अनघा निकम-मगदूम
दहीहंडीचा जल्लोष आता वातावरणात विरला आहे. मात्र जाता-जाता वातावरण एकदम प्रफुल्लित करून गेला आहे. आता कोकणवासीयांना वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे! गेली दोन वर्षे कोरोनामुळे कोकणवासीयांना मनसोक्त गणेशोत्सव साजरा करता आलेला नाही. गेल्या दोनही वर्षी आपल्या गावी येताना चाकरमान्यांना अनेक निर्बंध, अनेक अटी-शर्थींचा सामना करावा लागला होता.
आता मात्र कोरोना जरी सर्वत्र असला तरी सुद्धा त्याचे संकट काही अंश कमी झाले. त्यामुळे यंदा ज्या जोशानं दहीहंडी साजरी झाली त्याच जोशाने आणि उल्हासाने, उत्साहाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणी माणूस सज्ज झाला आहे.
कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी! जून, जुलै हे दोन महिने पाऊस मुसळधार कोसळून जातो. अशा वेळेला कोकण शांत असते. शेतीची कामं आटोपलेली असतात. मासेमारीसुद्धा थंड असते. मात्र एकदा श्रावणाची चाहूल लागली की पुन्हा एकदा कोकणामध्ये लगबगीला सुरुवात होते. श्रावण महिना खरं तर श्री शंकराच्या भक्तीचा महिमा! परंतु कोकणामध्ये शिवशंकराच्या मंदिरासोबतच अनेक मंदिरांमध्ये नामसप्ताह सोहळ्याचे आयोजन केलं जातं. त्याशिवाय अनेक धार्मिक उत्सव या महिन्यात केले जातात. त्याचबरोबर नारळी पौर्णिमा हा तर अथांग समुद्राच्या शेजारी राहणाऱ्या कोकणी माणसासाठी एक खास दिवस. हा उत्सव, त्याच दिवशी येणारी राखी पौर्णिमा ही सुद्धा तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. त्यानंतर मात्र दहीहंडीचा जल्लोषसुद्धा आनंददायी असतो. धाडसी कोकणी माणूस थरावर थर चढवून उंचावर असलेली हंडी फोडतो आणि आपल्या एकोप्याचे दर्शन या उत्सवाच्या माध्यमातून घडवत असतो. नामसप्ताह असू दे किंवा दहीहंडीसारखे उत्सव या सर्वांमध्येच कोकणी माणूस आपलं गावपण, आपला एकोपा कायम टिकवून ठेवतो.
गणेशोत्सव हा तर कोकणी माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव. गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या दोन उत्सवांसाठी मुंबईसह कुठेही राहणारा कोकणी माणूस आपल्या गावी परततो आणि रिकामी असलेली गाव पुन्हा एकदा या दिवसांमध्ये वर्दळू लागतात.
नुकताच दहीहंडीचा जल्लोष संपला आहे आणि आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे! कोरोनाचे सावट दूर झाल्याने कोकणी माणूस आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अर्थात त्याच्या वाटेमध्ये त्याच्या उत्सव आणि उत्साहामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यातीलच पहिली अडचण म्हणजे नादुरुस्त असलेला मुंबई-गोवा महामार्ग. महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण आणि त्याशिवाय महामार्गासह कोकणातील अनेक रस्त्यांवर असलेले खड्डे ही उत्सवाला गालबोट लावणारी गोष्ट आहे; परंतु यावर आता मार्ग निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे महामार्ग आणि अंतर्गत रस्ते यांची दुरुस्ती असतानाच दुसरीकडे मुसळधार पाऊस, वेगवान वारे यामुळे कोसळणाऱ्या दरडींचे सावट महामार्गावरील प्रवासासाठी धोका आहे. यावर सुद्धा उपाययोजना करणे आणि कडेकोट बंदोबस्त ठेवणं हेही गरजेचे आहे.
गणेशोत्सव म्हणजेच कोकणीपण असण्याचं एक प्रतीक आहे. हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी कोकणी माणूस सज्ज होतोय, तर दुसरीकडे राज्य शासन आणि प्रशासनसुद्धा कोकणी माणसाला या उत्सवाचा आनंद देण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. म्हणजेच आता बाप्पा घरोघरी वाजत-गाजत आणि त्याच्या मानात येणार हे नक्की!