ‘आप’ने लगेचच विरोध केला. भाजप विरुद्ध आप नवा वाद सुरू झाला. ज्या रोहिंग्यांना भाजपने सदैव विरोध दर्शवला तोच पक्ष सत्तेवर असताना त्यांना राहायला घरे देणार, असे कसे होऊ शकते? या वादानंतर रोहिंग्या मुस्लीम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

म्यानमारच्या पश्चिमेला रखाइन प्रदेश आहे. सोळाव्या शतकापासून मुस्लीम लोक तेथे राहात आहेत. १८२६ मध्ये अंग्लो – बर्मा युद्धानंतर प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. तेव्हा बंगालमधून (आजच्या बांगला देशातून) मजूर म्हणून मुस्लीम लोकांना आणले गेले. हळूहळू रखाइनमधील मुस्लीम लोकसंख्या वाढत गेली. याच लोकसंख्येला रोहिंग्या म्हणून ओळखले जाते. १९४८ मध्ये म्यानमारवर असलेली ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली व तो देश स्वतंत्र झाला. तेव्हा त्या देशात बौद्धांची लोकसंख्या सर्वाधिक होती. बौद्ध विरुद्ध मुस्लीम असा तेथे नवा वाद सुरू झाला. रोहिंग्यांची वाढती लोकसंख्या हा त्या देशाला मोठा प्रश्न भेडसावू लागला. १९८२ मध्ये म्यानमार देशात नवा राष्ट्रीय कायदा जारी झाला. या कायद्यानुसार रोहिंग्या मुस्लिमांना दिलेला नागरिकत्वाचा दर्जा रद्द करण्यात आला. म्यानमार सरकार रोहिंग्यांना देश सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहे, त्यातून हे लोक बांगला देश आणि भारतात पलायन करू लागले आहेत. बांगला देशातून भारतात रोहिंग्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी चालू असून त्यातून कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न अनेक राज्यात निर्माण झाला आहे.

म्यानमारमधील रखाइनमध्ये सन २०१२ मध्ये जातीय दंगली झाल्या. त्यानंतर रोहिंग्यांची भारतात घुसखोरी वाढू लागली. रखाइनमधील हिंसाचारात हजारो लोकांचे बळी गेले. लाखो लोक बेघर झाले. २०१४ मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या जनगणनेमध्ये रखाइनमधील दहा लाख लोकांची नावे सामील करून घेतली नाहीत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये राहणे तेथील व्यवस्थेमुळे अशक्य झाले व म्यानमारलासुद्धा बांगला देशातून येणारे लोंढे नकोसे झाले. म्यानमारमधून घुसखोरी केलेले लाखो रोहिंग्या बांगलादेशात बिना दस्ताऐवज वर्षानुवर्षे राहत आहेत. त्यातलेच हजारो रोजगारासाठी भारतात घुसले आहेत. भारतात गेली अनेक वर्षे वास्तव्यास असणाऱ्या रोहिंग्यांकडे बनावट पॅनकार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आहेत.

रोहिंग्यांच्या घुसखोरीवर संसदेत अनेकदा चर्चा झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हजारो रोहिंग्यांनी देशात बेकायदा घुसखोरी केल्याचे मान्य केले आहे. रोहिंग्यांचे भारतात येणे हे बेकायदेशीर आहेच, पण ते वेगवेगळ्या मार्गाने भारतात आले आहेत. देशात घुसखोर रोहिंग्यांची संख्या नेमकी किती आहे, हे सरकारलाही सांगता येत नाही. कारण त्यांची नोंद नाही. सर्वोच्च न्यायालयात रोहिंग्यांविषयी एक याचिका गेली सात वर्षे प्रलंबित आहे. सन २०१७ मध्ये भाजप नेता व कायदे तज्ज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली. भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी मुस्लीम व रोहिंग्या मुस्लिमांची ओळख पटवून एक वर्षाच्या आत त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे त्यांची भूमिका काय आहे, अशी विचारणा केली. अनेक राज्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. बहुतेकांनी सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल, त्याचे आम्ही पालन करू, असे म्हटले आहे.

देशातील रोहिग्यांनी नामवंत वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाकडे आम्हाला शरणार्थीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जात नाही, तोपर्यंत सरकारने त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये (बंदिस्त) ठेवावे, अशी सूचना न्यायालयात करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी रोहिग्यांना दिल्लीत फ्लॅट देण्याची घोषणा करताच राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला. पण, केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्काळ खुलासा केला व असा कोणताही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले. रोहिंग्यांना डिपोर्टेशन सेंटर (निर्वासित छावण्यांमध्ये) ठेवण्यात यावे, अशी एकीकडे चर्चा चालू असताना त्यांना दिल्लीत फ्लॅट राहायला देणे व त्यांना नाष्टा व भोजन देण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे, असे वृत्त पसरल्यामुळे रोहिग्यांच्या प्रश्नाला विनाकारण फाटे फुटले. बाह्य दिल्लीतील बक्करवाला येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी फ्लॅट्स उभारले आहेत. त्या वसाहतीत रोहिग्यांचे स्थलांतर केले जाईल व तेथे २४ तास सुरक्षा व्यवस्था दिली जाईल, असे ट्वीट केंद्रीय मंत्री पुरी यांनी केल्याने कमालीचा गोंधळ निर्माण झाला. बक्करपुरा येथे अडीचशे फ्लॅट्स आहेत व मदनपुरा येथे एक हजार फ्लॅटस तयार आहेत. ही घरे काय घुसखोरांना द्यायची का, असा वादंग सुरू झाला. या फ्लॅटमध्ये पंखा, तीन वेळचे खाणे, लॅण्डलाइन फोन, टेलिव्हिजन, आदी सुविधा असतील, अशी चर्चा सुरू झाल्याने त्याला राजकीय वळण मिळाले. दिल्लीमध्ये मदनपुरा भागात रोहिंग्यांचा मुक्काम असून तेथे तंबू उभारले आहेत. या तंबूंसाठी दरमहा दिल्ली सरकार सात लाख रुपये भाडे मोजत आहेच. रोहिंग्यांना दिल्लीत घरे देण्यास विश्व हिंदू परिषदेने कठोर शब्दांत विरोध केला आहे.

सन २०१२ नंतर म्यानमारमधील हिंसाचारानंतर भारतात रोहिंग्यांची संख्या वाढली. गृहमंत्रालयाने युनायटेड नेशन्स ह्युमन राइटस कमिशनचा हवाला देऊन भारतात २०२१ पर्यंत १८ हजार रोहिंग्या मुस्लीम होते, अशी माहिती दिली होती. सन २०१७ मध्ये मोदी सरकारने राज्यसभेत माहिती देताना भारतात ४० हजार रोहिंग्या बेकायदा राहात असल्याचे म्हटले होते. दोन वर्षांत रोहिंग्यांची संख्या चौपट वाढली. देशात जम्मू-काश्मीर, हैदराबाद, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान व मणिपूरमध्ये रोहिंग्या आहेत. बांगलादेशी व रोहिंग्यांसाठी देशात शरणार्थींसाठी छावण्या नाहीत, हे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० डिसेंबर २०२० रोजी ठामपणे म्हटले होते – भारतात रोहिंग्यांचा कधीही स्वीकार केला जाणार नाही, रोहिंग्या हे शरणार्थी नसून ते घुसखोर आहेत, हीच भारताची भूमिका आहे.

नोकरीच्या आमिषाचे राज्यभर जाळे

अॅड. रिया करंजकर

राजाराम म्हात्रे आणि शांताबाई म्हात्रे सकाळी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. दोघांचेही अंदाजे वय ६०-६५च्या घरात होतं. पोलीस स्टेशनला आल्यावर अक्षरश: ते रडायला लागले. पोलीस हवालदाराने त्यांना पाणी दिलं आणि शांत राहून झाला प्रकार सांगण्यास सांगितला. दोघांनी पाणी घेतलं आणि शांताबाईने पुढाकार घेऊन झालेला प्रकार पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यास सुरुवात केली. साहेब चार लाखांसाठी फसवणूक झाली हो आमची. जमापुंजी लुटली गेली हो, अशा प्रकारे तिने सुरुवात केली आणि झालेला प्रकार क्रमवार ती सांगायला लागली.

तीस वर्षांचा त्यांचा मुकेश नावाचा मुलगा आहे. त्याला कुठेही नोकरी-धंदा नाही. शिकलेला असूनही कुठेही त्याला नोकरी मिळत नाही, त्यामुळे ओळखीच्याच (म्हणजेच ते सध्या राहत असलेला पत्ता तात्पुरता असून त्यांची घर डेव्हलपमेंटसाठी गेलेली आहेत.) ते राहत असलेल्या पत्त्यावर नवीन कोणी नळजोडणी केली, तर ती तोडण्यासाठी बीएमसीचे काही कर्मचारी येत होते. अशीच एका कर्मचाऱ्याशी त्यांची ओळख झाली ते तिथे आले की, त्यांच्याशी त्यांचं बोलणं होत होतं म्हणून त्यांनी आपल्या मुलाला कुठे कामधंदा मिळेल का?, असं त्यांना विचारलं.

एक दिवस त्याने महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये शांताबाई व तिचा मुलगा मुकेश आणि त्यांची मुलगी रेश्मा यांना घेऊन आले व एस. के. पाटील यांच्याशी ओळख करून दिली. हे महानगरपालिकेमध्ये पाणी खात्यामध्ये लोकांना नोकऱ्या लावतात, असं सांगितलं. या लोकांची एस. के. पाटीलबरोबर बोलणी झाली व त्यांनी नोकरीला लावतो, असं सांगून चार लाख रुपये लागतील, असं त्यांना सांगितलं. टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील, असं दोन्ही पार्ट्यांमध्ये ठरलं. दीड लाख रुपये शांताबाईने एस. के. पाटील यांना अगोदर दिले. त्याच्यानंतर काही दिवसांनी मुलाचं मेडिकल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलवले असता तिथे अगोदरच काही उमेदवार उभे होते. हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांना उभं केलेलं होतं. आतमध्ये घेतलेलं नव्हतं. तिथे एस. के. पाटील यांनी धोत्रे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली आणि ते तुमचे मेडिकलचे चेकअप करतील, असं सांगितलं. एक महिला तिथे आली व त्यांनी येऊन छोटीशी बॉटल त्यांना दिली आणि तुम्ही व्यसन करता का, वगैरे असे तात्पुरते प्रश्न तिथल्या तिथे उभे राहून विचारले. एक फॉर्म दिला तो फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतला आणि तुमचं मेडिकल झालं, असं सांगून त्या बाकीच्या उमेदवारांना आणि मुकेशलाही घरी पाठवलं.

काही दिवस गेल्यानंतर एस. के. पाटील यांनी तुमच्या मुलाचं अपॉइंटमेंट लेटर तयार झालेले आहे. त्यामुळे भेटायला या, असं सांगितलं की, लोकं ठरलेल्या ठिकाणी भेटायला गेली असता त्यांनी अपॉइंटमेंट लेटरचा पेपर दाखवला व पुढील पैशाची मागणी त्यांनी केली. या लोकांनी मुदत मागितली आणि काही दिवसांनी तेही पैसे त्यांना दिले. हे सर्व पैसे शांताबाई आणि राजाराम हे चेकद्वारे एस. के. पाटील यांना देत होते आणि याच दरम्याने एस. के. पाटील हे महानगरपालिकेमधून निवृत्त झाले. ही गोष्ट शांताबाईंना कळली असता, ती त्यांना भेटायला गेली. तेव्हा एस. के. पाटील यांनी मला सेवानिवृत्त झालो तरी मी तुमच्या मुलाचं नक्की काम करणार आहे सांगून थोड्या दिवसांत त्याचा आयडी तयार होईल आणि एक फॉर्म दिला. हा फॉर्म तुम्ही बँकेत नेऊन भरा. त्याचा महानगरपालिकेचा पगार हा या बँकेत येईल, असं त्यांनी सांगितलं व आयडी कार्ड तयार होण्याच्या अगोदर उरलेली बाकीची रक्कम त्याने घेतली. मुलाचं भवितव्य होत आहे म्हणून शांताबाईने एकूण चार लाख रुपये त्यांना दिले.

शेवटची रक्कम घेतल्यानंतर भरपूर दिवस झाले, तरी अजून महानगरपालिकेकडून बोलणं कसं होत नाही म्हणून एस. के. पाटील यांना फोन केला असता, त्यांचा फोन स्वीच ऑफ यायला लागला म्हणून ज्यांनी ओळख करून दिली, त्यांना फोन केला असता त्यांचाही फोन स्वीच ऑफ येऊ लागला. त्याच्यानंतर ज्यांनी ओळख करून दिली, त्याला घेऊन शांताबाई राजाराम एस. के. पाटील यांच्या घरी गेले असता, तिथे त्यांना समजले की, त्यांनी अनेकजणांना महानगरपालिकेमध्ये कामाला लावतो, असे सांगून पैसे लोकांकडून उकळलेले आहेत आणि घरच्या लोकांना ते कुठे आहेत, त्यांचा काही स्थान पत्ता नाही, असे समजले. हे ऐकून दोघांनाही धक्का बसला आणि अधिक चौकशी केली असता, एस. के. पाटील यांनी महानगरपालिकेमध्ये लोकांना कामाला सांगतो, असं सांगून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून लोकांकडून पैसे उकळलेले होते आणि यामध्ये तो एकटाच नाही, तर पूर्ण त्यांची टीम काम करत होती.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेतल्यानंतर एस. के. पाटील याचा शोध घेण्यात आला व त्याच्याकडून हळूहळू एकेकाची नावं बाहेर येऊ लागली. या सर्व गोष्टीची मास्टरमाइंड एक स्त्री होती आणि ती पोलीस खात्यातून रिटायर झालेली महिला होती. मेडिकल चेकअप करणारे, अपॉइंटमेंट लेटर बनवणारे, आयडी बनवणारे असे कितीतरीजण एकत्र येऊन लोकांची महानगरपालिकेमध्ये नोकरी लावतो, असं
सांगून डुप्लिकेट पेपर बनवून लोकांची फसवणूक करत होते आणि कितीतरी वर्षे ही लोक फसवणुकीची कामे करत होते आणि ही तक्रार नोंदवली गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून लोक पुढे येऊ लागले आणि फसवणूक केलेल्या लोकांची संख्या १००च्या घरात गेली आणि अनेक ठिकाणाहून लोकांना समजलं की, आपली फसवणूक केली गेली आहे, तेव्हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंदवल्या गेल्या.

राजाराम व शांताबाई यांनी मुलाच्या काळजीपोटी व मुलाच्या भविष्यासाठी चौकशी न करता समोरच्या माणसावर विश्वास ठेवून नोकरीसाठी पैसे दिले. ते पण ओळखीच्या माणसाद्वारे आणि त्यांची मोठी फसवणूक झाली. समोरच्या माणसाने ओळखलं की, यांच्या मुलाला नोकरीची गरज आहे आणि त्याचाच फायदा एस. के. पाटीलसारख्या लोकांनी उचलला.

सामान्य माणूस कष्टातून एक एक पुंजी जमा करतो व असं कोणीतरी भेटलं की, ती कष्टाची पुंजी नको त्या ठिकाणी वाया जाते आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ मात्र येते.

(सत्य घटनेवर आधारित)

रामूचे बैल

रमेश तांबे

एक रामू नावाचा शेतकरी होता. त्याची थोडी फार शेती होती. त्याच्याकडे बैल होते खिलारी. शेतात काम करून शर्यतीत पळायचे भारी. आपली पांढरी शुभ्र खिलारी बैलं बघून रामूची छाती फुगायची. बैलगाडी घेऊन रामू बाजाराला जायचा. महिन्याचं सामान घेऊन यायचा. घरी येताना रस्त्यात कुणी बाया, म्हातारी, अपंग माणसं दिसली की, तो त्यांना गाडीत घ्यायचा. रामू साऱ्या गावाची काळजी घ्यायचा. त्यामुळे सारं गाव रामूला चांगलं ओळखत होतं.

एका महिन्यावर गावची जत्रा आली होती. गावची यात्रा म्हणजे चंगळ भारी. पाच पाच दिवस जत्रा चाले. पोरासोरांच्या आनंदाला नुसते उधाण यायचे. जत्रेत बैलगाडीच्या शर्यती असायच्या. म्हणून रामूने आता शेतातली कामे बंद केली होती. चांगला खुराक आणि विश्रांती देऊन त्याने बैलांची चांगली तयारी करवून घेतली होती.

अखेर दिवस उजाडला शर्यतीचा. बैलांच्या परीक्षेचा, रामूच्या इभ्रतीचा! रामूने बैलांना स्वच्छ धुऊन शिंगांना रंगरंगोटी करून सजवले होते. आपल्या दहा-बारा वर्षांच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन रामू बैल घेऊन शर्यतीच्या ठिकाणी हजर झाला.

शर्यतीच्या घाटावर प्रचंड गर्दी होती. सारा परिसर माणसांनी कसा फुलून गेला होता. स्पीकरवरून गाडी मालकाची नावे पुकारली जात होती. मधूनच “झाली… झाली… गेला… गेला… पळाला… पळाला” अशा घोषणा होत होत्या. किती वेळात घाटरस्ता पूर्ण केला त्याची घोषणा होत होती. तेवढ्यात रामूचे नाव पुकारले गेले. रामूने आपली चंचल बैलजोडी पुढे आणली आणि तिला एक छोटेखानी गाडी जोडली. जेणेकरून बैलांना ओढण्याचे जास्त कष्ट पडणार नाहीत. रामूने कंबर कसली. बैलांच्या पाठीवर थाप मारून त्यांना म्हणाला, “माझ्या पोरांनो चांगला जोर लावा आज. आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे.” रामूने बैलांच्या अंगाला अंग घासले. त्यांनी माना डोलावल्या. रामूसह दोन्ही बैलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या!

तेवढ्यात घोषणा झाली. “झाली… झाली… झाली! गेला… गेला… गेला!” बैलांच्या मागे रामू धावला. “रामू शिंगरेचा गाडा आला रे, आला फक्त दहा सेकंदांत आला.” रामूच्या बैलांनी घाटरस्ता पार केला होता. तोही फक्त दहा सेकंदांत! दहा सेकंदांची घोषणा ऐकून रामूने आनंदाने जोरात उंच उडी मारली अन् शर्यत जिंकल्याच्या थाटात तो बैलांच्या मागे पळाला. रामूची पोरं घाट संपतो तिथेच उभी होती. थोड्याच वेळात रामू धापा टाकत वर आला. पण त्याला आपली बैलं काही दिसेना. त्याने दूरवर सगळीकडे पाहिले. पण पोरंही दिसेनात अन् बैलंही दिसेना. आता रामू कावराबावरा झाला. तो तिथे उभं असणाऱ्यांना विचारू लागला, “माझी मुलं कुठे आहेत. माझी बैलं कुठे आहेत.” पण जो तो नवा गाडा किती सेकंदात पार करणार याची वाट पाहत होता. तितक्यात “झाली… झाली… गेला… गेला… बारा सेकंद! फक्त बारा सेकंद!” अशी घोषणा झाली. या साऱ्या गदारोळात रामूचे ओरडणे कुणालाही ऐकू आले नाही.

रामूच्या धास्तीचे एक कारण म्हणजे घाटाच्या पुढे थोड्याच अंतरावर एक दरी होती. आतापर्यंत कितीतरी बैलजोड्या बेहोशपणे थेट दरीतच गेल्या होत्या. हे सारे आठवून रामूच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याने पुन्हा एकदा आपल्या मुलांना “विजय, अजय” अशा हाका मारल्या. “शिवा, भिवा” या बैलांच्या नावाने त्याने टाहो फोडला. पण गर्दीत त्याचा आवाज पोहोचेना. “हाय रे दैवा” म्हणत रामूने डोक्याला हात लावला अन् दुःखी मनाने घराकडे निघाला. त्याला समजले बैल पळाले. जीव तोडून पळाले. पण कुठे थांबायचे त्यांना कळाले नाही. आपल्या इज्जतीसाठी ते पळाले हा विचार करून रामूला अधिकच रडू आले. रामूचे डोके अगदी भांबावून गेले. आपण आपल्या हट्टापायी बैल गमावले. याचा त्याला आता खूप पश्चाताप होऊ लागला.

रामूचे घर दूर होते. पण घरी जायला वाहन नव्हते. त्यामुळे रामू धावतच घराकडे निघाला. निदान मुले तरी घराकडे गेली असतील, अशी त्याला आशा वाटत होती. तासाभरात रामू घरी परतला. तेव्हा तो अगदी घामाघूम झाला होता. धापा टाकतच त्याने विजय, अजय अशा हाका मारल्या. तोच रामूची पोरं धावत घराबाहेर आली. रामू जोरात ओरडला. “अरे पोरांनो तुम्ही इथे कसे? आणि आपली बैलं कुठे आहेत.”

विजय म्हणाला, “बाबा बैलं गोठ्यात बांधलीत. अरे हे कसं काय? मला तर वाटलं की, आपलं बैलं गेली दरीत…!” रामू धावतच गोठ्यात गेला. बघतो तर काय दोन्ही बैल मस्तपैकी हिरवे गवत खात होते. रामू दिसताच दोघेही हंबरू लागले. रामूने मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आता मात्र रामूच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.

दोन्ही पोरं गोठ्यात आली अन् बाबांना सांगू लागली. “घाटाच्या वर बैलं आल्यावर ती थांबलीच नाहीत. काही लोकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण नाही जमले त्यांना! ती पळत सुटली वाऱ्याच्या वेगाने. मग आम्हीदेखील पळत सुटलो बैलांच्या मागे. पळता पळता बैलं थेट आपल्या घरीच आली अन् त्यांच्या मागोमाग आम्ही.” रामूने पोरांना पोटाशी धरले. त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले अन् म्हणाला, “बाळांनो आज तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे झालात!”

आता वाजत-गाजत येणार बाप्पा

अनघा निकम-मगदूम

दहीहंडीचा जल्लोष आता वातावरणात विरला आहे. मात्र जाता-जाता वातावरण एकदम प्रफुल्लित करून गेला आहे. आता कोकणवासीयांना वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे! गेली दोन वर्षे कोरोनामुळे कोकणवासीयांना मनसोक्त गणेशोत्सव साजरा करता आलेला नाही. गेल्या दोनही वर्षी आपल्या गावी येताना चाकरमान्यांना अनेक निर्बंध, अनेक अटी-शर्थींचा सामना करावा लागला होता.

आता मात्र कोरोना जरी सर्वत्र असला तरी सुद्धा त्याचे संकट काही अंश कमी झाले. त्यामुळे यंदा ज्या जोशानं दहीहंडी साजरी झाली त्याच जोशाने आणि उल्हासाने, उत्साहाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणी माणूस सज्ज झाला आहे.

कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी! जून, जुलै हे दोन महिने पाऊस मुसळधार कोसळून जातो. अशा वेळेला कोकण शांत असते. शेतीची कामं आटोपलेली असतात. मासेमारीसुद्धा थंड असते. मात्र एकदा श्रावणाची चाहूल लागली की पुन्हा एकदा कोकणामध्ये लगबगीला सुरुवात होते. श्रावण महिना खरं तर श्री शंकराच्या भक्तीचा महिमा! परंतु कोकणामध्ये शिवशंकराच्या मंदिरासोबतच अनेक मंदिरांमध्ये नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन केलं जातं. त्याशिवाय अनेक धार्मिक उत्सव या महिन्यात केले जातात. त्याचबरोबर नारळी पौर्णिमा हा तर अथांग समुद्राच्या शेजारी राहणाऱ्या कोकणी माणसासाठी एक खास दिवस. हा उत्सव, त्याच दिवशी येणारी राखी पौर्णिमा ही सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. त्यानंतर मात्र दहीहंडीचा जल्लोषसुद्धा आनंददायी असतो. धाडसी कोकणी माणूस थरावर थर चढवून उंचावर असलेली हंडी फोडतो आणि आपल्या एकोप्याचे दर्शन या उत्सवाच्या माध्यमातून घडवत असतो. नामसप्ताह असू दे किंवा दहीहंडीसारखे उत्सव या सर्वांमध्येच कोकणी माणूस आपलं गावपण, आपला एकोपा कायम टिकवून ठेवतो.

गणेशोत्सव हा तर कोकणी माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव. गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या दोन उत्सवांसाठी मुंबईसह कुठेही राहणारा कोकणी माणूस आपल्या गावी परततो आणि रिकामी असलेली गाव पुन्हा एकदा या दिवसांमध्ये वर्दळू लागतात.

नुकताच दहीहंडीचा जल्लोष संपला आहे आणि आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे! कोरोनाचे सावट दूर झाल्याने कोकणी माणूस आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अर्थात त्याच्या वाटेमध्ये त्याच्या उत्सव आणि उत्साहामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यातीलच पहिली अडचण म्हणजे नादुरुस्त असलेला मुंबई-गोवा महामार्ग. महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण आणि त्याशिवाय महामार्गासह कोकणातील अनेक रस्त्यांवर असलेले खड्डे ही उत्सवाला गालबोट लावणारी गोष्ट आहे; परंतु यावर आता मार्ग निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे महामार्ग आणि अंतर्गत रस्ते यांची दुरुस्ती असतानाच दुसरीकडे मुसळधार पाऊस, वेगवान वारे यामुळे कोसळणाऱ्या दरडींचे सावट महामार्गावरील प्रवासासाठी धोका आहे. यावर सुद्धा उपाययोजना करणे आणि कडेकोट बंदोबस्त ठेवणं हेही गरजेचे आहे.

गणेशोत्सव म्हणजेच कोकणीपण असण्याचं एक प्रतीक आहे. हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी कोकणी माणूस सज्ज होतोय, तर दुसरीकडे राज्य शासन आणि प्रशासनसुद्धा कोकणी माणसाला या उत्सवाचा आनंद देण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. म्हणजेच आता बाप्पा घरोघरी वाजत-गाजत आणि त्याच्या मानात येणार हे नक्की!

वास्तूला तथास्तू करणारी गायत्री पाटोळे

अर्चना सोंडे

घर पाहावे बांधून अशी सामान्य जनांत एक म्हण आहे. घर बांधणे किती अवघड असते हे बांधणाऱ्यालाच ठाऊक. काहीजण आपल्या आयुष्याची कमाई ही या घर उभारणीत खर्ची घालतात. या घर बहाद्दरांना काही वेळेस कळत नाही, की नेमकी समस्या काय आहे. अशा वेळी ती माऊली येते, शास्त्रोक्त पद्धतीने घराचे निरीक्षण करते, काही चाचण्या करते, आणि वास्तूमध्ये समस्या असेल, तर त्या दूर करण्याच्या उपाययोजना देखील करते. अनेकांच्या वास्तूला तथास्तू करणारी ही लेडी बॉस म्हणजे वास्तू संजीवनीच्या संचालक गायत्री पाटोळे.

गायत्रीचा जन्म लालबागचा. पण बालपण आणि शालेय जीवन रत्नागिरी येथे गेले. शालेय शिक्षण आर. बी. शिर्के प्रशाला येथे पूर्ण करून रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजमधून एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गायत्रीच्या आई शैलजा बळीराम गुजर आणि बाबा बळीराम रावसाहेब गुजर दोघेही पेशाने शिक्षक होते. त्यामुळे मुलांना देखील शिक्षणाचे महत्त्व पटले होते. शिक्षण पूर्ण होताच गायत्रीचे लग्न झाले. गायत्री गुजर आता गायत्री संजय पाटोळे झाली. लग्नानंतर काही काळासाठी शिक्षणाचा विसर पडला. मूल मोठे होत होते. त्यावेळी गायत्रीच्या वाचनात वास्तुशास्त्र, ज्योतिषशात्र, अध्यात्म यांसारखे विषय आले. या वाचनातून कुतूहल वाढत होते. त्याचा अभ्यास हळूहळू सुरू केला. वास्तुशास्त्र हा अतिशय जटिल आणि सखोल विषय आहे. पण आपल्याला आवडत आहे त्यामुळे याच क्षेत्रात आपण काही तरी केले पाहिजे हे मत ठाम झाले आणि यानंतर गायत्रीच्या आयुष्यातील नव्या पर्वाला सुरुवात झाली.

वास्तुशास्त्र या विषयाचे ज्ञान संपादन करीत असताना त्यांना अनेक मान्यवर, अभ्यासक, तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी यावेळी बऱ्याच केसेस हाताळल्या. त्यातून विलक्षण असे काही अनुभव अगदी मनात घर करून राहिले आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही उक्ती अगदी तंतोतंत पटली. हे शास्त्र शिकत असताना प्रथम तळ्यात, मग नदीत, त्यानंतर समुद्रात असा शिक्षणाचा प्रवास घडत गेला, असे गायत्री पाटोळ अनुभव कथन करताना सांगतात. गायत्री या शास्त्राच्या लेक्चरर म्हणून देखील आता काम करू लागल्या आहेत.

एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत असंख्य राजयोग लिहिले गेले आहेत; परंतु व्यक्ती मात्र अन्नाला महाग झालेली आहे, असे चित्र काही वेळा समाजात दिसून येते. व्यक्तीचे वास्तव्य जर दूषित वास्तूमध्ये असेल, तर त्याच्या हातून काही कर्मच घडणार नाही; परंतु ज्यावेळी व्यक्ती दूषित वास्तू सोडून अन्य ठिकाणी वास्तव्यास जाईल. त्यावेळी व्यक्तीच्या हातून काही कर्म घडेल व त्याच्या कुंडलीत दर्शविलेले सर्व राजयोग त्यावेळी फलित होईल. म्हणजेच ‘घराची जर दिशा बदलली तर दशाच अनुभवास येईल’ हे एकमेव सत्य आहे आणि हे सत्य आपण कोणीही नाकारू शकत नाही, असे पाटोळे म्हणतात.

गायत्री यांनी केलेल्या वास्तुशास्त्राच्या उत्तम अध्ययन, अवलोकन व मार्गदर्शनाबद्दल त्यांना वेळोवेळी असंख्य ठिकाणी व्यासपीठावर सन्मानित केले गेले आहे. त्यांची या शास्त्रावर विलक्षण पकड आहे. कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर तेथील स्पंदने त्यांना लगेच जाणवतात. वास्तूमध्ये वास्तव्य करणाऱ्या यजमानाने त्या वास्तूमध्ये व्यतित केलेली अनेक वर्षे कशी सरली असतील? हे वास्तू पाहिल्यावर त्यांच्या चटकन लक्षात येते आणि यजमानाला त्याविषयी विचारणा केली असता, अगदी बरोबर ओळखलंत! असे उद्गार त्यांच्या मुखातून क्षणात बाहेर पडतात.

आजच्या युगात माणसाला भेडसावणारे अनेक प्रश्न, समस्या असतात. त्यातील ६०-७० टक्के समस्या या दूषित वास्तूमधील वास्तव्यातूनच निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे वास्तू, ही पंचमहाभुतांना व अष्टीदिशांना अनुसरूनच असावी. त्यातून माणसाच्या आयुष्याला गती मिळते व ही गती म्हणजेच माणसाने साधलेली प्रगती म्हणायला हरकत नाही. गायत्री यांनी वास्तूचे परीक्षण करून अनेकांचे सुखाचे चार दिवस वाढवून, त्यामागून येणाऱ्या दु:खाची तीव्रता कमी करण्यात अनेकांची मदत केली आहे. कारण दोषी वास्तूमधील वास्तव्य म्हणजे माणसाला भोगाव्या लागणाऱ्या मरण यातनाच. आज अनेक कुटुंबे गायत्रीचा सल्ला घेऊन आनंदी जीवन जगत आहेत.

वास्तुशास्त्राविषयी अपुऱ्या ज्ञानामुळे लोकं अफवा पसरवतात. काही लोकांना वास्तुशात्र मान्यदेखील नसते. पण गायत्री अभ्यासपूर्वकच आपले मत व्यक्त करते. झोपी गेलेल्याला जागे करणे फार सोपे आहे. पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करणे फार कठीण. या शास्त्राचा अभ्यास करताना प्रथम पंचमहाभुतांविषयी आपल्याला जाणून घ्यायला किमान दोन-तीन जन्म घ्यावे लागतील, असे गायत्री म्हणते. या शास्त्राविषयी अफवा पसरतात त्या दोन कारणांमुळे एक म्हणजे अपुऱ्या ज्ञानामुळे व दुसरे म्हणजे अपुऱ्या ज्ञानातून निर्माण केलेल्या अर्धवट नियमामुळे. वास्तू ही आपल्याला सुख-समृद्धी, आरोग्य प्रदान करत असते. त्यामुळे सर्वाचा थोड्या फार प्रमाणात तरी वास्तू अभ्यास असावा.

सर्वसामान्यांना वास्तुदोषाचे अवगुण कळावेत आणि त्यातून लाभ व्हावा हीच इछा. गायत्री स्वतः नवीन वास्तूची निवड कशी करावी? राहत्या वास्तूचे वास्तूदोष निवारण कसे करावे? आध्यात्मिक उपाय कसे करावे? यावर मार्गदर्शन करतात. आजपर्यंत अनेक वर्तमानपत्रांतून वास्तुशास्त्राविषयी त्यांनी लिखाण केले आहे. नॅशनल युनिटी अॅवॉर्ड २०१३, भास्कर भूषण पुरस्कार, यशाची गुढी पुरस्कार, आदी पुस्कारांनी गायत्री यांना त्यांच्या व्यावसायिक योगदानानिमित्त गौरवण्यात आले आहे.

आपल्या घराचा समतोल साधण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी घराचे वास्तू परीक्षण करणे गरजेचे आहे. वास्तू तथास्तू असे म्हटले जाते. वास्तूला मार्गदर्शन करून यजमानांच्या घरी संजीवनी फुकणाऱ्या गायत्री पाटोळे या ग्रेट लेडी बॉस आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

विधवा? नव्हे… सन्माननीय स्त्री!

अनुराधा दीक्षित

मला बालपणी नेहमी प्रश्न पडायचा की, मुलींची लग्न होतात, तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. सारे सौभाग्यालंकार ती हौसेने आणि अभिमानाने आपल्या अंगाखांद्यावर बाळगते. पण तिच्या नवऱ्याला असं काहीच का घालावं लागत नाही? लग्न झालेली मुलगी या गोष्टींमुळे लगेच ओळखता येते. पण पुरुष? लग्न झालंय की नाही कसा ओळखायचा?

बाईने कुंकू लावलं पाहिजे, काचेच्या बांगड्या, मंगळसूत्र वगैरे घातलं पाहिजे हे ठरवलं कुणी? जर बाईसाठी हे सारे नियम ठरवले जातात, तर पुरुषांसाठी का नाही? कारण अगदी सरळ आहे. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे. ते ठरवतील तेच समाजात व्हायला पाहिजे. सारी बंधनं फक्त मुलींसाठी! पुरुषांना कसंही वागायला त्याच संस्कृतीने मुभा दिली. याच संस्कृतीने तिला पतीनिधनानंतर सती जायला लावलं. त्यातही इतका क्रूरपणा की, एखादी मुलगी आरडाओरडा करू लागली, तर तिचा आक्रोश ढोलताशांच्या गोंगाटात दाबून टाकायचा. तिला पतीचं प्रेत मांडीवर घेऊन बसावं लागे. चिता धडधडून पेटली की, ती जीव वाचावा म्हणून तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली, तर हे संस्कृतीरक्षक तिला काठ्यांनी आगीत ढकलून तिला जळायला भाग पाडायचे. तिचा बिचारीचा इच्छा नसतानाही जीव जायचा. मग तिचं उदात्तीकरण करण्यासाठी तिची समाधी बांधायची. तिच्या पाया पडायचं वगैरे… हा माणसांचा अमानुषपणा दीर्घकाळ चालू होता.

इतिहासातील कथेनुसार, शहाजीराजेंच्या निधनानंतर जिजाबाईही सती जायला निघाल्या, तेव्हा शिवरायांनी त्यांना अडवलं. त्या लहानग्या शिवबाच्या बोलांनी त्यांचं हृदय विरघळलं आणि पुढे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व त्यांनी घडवलं, म्हणूनच आजही शिवरायांसारखा एक महान राजा आणि जिजाऊंसारखी आदर्श माता महाराष्ट्राला मिळाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! जिजाऊंच्यानंतर तरी ही प्रथा खंडित व्हायला हवी होती. पण नाही. ती बंद होण्यासाठी राजा राममोहन रॉय यांच्यापर्यंत देशाला वाट पाहावी लागली.

ब्राह्मण वर्गात केशवपनाची कुप्रथा अगदी अलीकडेपर्यंत चालू होती. म्हणजे माझ्या बालपणी मी आमच्या आजूबाजूला, नात्यांमध्ये माझ्या आजीच्या वयाच्या बायकांना (माझी आजी याला अपवाद होती, हे नशीब!) लाल किंवा पांढरं आलवण नेसताना पाहिलंय. एखाद्या आजीचं डोकं भादरायला गुपचूप आलेला नाभिकसुद्धा पाहिलाय. तेव्हा माझ्या बालमनाला कुतूहल वाटायचं. असं का करतात? हा प्रश्न पडायचा. पण तेव्हा मुलांना पडलेल्या असल्या अगोचर प्रश्नांची उत्तरं देण्याची पद्धत नव्हती. विचारलं तर कान तरी पिरगळला जायचा, नाहीतर पाठीत धपाटा ठरलेलाच. यथावकाश त्यांची उत्तरं मिळाली. तोपर्यंत मध्ये दोन पिढ्या जाव्या लागल्या. शाळेत गेल्यावर शिकताना कळलं की, महात्मा जोतिबा फुले यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांनी सर्व नाभिकांना संपावर जायला सांगितलं. त्या नाभिकांना त्यांनी प्रतिज्ञा घ्यायला लावली. नंतर मात्र ती प्रथा बंद पडली खरी. तरी विधवांवर अन्याय, अत्याचार व्हायचं आजही काही प्रमाणात चालूच आहे.

पूर्वी बालविवाह व्हायचे. अगदी पाळण्यातही लग्न लावली जायची म्हणे. त्यात मुलीचं वय विचारात न घेता तिचा एखाद्या आजोबाच्या वयाएवढ्या माणसाशीही ‘जरठ-कुमारी’ विवाह व्हायचा. मुलीला जन्मत:च मन नावाचा अवयव नसतो, असं गृहितकच होतं. आजही ते काही प्रमाणात असतंच. तरी आता परिस्थिती खूपच चांगली आहे म्हणायची! तर गो. ब. देवलांनी या विषयावर ‘संगीत शारदा’ नाटक लिहून या प्रथेवर प्रकाश टाकण्याचा आणि समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अर्थात या सर्व गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत. पण तरी काही पुरुषच या प्रथांविरोधात सकारात्मकतेने काम करीत होते. त्यामुळे त्या बंद पडल्या, याबद्दल भारतीय स्त्रिया तरी त्यांच्या ऋणी आहेत.

मात्र आजही सुशिक्षित किंवा अशिक्षित विधवा स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजून म्हणावा तसा बदललेला नाही. त्यामुळे केशवपन, सती यांच्याप्रमाणेच विधवाप्रथाही बंद झाली पाहिजे. मुली बालपणापासूनच कुंकू लावत असतात. अर्थात आता तरुण पिढी हे सारं पाळतेच असं नाही. तरीही अजून ग्रामीण भागात तरी मोठ्या प्रमाणात हे पाळलं जातं. मग नवरा गेल्यानंतर तिने ते पुसून का टाकायचं? मंगळसूत्र का काढायचं? बांगड्या का फोडायच्या? हे सारं तिची इच्छा नसतानाही का करून घ्यायचं? नवरा गेल्यानंतरही तिने ते सारं तसंच ठेवलं, तर असा कोणता गहजब होणार आहे? तिला म्हणे हळदी-कुंकवाला बोलवायचं नाही, कोणी तिला कुंकू लावायचं नाही, तिने कुणाची ओटी भरायची नाही, कोणत्याही मंगलकार्यात तिने पुढे व्हायचं नाही, सतत मागे मागे राहायचं… असं का?

मग तोच एखादा विधुर असेल, तर बायको मेल्या मेल्या त्याचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला जातो, तो कुठेही पुढे पुढे करून वावरतो. मग त्यांच्या कपाळावर एखादा शिक्का का नाही मारत तो विधुर असल्याचा? ही कोणती स्त्री-पुरुष समानता? आपल्या संविधानाने हे सारं आपल्याला करायला परवानगी दिलीय? तरीही सगळे नियम धाब्यावर बसवून गोष्टी घडत असतात. कोणी एक बायको जिवंत असताना दुसरी तिच्या उरावर आणून बसवतो. पहिलीला मूल नाही, म्हणून तिची संमती घेतल्यासारखं करून दुसरं लग्न करायचं, तिलाही नाही मूल झालं, तर तिसरंही करायचं! वाह वा! जे स्वतःला कायद्याचे रक्षक समजतात, जे लोकांना ज्ञान वाटत फिरतात, ते कितीतरी राजकारणी, सेलिब्रिटी म्हणवणारे तरुणांचे आदर्श वगैरे या गोष्टी करण्यात तर माहीर आहेत. त्यांची लफडी-कुलंगडी राजरोसपणे चालतात! कारण ते पुरुष आहेत! तिथे कायदे वगैरे आड येत नाहीत. पण एखाद्या स्त्रीला नाहक बदनाम करण्यासाठी मात्र हीच जमात पुढे सरसावते, हे आपण रोजच्या व्यवहारात पाहतो.

…तर विधवा प्रथा बंद करणं हा विषय आहे. त्यासाठी समाजमन तयार करायलाच हवं. कारण हा संवेदनशील विषय आहे. पण ती बंद पाडण्यासाठी आता खरी गरज आहे, ती साऱ्या स्त्रियांनी एकजूट होऊन त्या विरोधात आवाज उठवण्याची.

आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दृष्टीने एक पाऊल उचललं गेलंय. ते अभिनंदनीय आहे. ज्या रूढी, प्रथा, परंपरा काळाशी विसंगत आहेत, त्या बहुसंख्य सुशिक्षित समाजाने बंद पाडण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता समंजसपणे गावागावांतील लोकांनी एकत्र येऊन त्यावर संवाद साधला पाहिजे. विधवा स्त्रियांच्या वाट्याला येणारी उपेक्षा, अवहेलना, अपमान यांचा विचार करून तिला आपल्या घरात आणि समाजातही सन्मानाची वागणूक मिळेल, तिच्याकडे वाकड्या नजरेने न बघता, ती आपलीच कुणी माता, भगिनी आहे असे मानून तिचे रक्षण करण्याची, तिला मदत करण्याची आणि मानाने वागवण्याची जबाबदारी साऱ्या समाजाची आहे. कारण प्रत्येक घरात कुणी ना कुणी विधवा कधी ना कधी पाहायला मिळतेच. मग सर्वांनी अंतर्मुख होऊन तिच्याशी आपली आणि समाजाची वागणूक कशी आहे, याचा विचार केला आणि केला, तरच विधवांच्या आयुष्यातही नवीन आशाआकांक्षांचा सूर्योदय नक्कीच होईल आणि
त्या आपलं उर्वरित आयुष्य सुरक्षित आणि खंबीरपणे घालवू शकतील, असं वाटतं! कारण, केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!!!

कोकणात पर्यटन विकास प्राधिकरण सुरू करण्याची गरज

सतीश पाटणकर

राज्यावर आलेले  कोरोनाचं संकट जगभर पसरलं आणि याचा सर्वात जास्त परिणाम कोकणातील उद्योग, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला. पर्यटन, उद्योग व्यवसाय आता पूर्ववत झाले. निसर्ग रमणीय कोकणच्या आर्थिक-सामाजिक मागासलेपणाबद्दल अनेकदा चर्चा होते आणि या समस्येवरील उत्तर इथल्या निसर्गातच असल्याचंही आवर्जून सांगितलं जातं. जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची जातिवंत मासळी ही कोकणातली ‘नगदी पिकं’ मानली जातात. त्याचप्रमाणे एका बाजूला सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली, जैवविविधतेने समृद्ध खेडी आणि दुसऱ्या बाजूला रूपेरी वाळू व माडाच्या बनातून सागरकिनाऱ्यांवरची सफर कोणाही पर्यटकाला भुरळ पाडणारी असते. त्यामुळेच आंबे किंवा माशांपेक्षासुद्धा पर्यटन हा कोकणच्या दृष्टीने शाश्वत विकासाचा पर्यावरणस्नेही पर्याय मानला जातो.

आजपर्यंत दुर्लक्षित पण पर्यटनाच्या दृष्टीने वाव असलेल्या ठिकाणी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या निवास व न्याहारीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिलं आहे. रायगड जिल्ह्यात एलिफंटा केव्ह्ज, कर्नाळा अभयारण्य, नागाव-किहीमचा समुद्रकिनारा, मापगाव येथील डोंगरावरील कनकेश्वर मंदिर, दिवे-आगार, मुरुड-जंजिरा, हरिहरेश्वर-श्रीवर्धन, महड-पाली येथील गणपतीची पेशवेकालीन मंदिरं, शिवाजी महाराजांची राजधानी रायगडचा किल्ला, अशी अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. त्याचप्रमाणे हा जिल्हा ठाणे-मुंबईला अतिशय जवळ असल्यामुळे कोकणातील तीन जिल्ह्यांपैकी या जिल्ह्यात पर्यटकांची संख्या सर्वात जास्त असते. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये अनेक प्राचीन मंदिरं आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांबरोबरच शिवकालीन तब्बल पंचवीस किल्ले आहेत. त्यापैकी १३ डोंगरी (गिरीदुर्ग) आणि १२ सागरी (जलदुर्ग) किल्ले आहेत. दुर्दैवाने या किल्ल्यांची चांगल्या प्रकारे देखभाल झालेली नाही.

तसंच त्याबाबत पर्यटकांना पुरेशी माहितीही नाही. यापैकी काही किल्ले पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल व दुरुस्ती या खात्यातर्फे केली जाते. त्यासाठी राज्य सरकारने पुरातत्त्व विभागाला निधी दिलेला असूनही हे काम होत नाही.

रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बावीस शिवकालीन गड-दुर्ग आहेत. हा एक वेगळा, साहसी ऐतिहासिक पर्यटनाचा विषय होऊ शकतो. शिरोडा, सागरेश्वर, निवती, तारकर्ली इत्यादी अतिशय निसर्ग रमणीय समुद्रकिनारेही आहेत. आंबोली हे तर जिल्ह्यातील थंड हवेचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या जिल्ह्यात ‘सी वर्ल्ड’ हा सागरी पर्यटनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे.

या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा सागरी महामार्ग अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी कोकणच्या खाऱ्या समुद्राचं रमणीय दर्शन घडतं. तसंच काही उत्तम पर्यटनस्थळंही या मार्गालगत आहेत. पण तिथे जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी या मार्गावर खाद्य-पेयाचे स्टॉल, पेट्रोलपंप आणि इतर आनुषंगिक सुविधा निर्माण होण्याची गरज आहे.

शासनाची विविध खाती राज्यात विकास योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील असतात. पर्यटन खातं त्यापैकी एक असलं तरी या खात्याच्या कामाचं स्वरूप आणि कार्यक्षेत्र पाहता, इथे जास्त कल्पक उपक्रमांची गरज आहे. डेक्कन ओडिसीसारख्या शाही पर्यटक गाडीचा कोकणात मुक्काम वाढवण्यासाठी परदेशी नागरिकांना आवश्यक तारांकित सुविधांची इथे गरज आहे. कोकणातील शेतकरी कधीही आत्महत्या करत नाही.

कोकणातील लोक प्रामाणिक आहेत. त्यांच्याकडे चिकाटीही आहे. मात्र त्यांच्यात केवळ दूरदृष्टी व ध्येयाची कमतरता आहे. शेती व मासेमारी व्यतिरिक्तही अनेक उद्योग कोकणात होऊ शकतात. भारतातल्या अनेक राज्यांच्या अर्थव्यवस्था पर्यटनावर उभारलेल्या आहेत.

कोकणात ७२० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांगा, जंगले, जैवविविधता, नद्या, धबधबे, तलाव, प्राचीन वास्तू, तीर्थक्षेत्रे, किल्ले, थंड हवेची ठिकाणे आदी सारं असूनही कोकण पर्यटनाची अवस्था आजही दिनदुबळी आहे. जागतिक पर्यटनातील आपला वाटा अगदी नगण्य आहे. वास्तविक पर्यटन हा जगात सर्वाधिक रोजगार आणि अति मौल्यवान परकीय चलन मिळवून देणारा उद्योग आहे; परंतु आजही तो दुर्लक्षित आहे. निसर्गरम्य कोकणात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सर्व काही आहे.

दर वर्षी लाखो पर्यटक कोकणातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत असतात. कोकणातील समुद्रकिनारे पर्यटन हंगामात पर्यटकांच्या वर्दळीने फुलून गेलेले असतात; परंतु काही अपवाद वगळता राज्य व केंद्र सरकारने कोकणच्या पर्यटन विकासाच्या किरकोळ स्वरूपातून निधी देऊन त्या ठिकाणी काही अल्पसल्प कामे केलेली आहेत. त्या पलीकडे कोकणच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने भरीव असे काहीही केले नाही. केवळ घोषणाबाजीच चालू आहे. कोकणातील कातळशिल्पांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने अलीकडे प्रयत्न सुरू केलेत. कोकण पर्यटन विकास आराखडासंदर्भात अतिशय महत्वाच्या बैठका कोकणात सतत होतच असतात. त्या बैठकांवर पैसाही खर्च होत असतो. कोकणात आलेल्या पर्यटकाने काही दिवस येथेच वास्तव्य करून पर्यटनाचा आनंद घ्यावा, यासाठी शासन आणि प्रशासनाने आजवर काय प्रयत्न केलेत? हा प्रश्न आहे. कोकणातील कातकरी, आदिवासी, कोळी आदी समाजाच्या सोबतची अनुभूती आपण पर्यटनात आणू शकतो का? असे नावीन्यपूर्ण  विचार करायला प्रशासनाला वेळच नाही आहे.

युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास गतीने व्हावा, यासाठी नारायण राणे यांनी स्वत: मुख्यमंत्री झाल्यावर स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास महामंडळ ही कंपनी स्थापन केली होती. पुढे ती बरखास्त केली गेली. छगन भुजबळ पर्यटनमंत्री असताना रत्नागिरी येथे झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणसाठी स्वतंत्र सागरी पर्यटन महामंडळ स्थापन होणार होते. वर्तमान सरकारनेही भरीव कोकण विकासाच्या स्वरूपात पोकळ घोषणा केल्या आहेत. एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासाच्या घोषणांचा पाऊस पाडला होता. कोकणच्या विकासाची भूक भागविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही देत कोकणच्या पर्यटन विकासाची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली  होती. कोकणच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपयांचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले असले तरीही, ‘कोकणच्या पदरात काय पडले?’ याचे उत्तर अनुत्तरीतच आहे.

कोकणातला निसर्ग विलोभनीय असूनही या साऱ्या अनुकूल परिस्थितीचे प्रभावी मार्केटिंग होत नसल्याने पर्यटन विकासाला अपेक्षित गती मिळालेली नाही, हे तर उघड दिसतेच आहे. मलेशियाचे पर्यटनाचे वार्षिक बजेट भारताच्या दीडपट, तर ऑस्ट्रेलियाचे पाचपट आहे. अंतर्गत चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे तसेच संपर्क साधनांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मग पर्यटन वाढेल.

केरळच्या धर्तीवर आर्थिक स्वायतत्ता असलेले पर्यटन विकास प्राधिकरण सुरू करणेही अत्यावश्यक आहे. पर्यटन विकासातून केवळ कोकणच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलाही मजबूत आधार मिळेल.

साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडक भाषणांतील भाषाविचार

डॉ. वीणा सानेकर

साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडक भाषणांतील भाषाविचार या लेखातून आपण समजून घेणार आहोत. अध्यक्षीय भाषणांचा एक खंड ग्रंथालयात पुस्तके चाळताना हाती लागला आणि त्यातला भाषाविचार आजच्या काळालाही किती सुसंगत आहे. ग. त्र्यं. माडखोलकरांनी नवमहाराष्ट्राचे उत्थान हा शब्द योजून त्याकरिता काय काय गरजेचे हे विस्ताराने सांगितले आहे. त्यांचा भर लोकवाङ्मयावर आहे व त्याकरिता काय गरजेचे आहे, हे त्यांनी भाषणातून मांडले. कोणतीही भाषा राजसत्तेच्या आश्रयाने किंवा विद्यापीठाच्या पुढाकाराने वाढत नाही, तर ती जनतेच्या, लोकांच्या आश्रयानेच वाढू शकते, हे ते स्पष्ट करतात. लोकांची भाषा त्यांच्या जिभेवर नाचते. तिचा आवाज त्यांच्या हृदयातून प्रतिध्वनित होतो हे ते आवर्जून सांगतात.

न. र. फाटक यांनी तर मानवाचा देह धारण करणाऱ्या माणसाचे सर्वस्व म्हणजे भाषा असे म्हटले. अनेक सत्ताधीशांनी असा प्रयत्न जगाच्या इतिहासात केला, जिथे राज्य जिंकले. तिथली भाषा खच्ची करून भाषा मारून टाकली. त्यावेळी त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही आमचे गुलाम आहात आणि तुम्हाला तुमची भाषा बोलण्याचे, वापरण्याचे स्वातंत्र्य नाही. हे सोचनीय असल्याचा संदर्भ त्यांच्या भाषणात येतो.

प्रत्येकाला ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, समर्थ, लोकहितवादी, चिपळूणकर, केळकर, खाडिलकर, कोल्हटकर, गडकरी इत्यादींप्रमाणे साहित्य निर्माण करता येणार नाही. पण, आपण सामान्य आहोत, हेच आपले बळ आहे. न. र. फाटक यांनी सामान्य माणूसच स्वभाषा नि स्वराज्याचे रक्षण खंबीरपणे करू शकतो, हे स्पष्ट केले आहे. शं. द. जावडेकर हे पुणे येथे आयोजित केलेल्या संमेलनाचे अध्यक्ष. १९४९ साली हे संमेलन पुण्यात आयोजित केले गेले होते.

लोकशाहीवरची निष्ठा व्यक्त करण्याचे व तिचा प्रसार करण्याचे साधन मातृभाषाच असले पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्याचा लाभ सामान्य माणसाला मिळावा तसेच भारतीय संस्कृतीत भर घालायची समान संधी सर्वांना मिळावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते करताना भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार केला. उच्च महाविद्यालयीन शिक्षण आपल्या भाषेतून होणे का गरजेचे आहे, हे अधोरेखित करताना ते म्हणतात की, भारतीय मनाचा व बुद्धीचा विकास यातूनच होईल. मातृभाषेतून शिक्षण हा अहंकाराचा किंवा अभिमानाचा विषय नाही, तर तो जनतेच्या बुद्धी विकासाचा व आत्मविकासाचा प्रश्न आहे. ते म्हणतात, ‘समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञान, मनोविज्ञान, समाजविज्ञान, अशा सर्व विषयांची वाढ झाली पाहिजे. त्याकरिता संत, साहित्यिक, समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते अशा सर्वांचे सहकार्य झाले पाहिजे.’

याबरोबरच समांतरपणे भाषेच्या समृद्धीत भर पडत राहिली पाहिजे, असा त्यांचा विचार होता. कारवार येथे १९५१ साली भरलेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते अ. का. प्रियोळकर. त्यांनी त्यांच्या भाषणात ख्रिस्ती मराठीचे आद्य कवी फादर स्टीफन्स यांच्या काव्याचा संदर्भ दिला आहे.

जैसी हरळांमाजी रत्नकिळा । कीं रत्नां माजी हिरा निळा ।
तैसा भासांमाजी चोखाळ। भासा मराठी।।
जैसी पुस्पांमाजी पुस्प मोगरी। कीं परिमळांमाजी कस्तुरी।
तैसा भासा माजी साजिरी। मराठिया।।
पखियांमध्यें मयोरु। रुखियांमध्ये कल्पतरू।
भासांमधें मानु थोरु । मराठियेसी ।।
तारांमधें बारा राशी। सप्तवारांमधे रविससि।
यां दिपिचेआं भासांमधें तैसी । मराठीया।।

मराठी भाषेचे वर्णन करताना ज्या उपमा योजल्या आहेत, त्या भावस्पर्शी असून तिचे श्रेष्ठत्व विशद करणाऱ्या आहेत. अहमदाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते वि. द. घाटे. ते नेहमी म्हणत की, ‘मराठी माझी आई आहे, हिंदी मावशी आहे, संस्कृत आजी आहे. तिघी वडीलधाऱ्या आहेत, माझ्याच आहेत; माझे दंडवत आहेत. पण आईच्या पाटावर आई बसली पाहिजे, मावशीच्या पाटावर मावशी आणि आजीही आजीच्याच पाटावर बसली पाहिजे.’ असे त्यांनी म्हटले आहे. साहित्य, समाज व भाषा यांचा संबंध मांडताना ते पुढे म्हणतात,

‘साहित्य हे त्रिशंकूसारखे अधांतरी लटकत नसते. त्यांची मुळे त्या त्या प्रदेशांतल्या जमिनीत खोल गेलेली असतात. उसन्या आणलेल्या कल्पना आणि विचार, उसने आणलेले दुसऱ्यांचे अनुभव या शिदोरीवर साहित्य पोसले जात नाही. माझी मराठी भाषा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसली पाहिजे आणि तिने प्रेमाने भरवलेला घास आमच्या सर्वांच्या पोटात गेला पाहिजे. माध्यमिकच नव्हे, तर सारे उच्चशिक्षण मराठीतून मिळाले पाहिजे. इंग्रजीचा शत्रू नाही ती माझी आवडती भाषा आहे; परंतु इंग्रजी चांगले येण्यासाठी ते अध्यापनाचे माध्यम झाले पाहिजे, या भोंगळ समजुतीच्या मी विरोधात आहे.’

मराठीतून शिक्षण कशासाठी, याची उकल या भाषणातून होते. १९६४ साली मडगाव येथे झालेल्या संमेलनात वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या भाषणात असे म्हटले आहे की – भाषेचे प्रश्न हे इतर प्रश्नांच्या मानाने गौण आहेत. दुय्यम स्वरूपाचे आहेत ही कल्पनाच मुळात बरोबर नाही. भाषा हे समाजाच्या जीवन विकासातील एक आधारभूत आणि सनातन असे तत्त्व आहे. समाजाच्या बांधकामातील राजकीय, नैतिक वा आर्थिक व्यवस्थांचे वरचे महाल मजले अनेकदा दुरुस्त होतात, बदलतात, कित्येकदा स्वरूपात नाहीसे होऊन नव्या रूपात उभे राहतात. या सर्व युगांतरात नष्ट होत नाही व आमूलाग्र बदलत नाही ती फक्त भाषा. भाषा जेव्हा नष्ट होते, तेव्हा समाजाचे अस्तित्वच समाप्त होते. सर्व परिवर्तनातून समाजाला सोबत करणारी, गेलेल्या काळातील सत्त्व आजच्या काळापर्यंत आणून पोहोचविणारी आणि पुढच्या काळातील परिवर्तनाला आवश्यक असे पाथेय आजच्या काळात सिद्ध करणारी, ही समाजाची माय शक्ती आहे.

विविध अध्यक्षांच्या भाषणांतून भाषा व साहित्यविचाराचा परिपोष झालेला दिसतो. मराठीशी निगडित प्रश्नांचा उच्चार या भाषणांतून त्यांनी केला. या प्रश्नांच्या सोडवणुकीचे आव्हान आजही आपल्या समोर आहे.

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. २१ ते २७ ऑगस्ट २०२२