अमरावती पदवीधर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत धीरज लिंगाडे विजयी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला.

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत लिंगाडे यांना आघाडी मिळाली. त्यांनी निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला नाही. पण मते अधिक असल्याने लिंगाडे विजयी झाले. निवडणूकअधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली. धीरज लिंगाडे पाटील यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली. तर रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे यांनी अखेर बाजी मारली.

त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील चार जागांचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले. कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे येथून विजयी झाले. त्यांना वीस हजार ७४८ मते मिळाली. त्यांच्याविरुद्ध उभे असलेले महाविकास आघाडीकडून शेकापचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना ९ हजार ३८ मते मिळाली.
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने थेट उमेदवार न उतरवता महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केला होता. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले. त्यांना १४०६९ मते मिळाली. गाणार यांना ६३६६ मते मिळाली. येथील ९० टक्के मते जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर अडबाले यांच्याकडे गेली. याच मुद्द्यावर अनेक शिक्षक संघटनांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे पुन्हा एकदा निवडून आले. त्यांनी भाजपाचे किरण पाटील यांचा पराभव केला. त्यांना वीस हजार ९१ मते मिळाली तर किरण पाटील यांच्याकडे १३४९७ मते होती. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली.

हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे नागरिकांची पळापळ

कल्याण : कल्याण पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची व हॉस्पिटलच्या स्टाफची पळापळ झाली.

कल्याण पूर्व चक्की नाका परिसरामध्ये जनकल्याण हॉस्पिटल मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये धूरच धूर पसरला. शॉर्टसर्किटमुळे हॉस्पिटलला आग लागली म्हणून रुग्णांच्या नातेवाईक व हॉस्पिटलचा स्टाफची धावपळ सुरू झाली. परिसरातील नागरिक देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. रुग्णालयामध्ये २० ते २५ रुग्ण उपचार घेत आहेत परंतु या शॉर्टसर्किटमुळे हॉस्पिटल मधील रुग्णांना कोणतीही दुखापत झाली नाही. हॉस्पिटलच्या स्टाफने अग्निशामक दलाला कळवताच अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींचं भयानक वास्तव समोर

मुंबई: सायंकाळ ७.३० ते ८ ची वेळ, स्थळ दादर स्टेशन. तिकिट काऊंटरच्या समोरील जागेवर सहा मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या. त्रस्त, चिंतीत आणि भयभीत! या मुली स्टेशनबाहेर तिकिट घरासमोर अशा जमिनीवर का बसल्या आहेत? असा प्रश्न तेथील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडला होता. कुणीतरी तो प्रश्न त्यांना विचारलाच अन् समोर आलं भयानक वास्तव.

नाशिक जिल्ह्यातून मुंबईला पोलीस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या या सामान्य शेतकऱ्यांच्या मुली. नायगांव येथेच ही पोलिस भरती प्रक्रिया सुरू होती. तेथेच त्यांची राहण्याची व्यवस्थाही होती पण ही जागा ऐनवेळी नाकारण्यात आली. जागा भरलेली असल्याने तेथून त्यांना परत जाण्यास सांगितले पण कुठे राहायचे याचा काही पत्ता दिला नाही. या बिचाऱ्या सहा मुली तेथे बराच वेळ वाट बघत तशाच बसलेल्या. त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता आता रात्र काढायची कुठे?
सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येते. गेस्ट रुममध्ये गेल्यानंतर ५ हजार रुपये भाडं या मुली कुठुन देणार? मग या मुली परत आल्या आणि पुन्हा दादर स्थानकातील तिकिटगृहाच्या बाहेर बसल्या. याबाबच एका पोलिस कॉन्स्टेबलकडे या मुलींच्या राहण्याची सोय होऊ शकते का अशी विचारणा केली. त्याने प्लॅटफॉर्मवर असलेल्या विश्रामगृहाचा रस्ताही दाखवला पण येथे २ तासांच्या वर राहता येणार नाही, असे तो म्हणाला.
रात्रीची मुंबई म्हणजे गर्दुल्ले, पाकीटमार यांची. या स्थानकाबाहेर तर या गर्दुल्ल्यांचा राबता असतो. तो पोलीस कॉनस्टेबल म्हणाला, मी आहे तोवर येथे बसा पण रात्रीचे इन्चार्ज आले तर ते तुम्हाला बसू देणार नाहीत. फक्त सामानाची काळजी तेवढी घ्या.

गावातील कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आणि मुली पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहनत घेऊन मुंबईत येतात. मुलांप्रमाणेच या मुलीही त्यांच्या कुटुंबीयांचा आधार असतात. पोलिस सेवेत भरती होऊन इतरांना सुरक्षा देण्यासाठी आलेल्या या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? पोलीस भरतीसाठी आदल्या दिवशी जागरण करुन दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता ग्राऊंडवर धावायचं. शारीरीक क्षमतेची चाचणी द्यायची. हे सर्व शक्य नेमकं करायचं तरी कसं? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आज या सहा मुलींचा प्रश्न समोर आला आहे. आणखी कित्येक जणींना या प्रकाराला सामोरे जावे लागले असेल याची गणती नाही.

दिपक चहरच्या पत्नीची फसवणूक, क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजकडून हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी आणि व्यावसायिक कमलेश पारीख यांनी व्यवसायाच्या नावाखाली १० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी हरिपर्वत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

क्रिकेटर दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर हे मानसरोवर कॉलनी शहागंजमध्ये राहतात. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमजी रोडवर असलेल्या पारिख स्पोर्ट्सचे मालक ध्रुव पारीख आणि त्याचे वडील कमलेश पारीख यांच्यात गेल्या वर्षी व्यावसायिक संभाषण झाले होते. पारीख पिता-पुत्र हे अवंती कॉर्पोरेशन हाउसिंग सोसायटी हैदराबाद येथील रहिवासी आहेत. कमलेश पारीख हे हैदराबादचे शुज व्यावसायिक आहेत. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील राज्य संघांचे ते माजी पदाधिकारीही आहेत.

जया भारद्वाज यांनी ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांना विश्वासात घेऊन व्यवसायासाठी करार केला होता. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जया भारद्वाज यांनी आरोपीच्या खात्यात १० लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र या दोघांनीही जया यांची फसवणूक केली. रकमेची देवाणघेवाण केल्यावर आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत पोलिस उपायुक्त विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या मुरबाडकरांचे स्वप्न ७५ वर्षांनंतर पूर्ण

मुरबाड: रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या मुरबाडकरांचे स्वप्न ७५ वर्षांनंतर पूर्ण होणार. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून, जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे. तर ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर मुरबाड रेल्वेमार्गासाठी निविदा काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. हे काम या रेल्वेचे काम २०२४ च्या आधीच सुरू होईल, असेही कपिल पाटील यांनी सांगितले.

जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येईल. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले
पहिल्या टप्प्यातील कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे असे दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे गाव पण…

भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र, या गावाला रेल्वे पोचण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींना साथीला घेऊन सुमारे दीड महिन्यांत जमीन अधीग्रहण करण्याचा प्रयत्न आहे. या मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च असून, राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देण्यात आली आहे, असे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

सांस्कृतिक नगरीतल्या ऐतिहासिक वाचनालयाचे शतकोत्तर हीरक महोत्सव सुरू

0

कल्याण : शिक्षक, कारकून, मामलेदार ते उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर ब्रिटीश शासनात नोकरी केलेल्या कल्याणच्या सदाशिव मोरेश्वर साठे यांनी १८६४ साली कल्याणमध्ये सार्वजनिक वाचनालय संस्कृतीचा पाया रचला. या ऐतिहासिक वाचनालयाचे हे शतकोत्तरी हीरक महोत्सवी वर्ष असून या कार्यक्रमाची सुरुवात ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ वाचक बाळकृष्ण धुरी, चंद्रकांत उदावंत, मोहन पिंपळखरे यांच्या हस्ते संस्थापक सदाशिव साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सुरुवातीला दूरदर्शन कलावंत सुधाकर वसईकर यांनी सदाशिव साठे यांच्याविषयी माहिती दिली. शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम वर्षभर साजरे करण्यात येणार असून त्याकरिता वाचकांनी वाचन संस्कृती वाढविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी ग्रंथ समिती सदस्य अरविंद शिंपी, सरचिटणीस भिकू बारस्कर, सहग्रंथपाल करुणा कल्याणकर, ग्रंथसेविका तसेच वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

केडीएमसी परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वनवास संपला

0

कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील गेल्या २० वर्षांपासून कंत्राटी पदावर काम करणारे ११ चालक व ४८ वाहक यांचा वनवास संपला असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रशासकीय आदेश पारित केला आहे. या कामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने तसेच संघटना अध्यक्ष रवि पाटील यांच्या प्रयत्नाने या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव सोनिया सेठी, केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे, अप्पर सचिव प्रतिभा पाटील, परिवहन व्यवस्थापक दिपक सावंत, उपपरिवहन व्यवस्थापक संदिप भोसले आणि या कार्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या संघटनेचे उपाध्यक्ष प्रतिक पेणकर या सर्वांचे परिवहन कर्मचाऱ्यांच्या वतीने परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांनी आभार मानले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवर कंत्राटी पध्दतीने, कल्याण-ड तात्पुरत्या स्वरूपात किमान वेतन व ठोक मानधनावर ४८ वाहक व ११ चालक, असे एकूण ५९ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या भरतीची कार्यवाही सन २००३ व २००४ मध्ये करण्यात आली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवर विहित प्रक्रिया पार पाडून कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात, किमान वेतन ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ४८ वाहक व ११ चालक अशा एकूण ५९ कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर समावेश करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय नगरविकास विभागाने गुरुवारी पारित केला आहे. यामुळे या कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टिटवाळ्यात नशेडी आणि गर्दुल्यांचा हैदोस

तरुण-तरुणींच्या गैरवर्तनाला आळा घालण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी

कल्याण : कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांडा-टिटवाळा येथील आठ प्रमुख ठिकाणी अल्पवयीन तरुण-तरुणी, मद्यपी व नशा करणारे टोळके बिनधास्तपणे गैरवर्तणूक करीत असतात. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने याला आळा घालण्याची मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देऊन केली आहे.

सुप्रसिद्ध गणेश मंदिर टिटवाळ्यात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अंगारकी व चतुर्थीला भक्तगणांची रेलचेल हजारोंच्या संख्येत असते. नवसाला पावणारा गणपती असल्याने राज्यातून भाविकांची वर्दळ येथे कायम असते. यामुळे मांडा-टिटवाळा शहर झपाट्याने विकसित झाले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बेकायदेशीर धंद्यांनी डोके वर काढले असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मांडा-टिटवाळा शहरातील सार्वजनिक उद्यानात तरुण-तरुणी खुलेआम गैरवर्तन करीत आहेत. यात प्रामुख्याने बालोद्यान पार्क, स्टेशन समोरील मारुती मंदिराच्या मागील परिसर, इंदिरा नगर मार्गे, चार्मस हाईट रोड, स्मशानभूमी रोड, टिटवाळा महोत्सव मैदान, रेजन्सी सर्वम, थारवाणी सिमेंट रोड, पंचवटी बिल्डिंग मागील परिसर व शिवमंदिर परिसर आदींचा समावेश आहे. काहीजण येथे अमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून अन्य तरुणवर्ग व्यसनाधीन बनत चालल्याचे बोलले जात आहे. त्यातच पोलिसांची गस्त, फेरफटका होत नसल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शहर उपप्रमुख विजय देशेकर यांच्या शिष्टमंडळाने कल्याण पोलीस ठाण्यात पो. नि. जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देत तरुण-तरुणी करीत असलेली गैरवर्तणूक, खुलेआमपणे अमली पदार्थ सेवन व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करून या संदर्भात एक हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मागणी केली आहे.

अदानी कंपनीसाठी खुशखबर! जागतिक रेटिंग एजन्सीने सांगितले…

मुंबई: जगातील प्रसिद्ध रेटिंग एजन्सी फिचने शुक्रवारी अदानी समुहाबाबत एक खुशखबर दिली आहे. फिचच्या म्हणण्यानूसार हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाच्या रेटिंगवर कोणताही तात्काळ परिणाम होणार नसल्याचे फिचचे म्हणणे आहे.

फीचने असेही नमुद केले की, अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समूहाच्या क्रेडिट प्रोफाइलवर कोणताही परिणाम झाला नाही. अदानी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेतला होता. त्यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवाल निराधार असल्याचे अदानी समुहाने म्हटले होते आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचीही पुष्टी केली होती.

दुसरीकडे, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनेही शुक्रवारी सांगितले की ते अदानी समूहाच्या आर्थिक अस्थिरतेवर लक्ष ठेवून आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीबाबत ते म्हणाले, अलीकडच्या घडामोडींचा समूहावर नकारात्मक परिणाम होत आहे आणि त्यामुळे येत्या एक-दोन वर्षांत समूहाच्या कर्ज उभारणीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादरम्यान आंदोलन

वर्धा : वर्धात आजपासून सुरू झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला विदर्भवाद्यांनी गालबोट लावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना गोंधळ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे आहे. तुमचेही म्हणने ऐकू, असे आश्वासन देत भाषण सुरू केले. तेव्हा पुन्हा काही विदर्भवादी उभे राहिले. त्यांनी “शेतकऱ्यांवर बोला, वेगळ्या विदर्भावर बोला’, असे आवाहन केले. तसेच ‘वेगळा विदर्भ द्या’ अशी मागणी करत पत्रके व्यासपीठाच्या दिशेने फेकली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर नेले. त्यानंतर आणखी काही जणांनी घोषणाबाजी केली. तर संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे उदघाटन कार्यक्रमात भाषण सुरू करताच काही महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वांना पोलिसांनी बाहेर काढले.

साहित्य संमेलन आणि वाद याचे नाते तसे जुनेच आहे. वर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही वादाचे सूर उमटले होते. मात्र, थेट संमेलनाच्या उदघाटनावेळी अचानक हा प्रकार घडल्याचे समोर आले. यामुळे संमेलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित होते.

या संमेलनाचा समारोप रविवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार आहेत.