अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरमध्ये समाप्त झाली. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि ३० जानेवारीला श्रीनगर येथे विराम झाला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर अशा बारा राज्यांतून राहुल गांधी जवळपास चार हजार किमी पायी चालले. या यात्रेत त्यांनी बारा जाहीर सभा घेतल्या. शंभर चौक सभांमधून भाषणे केली. १३ पत्रकार परिषदांमधून आपली भूमिका मांडली. रोज सकाळी ब्रेकफास्टला आणि पदयात्रेत चालता चालता त्यांनी शेकडो जणांशी थेट संवाद साधला. ऊन, वारा, थंडी, पाऊस, बर्फवृष्टी असा अनुभव घेत त्यांनी पदयात्रा पूर्ण केली. भारत जोडो यात्रा ही सद्भावना व थेट जनतेशी संवाद यासाठी होती, ही यात्रा राजकीय नव्हे, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार स्पष्ट केले जात होते. पण असे सांगणे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार होता. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत १४६ दिवस चाललेली राहुल यांची यात्रा ही जर राजकीय नव्हती, तर भाजपविरोधी २३ राजकीय पक्षांना त्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण कशासाठी दिले होते? भारत जोडो यात्रा जर शांती व सद्भावना यासाठी होती, तर रोज भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोदी आणि शहा यांच्यावर टीका-टिप्पणी कशासाठी केली जात होती? भारत जोडो यात्रेचा लाभ काँग्रेस पक्षाला किती मिळाला, हे येत्या ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर समजू शकेल. पण राहुल यांची प्रतिमा बदलण्यासाठी ही यात्रा होती, याची कबुली स्वत: राहुल यांनीच दिली आहे. पूर्वीचे राहुल गांधी विसरा, असे ते सांगत होते. राहुल गांधी हे परिपक्व व गंभीर नेते आहेत, हे देशाला दाखविण्यासाठी भारत जोडोचा खटाटोप होता. ते युवराज नाहीत, राजपुत्र नाहीत, घराणेशाहीतून आलेले नेते नाहीत आणि पप्पूही आता राहिलेले नाहीत, हे ठसविण्याचा भारत जोडोतून प्रयत्न होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली, तेव्हा त्याच्याविरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसविरोधात डाव्या-उजव्या सर्व पक्षांना एकत्र आणून जनता पक्षाची मोट बांधली होती. तेव्हा समाजवादी, डावे आणि जनसंघही जनता पक्षाच्या बॅनर खाली एकत्र आले होते. पण तो प्रयोग फार काळ टिकू शकला नाही, हे देशाने अनुभवले आहे. पण तसा प्रयोग करणे हे राहुल यांना अजून जमलेले नाही. भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचे त्यांनी भारत जोडोच्या निमित्ताने प्रयत्न केले. पण निमंत्रित केलेल्या २३ पैकी ८ राजकीय पक्ष वगळता इतरांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे बघायला मिळाले.
भारत जोडोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, असे भासविण्यात येत होते. मग यात्रा अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची का पाळी आली? ज्यांना पक्षातून निलंबनाची कारवाई केली, ते महाआघाडीचा दणदणीत पराभव करून विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले, हेच भारत जोडोचे फलित म्हणायचे का? भारत जोडो यात्रा चालू असतानाच महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. हे कशाचे लक्षण समजायचे?
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना, स्वत: राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांवर ब्रिटिशांची माफी मागितल्याचे आरोप करून स्वत:च्या यात्रेला स्वत:च गालबोट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या वक्तव्याने त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची कोंडी झाली. राहुल यांच्या अपरिपक्वतेचे दर्शन यानिमित्ताने महाराष्ट्राला झाले. १९९० पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसने सत्ता उपभोगली. सातत्याने काँग्रेसने राज्याला सर्वाधिक मुख्यमंत्री दिले. राज्याच्या सर्व २८८ मतदारसंघांत काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. पण भारत जोडो यात्रेचा लाभ मिळतोय, असे कुठे दिसले नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्ते व मीडियाचे कॅमेरे हे राहुल गांधी यांच्या अवती-भोवतीच फिरताना दिसत होते. राज्यात काँग्रेस पक्ष गटातटात विभागला गेला आहे व गेल्या तीन निवडणुकांतून काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सतत घसरत आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसची मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली. विधानसभेत केवळ या पक्षाचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसचे एवढे खराब प्रदर्शन यापूर्वी कधी झाले नव्हते. पक्ष संघटनेला बळ देईल, असा राज्यात काँग्रेसकडे नेता नाही, भारत जोडोनंतर पक्षात काहीच फरक पडलेला दिसला नाही. काँग्रेस हा महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. ठाकरे सरकारच्या काळात सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. पण मिळालेले हे महत्त्वाचे पदही काँग्रेसला राखता आले नाही. राहुल व त्यांच्या भारत जोडोमुळे महाराष्ट्रातही पक्षाला शक्ती मिळाली, असे जाणवले नाही.
काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर भारत जोडोचा समारोप झाला. याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तेवीस राजकीय पक्षांना (भाजप विरोधक) निमंत्रण दिले होते. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डीएमके, सीपीआय, आरएसपी, आययूएमएल, बीएसपी, जेएमएम, व्हीकेसी हे आठ पक्ष हजर राहिले. मात्र तृणमूल काँग्रेस, जनता दल यू, शिवसेना, तेलुगू देशम, सपा, सीपीआय एम, राजद, आरएलएसपी, एचएएम, केरळ काँग्रेस, एमडीएमके, आरएलडी, जनता दल एस हे राजकीय पक्ष फिरकले नाहीत. सीपीआय एमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांना निमंत्रण देऊनही ते भारत जोडोच्या समारोपाला गेले नाहीत. ओमर अब्दुल्ला व मेबहुबा मुफ्ती हे जम्मू-काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मात्र भारत जोडो समारोपाला हजर होते. भाजपनंतर देशात काँग्रेस हा मोठा जनाधार असलेला राजकीय पक्ष आहे. गेल्या आठ वर्षांत भाजपने काँग्रेसला मतांच्या टक्केवारीत बरेच मागे टाकले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०६ दशलक्ष मते मिळाली होती, तर २०१९ च्या निवडणुकीत ११९ दशलक्ष मते प्राप्त झाली होती. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, वायएसआर काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसची व्होट बँक मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचून घेतली.
भारत जोडो यात्रेनंतर अन्यत्र गेलेली मते काँग्रेसला परत मिळवता येतील का?, या प्रश्नाचे उत्तर आज तरी सकारात्मक देता येत नाही. २०२३ व २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भारत जोडो यात्रा काँग्रेसला नवजीवन देऊ शकेल का? या प्रश्नाचे उत्तरही ठामपणे देता येणार नाही.
भारत जोडोमुळे काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढेल काय? हा कळीचा मुद्दा आहे. त्याचे उत्तर नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतरच देता येईल. नुकत्याच झालेल्या सी व्होटर्स सर्व्हेनुसार अरविंद केजरीवाल व ममता बॅनर्जी यांना विरोधी नेता म्हणून लोकांची अधिक पसंती आहे. राहुल गांधी यांचे नाव तेही विरोधी नेता म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला राहुल गांधींपेक्षा अधिक पसंती मिळते, हे काँग्रेसचे अपयश आहे. भारत जोडो यात्रेतून हे अपयश राहुल यांना पुसून टाकता येईल का? भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी हेच काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, हे देशाला दिसून आले. मल्लिकार्जुन खर्गे हे निवडून आलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते पक्षाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) आहेत. काँग्रेस पक्षाचे हायकमांड गांधी परिवारच आहे, हाच संदेश भारत जोडो यात्रेने दिला आहे.
– डॉ. सुकृत खांडेकर