तरुण-तरुणींच्या गैरवर्तनाला आळा घालण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी
कल्याण : कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांडा-टिटवाळा येथील आठ प्रमुख ठिकाणी अल्पवयीन तरुण-तरुणी, मद्यपी व नशा करणारे टोळके बिनधास्तपणे गैरवर्तणूक करीत असतात. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने याला आळा घालण्याची मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देऊन केली आहे.
सुप्रसिद्ध गणेश मंदिर टिटवाळ्यात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अंगारकी व चतुर्थीला भक्तगणांची रेलचेल हजारोंच्या संख्येत असते. नवसाला पावणारा गणपती असल्याने राज्यातून भाविकांची वर्दळ येथे कायम असते. यामुळे मांडा-टिटवाळा शहर झपाट्याने विकसित झाले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बेकायदेशीर धंद्यांनी डोके वर काढले असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मांडा-टिटवाळा शहरातील सार्वजनिक उद्यानात तरुण-तरुणी खुलेआम गैरवर्तन करीत आहेत. यात प्रामुख्याने बालोद्यान पार्क, स्टेशन समोरील मारुती मंदिराच्या मागील परिसर, इंदिरा नगर मार्गे, चार्मस हाईट रोड, स्मशानभूमी रोड, टिटवाळा महोत्सव मैदान, रेजन्सी सर्वम, थारवाणी सिमेंट रोड, पंचवटी बिल्डिंग मागील परिसर व शिवमंदिर परिसर आदींचा समावेश आहे. काहीजण येथे अमली पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून अन्य तरुणवर्ग व्यसनाधीन बनत चालल्याचे बोलले जात आहे. त्यातच पोलिसांची गस्त, फेरफटका होत नसल्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शहर उपप्रमुख विजय देशेकर यांच्या शिष्टमंडळाने कल्याण पोलीस ठाण्यात पो. नि. जितेंद्र ठाकूर यांना निवेदन देत तरुण-तरुणी करीत असलेली गैरवर्तणूक, खुलेआमपणे अमली पदार्थ सेवन व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करून या संदर्भात एक हेल्पलाइन नंबर सुरू करण्याची मागणी केली आहे.