Monday, July 15, 2024

रामूचे बैल

रमेश तांबे

एक रामू नावाचा शेतकरी होता. त्याची थोडी फार शेती होती. त्याच्याकडे बैल होते खिलारी. शेतात काम करून शर्यतीत पळायचे भारी. आपली पांढरी शुभ्र खिलारी बैलं बघून रामूची छाती फुगायची. बैलगाडी घेऊन रामू बाजाराला जायचा. महिन्याचं सामान घेऊन यायचा. घरी येताना रस्त्यात कुणी बाया, म्हातारी, अपंग माणसं दिसली की, तो त्यांना गाडीत घ्यायचा. रामू साऱ्या गावाची काळजी घ्यायचा. त्यामुळे सारं गाव रामूला चांगलं ओळखत होतं.

एका महिन्यावर गावची जत्रा आली होती. गावची यात्रा म्हणजे चंगळ भारी. पाच पाच दिवस जत्रा चाले. पोरासोरांच्या आनंदाला नुसते उधाण यायचे. जत्रेत बैलगाडीच्या शर्यती असायच्या. म्हणून रामूने आता शेतातली कामे बंद केली होती. चांगला खुराक आणि विश्रांती देऊन त्याने बैलांची चांगली तयारी करवून घेतली होती.

अखेर दिवस उजाडला शर्यतीचा. बैलांच्या परीक्षेचा, रामूच्या इभ्रतीचा! रामूने बैलांना स्वच्छ धुऊन शिंगांना रंगरंगोटी करून सजवले होते. आपल्या दहा-बारा वर्षांच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन रामू बैल घेऊन शर्यतीच्या ठिकाणी हजर झाला.

शर्यतीच्या घाटावर प्रचंड गर्दी होती. सारा परिसर माणसांनी कसा फुलून गेला होता. स्पीकरवरून गाडी मालकाची नावे पुकारली जात होती. मधूनच “झाली… झाली… गेला… गेला… पळाला… पळाला” अशा घोषणा होत होत्या. किती वेळात घाटरस्ता पूर्ण केला त्याची घोषणा होत होती. तेवढ्यात रामूचे नाव पुकारले गेले. रामूने आपली चंचल बैलजोडी पुढे आणली आणि तिला एक छोटेखानी गाडी जोडली. जेणेकरून बैलांना ओढण्याचे जास्त कष्ट पडणार नाहीत. रामूने कंबर कसली. बैलांच्या पाठीवर थाप मारून त्यांना म्हणाला, “माझ्या पोरांनो चांगला जोर लावा आज. आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे.” रामूने बैलांच्या अंगाला अंग घासले. त्यांनी माना डोलावल्या. रामूसह दोन्ही बैलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या!

तेवढ्यात घोषणा झाली. “झाली… झाली… झाली! गेला… गेला… गेला!” बैलांच्या मागे रामू धावला. “रामू शिंगरेचा गाडा आला रे, आला फक्त दहा सेकंदांत आला.” रामूच्या बैलांनी घाटरस्ता पार केला होता. तोही फक्त दहा सेकंदांत! दहा सेकंदांची घोषणा ऐकून रामूने आनंदाने जोरात उंच उडी मारली अन् शर्यत जिंकल्याच्या थाटात तो बैलांच्या मागे पळाला. रामूची पोरं घाट संपतो तिथेच उभी होती. थोड्याच वेळात रामू धापा टाकत वर आला. पण त्याला आपली बैलं काही दिसेना. त्याने दूरवर सगळीकडे पाहिले. पण पोरंही दिसेनात अन् बैलंही दिसेना. आता रामू कावराबावरा झाला. तो तिथे उभं असणाऱ्यांना विचारू लागला, “माझी मुलं कुठे आहेत. माझी बैलं कुठे आहेत.” पण जो तो नवा गाडा किती सेकंदात पार करणार याची वाट पाहत होता. तितक्यात “झाली… झाली… गेला… गेला… बारा सेकंद! फक्त बारा सेकंद!” अशी घोषणा झाली. या साऱ्या गदारोळात रामूचे ओरडणे कुणालाही ऐकू आले नाही.

रामूच्या धास्तीचे एक कारण म्हणजे घाटाच्या पुढे थोड्याच अंतरावर एक दरी होती. आतापर्यंत कितीतरी बैलजोड्या बेहोशपणे थेट दरीतच गेल्या होत्या. हे सारे आठवून रामूच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याने पुन्हा एकदा आपल्या मुलांना “विजय, अजय” अशा हाका मारल्या. “शिवा, भिवा” या बैलांच्या नावाने त्याने टाहो फोडला. पण गर्दीत त्याचा आवाज पोहोचेना. “हाय रे दैवा” म्हणत रामूने डोक्याला हात लावला अन् दुःखी मनाने घराकडे निघाला. त्याला समजले बैल पळाले. जीव तोडून पळाले. पण कुठे थांबायचे त्यांना कळाले नाही. आपल्या इज्जतीसाठी ते पळाले हा विचार करून रामूला अधिकच रडू आले. रामूचे डोके अगदी भांबावून गेले. आपण आपल्या हट्टापायी बैल गमावले. याचा त्याला आता खूप पश्चाताप होऊ लागला.

रामूचे घर दूर होते. पण घरी जायला वाहन नव्हते. त्यामुळे रामू धावतच घराकडे निघाला. निदान मुले तरी घराकडे गेली असतील, अशी त्याला आशा वाटत होती. तासाभरात रामू घरी परतला. तेव्हा तो अगदी घामाघूम झाला होता. धापा टाकतच त्याने विजय, अजय अशा हाका मारल्या. तोच रामूची पोरं धावत घराबाहेर आली. रामू जोरात ओरडला. “अरे पोरांनो तुम्ही इथे कसे? आणि आपली बैलं कुठे आहेत.”

विजय म्हणाला, “बाबा बैलं गोठ्यात बांधलीत. अरे हे कसं काय? मला तर वाटलं की, आपलं बैलं गेली दरीत…!” रामू धावतच गोठ्यात गेला. बघतो तर काय दोन्ही बैल मस्तपैकी हिरवे गवत खात होते. रामू दिसताच दोघेही हंबरू लागले. रामूने मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आता मात्र रामूच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.

दोन्ही पोरं गोठ्यात आली अन् बाबांना सांगू लागली. “घाटाच्या वर बैलं आल्यावर ती थांबलीच नाहीत. काही लोकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण नाही जमले त्यांना! ती पळत सुटली वाऱ्याच्या वेगाने. मग आम्हीदेखील पळत सुटलो बैलांच्या मागे. पळता पळता बैलं थेट आपल्या घरीच आली अन् त्यांच्या मागोमाग आम्ही.” रामूने पोरांना पोटाशी धरले. त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले अन् म्हणाला, “बाळांनो आज तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे झालात!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -