डॉ. वीणा सानेकर
साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडक भाषणांतील भाषाविचार या लेखातून आपण समजून घेणार आहोत. अध्यक्षीय भाषणांचा एक खंड ग्रंथालयात पुस्तके चाळताना हाती लागला आणि त्यातला भाषाविचार आजच्या काळालाही किती सुसंगत आहे. ग. त्र्यं. माडखोलकरांनी नवमहाराष्ट्राचे उत्थान हा शब्द योजून त्याकरिता काय काय गरजेचे हे विस्ताराने सांगितले आहे. त्यांचा भर लोकवाङ्मयावर आहे व त्याकरिता काय गरजेचे आहे, हे त्यांनी भाषणातून मांडले. कोणतीही भाषा राजसत्तेच्या आश्रयाने किंवा विद्यापीठाच्या पुढाकाराने वाढत नाही, तर ती जनतेच्या, लोकांच्या आश्रयानेच वाढू शकते, हे ते स्पष्ट करतात. लोकांची भाषा त्यांच्या जिभेवर नाचते. तिचा आवाज त्यांच्या हृदयातून प्रतिध्वनित होतो हे ते आवर्जून सांगतात.
न. र. फाटक यांनी तर मानवाचा देह धारण करणाऱ्या माणसाचे सर्वस्व म्हणजे भाषा असे म्हटले. अनेक सत्ताधीशांनी असा प्रयत्न जगाच्या इतिहासात केला, जिथे राज्य जिंकले. तिथली भाषा खच्ची करून भाषा मारून टाकली. त्यावेळी त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही आमचे गुलाम आहात आणि तुम्हाला तुमची भाषा बोलण्याचे, वापरण्याचे स्वातंत्र्य नाही. हे सोचनीय असल्याचा संदर्भ त्यांच्या भाषणात येतो.
प्रत्येकाला ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, समर्थ, लोकहितवादी, चिपळूणकर, केळकर, खाडिलकर, कोल्हटकर, गडकरी इत्यादींप्रमाणे साहित्य निर्माण करता येणार नाही. पण, आपण सामान्य आहोत, हेच आपले बळ आहे. न. र. फाटक यांनी सामान्य माणूसच स्वभाषा नि स्वराज्याचे रक्षण खंबीरपणे करू शकतो, हे स्पष्ट केले आहे. शं. द. जावडेकर हे पुणे येथे आयोजित केलेल्या संमेलनाचे अध्यक्ष. १९४९ साली हे संमेलन पुण्यात आयोजित केले गेले होते.
लोकशाहीवरची निष्ठा व्यक्त करण्याचे व तिचा प्रसार करण्याचे साधन मातृभाषाच असले पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्याचा लाभ सामान्य माणसाला मिळावा तसेच भारतीय संस्कृतीत भर घालायची समान संधी सर्वांना मिळावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते करताना भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार केला. उच्च महाविद्यालयीन शिक्षण आपल्या भाषेतून होणे का गरजेचे आहे, हे अधोरेखित करताना ते म्हणतात की, भारतीय मनाचा व बुद्धीचा विकास यातूनच होईल. मातृभाषेतून शिक्षण हा अहंकाराचा किंवा अभिमानाचा विषय नाही, तर तो जनतेच्या बुद्धी विकासाचा व आत्मविकासाचा प्रश्न आहे. ते म्हणतात, ‘समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञान, मनोविज्ञान, समाजविज्ञान, अशा सर्व विषयांची वाढ झाली पाहिजे. त्याकरिता संत, साहित्यिक, समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते अशा सर्वांचे सहकार्य झाले पाहिजे.’
याबरोबरच समांतरपणे भाषेच्या समृद्धीत भर पडत राहिली पाहिजे, असा त्यांचा विचार होता. कारवार येथे १९५१ साली भरलेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते अ. का. प्रियोळकर. त्यांनी त्यांच्या भाषणात ख्रिस्ती मराठीचे आद्य कवी फादर स्टीफन्स यांच्या काव्याचा संदर्भ दिला आहे.
जैसी हरळांमाजी रत्नकिळा । कीं रत्नां माजी हिरा निळा ।
तैसा भासांमाजी चोखाळ। भासा मराठी।।
जैसी पुस्पांमाजी पुस्प मोगरी। कीं परिमळांमाजी कस्तुरी।
तैसा भासा माजी साजिरी। मराठिया।।
पखियांमध्यें मयोरु। रुखियांमध्ये कल्पतरू।
भासांमधें मानु थोरु । मराठियेसी ।।
तारांमधें बारा राशी। सप्तवारांमधे रविससि।
यां दिपिचेआं भासांमधें तैसी । मराठीया।।
मराठी भाषेचे वर्णन करताना ज्या उपमा योजल्या आहेत, त्या भावस्पर्शी असून तिचे श्रेष्ठत्व विशद करणाऱ्या आहेत. अहमदाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते वि. द. घाटे. ते नेहमी म्हणत की, ‘मराठी माझी आई आहे, हिंदी मावशी आहे, संस्कृत आजी आहे. तिघी वडीलधाऱ्या आहेत, माझ्याच आहेत; माझे दंडवत आहेत. पण आईच्या पाटावर आई बसली पाहिजे, मावशीच्या पाटावर मावशी आणि आजीही आजीच्याच पाटावर बसली पाहिजे.’ असे त्यांनी म्हटले आहे. साहित्य, समाज व भाषा यांचा संबंध मांडताना ते पुढे म्हणतात,
‘साहित्य हे त्रिशंकूसारखे अधांतरी लटकत नसते. त्यांची मुळे त्या त्या प्रदेशांतल्या जमिनीत खोल गेलेली असतात. उसन्या आणलेल्या कल्पना आणि विचार, उसने आणलेले दुसऱ्यांचे अनुभव या शिदोरीवर साहित्य पोसले जात नाही. माझी मराठी भाषा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसली पाहिजे आणि तिने प्रेमाने भरवलेला घास आमच्या सर्वांच्या पोटात गेला पाहिजे. माध्यमिकच नव्हे, तर सारे उच्चशिक्षण मराठीतून मिळाले पाहिजे. इंग्रजीचा शत्रू नाही ती माझी आवडती भाषा आहे; परंतु इंग्रजी चांगले येण्यासाठी ते अध्यापनाचे माध्यम झाले पाहिजे, या भोंगळ समजुतीच्या मी विरोधात आहे.’
मराठीतून शिक्षण कशासाठी, याची उकल या भाषणातून होते. १९६४ साली मडगाव येथे झालेल्या संमेलनात वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या भाषणात असे म्हटले आहे की – भाषेचे प्रश्न हे इतर प्रश्नांच्या मानाने गौण आहेत. दुय्यम स्वरूपाचे आहेत ही कल्पनाच मुळात बरोबर नाही. भाषा हे समाजाच्या जीवन विकासातील एक आधारभूत आणि सनातन असे तत्त्व आहे. समाजाच्या बांधकामातील राजकीय, नैतिक वा आर्थिक व्यवस्थांचे वरचे महाल मजले अनेकदा दुरुस्त होतात, बदलतात, कित्येकदा स्वरूपात नाहीसे होऊन नव्या रूपात उभे राहतात. या सर्व युगांतरात नष्ट होत नाही व आमूलाग्र बदलत नाही ती फक्त भाषा. भाषा जेव्हा नष्ट होते, तेव्हा समाजाचे अस्तित्वच समाप्त होते. सर्व परिवर्तनातून समाजाला सोबत करणारी, गेलेल्या काळातील सत्त्व आजच्या काळापर्यंत आणून पोहोचविणारी आणि पुढच्या काळातील परिवर्तनाला आवश्यक असे पाथेय आजच्या काळात सिद्ध करणारी, ही समाजाची माय शक्ती आहे.
विविध अध्यक्षांच्या भाषणांतून भाषा व साहित्यविचाराचा परिपोष झालेला दिसतो. मराठीशी निगडित प्रश्नांचा उच्चार या भाषणांतून त्यांनी केला. या प्रश्नांच्या सोडवणुकीचे आव्हान आजही आपल्या समोर आहे.