मुरबाड: रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या मुरबाडकरांचे स्वप्न ७५ वर्षांनंतर पूर्ण होणार. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून, जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे. तर ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर मुरबाड रेल्वेमार्गासाठी निविदा काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. हे काम या रेल्वेचे काम २०२४ च्या आधीच सुरू होईल, असेही कपिल पाटील यांनी सांगितले.
जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येईल. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले
पहिल्या टप्प्यातील कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे असे दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे गाव पण…
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र, या गावाला रेल्वे पोचण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींना साथीला घेऊन सुमारे दीड महिन्यांत जमीन अधीग्रहण करण्याचा प्रयत्न आहे. या मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च असून, राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देण्यात आली आहे, असे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.