अनुराधा दीक्षित
मला बालपणी नेहमी प्रश्न पडायचा की, मुलींची लग्न होतात, तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात. सारे सौभाग्यालंकार ती हौसेने आणि अभिमानाने आपल्या अंगाखांद्यावर बाळगते. पण तिच्या नवऱ्याला असं काहीच का घालावं लागत नाही? लग्न झालेली मुलगी या गोष्टींमुळे लगेच ओळखता येते. पण पुरुष? लग्न झालंय की नाही कसा ओळखायचा?
बाईने कुंकू लावलं पाहिजे, काचेच्या बांगड्या, मंगळसूत्र वगैरे घातलं पाहिजे हे ठरवलं कुणी? जर बाईसाठी हे सारे नियम ठरवले जातात, तर पुरुषांसाठी का नाही? कारण अगदी सरळ आहे. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे. ते ठरवतील तेच समाजात व्हायला पाहिजे. सारी बंधनं फक्त मुलींसाठी! पुरुषांना कसंही वागायला त्याच संस्कृतीने मुभा दिली. याच संस्कृतीने तिला पतीनिधनानंतर सती जायला लावलं. त्यातही इतका क्रूरपणा की, एखादी मुलगी आरडाओरडा करू लागली, तर तिचा आक्रोश ढोलताशांच्या गोंगाटात दाबून टाकायचा. तिला पतीचं प्रेत मांडीवर घेऊन बसावं लागे. चिता धडधडून पेटली की, ती जीव वाचावा म्हणून तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली, तर हे संस्कृतीरक्षक तिला काठ्यांनी आगीत ढकलून तिला जळायला भाग पाडायचे. तिचा बिचारीचा इच्छा नसतानाही जीव जायचा. मग तिचं उदात्तीकरण करण्यासाठी तिची समाधी बांधायची. तिच्या पाया पडायचं वगैरे… हा माणसांचा अमानुषपणा दीर्घकाळ चालू होता.
इतिहासातील कथेनुसार, शहाजीराजेंच्या निधनानंतर जिजाबाईही सती जायला निघाल्या, तेव्हा शिवरायांनी त्यांना अडवलं. त्या लहानग्या शिवबाच्या बोलांनी त्यांचं हृदय विरघळलं आणि पुढे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व त्यांनी घडवलं, म्हणूनच आजही शिवरायांसारखा एक महान राजा आणि जिजाऊंसारखी आदर्श माता महाराष्ट्राला मिळाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! जिजाऊंच्यानंतर तरी ही प्रथा खंडित व्हायला हवी होती. पण नाही. ती बंद होण्यासाठी राजा राममोहन रॉय यांच्यापर्यंत देशाला वाट पाहावी लागली.
ब्राह्मण वर्गात केशवपनाची कुप्रथा अगदी अलीकडेपर्यंत चालू होती. म्हणजे माझ्या बालपणी मी आमच्या आजूबाजूला, नात्यांमध्ये माझ्या आजीच्या वयाच्या बायकांना (माझी आजी याला अपवाद होती, हे नशीब!) लाल किंवा पांढरं आलवण नेसताना पाहिलंय. एखाद्या आजीचं डोकं भादरायला गुपचूप आलेला नाभिकसुद्धा पाहिलाय. तेव्हा माझ्या बालमनाला कुतूहल वाटायचं. असं का करतात? हा प्रश्न पडायचा. पण तेव्हा मुलांना पडलेल्या असल्या अगोचर प्रश्नांची उत्तरं देण्याची पद्धत नव्हती. विचारलं तर कान तरी पिरगळला जायचा, नाहीतर पाठीत धपाटा ठरलेलाच. यथावकाश त्यांची उत्तरं मिळाली. तोपर्यंत मध्ये दोन पिढ्या जाव्या लागल्या. शाळेत गेल्यावर शिकताना कळलं की, महात्मा जोतिबा फुले यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांनी सर्व नाभिकांना संपावर जायला सांगितलं. त्या नाभिकांना त्यांनी प्रतिज्ञा घ्यायला लावली. नंतर मात्र ती प्रथा बंद पडली खरी. तरी विधवांवर अन्याय, अत्याचार व्हायचं आजही काही प्रमाणात चालूच आहे.
पूर्वी बालविवाह व्हायचे. अगदी पाळण्यातही लग्न लावली जायची म्हणे. त्यात मुलीचं वय विचारात न घेता तिचा एखाद्या आजोबाच्या वयाएवढ्या माणसाशीही ‘जरठ-कुमारी’ विवाह व्हायचा. मुलीला जन्मत:च मन नावाचा अवयव नसतो, असं गृहितकच होतं. आजही ते काही प्रमाणात असतंच. तरी आता परिस्थिती खूपच चांगली आहे म्हणायची! तर गो. ब. देवलांनी या विषयावर ‘संगीत शारदा’ नाटक लिहून या प्रथेवर प्रकाश टाकण्याचा आणि समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अर्थात या सर्व गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत. पण तरी काही पुरुषच या प्रथांविरोधात सकारात्मकतेने काम करीत होते. त्यामुळे त्या बंद पडल्या, याबद्दल भारतीय स्त्रिया तरी त्यांच्या ऋणी आहेत.
मात्र आजही सुशिक्षित किंवा अशिक्षित विधवा स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजून म्हणावा तसा बदललेला नाही. त्यामुळे केशवपन, सती यांच्याप्रमाणेच विधवाप्रथाही बंद झाली पाहिजे. मुली बालपणापासूनच कुंकू लावत असतात. अर्थात आता तरुण पिढी हे सारं पाळतेच असं नाही. तरीही अजून ग्रामीण भागात तरी मोठ्या प्रमाणात हे पाळलं जातं. मग नवरा गेल्यानंतर तिने ते पुसून का टाकायचं? मंगळसूत्र का काढायचं? बांगड्या का फोडायच्या? हे सारं तिची इच्छा नसतानाही का करून घ्यायचं? नवरा गेल्यानंतरही तिने ते सारं तसंच ठेवलं, तर असा कोणता गहजब होणार आहे? तिला म्हणे हळदी-कुंकवाला बोलवायचं नाही, कोणी तिला कुंकू लावायचं नाही, तिने कुणाची ओटी भरायची नाही, कोणत्याही मंगलकार्यात तिने पुढे व्हायचं नाही, सतत मागे मागे राहायचं… असं का?
मग तोच एखादा विधुर असेल, तर बायको मेल्या मेल्या त्याचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला जातो, तो कुठेही पुढे पुढे करून वावरतो. मग त्यांच्या कपाळावर एखादा शिक्का का नाही मारत तो विधुर असल्याचा? ही कोणती स्त्री-पुरुष समानता? आपल्या संविधानाने हे सारं आपल्याला करायला परवानगी दिलीय? तरीही सगळे नियम धाब्यावर बसवून गोष्टी घडत असतात. कोणी एक बायको जिवंत असताना दुसरी तिच्या उरावर आणून बसवतो. पहिलीला मूल नाही, म्हणून तिची संमती घेतल्यासारखं करून दुसरं लग्न करायचं, तिलाही नाही मूल झालं, तर तिसरंही करायचं! वाह वा! जे स्वतःला कायद्याचे रक्षक समजतात, जे लोकांना ज्ञान वाटत फिरतात, ते कितीतरी राजकारणी, सेलिब्रिटी म्हणवणारे तरुणांचे आदर्श वगैरे या गोष्टी करण्यात तर माहीर आहेत. त्यांची लफडी-कुलंगडी राजरोसपणे चालतात! कारण ते पुरुष आहेत! तिथे कायदे वगैरे आड येत नाहीत. पण एखाद्या स्त्रीला नाहक बदनाम करण्यासाठी मात्र हीच जमात पुढे सरसावते, हे आपण रोजच्या व्यवहारात पाहतो.
…तर विधवा प्रथा बंद करणं हा विषय आहे. त्यासाठी समाजमन तयार करायलाच हवं. कारण हा संवेदनशील विषय आहे. पण ती बंद पाडण्यासाठी आता खरी गरज आहे, ती साऱ्या स्त्रियांनी एकजूट होऊन त्या विरोधात आवाज उठवण्याची.
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दृष्टीने एक पाऊल उचललं गेलंय. ते अभिनंदनीय आहे. ज्या रूढी, प्रथा, परंपरा काळाशी विसंगत आहेत, त्या बहुसंख्य सुशिक्षित समाजाने बंद पाडण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता समंजसपणे गावागावांतील लोकांनी एकत्र येऊन त्यावर संवाद साधला पाहिजे. विधवा स्त्रियांच्या वाट्याला येणारी उपेक्षा, अवहेलना, अपमान यांचा विचार करून तिला आपल्या घरात आणि समाजातही सन्मानाची वागणूक मिळेल, तिच्याकडे वाकड्या नजरेने न बघता, ती आपलीच कुणी माता, भगिनी आहे असे मानून तिचे रक्षण करण्याची, तिला मदत करण्याची आणि मानाने वागवण्याची जबाबदारी साऱ्या समाजाची आहे. कारण प्रत्येक घरात कुणी ना कुणी विधवा कधी ना कधी पाहायला मिळतेच. मग सर्वांनी अंतर्मुख होऊन तिच्याशी आपली आणि समाजाची वागणूक कशी आहे, याचा विचार केला आणि केला, तरच विधवांच्या आयुष्यातही नवीन आशाआकांक्षांचा सूर्योदय नक्कीच होईल आणि
त्या आपलं उर्वरित आयुष्य सुरक्षित आणि खंबीरपणे घालवू शकतील, असं वाटतं! कारण, केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!!!