गेल्या दोन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला पीक मिळाले नाही. शेतकऱ्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली, एक वर्ष मला हवे तसे हवामान दे. मग बघा मी कसे, हवे तसे धान्याचे कोठार भरतो. तथास्तु! शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. चांगले पीक आले. कापणी केली, तर त्यांत गव्हाचा एकही दाणा नाही. शेतकरी देवावर चिडला. देव म्हणाले, तुला हवे तसे हवामान दिले त्यामुळे झाडांना संघर्ष करण्याची थोडीही संधी मिळाली नाही. त्यामुळे झाड आतून पोकळ राहिले. बदल्या हवामानांत टिकून राहण्यासाठी झाडांनाही संघर्ष करावा लागतो.
कोशातून बाहेर पडताना कराव्या लागणाऱ्या संघर्षामुळे फुलपाखराचे पंख बळकट व विकसित होतात. निसर्गात पशू-पक्षी, प्राण्यांचा, अन्नासाठी/संरक्षणासाठी प्रत्येक क्षण अनिश्चित असतो. संघर्ष त्यांच्यात ताकद निर्माण करतो, हिंमत देतो. हेच तत्त्व सर्वांच्या जीवनाला लागू आहे.
जीवनात निसर्गाशी, परिस्थितीशी, स्वतःशी, समाजांसाठी प्रत्येकाचा संघर्ष चालूच असतो. नोकरी, व्यवसाय, वैवाहिक जीवन, खेळ, कला-क्रीडा, विज्ञान, राजकारण त्यामधील चांगल्या वाईट घटना, दुर्घटनांना तोंड देऊन टिकून राहावे लागते. जो सामना करतो तो पुढे जातो, जो मागे वळतो, तो तेथेच राहतो.
संघर्ष! तीन अक्षरी शब्द! संघर्ष शब्दाला महत्त्व नाही, तर संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. संघर्षाशिवाय काही नवे निर्माण होत नाही. जोपर्यंत छन्नीचे घाव घेत नाही, तोपर्यंत दगडसुद्धा देव बनत नाही. भगवान श्रीकृष्णाने म्हटलेच आहे, ‘जीवन एक संघर्ष आहे.’ ही एक दीर्घकाळ चालणारी साधना आहे. पांडव त्या मार्गावरून चालले व लढले. श्रीरामांनाही संघर्ष चुकला नाही. समाजाच्या उद्धारासाठी साऱ्या साधुसंताना खूप संघर्ष सहन करावा लागला. कर्मकांडाच्या विरोधात, सामाजिक परिवर्तनासाठी, मानवतेच्या हक्कासाठी लढणारे विवेकानंद, फुले; शिक्षणासाठी सावित्रिबाई फुले, शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक; स्वशिक्षणासाठी डॉ. आनंदीबाई जोशी, स्त्री सुधारणा पंडित रमाबाई ते विद्या बाळ; संतती नियमन, पुनर्विवाहाचे प्रश्न सोडविणारे डॉ. धोंडो केशव कर्वे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी दिलेला लढा, देशाच्या सीमा रक्षणासाठी लढणारे सैनिक, त्यांचे कुटुंब या साऱ्यांचा संघर्ष पराकोटीचा आहे. अनेकांनी भारतासाठी समर्पित आयुष्य वेचले. सारे सुरुवातीला एकटेच होते. पण ते स्वतःच्या विचारावर ठाम होते. आजही जात – धर्म – रूढी – चालीरीती – व्यसने, सोबत गाडगे महाराजांचा सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नांवरही संघर्ष चालू आहे.
मानवाने आजवर साधलेली प्रगती ही आपोआप किंवा कोणत्याही दैवी, अमानवी शक्तीचा आधार घेऊन नव्हे, तर मानवी बुद्धीच्या बळावर आहे. शास्त्रज्ञांचाही संघर्ष थक्क करणारा आहे. जीवन जगण्याचे दुसरे नाव संघर्ष! आज लहान-मोठा, श्रीमंत-गरीब, शिकलेला न शिकलेला, अधिकारी, कारकून प्रत्येकाला घरात, घराबाहेर पडण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. रोजच्या जीवनात संघर्ष निर्माण होण्याची कारणे – व्यक्तिगत – सांस्कृतिक – सामाजिक पातळीवरील मतभिन्नता, भिन्न विचारधारा, भिन्न दृष्टिकोन, राहणीमान, शिक्षण, हुद्दा, अभिरुची, पैसा, जात-धर्म, आस्तिक-नास्तिक, मूल्य, लक्ष्य यांत खूप फरक असतो. थोडक्यात समझोता होण्याची शक्यता कमी तेव्हा संघर्ष उद्भवतो.
संघर्ष ही जीवनाची परीक्षा आहे. यात चूक सुधारा आणि सूडबुद्धी न ठेवता क्षमा, माफी हा संघर्षाचा मूलमंत्र होय.
संघर्ष तीन प्रकारचे
१. व्यक्तिगत – सर्वसामान्य संघर्ष करूनच वर येतात. काही घरात परिस्थितीमुळे संघर्षातून लहान वयातच मुले परिपक्व होतात. परीक्षेचे निकाल लागल्यावर मुलांचा, पालकांचा संघर्ष वाचतो. फक्त नोकरी, व्यवसायात नव्हे कोणत्याही क्षेत्रात संघर्षाशिवाय यश नाही. जोश टॉकमधील लोकांचे संघर्ष वाचा.
भारताचे पहिले वैज्ञानिक संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस यांना भारतात कॉलेजमध्ये शिकविताना इंग्रजांच्या तुलनेने एक तृतीयांश पगार मिळत होता. त्यासाठी
डॉ. बोस पगार न घेता तीन वर्षे लढले. कर्जबाजारी झाले. चौथ्या वर्षी पूर्ण पगार घेतला.
एव्हरेस्ट चढाईवर यश मिळविणाऱ्या पहिल्या महिला जुंको ताबेई म्हणतात, बर्फाच्छादित थंडगार वातावरणात श्वास घेताना होणारी दमछाक, प्रत्येक पाऊल पुढे टाकताना मागे फिरावे वाटत होते तरी पुढे चालणे चालू ठेवले. ज्यावेळी पोहोचले तेव्हा माझ्याइतके यशस्वी कोणी नाही, असे वाटले. नंतर सर्वत्र सत्कार झाले; परंतु सुरुवातीला कोणाचीही दाद नव्हती.
२. आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावर, शारीरिक आपत्तीवर मात करून स्वतःचे आयुष्य पालकांच्या साथीने यशस्वी करणारे खरेच खूप आहेत. मुख्यतः स्वतःच्या शारीरिक व्याधीचा, त्या सत्याचा ते प्रथम स्वीकार करतात. यलो चित्रपट. जन्मानंतर काही वर्षांनी आलेल्या अंधत्वावर मात करून आज एकजण स्टेजवर व्याख्यान देत आहे. पोलिओ झालेली विमा रुडाल्फ जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली.
३. देशाच्या उभारणीसाठी, अनेक क्षेत्रातील विकासकामात, मतभिन्नतेमुळे, असंतोषामुळे, राजकीय मतभेदामुळे होणारे संघर्ष. उदा. मेट्रो, मराठी भाषा, मराठी माणूस… तरीही संघर्षातूनच सामाजिक प्रगती होते.
संघर्षात संकल्प शिथिल होता कामा नये. मागे फिरू नका. विवेकानंदाना शिकागो परिषदेच्या आधी, रवींद्रनाथांना नोबेल प्राइझ मिळाल्यावर, अतोनात त्रास झाला होता. प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करा. स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांचे संघर्षमय जीवन वाचा. सगळ्यांत महत्त्वाचे संघर्षाची दिशा बरोबर हवी. नाहीतर आयुष्यभर संघर्ष करून हाती काही लागत नाही. स्वतःचाही उत्कर्ष होत नाही. कोणतीही जबाबदारी पेलू शकत नाही.
आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष – १. जगण्यासाठीचा. २. ओळख निर्माण करण्याचा. ३. निर्माण झालेली ओळख टिकविण्याचा.
संकटे आली की, एकामागोमाग एक येतात. त्यावेळी जमणार नाही, जाऊ दे, नकोच करूया, होणार नाही ही भाषा नसावी. संघर्षच जगायला शिकवितो. संघर्षातून मिळणारे अनुभव हेच खरे शिक्षण. एकदा आव्हान स्वीकारले की, त्या संघर्षाशी मैत्री होते, आपल्यातील सूप्त ऊर्जा बाहेर येते. संघर्षाचा अर्थ लढणे नाही, तर भिडणे होय. संघर्षाचे प्रवासी व्हा आणि गंतव्यस्थानी पोहोचा, हीच प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी होय. तेव्हा संघर्ष करा नि प्रगती करा.
-मृणालिनी कुलकर्णी