प्रख्यात वकील ॲड. बी.एल.शर्मा यांचे निधन

ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक प्रख्यात वकील ॲड. बी.एल.शर्मा यांचे शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी वयाच्या ६५ व्या वर्षी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. भाजपचे वरिष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांचे ते धाकटे बंधु होत.त्यांच्या पश्चात पत्नी मंजु, मुलगा ॲड.विनय आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समस्त शर्मा कुटुंबियांसह आप्तेष्ठ, मित्रपरिवार व राजकिय, सामाजिक आणि प्रसारमाध्यमातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ठाण्यातील वर्तकनगर, दोस्ती विहार येथे राहणारे ॲड. बी.एल.शर्मा यांनी महाविद्यालयीन काळात अभाविपच्या सेक्रेटरी पदापासुन राजकिय कारकिर्दीचा प्रारंभ केला होता. अखेरच्या श्वासापर्यत ते जनसेवेत कार्यरत होते. ब्रम्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष, राजस्थानी सेवा समितीचे २० वर्षे अध्यक्ष असलेले ॲड. बी.एल.शर्मा यांचे स्व.आनंद दिघे यांच्याशीही चांगले सख्य होते. याच माध्यमातुन मराठी आणि हिंदी भाषिकांना जोडण्यासाठी गेली २९ वर्षे त्यांनी हिंदी भाषा एकता परिषद व राजस्थानी सेवा समितीच्या माध्यमातुन ठाण्यात राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन केले. गोरगरिबांचे कैवारी असलेले ॲड.बी.एल.शर्मा हे गरीब व्यक्तीकडुन कधीही वकिलीचे शुल्क घेत नसत. ग्रामीण वनवासी भागात सामुदायिक विवाह सोहळे तसेच अनेक जनहिताचे उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरातुन शोक व्यक्त होत आहे.

मोदी सरकारचा चीनवर पुन्हा एकदा डिजिलट स्ट्राईक…..

मुंबई: भारत सरकारने सुमारे २३० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत, ज्यात १३८ बेटिंग अ‍ॅप्स आणि ९४ कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सचा समावेश आहे, गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ही कारवाई सुरू केली आहे.

सरकारने सुमारे २८८ चिनी अप्सची तपासणी सहा महिन्यांपूर्वी सुरू केली होती. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालात या अ‍ॅप्सद्वारे भारतीय नागरिकांचा खाजगी डेटा अ‍ॅक्सेस केला जातो, अशी माहिती समोर आली आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांना कर्ज घेण्याचे आमिष दाखवले जाते आणि नंतर ते वार्षिक तब्बल ३ टक्क्यांपर्यंत व्याज वाढवतात. नंतर या अ‍ॅप्सच्या प्रतीनीधींकडून कर्जदारांना त्रास दिला जातो अशी माहिती मिळाली आहे. हे मोबाईल अ‍ॅप्स चालवणाऱ्या कंपन्या आणि व्यक्ती कर्जदारांकडून खंडणीसाठी छळ करत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

हे अ‍ॅप्स मुळ अ‍ॅप्सची क्लोन आवृत्ती असून त्यामुळे अनेक सुरक्षेचे धोके आहेत. जून २०२० मध्ये, सरकारने ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती आणि नंतर १० ऑगस्ट २२२० मध्येही ४७ अ‍ॅप्स ब्लॉक केले होते. केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने भारताच्या काही भागात बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याची जाहीरात करणे देखील ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार बेकायदेशीर आहे.

विनोबाजींचा साहित्यविचार

वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त विनोबाजींच्या साहित्य विचारावरील लेख.

विनोबाजींचे व्यक्तित्व बहुआयामी होते. चिंतनशील होते. भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेशी नाते सांगणारे होते. गेल्या शतकाच्या सहाव्या दशकात त्यांनी भूदान चळवळ चालवली. यानिमित्ताने देशभर फिरत असताना त्यांनी साहित्यिकांशी आवर्जून चर्चा केली. या चर्चांमधून साहित्य, साहित्य व्यवहार, साहित्याचे प्रयोजन, साहित्य आणि जीवन अशा अनेक अंगांनी त्यांनी आपले विचार मांडले. लघुरूपात, सूत्ररूपात, तरीही आशयघन असे हे विचार आहेत. वर्तमान संदर्भात त्यांचे महत्त्व आणि संयुक्तिकता अधिकच जाणवते.

‘साहित्यिकांशी हितगुज’ या शीर्षकाने त्यांचे हे विचार प्रकाशित झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथील साहित्यिकांपुढे त्यांनी दिलेली भाषणे यात आहेत. तसेच माटे यांच्या ‘देवदूत’ या पुस्तकाला आणि कोलते यांच्या ‘जीवनगंगा’ या कविता संग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनाही यात आहे. याशिवाय साहित्यिकांशी झालेली प्रश्नोत्तरेही अखेरच्या प्रकरणात समाविष्ट आहेत. १३ जुलै १९५२ रोजी काशी विद्यापीठात, २३ ऑक्टोबर १९५५ रोजी पाटणा येथे, ३ ऑगस्ट १९५३ रोजी गया येथे, १९ जानेवारी १९५५ रोजी बलरामपूर येथे, ६ फेब्रुवारी १९५६ रोजी बालेश्वर येथे, २६ मार्च १९५६ रोजी पुरी येथे त्यांनी केलेली साहित्यविषयक भाषणे त्यात आहेत.

साहित्याबद्दल मूलभूत विचार मांडताना ते म्हणतात – ‘साहित्य हा शब्दच सांगतो की ती निरपेक्ष वस्तू नाही. ती कोणाच्या तरी ‘सह’जाणारी वस्तू आहे. जीवननिष्ठेचे प्रकाशन करणे हे साहित्याचे काम आहे. जीवननिष्ठा व साहित्य एकरूप झाले पाहिजे. साहित्यामुळे जीवनाची प्रभा फाकते. त्यांचा संबंध सूर्य आणि किरण यांच्यासारखा आहे. दोन्ही अभिन्न असले तरी प्रचारकाचे काम किरणच करतात. साहित्य जीवनाच्या प्रभेच्या रूपाने प्रकट होते.’ जीवनासाठी कला (साहित्य हीदेखील कलाच) की कलेसाठी कला या वादात विनोबाजी स्पष्टपणे जीवनासाठी कला या बाजूने उभे राहतात. आज होणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेत जीवननिरपेक्ष अभिव्यक्ती गृहीत धरली जाते किंवा श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न होतो. त्या पार्श्वभूमीवर विनोबाजी वेगळे ठरतात.

याच भाषणात जीवनाविषयी ते म्हणतात, लोकांत जर सौहार्द असेल, प्रेम असेल, तर विविधतेतूनही एक सुरेल संगीत निर्माण होईल. भेदाविरुद्ध माझा प्रचार चालू असला तरीही, मी विविधता नष्ट करू इच्छित नाही. विविधता नाहीशी झाली, तर जीवनच निरस बनेल. वर्गविरोध, संघर्ष इत्यादी शब्दांहून वेगळे शब्द मी वापरतो. वर्गभेद मला दिसत नाही.’ स्पष्टच आहे की, भांडवलशाही आणि साम्यवाद वा समाजवाद यांना अभिप्रेत असलेली समता विनोबाजी फेटाळून लावतात. व्यास, वाल्मिकी, शंकराचार्य, गांधीजी, रवींद्रनाथ टागोर हे सगळे सत्यान्वेषी, जीवनाला उन्नत करणारे श्रेष्ठ साहित्यिक असल्याचे मतही विनोबाजी नोंदवतात.

साहित्यिकांना देवर्षी असे संबोधून एका ठिकाणी ते म्हणतात, शब्दांनी न्यून भाव, अतिरिक्त भाव आणि विपरीत भाव प्रकट करू नये. साहित्याने हे त्रिविध दोष टाळले पाहिजेत. सर्वांबद्दल अंत:करणात प्रेम हे देवर्षींचे लक्षण सांगून ते म्हणतात, सर्वांचे विचार पारखण्यासाठी बुद्धीची तटस्थता, वाणीची निर्विकारता आणि स्वत:ची निरहंकारिता लागते. आपले मत अतिशय परखडपणे व्यक्त करताना विनोबाजी पुढे म्हणतात, ‘ज्या देशाचे लोक मनात आले ते लिहून टाकतात, संपादक बनले आहेत म्हणून कसलाही मजकूर शीघ्र प्रकाशित करू पाहतात, कसेही करून फक्त कॉलम भरण्याची आपली जबाबदारी मानतात, काळ किंवा स्थळ यांची काहीच मर्यादा ओळखत नाहीत; त्या देशात लक्ष्मी स्वप्नवत समजावी. मनन करायला फुरसत मिळाली नसेल, तर एक कॉलम कोरा ठेवता येतो.’ मुद्रित माध्यमे, प्रकाशचित्रवाणीवरील बातम्यांसहित सगळेच कार्यक्रम, सोशल मीडिया, व्यक्त करण्याची प्रचंड
घाई; या पार्श्वभूमीवर विनोबांच्या या विचारांकडे पाहता येईल.

आजच्या काळातही आमच्या देशाने योगी अरविंद घोष यांच्यासारखे ब्रम्हर्षी, रवींद्रनाथ ठाकूर यांच्यासारखे देवर्षी आणि गांधीजींसारखे राजर्षी जन्माला घातले. ते आमचे आदर्श आहेत असे समजून देशाची प्रतिष्ठा वाढेल असे साहित्य आमचे साहित्यिक निर्माण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.

अर्वाचीन भारतीय साहित्याबद्दल विनोबा म्हणतात, ‘आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात अर्वाचीन भारतीय साहित्याचा उदय बंगालमध्येच झाला. येथील साहित्यिकांची अनेक नावे तुम्ही घ्याल. ती सगळी हिंदुस्थानच्या परिचयाची नाहीत; परंतु बंकिमचंद्र, रवींद्रनाथ, शरच्चंद्र यांची ओळख नसलेले शिक्षित लोक हिंदुस्थानात कुठेच नसतील. बंगालमधल्या इतर मोठ्या लोकांची नावेही हिंदुस्थानात प्रसिद्ध आहेत; परंतु त्यांचा उल्लेख मी येथे करीत नाही. कारण ते अन्य क्षेत्रात ज्ञानी होते. साहित्याच्या क्षेत्रात ही तीन नावे साऱ्या हिंदुस्थानात अजरामर झाली आहेत. त्यातही कालिदासानंतर भारतीय संस्कृतीचे समग्र रूप पाहणारा आणि सम्यक रूपात ते व्यक्त करणारा रवींद्रनाथाहून श्रेष्ठ साहित्यिक क्वचितच झाला असेल. उत्तर प्रदेशचे महाकवी तुलसीदास, महाराष्ट्राचे ज्ञानदेव, दक्षिण भारताचे कंबन इत्यादी दुसरे अनेक महाकवी होऊन गेले; परंतु त्यांची योग्यता वेगळ्या कोटीची होती. ते धर्मपुरुष होते; परंतु साहित्यिक या नात्याने ज्यांनी भारतीय संस्कृतीचे, केवळ धर्मदृष्ट्याच नव्हे तर समग्र जीवनदृष्ट्या सर्व पैलूंचे दर्शन घेतले असे एक रवीबाबूच होते. जीवनाच्या अनेक पैलूंचे ज्यांना सम्यक दर्शन झाले, असे महापुरुष कालिदासानंतर रवींद्रनाथच होऊन गेले.’

‘साहित्यिक आणि राज्याश्रय’ याची चर्चा करताना विनोबाजी म्हणतात – ‘नुकतीच दिल्लीला साहित्य अकादमी स्थापन झाली. संबंध भारतीय साहित्यात अकादमीसाठी काही शब्दच मिळाला नाही का? हिंदुस्थानात १० हजार वर्षांपासून विकसित झालेल्या १०-१२ तरी भाषा आहेत. त्या भाषांमध्ये या विषयासाठी शब्दच मिळाला नाही तर ते काम तरी कसे व्हायचे? विज्ञानाची गोष्ट वेगळी आहे. विज्ञानविषयक शब्द आमच्या भाषात कदाचित सापडणार नाहीत; परंतु साहित्याच्या क्षेत्रात समर्पक शब्द मिळू नये ही गोष्ट मला खटकते. मी विचार केला की, काही का असेना, काम तर होईल. पण काम काय होते आहे? साहित्यिकांना बक्षिसे दिली जातात. आता विचार करा, जगात कधी बक्षिसे देऊन काम होते का? तुलसीदास आणि कबीर यांना कोणते इनाम मिळाले होते? हा, आमच्या रवींद्रनाथांना बक्षीस मिळाले होते खरे. त्याला नोबेल प्राईज म्हणतात. हल्ली प्रत्येक गोष्टीची किंमत पैशामध्ये केली जाते. एखाद्याने उत्तम साहित्य लिहिले, तर त्याला चांगले खाऊपिऊ घातले पाहिजे, असे म्हटले जाते. पण, खाण्यापिण्याचा साहित्याशी काय संबंध? साहित्यिकांच्या उपजीविकेसाठी काही पाहिजे हे मी कबूल करतो; परंतु इनाम देण्याने साहित्यिकांना काय मदत होते? कारण त्यांच्या जीवनाचा मूळ स्त्रोत वेगळाच असतो. ज्यांनी लक्ष्मीला दासी नव्हे तर माता मानले अशाच लोकांकडून हिंदुस्थानात साहित्याची वृद्धी झाली आहे. जे निरंतर साहित्य निर्माण करीत होते ते जनसमाजात मिसळून काम करीत आणि देहधारणेपुरते जे काय मिळेल त्यावर संतुष्ट राहत. त्यांनी राजांची पर्वा केली नाही. पैशाने ते खरीदले जाणारे नव्हते. अशा लोकांमुळेच हिंदुस्थानचे साहित्य वाढले आहे. तुलसीदास, कबीर, पोतना, तुकाराम इत्यादी सर्वोत्तम साहित्यिकांकडे पाहा. ते राज्याश्रीत नव्हते, तर भगवंताश्रीत होते. तुम्ही त्यांचेच वारस आहात.’

भारत श्रेष्ठ का, याची चर्चा करताना विनोबाजी म्हणतात – ‘हिंदुस्थानातील माती अमेरिकेतल्या मातीपेक्षा चांगली आहे असे नाही. तसे पाहिले तर अमेरिकेची माती ताजी आहे. तिच्यात अधिक उत्पन्न निघू शकते. तेथे कितीतरी मोठमोठ्या नद्या आहेत. त्यांच्यापुढे आमच्या गंगा नदीचा काय पाड? हिमालय पर्वत जगात सर्वात उंच आहे खरा; परंतु तो सोडल्यास आमचा हिंदुस्थान श्रेष्ठ आहे, असे म्हणण्यासारखी दुसरी कोणतीही वस्तू आमच्याजवळ नाही. हिंदुस्थानची निसर्गरचना इतर देशातल्या निसर्गरचनेपेक्षा श्रेष्ठ आहे, असे नसले तरीही, हिंदुस्थानातच ब्रम्हविद्या निघाली, असा मात्र माझा दावा आहे. तिच्या तोडीची वस्तू जगामध्ये दुसरी नाही, ही गोष्ट मी अगदी स्वतंत्रपणे तटस्थ होऊन सांगत आहे. जगातल्या पुष्कळशा भाषांचे आणि साहित्याचे अध्ययन मी केले आहे; परंतु ‘तत् त्वम् असि’ (तू ब्रम्ह आहेस) असे निष्ठापूर्वक सांगणारे साहित्य जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. ही ब्रम्हविद्या हेच आमचे बळ. यातच भारताचा गौरव आहे. भारत ‘सारे जहाँ से अच्छा’ आहे, कारण येथे ब्रम्हविद्या आहे.’

एका भाषणात त्यांनी मांसाहाराचीही चर्चा केली आहे. कालिदासाच्या शाकुंतलाचे उदाहरण त्यासाठी त्यांनी दिले आहे. शाकुंतलामध्ये राजा दुष्यंत शिकारीला जातो, तेव्हा आश्रमातील एक मुलगा त्याला सांगतो – हे आश्रमातील हरीण आहे त्याला मारू नको. त्यावर दुष्यंताने त्या हरिणाला सोडून दिले. ही हिंदुस्थानची संस्कृती आहे. हे सारे सांगून विनोबाजी प्रश्न करतात – आज कोणत्या देशाचा मुलगा बादशहाला असे सांगू शकेल? जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाच्या वेळी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली, तेव्हा जो गोंधळ झाला किंवा घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून गोवंश हत्याबंदीचा मुद्दा येतो तेव्हा जो गोंधळ होतो आणि मोठमोठे साहित्यिक, विचारवंतसुद्धा त्या गोंधळात भर घालतात; तेव्हा विनोबाजींचा हा प्रश्न आठवल्याशिवाय राहत नाही.

साहित्य हे आकाशासारखे असते, असे सांगून विनोबाजी म्हणतात, ‘आकाश कितीही पाहिले तरीही कोणाला थकवा येत नाही. त्याचा नील रंगही थकवा आणत नाही. साहित्याने असे असायला हवे. शिवाय साहित्य हे नवनवे अर्थ प्रसवणारे, सदा सृजनशील कामधेनूसारखे असावे. अल्पाक्षरात अधिक अर्थ सांगणारे असावे. भारतीय भाषांएवढी, विशेषत: संस्कृतएवढी काव्यशक्ती जगातील कोणत्याही भाषेत नाही, असेही विनोबांचे मत आहे. साहित्यिकांचे समाजातील स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगतानाच विनोबाजी अपेक्षा व्यक्त करतात की, साहित्यिकांनी विरक्त असले पाहिजे. साहित्यिकांच्या उदरनिर्वाहाची चिंता समाजाने करायला हवी, असे मतही त्यांनी मांडले आहे.

विदग्ध साहित्याची चर्चा करताना विनोबाजी म्हणतात – ‘ज्ञानदेवाने म्हटल्याप्रमाणे – पाणी बुबुळालाही त्रास देत नाही अन् खडकालाही फोडून काढते, तसे – साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, असे विदग्ध वाङ्मयाचे विशुद्ध स्वरूप आहे. रामायण आणि महाभारत ही विदग्ध वाङ्मयाची काळाच्या कसोटीवर उतरलेली उत्तम उदाहरणे आहेत. उलट बरीचशी पुराणे, जरी कथाशैलीने युक्त असली तरीही आज दग्ध होऊन चुकली आहेत. लोकांना काव्य-नाटक-कथादी रोचक होऊ शकते, याचा लाभ घेऊन जे भाराभर साहित्य अनेक भाषात लिहिले जात आहे, ते सारे दग्ध साहित्य आहे. आज ना उद्या जळून जायचे आहे.’

अन्यही पुष्कळ विषयांची चर्चा विनोबाजींनी या भाषणांमधून केली आहे. साहित्याच्या संदर्भात आज अनेक चर्चा होत असतात, अनेक मते मांडली जातात, अनेक बाबींवर खल होतो; त्यावेळी साधक-बाधक चर्चेसाठी विनोबाजींचे हे विचारही मोलाचे ठरू शकतात.

-श्रीपाद कोठे, नागपूर

संघर्ष…

गेल्या दोन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला पीक मिळाले नाही. शेतकऱ्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली, एक वर्ष मला हवे तसे हवामान दे. मग बघा मी कसे, हवे तसे धान्याचे कोठार भरतो. तथास्तु! शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. चांगले पीक आले. कापणी केली, तर त्यांत गव्हाचा एकही दाणा नाही. शेतकरी देवावर चिडला. देव म्हणाले, तुला हवे तसे हवामान दिले त्यामुळे झाडांना संघर्ष करण्याची थोडीही संधी मिळाली नाही. त्यामुळे झाड आतून पोकळ राहिले. बदल्या हवामानांत टिकून राहण्यासाठी झाडांनाही संघर्ष करावा लागतो.

कोशातून बाहेर पडताना कराव्या लागणाऱ्या संघर्षामुळे फुलपाखराचे पंख बळकट व विकसित होतात. निसर्गात पशू-पक्षी, प्राण्यांचा, अन्नासाठी/संरक्षणासाठी प्रत्येक क्षण अनिश्चित असतो. संघर्ष त्यांच्यात ताकद निर्माण करतो, हिंमत देतो. हेच तत्त्व सर्वांच्या जीवनाला लागू आहे.

जीवनात निसर्गाशी, परिस्थितीशी, स्वतःशी, समाजांसाठी प्रत्येकाचा संघर्ष चालूच असतो. नोकरी, व्यवसाय, वैवाहिक जीवन, खेळ, कला-क्रीडा, विज्ञान, राजकारण त्यामधील चांगल्या वाईट घटना, दुर्घटनांना तोंड देऊन टिकून राहावे लागते. जो सामना करतो तो पुढे जातो, जो मागे वळतो, तो तेथेच राहतो.

संघर्ष! तीन अक्षरी शब्द! संघर्ष शब्दाला महत्त्व नाही, तर संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. संघर्षाशिवाय काही नवे निर्माण होत नाही. जोपर्यंत छन्नीचे घाव घेत नाही, तोपर्यंत दगडसुद्धा देव बनत नाही. भगवान श्रीकृष्णाने म्हटलेच आहे, ‘जीवन एक संघर्ष आहे.’ ही एक दीर्घकाळ चालणारी साधना आहे. पांडव त्या मार्गावरून चालले व लढले. श्रीरामांनाही संघर्ष चुकला नाही. समाजाच्या उद्धारासाठी साऱ्या साधुसंताना खूप संघर्ष सहन करावा लागला. कर्मकांडाच्या विरोधात, सामाजिक परिवर्तनासाठी, मानवतेच्या हक्कासाठी लढणारे विवेकानंद, फुले; शिक्षणासाठी सावित्रिबाई फुले, शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक; स्वशिक्षणासाठी डॉ. आनंदीबाई जोशी, स्त्री सुधारणा पंडित रमाबाई ते विद्या बाळ; संतती नियमन, पुनर्विवाहाचे प्रश्न सोडविणारे डॉ. धोंडो केशव कर्वे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी दिलेला लढा, देशाच्या सीमा रक्षणासाठी लढणारे सैनिक, त्यांचे कुटुंब या साऱ्यांचा संघर्ष पराकोटीचा आहे. अनेकांनी भारतासाठी समर्पित आयुष्य वेचले. सारे सुरुवातीला एकटेच होते. पण ते स्वतःच्या विचारावर ठाम होते. आजही जात – धर्म – रूढी – चालीरीती – व्यसने, सोबत गाडगे महाराजांचा सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नांवरही संघर्ष चालू आहे.

मानवाने आजवर साधलेली प्रगती ही आपोआप किंवा कोणत्याही दैवी, अमानवी शक्तीचा आधार घेऊन नव्हे, तर मानवी बुद्धीच्या बळावर आहे. शास्त्रज्ञांचाही संघर्ष थक्क करणारा आहे. जीवन जगण्याचे दुसरे नाव संघर्ष! आज लहान-मोठा, श्रीमंत-गरीब, शिकलेला न शिकलेला, अधिकारी, कारकून प्रत्येकाला घरात, घराबाहेर पडण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. रोजच्या जीवनात संघर्ष निर्माण होण्याची कारणे – व्यक्तिगत – सांस्कृतिक – सामाजिक पातळीवरील मतभिन्नता, भिन्न विचारधारा, भिन्न दृष्टिकोन, राहणीमान, शिक्षण, हुद्दा, अभिरुची, पैसा, जात-धर्म, आस्तिक-नास्तिक, मूल्य, लक्ष्य यांत खूप फरक असतो. थोडक्यात समझोता होण्याची शक्यता कमी तेव्हा संघर्ष उद्भवतो.
संघर्ष ही जीवनाची परीक्षा आहे. यात चूक सुधारा आणि सूडबुद्धी न ठेवता क्षमा, माफी हा संघर्षाचा मूलमंत्र होय.

संघर्ष तीन प्रकारचे

१. व्यक्तिगत – सर्वसामान्य संघर्ष करूनच वर येतात. काही घरात परिस्थितीमुळे संघर्षातून लहान वयातच मुले परिपक्व होतात. परीक्षेचे निकाल लागल्यावर मुलांचा, पालकांचा संघर्ष वाचतो. फक्त नोकरी, व्यवसायात नव्हे कोणत्याही क्षेत्रात संघर्षाशिवाय यश नाही. जोश टॉकमधील लोकांचे संघर्ष वाचा.
भारताचे पहिले वैज्ञानिक संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस यांना भारतात कॉलेजमध्ये शिकविताना इंग्रजांच्या तुलनेने एक तृतीयांश पगार मिळत होता. त्यासाठी
डॉ. बोस पगार न घेता तीन वर्षे लढले. कर्जबाजारी झाले. चौथ्या वर्षी पूर्ण पगार घेतला.
एव्हरेस्ट चढाईवर यश मिळविणाऱ्या पहिल्या महिला जुंको ताबेई म्हणतात, बर्फाच्छादित थंडगार वातावरणात श्वास घेताना होणारी दमछाक, प्रत्येक पाऊल पुढे टाकताना मागे फिरावे वाटत होते तरी पुढे चालणे चालू ठेवले. ज्यावेळी पोहोचले तेव्हा माझ्याइतके यशस्वी कोणी नाही, असे वाटले. नंतर सर्वत्र सत्कार झाले; परंतु सुरुवातीला कोणाचीही दाद नव्हती.

२. आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावर, शारीरिक आपत्तीवर मात करून स्वतःचे आयुष्य पालकांच्या साथीने यशस्वी करणारे खरेच खूप आहेत. मुख्यतः स्वतःच्या शारीरिक व्याधीचा, त्या सत्याचा ते प्रथम स्वीकार करतात. यलो चित्रपट. जन्मानंतर काही वर्षांनी आलेल्या अंधत्वावर मात करून आज एकजण स्टेजवर व्याख्यान देत आहे. पोलिओ झालेली विमा रुडाल्फ जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली.

३. देशाच्या उभारणीसाठी, अनेक क्षेत्रातील विकासकामात, मतभिन्नतेमुळे, असंतोषामुळे, राजकीय मतभेदामुळे होणारे संघर्ष. उदा. मेट्रो, मराठी भाषा, मराठी माणूस… तरीही संघर्षातूनच सामाजिक प्रगती होते.
संघर्षात संकल्प शिथिल होता कामा नये. मागे फिरू नका. विवेकानंदाना शिकागो परिषदेच्या आधी, रवींद्रनाथांना नोबेल प्राइझ मिळाल्यावर, अतोनात त्रास झाला होता. प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करा. स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांचे संघर्षमय जीवन वाचा. सगळ्यांत महत्त्वाचे संघर्षाची दिशा बरोबर हवी. नाहीतर आयुष्यभर संघर्ष करून हाती काही लागत नाही. स्वतःचाही उत्कर्ष होत नाही. कोणतीही जबाबदारी पेलू शकत नाही.
आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष – १. जगण्यासाठीचा. २. ओळख निर्माण करण्याचा. ३. निर्माण झालेली ओळख टिकविण्याचा.

संकटे आली की, एकामागोमाग एक येतात. त्यावेळी जमणार नाही, जाऊ दे, नकोच करूया, होणार नाही ही भाषा नसावी. संघर्षच जगायला शिकवितो. संघर्षातून मिळणारे अनुभव हेच खरे शिक्षण. एकदा आव्हान स्वीकारले की, त्या संघर्षाशी मैत्री होते, आपल्यातील सूप्त ऊर्जा बाहेर येते. संघर्षाचा अर्थ लढणे नाही, तर भिडणे होय. संघर्षाचे प्रवासी व्हा आणि गंतव्यस्थानी पोहोचा, हीच प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी होय. तेव्हा संघर्ष करा नि प्रगती करा.

-मृणालिनी कुलकर्णी

[email protected]

नवसाला हमखास पावणारी – देवी महाकाली

कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही कमी नाही. कोकण म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणाऱ्या आख्यायिकांकरिता. काही परिचित तर बरीचशी अपरिचित अशी ही देवस्थाने. प्राचीन सुंदर मूर्ती, जुनी मंदिरे, त्याच्याशी जोडला गेलेला रोमहर्षक इतिहास आणि निसर्गनवल अशा गोष्टींचा मिलाफ जर पाहायचा आणि अनुभवायचा असेल, तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोळप-आडिवरे-कशेळी परिसराला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी आणि राजापूर या दोन्ही ठिकाणांच्या मधोमध असणारा हा परिसर अतिशय शांत, रम्य आणि तितकाच ऐतिहासिकसुद्धा आहे. रत्नागिरीच्या दक्षिणेला सागरीमार्गाने निघाले की, आधी येते स्वरूपानंदांचे पावस. तिथे दर्शन घेऊन पावसचेच जणू जुळे गाव असलेल्या गोळपला जावे. गोळप इथे हरिहरेश्वराचे मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत असलेले हे नितांतसुंदर ठिकाण. दगडी पाखाडी उतरून मंदिर प्रांगणात आपला प्रवेश होतो. समोरच नाटके सादर करण्यासाठी तयार केलेला रंगमंच पाहून कोकणी माणसाचे नाटकाविषयीचे प्रेम किती उत्कट आहे, याची जाणीव होते. हरिहरेश्वर मंदिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांच्या स्वतंत्र मूर्ती या मंदिरात शेजारीशेजारी ठेवलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची मूर्ती काहीशी दुर्मीळ समजली जाते. साधारणत १२-१३ व्या शतकातील या अतिशय देखण्या मूर्ती, त्यांच्या पायाशी असलेली त्यांची वाहने आणि त्यांच्या प्रभावळीत असलेले इतर देव, असे देखणे शिल्प जरूर पाहायला हवे.

गोळपवरून पुढे आडिवरेला जाताना वाटेत कशेळीचा फाटा लागतो. कशेळीला कनकादित्याचे म्हणजे सूर्याचे मंदिर आहे. गुजरातेत वेरावळजवळ प्रभासपट्टण इथे प्राचीन सूर्यमंदिर होते. इ. स. १२९३ साली अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याच्या मदतीने एका व्यापाऱ्याने तिथल्या काही सूर्यमूर्ती जहाजात घालून तिथून हलवल्या. त्यातलीच एक मूर्ती म्हणजे कशेळीचा कनकादित्य होय. या सूर्यदेवाला इ. स. शिलाहार भोजराजाने एक दानपत्र ताम्रपटावर लिहून दिले. तो ताम्रपट आजही देवस्थानने जपून ठेवला आहे. मात्र सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावा लागला आहे. अत्यंत रम्य मंदिर परिसर असून आता तिथे भक्तनिवाससुद्धा बांधलेला आहे.
कशेळीपासून जेमतेम चार किमीवर आहे आडिवरे हे गाव. कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण असलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापूरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापूर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. हिंदू धर्मीयांच्या प्राचीन परंपरेनुसार प्रत्येक गावशिवेमध्ये रक्षक देवतांची स्थापना केली जाते. या प्राचीन परंपरेनुसार राजापूर तालुक्यातील महाकाली देवी ही आडिवरे गावाची ग्रामदेवता. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी लिहिले आहे. ‘अट्टेवर’ या शब्दाचा अपभ्रंश आडिवरे असा झाला असावा. ‘अट्ट’ म्हणजे बाजार आणि ‘वेर’ म्हणजे पूर किंवा नगर म्हणजे बाजाराचे गाव असा अर्थ होतो. शके १९१३ मध्ये शिलाहार वंशातील भोज राजाने एका दानपत्रात, ‘अट्टविरे कंपण मध्यवर्ते’ असा उल्लेख केला आहे. ११व्या शतकात या भागात जैन पंथीयांचे प्राबल्य होते. हे त्या भागातील अनेक देवतांच्या निरीक्षणाने समजून येते. धर्म प्रसारार्थ शंकराचार्याचा संचार पुढे या भागात झाला. त्यांनी जैन मतांचे खंडन करून तेथील मूर्तीची स्थापना सन १३२४च्या सुमारास केली. पुढे पेशवाईत भिडे नावाच्या सरसुभ्यांनी जीर्णोद्धार केला. आडिवरे हे स्वतंत्र गावाचे नाव नाही. तो प्रदीर्घ परिवार आहे.

इंग्रजी राजवटीपासून १४ स्वतंत्र वाड्या आहेत. या सर्वाना मध्यवर्ती स्थान असलेल्या ‘वाडापेठ’ येथे महाकाली मंदिर आहे. श्री महाकाली देवस्थानची स्थापना तेराशे वर्षांपूर्वी शृंगेरी पीठाचे आद्य श्रीशंकराचार्य यांच्या हस्ते झाली. या गावाचे प्राचीन काळापासून संदर्भ मिळतात. भोजराजाच्या ताम्रपटात याचा उल्लेख ‘अट्टविरे’ असा आला आहे. तर काही साहित्यात याचे नाव आदिवरम असे आढळते. शंकराचार्यांनी या देवीची स्थापना केली, असेही सांगितले जाते. सुंदर देवस्थान असलेल्या या मंदिरात विहिरीतून पाणी काढण्यासाठी ‘कोटंब’ नावाच्या जुन्या पारंपरिक पद्धतीचा वापर केलेला आजही आढळतो. मंदिराच्या सभागृहात छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम असून विविध कथनशिल्पे इथे पाहायला मिळतात.

मंदिरात महाकालीची प्रसन्न मूर्ती असून तावडे मंडळींची ती कुलदेवता आहे. परिसरात नगरेश्वर, महालक्ष्मी, महासरस्वतीची मंदिरे आहेत. नगरेश्वराच्या मंदिरात छताच्या वर गेलेले मोठे वारूळ पाहायला मिळते. नवसाला हमखास पावणारी देवी असा तिचा महिमा असल्याने आपल्या मनोकामना सिद्धीस जाव्यात म्हणून भक्तगण तिला नवस करतात. अखंड पाषाण कोरून घडविलेली देवीची मूर्ती, भव्य मुखावरचा विशाल भालप्रदेश, सरळ नासिका, तेजस्वी नेत्र, शिरस्थानी विराजमान झालेल्या उभट कोरीव मुकुट, त्याचप्रमाणे नाकातील नथ, गळ्यातला अलंकार या आभूषणांनी युक्त असे देवीचे रूप प्रसन्न वाटते. महाकाली हे मंदिर पंचायन असून त्यात महाकाली, महासरस्वती, रवळनाथ व नगरेश्वर यांचा समावेश आहे. तसेच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीन बहिणी असून त्या एकाच मंदिरात तीन वेगवगेळ्या दिशांना आसनस्थ आहेत. तसेच नगरेश्वर मंदिरात शेकडो वर्षांचे जुने नागोबाचे वारूळ असून ते छप्पर फोडून त्याच्याही वर गेले आहे; परंतु पावसाळ्यात त्यातून एक थेंबही पाणी गळत नाही. यात्रेकरूच्या दृष्टीने एक मोठा कुतूहलाचा विषय आहे. महाकाली देवीच्या देवस्थानाव्यतिरिक्त आडिवरे परिसरात अनेक मंदिरे व पर्यटन स्थळे आहेत. त्यात आडिवरे-वाडापेठ येथील भगवती मंदिर, कालिकावाडी येथील कालिका देवी व शंकरेश्वर मंदिर, कोंडसर येथील सत्येश्वर मंदिर यांचा समावेश आहे. देवी भगवती व कालिका या महाकालीदेवीच्या भगिनी होत. आडिवरे गावाचे भूषण ठरवलेल्या जीर्णोद्धार मंदिराचे वास्तुपूजन व मूर्तीचा वज्रलेप समारंभ होतो. देवदीपावली व पौष पौर्णिमा असे वर्षातून चार वेळा महाकाली देवीला वस्त्र अलंकारांनी सजविले जाते. देवीचा मोठा उत्सव म्हणजे ‘नवरात्रोत्सव’. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस हा मोठा उत्सव असतो. तसेच नवरात्रीत नऊ दिवस मोठी जत्रा भरते. अहोरात्र कार्यक्रम चालू असतात. भाविकांची व वाहनांची एकच झुंबड उडते. महाकाली देवीचे मंदिर भव्य-दिव्य असून आवार प्रशस्त आहे. आवारात आगमन व निर्गमने यासाठी दोन मोठे दिंडी दरवाजे आहेत. दिंडी दरवाजाच्या वरील बाजूस छोटी सभागृहे आहेत. मंदिराच्या आतील बाजूस दरबारी थाट आहे. मंदिराच्या आतील बाजूस कोरीव कामाचे उत्कृष्ट रंगकामाचे नमुने आहेत. एकूणच मंदिराला मोठा थाट आहे. देवळाचे छप्पर कौलारू असून जमीन फरसबंदी आहे. आवार चिरेबंदी असून आवाराची तटबंदीही चिऱ्याचीच आहे. अशा या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी दरवर्षी असंख्य भक्तगण येत असतात.

– सतीश पाटणकर
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

तेजशलाका

आपल्या समाजात अशा काही व्यक्ती असतात की, त्यांना स्वत:च्या संसारासोबत काहीतरी करून दाखविण्याची ऊर्मी, इच्छा असते. समाजाच्या ठाशीव प्रवाहाविरुद्ध पोहोण्याची ताकद त्यांच्यात येते कुठून? कदाचित त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, जडण-घडण, संस्कार व जिद्द या गोष्टी कारणीभूत असाव्यात.

आपण सर्वसामान्य माणसे समाजातील लहान-मोठ्या, भल्या-बुऱ्या घटनांनी व्यथित तर होतो; परंतु यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे म्हणून आपण पुढच्या आयुष्याला लागतो. पण जेव्हा आपण अशा व्यक्तींचे काम पाहतो, वाचतो तेव्हा क्षणभर थबकतो व आपल्याला त्याची जाणीव होते. घराच्या उंबरठ्याच्या आतील जग व बाहेरील विश्व यात खूपच तफावत आहे. घराच्या आतील सुरक्षिततेचे कवच फोडून कधी प्रवाह प्रवाहात, तर कधी प्रवाह विरुद्ध झोकून द्यायची ताकद या व्यक्तींमध्ये जाणवते. काहीशा प्रसिद्धीच्या वलयापासून दूर. पण देशासाठी, शोषितांसाठी, मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या या तेजशलाका म्हणूनच आगळ्यावेगळ्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडसं.

निर्मला निकेतन, मुंबई येथे एम. एस. डब्ल्यू.चे शिक्षण घेतलेल्या उल्का महाजन या रायगड जिल्ह्यातल्या परिवर्तन या संस्थेत काम करू लागल्या, तेव्हा त्यांची ओळख कातकरी आदिवासींच्या समस्यांशी होत गेली. कातकऱ्यांना त्या जशा भेटत गेल्या तसे त्यांना शेतमजुरांच्या मजुरीच्या प्रश्नांबरोबर दळी जमिनीचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे लक्षात आलं. कातकरी आदिवासींच्या बाबतीत ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा धाब्यावर बसवला गेला आहे. उल्काताईंच्या सर्वहारा आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न संघटनेने ऐरणीवर आणला. कातकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावावर करणे हा सर्वहारा संघटनेचा मोठा लढा आहे. तहान-भूक विसरून अनेक अडचणींना तोंड देत उल्काताई व त्यांची संघटना काम करते आहे. कातकरी समाजाला त्यांच्या जमिनीसाठी न्याय मिळवून देणे यासाठीचा लढा लढताना प्रचंड सामर्थ्याची गरज होती.

जवळपास ७५ हजार लोकांसाठी उल्काताई व त्यांची संघटना अंदाजे दोन दशके लढत आहेत. शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, वीटभट्ट्यांवरील कामगारांची व स्थलांतरित मजुरांची संघटना बांधणे, रायगड जिल्ह्यातील दलितांना पाण्याचा समान हक्क मिळवून देणे या कामात उल्काताईंनी स्वतःला झोकून दिले आहे.
‘कोसळता गावगाडा २०१५’ व ‘कार्य आणि कार्यकर्ते’ (आत्मकथन) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. उल्का म्हणजे पृथ्वीवर पडलेला तारा. तेजस्वी ताऱ्याप्रमाणे दिशादर्शकाचे कार्य उल्काताई करत आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकांसाठी १९८९मध्ये त्यांनी काम सुरू केले. या जिल्ह्यातील कातकरी आदिवासींचा पिढ्यान पिढ्या कसलेल्या जमिनीवर हक्क नाही. या जमिनीच्या कागदपत्रांवर त्यांचे नावच नाही. इथल्या आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय कात पाडण्याचा; परंतु जंगलतोडीमुळे ते काम बंद पडले व आदिवासींवर उपासमारीची वेळ आली. चरितार्थासाठी दुसऱ्याच्या जमिनीवर, शेतात वेठबिगारी करून वर्षानुवर्षे ते शोषणाचे बळी ठरू लागले. यासाठी उल्काताई व त्यांच्या संघटनेने केलेले काम नक्कीच स्तुत्य आहे.

अशाच एक हटके काम करणाऱ्या डॉ. सुनंदा अवचट. डॉ. सुनंदा अवचट या एक कुशल मानसोपचारतज्ज्ञ होत्या. हजारो लोकांना आपलसं करणाऱ्या, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्या पत्नी. एक मानवतावादी स्त्री. त्यांच्या कामाचा उरक, त्यांचं वागणं, त्यांचे समतोल विचार सारं काही झपाटल्यासारखं. डॉ. अनिल अवचटांनी समाजातल्या उपेक्षित वंचित लोकांना जवळून पाहिलं. विणकर, भटके दल हमाल, मजूर, खाण कामगार, वाघ्या, मुरळ्या यांच्याविषयी त्यांनी लिहिलं. त्यांना मनसोक्त सामाजिक कार्य करून देण्यासाठी डॉ. सुनंदा यांचा प्रचंड
पाठिंबा होता.

देशातील पहिले व्यसनमुक्ती केंद्र ‘मुक्तांगण’ याची त्यांनी स्थापना केली. महिला फायटर पायलट स्कीम (योजना) प्रायोगिक तत्त्वावर २०१६ मध्ये सुरू झाली. तेव्हा सुरुवातीला केवळ तीनच महिला होत्या; परंतु नंतर त्यांची संख्या वाढू लागली. आता जवळपास १६ महिला आहेत. भावना कांत, अवनी चतुर्वेदी व मोहना सिंग यांची पहिल्या महिला बॅचच्या फायटर पायलट म्हणून निवड झाली. मोहना सिंग या अशा फायटर पायलट आहेत की, ज्यांनी हॉक अॅडव्हान्स जेट मिशन पूर्ण केले. या बॅचमधील दुसऱ्या महिला म्हणजे भावना कांत. भावनांचा जन्म १९९२ मध्ये बिहार येथील दरभंगामध्ये झाला. त्यांना लहानपणापासून पेंटिंग, खो-खो व बॅडमिंटनची आवड होती. फायटर पायलट बनण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे नोकरी सोडून त्यांनीदेखील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. १६ मार्च २०१८ मध्ये त्यांनी मिग-२१ बायसन एकटीने उडवले होते. या दोघींसोबत अवनी चतुर्वेदीदेखील आहेत. भारतीय वायुसेनेत प्रथमच भारतीय महिलांनी वैमानिक लढाऊ विमाने चालविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भावना कांत, मोहना सिंह व अवनी चतुर्वेदी या तीन लढाऊ महिला वैमानिकांनी हा मान १८ जून विशेष २०१६ मध्ये पटकावला होता.

अवनी चतुर्वेदी यांनी राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठातून बी.टेक. पूर्ण केले. त्यांचा भाऊ हा इंडियन आर्मीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनाही वायुसेनेमध्ये सामील होण्याची इच्छा होती. अवनी यांनी मिळालेली नोकरी सोडून एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी गुजरातच्या जामनगर येथून मिग-२१ने उड्डाण भरली. त्यांनी एकटीने ही उड्डाण भरली होती.

अशा या असाधारण कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वातून, साहसातून तरुण-तरुणींनी खूप शिकण्यासारखे आहे. सुखोई, मिराज, जॅग्वॉर व मिग यासारखी युद्ध विमाने या फायटर पायलट उडवतात. अत्यंत खडतर प्रशिक्षणाला त्यांना सामोरे जावे लागते. अशा या तेजशलाकांची ऊर्मी, धडाडी, आव्हाने पेलवण्याची क्षमता आपण आपल्यातही उतरवूया.

-पल्लवी अष्टेकर

आज हृदय मम विशाल झाले…

मराठीत जेवढे प्रयोग झाले असतील, तेवढे अन्य कोणत्याही भारतीय भाषात झाले नसावेत. मग ते काव्य असो, नाट्य असो सिनेमा असो की साहित्य असो. अनेकदा मराठीतून प्रेरणा घेऊन इतर भारतीय भाषात लिखाण झालेले आहे. एक अपवाद म्हणजे फार तर बंगाली साहित्य आणि गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य. बाकी माझी मराठी महानच!

कविवर्य शंकर वैद्य यांची एक कविता अशाच बाबतीत लक्षणीय ठरते. अरुण दाते यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचे! त्यांनी अरुण दातेंच्या आवाजात या गाण्याचा आशय अगदी यथार्थपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. कारण ही कविता, हे भावगीत काही एक सर्वसाधारण कविता नाही. तो एक मोठा गूढ असा आध्यात्मिक अनुभव आहे. कविवर्य शंकर वैद्य यांनी तो शब्दांत कैद करण्याचे जवळजवळ अशक्य काम लीलया करून दाखवले.

या नितांत सुंदर गाण्याचे शब्द होते –
आज हृदय मम विशाल झाले,
त्यास पाहुनी गगन लाजले…

पहिल्याच दोन ओळीत लक्षात येते की, ही कविता, हे गीत काही सोपे नाही. ते समजावून घ्यावे लागेल. चक्क आकाश एका माणसाच्या हृदयाचे विशालपण पाहून लाजेल? इतके विशाल हृदय? कसे शक्य आहे? मुळात माणूस माणूस तो काय? त्याचे एका मुठीच्या आकाराचे हृदय ते केवढे? आणि त्याला पाहून आकाशाने लाजायचे? म्हणजे हा तर ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी’सारखी उपमा झाली. छे! अशक्य! ज्यांना महाराष्ट्र ‘माऊली’ म्हणून ओळखतो त्या ज्ञानेश्वरांचे ठीक आहे. पण शंकर वैद्य? आणि इथेच तर गंमत आहे. वैद्यांनीसुद्धा फार वेगळा, फार उदात्त अनुभव इथे शब्दांत मांडला आहे.

संत तुकारामांचे अभंग हे उत्तम उपमा अलंकार यांनी सजलेले अक्षर साहित्य म्हणून आजही अभ्यासले जाते. महाराजांनी जमेल तितके सोपे लिहिण्याचा प्रयत्न केला हेही सत्यच! मात्र त्यांची एक रचना या पार्श्वभूमीवर उठून दिसते. “अणूरणीया थोकडा, तुका अकशाएवढा!” हा अभंग केवळ काव्यरचना नाही तो एक अतिंद्रिय अनुभव आहे. काहीसा तसाच प्रकार शंकर वैद्य यांनी आपल्या अतिसंक्षिप्त कवितेत मांडलेला दिसतो. ते म्हणतात माझी जाणीव, माझी चेतना इतकी अवाढव्य झाली की ती आकाशात मावेना! माझ्यातून निघणारे किरण माझे हात झाले आणि मी अवघी पृथ्वी ओंजळीत घेतली! अवकाशात तळपणारा सूर्य मला माझ्या कपाळावरचे गंधच वाटू लागला! केवढी जबरदस्त कल्पना! ‘पॅराडाइज लॉस्ट’या खंडकाव्यात जॉन मिल्टनने वापरली होती तशी अतिभव्य शैली!शंकर वैद्यांच्या गीताची पुढची ओळ, तर अलीकडे पाश्चिमात्य देशात अतिशय लोकप्रिय झाल्याने चर्चेत असलेल्या एन.डी.ई. म्हणजे निअर डेथ एक्स्पिरियन्स या अनुभवाइतकी चित्रमय आहे

त्या विश्वाच्या कणाकणांतून,
भरून राहिले अवघे मी पण…

एन.डी.ए.बद्दल सांगायचे, तर सिंगापूरमधील अनिवासी भारतीय असलेल्या अनिता मुराजानी यांचे त्या विषयावरचे अनेक व्हीडिओ आज यूट्यूबवर आहेत. त्यांना कर्करोग झाला होता आणि त्या इस्पितळात अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत होत्या. शरीराच्या सगळ्या संस्था-रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पंचनसंस्था बंद पडू लागल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाइकांना ‘रुग्ण आता केवळ काही तासांचा सोबती आहे.’ त्यामुळे जवळच्या सर्वांना शेवटच्या भेटीसाठी बोलावून घ्यायलाही सांगितले होते. अनिता मुरजानी यांचा भाऊ भारतात होता. आपल्या बहिणीच्या जीवनाचे केवळ काहीच तास शिल्लक आहेत, असा निरोप मिळाल्याने तो प्रचंड चिंतेत पडला. अत्यंत विमनस्क मन:स्थितीत विमानतळावर काहीही करून सिंगापूरच्या विमानाचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
आणि क्षणार्धात ते घडले! अनिताबाई या जगातून गेल्या. त्यांची जाणीव, शरीरातून बाहेर पडली. त्यांना स्वत:चे लोळागोळा होऊन दवाखांच्या कॉटवर पडलेले शरीर दिसत होते. इतकेच नाही, तर ‘त्या कोमात आहेत’, असे वाटत असताना डॉक्टर तळमजल्यावर त्यांच्या पतींशी जे बोलत होते, ते शब्द त्यांना स्पष्ट ऐकू येऊ लागले. दूर भारतात असलेल्या भावाच्या मनातील विचारही कळू लागले. त्यांनी म्हटले आहे की, भावाचे मन, जवळच्या इतर अनेकांचे मन आणि माझे मन एकच झाले होते. मला त्याक्षणी सगळ्यांच्याच मनातले विचार
कळत होते…

मृत्यूनंतर मनाचे एकदम असे वैश्विक प्रसरण होते, ही काही कविकल्पना नाही. ते एक सत्य आहे हीच गोष्ट अनेक आध्यात्मिक व्यक्तींच्या पुस्तकात, व्हीडिओत अनेकदा आलेली आहे. शंकर वैद्यांच्या बाबतीत नेमके काय होते ते जरी आपल्याला माहीत नसले तरी या कवितेतून प्रकट होणारा अनुभव हुबेहूब तसाच आहे. आपल्या कवितेत ते पुढे म्हणतात –
आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमध्ये धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले…
ते पुढे म्हणतात –
त्या विश्वाच्या कणाकणांतून
भरून राहिले अवघे ‘मी’पण
फुलता फुलता बीज हरपले…

माझी केवळ माझ्या स्थूल शरीरात बंदिस्त असलेली जाणीव मुक्त झाली आणि विश्वाच्या कणाकणात गेली. जणू अंकुरित होताना, फुलताना, झाडाचे मूळ बीज नष्ट व्हावे, भोवतालच्या अस्तित्वात विलीन व्हावे, विरून जावे आणि त्याचा वृक्ष व्हावा तितका सहज नैसर्गिक अनुभव! संत तुकारामांचा अभंगही हेच सांगतो. महाराज म्हणतात, अणूहून लहान असलेले माझे अस्तित्व आकाशाएवढे विशाल असल्याची जाणीव मला झाली. शरीराच्या मर्यादांचा आणि मूळ चैतन्याच्या विश्वव्यापीपणाचा अनुभव आला. त्यामुळे मी बाहेर पडून आत्मसाक्षात्कार अनुभवला! दृश्य जगाच्या भ्रमातून मी बाहेर पडलो! आता आतला अंधार पूर्णत: संपला आहे.

अणुरेणियां थोकडा,
तुका आकाशाएवढा…
गिळुन सांडिले कलेवर,
भव भ्रमाचा आकार…
सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी
तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता…

एक संत आणि एका आधुनिक कवीच्या लेखनात जे साम्य आढळले, ते नोंदवावेसे वाटले म्हणून हा नॉस्टॅल्जिक प्रपंच!

-श्रीनिवास बेलसरे

उठाठेव

काल संध्याकाळी एक पुस्तक माझ्या हाती लागलं. स्वामी आनंद ऋषी यांनी लिहिलेलं ‘मला उमजलेले ओशो’ या पुस्तकाला पी. सी. बागमार ऊर्फ स्वामी सत्य निरंजन यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेतील हा एक किस्सा… हा किस्सा मला एवढा आवडला की, तो स्वामी सत्य निरंजन यांच्याच शब्दांत जसाच्या तसा सांगतो.

‘१९६६ सालच्या ऑक्टोबरमधली ही घटना. त्यावेळी ओशोंचा मुक्काम बाफना दांपत्याच्या घरी होता. एके संध्याकाळी मी बाफना दांपत्याच्या घरी गेलो होतो. माझ्या नशिबाने ओशो एकटेच तिथल्या दिवाणखान्यात चकरा मारीत होते. ओशो असे एकटे सापडणे महाकठीण काम होते. मी लगेच त्यांच्या समोर उभा राहिलो आणि पटकन विचारले, ‘आचार्यजी, आपके पास जो अप्रतिम बुद्धी है, वह आपने कमाई है? या कोई परमात्मा की आपको भेट है?’

हे ऐकताच ओशो चटकन थांबले, तीक्ष्ण नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले व ते म्हणाले, ‘गलत प्रश्न पूछने की आदत छोड़ दो। जब भी प्रश्न पूछना हो, तो प्रश्न का तीर अपने तरफ रखो। ताकी अगर प्रश्न का उत्तर ठीक से आया तो तीर तुम्हें चुभेगा, फायदा तुम्हारा होगा, जैसे यह प्रश्न तुमने मुझे पूछा की, ‘यह मिली बुद्धी मैने कमाई है की, कोई परमात्मा की मुझे भेंट है? मैं कह दूँ की – हां मैने कमाई है, या मुझे भेंट मिली है, तो तुम्हे क्या फर्क पड़ेगा?’
हे सगळं बोलणं चालू असताना माझ्या नजरेला त्यांची नजर तशीच भिडलेली होती. ते पुढे म्हणाले, ‘लेकीन तुम्हारे भीतर झांक कर, मैंने जान लिया है, की तुम पूछना चाहते हो की, अगर ऐसी बुद्धी मुझे चाहिये, हो तो मुझे क्या करना चाहिए?’ एवढं बोलून ते दोन पावलं पुढे आले. माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि हसून विचारलं, ‘क्यों ऐसा ही पूछना था ना?’
त्यांच्या या हसण्याने माझ्यातील सर्व ताण शमला, जणू हृदयात मधुर चांदणे पसरले आणि हसून मी म्हटलं, ‘हां हां। ऐसाही कुछ है।
बागमारजींचा हा प्रश्न योग्य होता, पण विचारण्याची पद्धत आणि शब्द चुकीचे होते, पण आपल्या बाबतीत तर प्रश्नच चुकीचा असतो. ओशो म्हणाले तसं, ‘गलत प्रश्न.’
आपल्याला एखाद्या घटनेशी काहीही देणं नसतं तरीही आपण उगाचच एखाद्याला प्रश्न विचारतो, नसत्या चौकशा करतो.
‘तो अमुक तमुक क्रिकेटिअर एका जाहिरातीत काम करायचे किती पैसे घेतो?
‘त्या अमक्या नटीचा डिव्होर्स झाला का रे?’
‘त्या तमक्याचं लफडं आहे म्हणतात. खरंय का ?’
हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्यालाही कुणीतरी विचारले असतील. कदाचित आपणही इतरांना विचारले असतील…
आपला काहीही संबंध नसताना लोक या चौकशा कशासाठी करतात?
सरकारी, निमसरकारी आणि अगदी खासगी ऑफिसातही हे प्रकार चालतात.
त्या अमक्याला इन्क्रिमेंट किती मिळालं?
त्या तमक्याला प्रमोशन मिळाल्यानंतर त्याचा पगार किती रुपयांनी वाढला?
कुणाची बायको कुठे नोकरी करते? आणि तिला किती पगार मिळतो?
यासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळून विचारणाऱ्याच्या आर्थिक किंवा सामाजिक स्थितीत काहीही फरक पडणार नसतो. पण तरीही माणसं अशा प्रकारच्या चौकशा करतातच. ज्याला इंग्रजीत ‘गॉसिप’ म्हणतात, त्यातलाच हा प्रकार असतो.
पूर्वीच्या काळी तरुण सासुरवाशिणींना घरी सासूचा नणंदांचा जाच असायच्या. त्यामुळे एखादी सासुरवाशीण नदीवर विहिरीवर पाणी भरायला गेली की तिथं तिच्या समवयस्क, समदुःखी मुलींबरोबर सुखदुःखं वाटताना एकमेकांची चौकशी व्हायची. कधी सासूच्या नणंदांच्या कागाळ्या सांगितल्या जायच्या. त्यातून फार मोठं साध्य होत नसे, पण त्या गांजलेल्या सासूरवाशिणीचं मन थोडं हलकं होत असे. दिवसभराच्या कामाचा शीण थोडा शमायचा. डोक्यावरचा भरलेला हंडा जरा हलका भासायचा. इथपर्यंत ठीक आहे.

पण, अशा प्रकारची उगाच चौकशा करायची सवय लागली की तो स्वभाव बनतो. कुचाळक्या करायचं एक व्यसनच जडतं. मग इकडच्या बातम्या तिकडे आणि तिकडच्या इकडे असली फुकटची पोष्टमनगिरी सुरू होतेहे व्यसन जोपासायचं तर त्यासाठी काहीतरी नवनवीन ताज्या ताज्या बातम्या हव्यात. या नवीन बातम्यांसाठी मग फुकाच्या चौकशा सुरू होतात. ती अमुक तमुक कुठे जाते? कुणाला भेटते? काय करते? तो अमका तमका कुठं नोकरीला आहे? त्याला पगार किती? आणि वरकमाई किती? तो काय खातो नि काय पितो? त्याचे कुणा-कुणाशी कोण-कोणत्या प्रकारचे संबंध आहेत? त्याचे कुणाशीही काहीही संबंध असले तरी आपला त्याच्याशी काहीही संबंध नसताना देखील लोक असल्या उचापती करतात. इंग्रजीत एक म्हण आहे. Birds of same feather fly together संस्कृतमध्ये म्हणतात, ‘समानशीले व्यसनेषु पंडिताची पंडितांशी मैत्री होते, एका चोराची दुसऱ्या चोराशी मैत्री होते तसंच विनाकारण उचापती करणाऱ्या माणसांची तशाच सख्यम्’ प्रकारच्या लोकांशी मैत्री होते. कुचाळक्या करणाऱ्यांचा एक ग्रुप तयार होतो. अशी माणसं मग त्या ग्रुपमध्ये जो उपस्थित नाही, त्याच्याबद्दल कुचाळक्या करतात.

अशा कुचाळक्या करण्यामुळे निव्वळ एक घटकाभरची करमणूक झाली तरी त्याचे दूरगामी तोटे मात्र बरेच होतात.
मुख्य तोटा म्हणजे आपला अनमोल वेळ वाया जातो. विचार गढुळतात, मन कलुषित होतात. नातेसंबंधात गैरसमज निर्माण होतात. मैत्रीला तडा जातो.

अशा प्रकारच्या नसत्या उठाठेवी आणि नको त्या कुचाळक्या करणाऱ्या माणसांची नेमकी मानसिकता काय असते? केवळ दोन घटका करमणूक की? जी गोष्ट मला मिळाली नाही ती दुसऱ्याला कशी मिळाली हा हेवा? का करतात माणसं या नसत्या उठाठेवी?

इंग्रजीत एक शब्द आहे पापाराझी…
इंग्लंड-अमेरिकेसारख्या देशातली ही ‘पापाराझी’ नावाची जमात आहे. हे पापाराझी स्वतःला फार मोठे शोध पत्रकार समजतात. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या, एखाद्या उद्योगपतीच्या मागावर जाऊन त्याचं खासगी जीवन चव्हाट्यावर आणणं हा एकमेव उद्योग करून ही जमात पैसे कमावते. नामवंत नटनट्यांच्या घरी बेडरूमच्या खिडकीला भोक पाडून आत छुपे कॅमेरे घालून फोटो काढण्यापर्यंतही यांची मजल जाते. कोण उद्योगपती कोणत्या पार्टीत दारू पिऊन कुणाबरोबर भांडला याच्या खऱ्या खोट्या बातम्या हे लोक मिळवतात आणि वर्तमानपत्रातून मासिकांतून छापतात. मोठमोठ्या राजकारणी नेत्यांच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी ही माणसं जाहीर करतात. कधी कधी तर हे लोक बातम्या मिळवतात आणि त्या ‘जाहीर करू.’ अशी धमकी देऊन ब्लॅकमेलदेखील करतात. मोठ्या माणसांकडून आपली वैयक्तिक आणि खासगी कामं करून घेतात, पैसे उकळतात. अशा सवंग बातम्या मिळवणं हा पापाराझींसाठी हा जगण्याचा व्यवसाय असतो.
पण, उगाचच कुचाळक्या करणाऱ्या इतरांचं काय?
खरं पाहिलं तर आपल्याला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याशी काही देणं-घेणं
असतं का?
एखाद्या अभिनेत्रीशी एखाद्या दिग्दर्शकाबरोबर निव्वळ मैत्री आहे की आणखी काही भानगड आहे, याच्याशी आपला काही संबंध असतो का? पण आपल्यालाही अनेकदा त्यात इंटरेस्ट वाटतो. अशा खमंग बातम्या आपण आवडीनं वाचतो. कधी चार मित्रमंडळी जमली तर चर्चादेखील करतो. खरंय ना?
जर आपण हे करत असू तर आपणही काही प्रमाणात पापाराझीच झालेलो असतो. ज्यातून कोणत्याही प्रकारचा लाभ नाही अशा प्रकारची माहिती मिळवण्यात आणि त्यातून चार घटका असुरी आनंद लुटण्याची आपली वृत्तीला नेमकं काय म्हणायचं? आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, खासगी आयुष्यात कुणी नाक खुपसलेलं, चौकशा केलेल्या आपल्याला चालतात का? जर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं असेल, तर दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण नाक खुपसण्याचा आपल्याला काही अधिकार आहे का ?
वास्तविक ज्या घटनेशी आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नसतो अशा गोष्टींबद्दल आपण बोलूच नये आणि बोलायची वेळ आली तर चांगलंच बोलावं.
सहज आठवली म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक माणूस सॉक्रेटिसकडे गेला आणि अगदी दबक्या आवाजात म्हणाला, ‘सर, तुम्हाला ठाऊक आहे का? त्या जमीनदाराच्या मुलाने की नाही…
‘थांब….’ त्याचं बोलणं सॉक्रेटिसने मध्येच तोडलं. ‘तू त्या जमीनदाराच्या मुलाबद्दल जे काही सांगणार आहेस ते सांगण्यापूर्वी आधी माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं दे. पहिलं म्हणजे तू जे बोलणार आहेस, ते नक्की खरं आहे याची तुला पूर्ण खात्री आहे का? दुसरं म्हणजे तू मला जे सांगणार आहेस, त्यामुळे माझा आणि तुझा काही फायदा होणार आहे का? आणि तिसरं म्हणजे तू त्या जमीनदाराच्या मुलाबद्दल जे सांगणार आहेस ते चांगलंच सांगणार
आहेस का?

या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर ‘होय’ असतील तरच तू मला जमीनदाराच्या मुलाबद्दल सांग. पण जर या तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं जरी उत्तर ‘नाही’ असं असेल तर तू कृपाकरून मला त्याच्याबद्दल काही सांगूच नकोस. तो माणूस गप्पच बसला. सॉक्रेटिस म्हणाला, ‘अरे बोल ना… तुला काही सांगायचं होतं ना? तू त्या जमीनदाराच्या मुलाबद्दल काही सांगणार होतास ना? बोल ना…
सॉक्रेटिसमोर बसलेला तो माणूस मान खाली घालून उभा राहिला आणि काहीही न बोलता आल्यापावली निघून गेला. सॉक्रेटिसने सांगितलेल्या या तीन कसोट्यांवर जर आपण आपलं नेहमीचं बोलणं तपासून पाहिलं, तर आपलं आपल्यालाच आढळेल की गरज नसताना देखील आपण अनेकदा नसत्या उठाठेवी करतो. माझ्या बाबतीत सांगायचं तर मला तरी माझी चूक उमगलीये.
तुमच्या बाबतीत काय?
तुम्हीच विचार करा…!

-गुरुनाथ तेंडुलकर

प्रेमळ कनक

एका गावात धनानंद व रमा नावाचे एक श्रीमंत जमीनदार जोडपे राहत होते. ते दोघेही श्रीमंत असूनही खूप प्रेमळ व दयाळू होते. कोणाही गरजवंतास ते नि:स्वार्थीपणे अगदी मनापासून मदत करीत होते. त्यांना कनक नावाचा एक मुलगा होता. कनकच्या अंगी आई-वडिलांचा, दयाळूपणाचा गुण आला होता.

एकदा असेच कनक व त्याचे मित्र शाळा सुटल्यानंतर बाजूच्या पटांगणावर खेळायला गेले. तेथे एका कोप­ऱ्यात एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू मलूल होऊन पडलेले त्यांना दिसले. कनक ताबडतोब त्या पिल्लाजवळ गेला. त्याने पिलाला उचलून बघितले, तर त्याच्या पायाला मोठी जखम झालेली त्याला दिसली. तो त्या पिलाला उचलून घरी घेऊन आला. त्याने स्वयंपाक घराच्या कोनाड्यातून एका वाटीत थोडी हळद आणली. स्वत:च एका स्वच्छ व नरम कापडाने त्या पिलाची जखम साफ केली. मग त्याने त्याच्या जखमेत व्यवस्थित हळद भरली. नंतर त्याने दुसऱ्या एका स्वच्छ कापडाची एक चिंधी फाडली व त्याच्या जखमेवर नीट पक्की बांधली. एव्हाना रमाबाई बाहेरून घरी आल्या होत्या. आईने विचारण्याआधीच कनकने त्या पिल्लाची अवस्था आईला सांगितली व विचारले, आयी, आपून पाळू काय या पिलाले. लय चांगलं दिसते ते.

त्याने सांगितलेले ऐकून रमाबाईंना कनकचे कौतुक वाटले. त्याले अगुदर थोडसं आपलं घरात ठेयेलं दूध पाज. भुकेलं दिसतं बिचारं. तुये बाबा हाव म्हनतीन तं वागवू आपुन त्याले त्या म्हणल्या. त्याने त्या पिल्लाला वाटीत आपल्या घरचे दूध पाजले. संध्याकाळी शेतातून धनानंद घरी आल्यानंतर त्यांनी परवानगी देताच कनकने त्या पिल्लाचे मोती असे नामकरण केले. कनक दररोज सकाळ-संध्याकाळ नियमितपणे त्याला दूध पाजू लागला. कनक शाळेत गेल्यानंतर रमाबाईही मोतीची काळजी घ्यायच्या. थोड्याच दिवसात मोतीची जखम दुरुस्त झाली. कनक त्याला दोन्ही वेळा न चुकता दूध-भाकरीचा काला खाऊ घालायचा. त्यामुळे तो एकदम चांगला धष्टपुष्ट झाला. दिसामासाने दोघेही वाढू लागले, मोठे झाले; परंतु मोती मात्र आता बांध्याने चांगलाच भक्कम, मोठा धिप्पाड नि शरीराने सिंहासारखा भरदार असा जबरदस्त व बलवान कुत्रा झाला होता. त्याला बघूनच चोरांची भीतीने गाळण उडायची. एके दिवशी रमाबाईंची त्यांच्या शेतात जायची इच्छा झाली. सुट्टी असल्याने कनकही त्यांच्यासोबत जायला निघाला. मग काय मोती तर त्यांच्याही पुढे चालू लागला. ते रस्त्याने जात असता अचानक बाजूच्या दाट झाडीतून एक लांडगा बाहेर आला. तो गुरगुरत जोराने ह्या मायलेकांकडे येऊ लागला. लांडग्याची चाहूल लागल्याबरोबर मोती सावध झाला व त्याने लांडग्यावर हल्ला करण्याचा पावित्रा घेत त्याच्यासमोर उभा ठाकला. कनक व रमाबाईंनी मदतीसाठी जोरजोरात आरडा-ओरडा सुरू केला.

लांडग्याने मोतीला बघताच तो मोतीवर चालून गेला. मोतीही त्याच्यावर धावून गेला नि जोराने त्याच्यावर तुटून पडला. शेवटी खास दुधाच्या ताकदीवर पोसलेल्या मोतीच्या शक्तीपुढे लांडग्याची डाळ न शिजता पिछेहाट झाली. मोतीने त्याला जंगलात पिटाळून लावले व मगच माघारी परत आला; परंतु लांडग्यासोबतच्या लढाईत त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या.

तोपर्यंत कनक व त्याच्या आईने जोरजोराने दिलेल्या आवाजाने आजूबाजूच्या शेतातील लोकंसुद्धा हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत आले होते. त्यांनीही धावत येताना मोतीचा अचाट पराक्रम पाहिला होता. मोती येताबरोबर कनकने त्याला जवळ घेतले व त्याची पाठ थोपटली. रमाबाईंनी मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवित हळुवारपणे आपल्या लुगड्याच्या पदराने त्याच्या जखमा पुसल्या. एका जणाने बाजूच्याच कुंपणातून अघिरड्याचा पाला काढून आणला व त्याचा आपल्या हातावर चोळून रस काढला व तो मोतीच्या जखमांवर लावला. ते घरी परत आले नि मोतीला त्यांनी पशूंच्या डॉक्टरांकडे मोतीला नेले. डॉक्टरांच्या औषधोपचाराने मोती ४-५ दिवसांत खडबडीत बरा झाला.

-प्रा. देवबा पाटील

‘भारत जोडो’चे फलित काय?

अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरमध्ये समाप्त झाली. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि ३० जानेवारीला श्रीनगर येथे विराम झाला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर अशा बारा राज्यांतून राहुल गांधी जवळपास चार हजार किमी पायी चालले. या यात्रेत त्यांनी बारा जाहीर सभा घेतल्या. शंभर चौक सभांमधून भाषणे केली. १३ पत्रकार परिषदांमधून आपली भूमिका मांडली. रोज सकाळी ब्रेकफास्टला आणि पदयात्रेत चालता चालता त्यांनी शेकडो जणांशी थेट संवाद साधला. ऊन, वारा, थंडी, पाऊस, बर्फवृष्टी असा अनुभव घेत त्यांनी पदयात्रा पूर्ण केली. भारत जोडो यात्रा ही सद्भावना व थेट जनतेशी संवाद यासाठी होती, ही यात्रा राजकीय नव्हे, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार स्पष्ट केले जात होते. पण असे सांगणे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार होता. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत १४६ दिवस चाललेली राहुल यांची यात्रा ही जर राजकीय नव्हती, तर भाजपविरोधी २३ राजकीय पक्षांना त्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण कशासाठी दिले होते? भारत जोडो यात्रा जर शांती व सद्भावना यासाठी होती, तर रोज भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोदी आणि शहा यांच्यावर टीका-टिप्पणी कशासाठी केली जात होती? भारत जोडो यात्रेचा लाभ काँग्रेस पक्षाला किती मिळाला, हे येत्या ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर समजू शकेल. पण राहुल यांची प्रतिमा बदलण्यासाठी ही यात्रा होती, याची कबुली स्वत: राहुल यांनीच दिली आहे. पूर्वीचे राहुल गांधी विसरा, असे ते सांगत होते. राहुल गांधी हे परिपक्व व गंभीर नेते आहेत, हे देशाला दाखविण्यासाठी भारत जोडोचा खटाटोप होता. ते युवराज नाहीत, राजपुत्र नाहीत, घराणेशाहीतून आलेले नेते नाहीत आणि पप्पूही आता राहिलेले नाहीत, हे ठसविण्याचा भारत जोडोतून प्रयत्न होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली, तेव्हा त्याच्याविरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसविरोधात डाव्या-उजव्या सर्व पक्षांना एकत्र आणून जनता पक्षाची मोट बांधली होती. तेव्हा समाजवादी, डावे आणि जनसंघही जनता पक्षाच्या बॅनर खाली एकत्र आले होते. पण तो प्रयोग फार काळ टिकू शकला नाही, हे देशाने अनुभवले आहे. पण तसा प्रयोग करणे हे राहुल यांना अजून जमलेले नाही. भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचे त्यांनी भारत जोडोच्या निमित्ताने प्रयत्न केले. पण निमंत्रित केलेल्या २३ पैकी ८ राजकीय पक्ष वगळता इतरांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे बघायला मिळाले.

भारत जोडोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, असे भासविण्यात येत होते. मग यात्रा अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची का पाळी आली? ज्यांना पक्षातून निलंबनाची कारवाई केली, ते महाआघाडीचा दणदणीत पराभव करून विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले, हेच भारत जोडोचे फलित म्हणायचे का? भारत जोडो यात्रा चालू असतानाच महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. हे कशाचे लक्षण समजायचे?

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना, स्वत: राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांवर ब्रिटिशांची माफी मागितल्याचे आरोप करून स्वत:च्या यात्रेला स्वत:च गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या वक्तव्याने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची कोंडी झाली. राहुल यांच्या अपरिपक्वतेचे दर्शन यानिमित्ताने महाराष्ट्राला झाले. १९९० पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसने सत्ता उपभोगली. सातत्याने काँग्रेसने राज्याला सर्वाधिक मुख्यमंत्री दिले. राज्याच्या सर्व २८८ मतदारसंघांत काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. पण भारत जोडो यात्रेचा लाभ मिळतोय, असे कुठे दिसले नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्ते व मीडियाचे कॅमेरे हे राहुल गांधी यांच्या अवती-भोवतीच फिरताना दिसत होते. राज्यात काँग्रेस पक्ष गटातटात विभागला गेला आहे व गेल्या तीन निवडणुकांतून काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सतत घसरत आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसची मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली. विधानसभेत केवळ या पक्षाचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसचे एवढे खराब प्रदर्शन यापूर्वी कधी झाले नव्हते. पक्ष संघटनेला बळ देईल, असा राज्यात काँग्रेसकडे नेता नाही, भारत जोडोनंतर पक्षात काहीच फरक पडलेला दिसला नाही. काँग्रेस हा महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. ठाकरे सरकारच्या काळात सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. पण मिळालेले हे महत्त्वाचे पदही काँग्रेसला राखता आले नाही. राहुल व त्यांच्या भारत जोडोमुळे महाराष्ट्रातही पक्षाला शक्ती मिळाली, असे जाणवले नाही.
काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर भारत जोडोचा समारोप झाला. याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तेवीस राजकीय पक्षांना (भाजप विरोधक) निमंत्रण दिले होते. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डीएमके, सीपीआय, आरएसपी, आययूएमएल, बीएसपी, जेएमएम, व्हीकेसी हे आठ पक्ष हजर राहिले. मात्र तृणमूल काँग्रेस, जनता दल यू, शिवसेना, तेलुगू देशम, सपा, सीपीआय एम, राजद, आरएलएसपी, एचएएम, केरळ काँग्रेस, एमडीएमके, आरएलडी, जनता दल एस हे राजकीय पक्ष फिरकले नाहीत. सीपीआय एमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना निमंत्रण देऊनही ते भारत जोडोच्या समारोपाला गेले नाहीत. ओमर अब्दुल्ला व मेबहुबा मुफ्ती हे जम्मू-काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मात्र भारत जोडो समारोपाला हजर होते. भाजपनंतर देशात काँग्रेस हा मोठा जनाधार असलेला राजकीय पक्ष आहे. गेल्या आठ वर्षांत भाजपने काँग्रेसला मतांच्या टक्केवारीत बरेच मागे टाकले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०६ दशलक्ष मते मिळाली होती, तर २०१९ च्या निवडणुकीत ११९ दशलक्ष मते प्राप्त झाली होती. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, वायएसआर काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसची व्होट बँक मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचून घेतली.
भारत जोडो यात्रेनंतर अन्यत्र गेलेली मते काँग्रेसला परत मिळवता येतील का?, या प्रश्नाचे उत्तर आज तरी सकारात्मक देता येत नाही. २०२३ व २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भारत जोडो यात्रा काँग्रेसला नवजीवन देऊ शकेल का? या प्रश्नाचे उत्तरही ठामपणे देता येणार नाही.

भारत जोडोमुळे काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढेल काय? हा कळीचा मुद्दा आहे. त्याचे उत्तर नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतरच देता येईल. नुकत्याच झालेल्या सी व्होटर्स सर्व्हेनुसार अरविंद केजरीवाल व ममता बॅनर्जी यांना विरोधी नेता म्हणून लोकांची अधिक पसंती आहे. राहुल गांधी यांचे नाव तेही विरोधी नेता म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला राहुल गांधींपेक्षा अधिक पसंती मिळते, हे काँग्रेसचे अपयश आहे. भारत जोडो यात्रेतून हे अपयश राहुल यांना पुसून टाकता येईल का? भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी हेच काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, हे देशाला दिसून आले. मल्लिकार्जुन खर्गे हे निवडून आलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते पक्षाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत. काँग्रेस पक्षाचे हायकमांड गांधी परिवारच आहे, हाच संदेश भारत जोडो यात्रेने दिला आहे.

– डॉ. सुकृत खांडेकर

[email protected]
[email protected]