Sunday, January 19, 2025
Homeमहत्वाची बातमीवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादरम्यान आंदोलन

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनादरम्यान आंदोलन

वर्धा : वर्धात आजपासून सुरू झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला विदर्भवाद्यांनी गालबोट लावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना गोंधळ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे आहे. तुमचेही म्हणने ऐकू, असे आश्वासन देत भाषण सुरू केले. तेव्हा पुन्हा काही विदर्भवादी उभे राहिले. त्यांनी “शेतकऱ्यांवर बोला, वेगळ्या विदर्भावर बोला’, असे आवाहन केले. तसेच ‘वेगळा विदर्भ द्या’ अशी मागणी करत पत्रके व्यासपीठाच्या दिशेने फेकली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर नेले. त्यानंतर आणखी काही जणांनी घोषणाबाजी केली. तर संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे उदघाटन कार्यक्रमात भाषण सुरू करताच काही महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. या सर्वांना पोलिसांनी बाहेर काढले.

साहित्य संमेलन आणि वाद याचे नाते तसे जुनेच आहे. वर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही वादाचे सूर उमटले होते. मात्र, थेट संमेलनाच्या उदघाटनावेळी अचानक हा प्रकार घडल्याचे समोर आले. यामुळे संमेलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित होते.

या संमेलनाचा समारोप रविवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -