कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही कमी नाही. कोकण म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणाऱ्या आख्यायिकांकरिता. काही परिचित तर बरीचशी अपरिचित अशी ही देवस्थाने. प्राचीन सुंदर मूर्ती, जुनी मंदिरे, त्याच्याशी जोडला गेलेला रोमहर्षक इतिहास आणि निसर्गनवल अशा गोष्टींचा मिलाफ जर पाहायचा आणि अनुभवायचा असेल, तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोळप-आडिवरे-कशेळी परिसराला भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी आणि राजापूर या दोन्ही ठिकाणांच्या मधोमध असणारा हा परिसर अतिशय शांत, रम्य आणि तितकाच ऐतिहासिकसुद्धा आहे. रत्नागिरीच्या दक्षिणेला सागरीमार्गाने निघाले की, आधी येते स्वरूपानंदांचे पावस. तिथे दर्शन घेऊन पावसचेच जणू जुळे गाव असलेल्या गोळपला जावे. गोळप इथे हरिहरेश्वराचे मंदिर आहे. डोंगराच्या कुशीत असलेले हे नितांतसुंदर ठिकाण. दगडी पाखाडी उतरून मंदिर प्रांगणात आपला प्रवेश होतो. समोरच नाटके सादर करण्यासाठी तयार केलेला रंगमंच पाहून कोकणी माणसाचे नाटकाविषयीचे प्रेम किती उत्कट आहे, याची जाणीव होते. हरिहरेश्वर मंदिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांच्या स्वतंत्र मूर्ती या मंदिरात शेजारीशेजारी ठेवलेल्या आहेत. ब्रह्मदेवाची मूर्ती काहीशी दुर्मीळ समजली जाते. साधारणत १२-१३ व्या शतकातील या अतिशय देखण्या मूर्ती, त्यांच्या पायाशी असलेली त्यांची वाहने आणि त्यांच्या प्रभावळीत असलेले इतर देव, असे देखणे शिल्प जरूर पाहायला हवे.
गोळपवरून पुढे आडिवरेला जाताना वाटेत कशेळीचा फाटा लागतो. कशेळीला कनकादित्याचे म्हणजे सूर्याचे मंदिर आहे. गुजरातेत वेरावळजवळ प्रभासपट्टण इथे प्राचीन सूर्यमंदिर होते. इ. स. १२९३ साली अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याच्या मदतीने एका व्यापाऱ्याने तिथल्या काही सूर्यमूर्ती जहाजात घालून तिथून हलवल्या. त्यातलीच एक मूर्ती म्हणजे कशेळीचा कनकादित्य होय. या सूर्यदेवाला इ. स. शिलाहार भोजराजाने एक दानपत्र ताम्रपटावर लिहून दिले. तो ताम्रपट आजही देवस्थानने जपून ठेवला आहे. मात्र सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तो बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावा लागला आहे. अत्यंत रम्य मंदिर परिसर असून आता तिथे भक्तनिवाससुद्धा बांधलेला आहे.
कशेळीपासून जेमतेम चार किमीवर आहे आडिवरे हे गाव. कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण असलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापूरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापूर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. हिंदू धर्मीयांच्या प्राचीन परंपरेनुसार प्रत्येक गावशिवेमध्ये रक्षक देवतांची स्थापना केली जाते. या प्राचीन परंपरेनुसार राजापूर तालुक्यातील महाकाली देवी ही आडिवरे गावाची ग्रामदेवता. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्पन्न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी लिहिले आहे. ‘अट्टेवर’ या शब्दाचा अपभ्रंश आडिवरे असा झाला असावा. ‘अट्ट’ म्हणजे बाजार आणि ‘वेर’ म्हणजे पूर किंवा नगर म्हणजे बाजाराचे गाव असा अर्थ होतो. शके १९१३ मध्ये शिलाहार वंशातील भोज राजाने एका दानपत्रात, ‘अट्टविरे कंपण मध्यवर्ते’ असा उल्लेख केला आहे. ११व्या शतकात या भागात जैन पंथीयांचे प्राबल्य होते. हे त्या भागातील अनेक देवतांच्या निरीक्षणाने समजून येते. धर्म प्रसारार्थ शंकराचार्याचा संचार पुढे या भागात झाला. त्यांनी जैन मतांचे खंडन करून तेथील मूर्तीची स्थापना सन १३२४च्या सुमारास केली. पुढे पेशवाईत भिडे नावाच्या सरसुभ्यांनी जीर्णोद्धार केला. आडिवरे हे स्वतंत्र गावाचे नाव नाही. तो प्रदीर्घ परिवार आहे.
इंग्रजी राजवटीपासून १४ स्वतंत्र वाड्या आहेत. या सर्वाना मध्यवर्ती स्थान असलेल्या ‘वाडापेठ’ येथे महाकाली मंदिर आहे. श्री महाकाली देवस्थानची स्थापना तेराशे वर्षांपूर्वी शृंगेरी पीठाचे आद्य श्रीशंकराचार्य यांच्या हस्ते झाली. या गावाचे प्राचीन काळापासून संदर्भ मिळतात. भोजराजाच्या ताम्रपटात याचा उल्लेख ‘अट्टविरे’ असा आला आहे. तर काही साहित्यात याचे नाव आदिवरम असे आढळते. शंकराचार्यांनी या देवीची स्थापना केली, असेही सांगितले जाते. सुंदर देवस्थान असलेल्या या मंदिरात विहिरीतून पाणी काढण्यासाठी ‘कोटंब’ नावाच्या जुन्या पारंपरिक पद्धतीचा वापर केलेला आजही आढळतो. मंदिराच्या सभागृहात छतावर अतिशय सुंदर नक्षीकाम असून विविध कथनशिल्पे इथे पाहायला मिळतात.
मंदिरात महाकालीची प्रसन्न मूर्ती असून तावडे मंडळींची ती कुलदेवता आहे. परिसरात नगरेश्वर, महालक्ष्मी, महासरस्वतीची मंदिरे आहेत. नगरेश्वराच्या मंदिरात छताच्या वर गेलेले मोठे वारूळ पाहायला मिळते. नवसाला हमखास पावणारी देवी असा तिचा महिमा असल्याने आपल्या मनोकामना सिद्धीस जाव्यात म्हणून भक्तगण तिला नवस करतात. अखंड पाषाण कोरून घडविलेली देवीची मूर्ती, भव्य मुखावरचा विशाल भालप्रदेश, सरळ नासिका, तेजस्वी नेत्र, शिरस्थानी विराजमान झालेल्या उभट कोरीव मुकुट, त्याचप्रमाणे नाकातील नथ, गळ्यातला अलंकार या आभूषणांनी युक्त असे देवीचे रूप प्रसन्न वाटते. महाकाली हे मंदिर पंचायन असून त्यात महाकाली, महासरस्वती, रवळनाथ व नगरेश्वर यांचा समावेश आहे. तसेच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीन बहिणी असून त्या एकाच मंदिरात तीन वेगवगेळ्या दिशांना आसनस्थ आहेत. तसेच नगरेश्वर मंदिरात शेकडो वर्षांचे जुने नागोबाचे वारूळ असून ते छप्पर फोडून त्याच्याही वर गेले आहे; परंतु पावसाळ्यात त्यातून एक थेंबही पाणी गळत नाही. यात्रेकरूच्या दृष्टीने एक मोठा कुतूहलाचा विषय आहे. महाकाली देवीच्या देवस्थानाव्यतिरिक्त आडिवरे परिसरात अनेक मंदिरे व पर्यटन स्थळे आहेत. त्यात आडिवरे-वाडापेठ येथील भगवती मंदिर, कालिकावाडी येथील कालिका देवी व शंकरेश्वर मंदिर, कोंडसर येथील सत्येश्वर मंदिर यांचा समावेश आहे. देवी भगवती व कालिका या महाकालीदेवीच्या भगिनी होत. आडिवरे गावाचे भूषण ठरवलेल्या जीर्णोद्धार मंदिराचे वास्तुपूजन व मूर्तीचा वज्रलेप समारंभ होतो. देवदीपावली व पौष पौर्णिमा असे वर्षातून चार वेळा महाकाली देवीला वस्त्र अलंकारांनी सजविले जाते. देवीचा मोठा उत्सव म्हणजे ‘नवरात्रोत्सव’. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस हा मोठा उत्सव असतो. तसेच नवरात्रीत नऊ दिवस मोठी जत्रा भरते. अहोरात्र कार्यक्रम चालू असतात. भाविकांची व वाहनांची एकच झुंबड उडते. महाकाली देवीचे मंदिर भव्य-दिव्य असून आवार प्रशस्त आहे. आवारात आगमन व निर्गमने यासाठी दोन मोठे दिंडी दरवाजे आहेत. दिंडी दरवाजाच्या वरील बाजूस छोटी सभागृहे आहेत. मंदिराच्या आतील बाजूस दरबारी थाट आहे. मंदिराच्या आतील बाजूस कोरीव कामाचे उत्कृष्ट रंगकामाचे नमुने आहेत. एकूणच मंदिराला मोठा थाट आहे. देवळाचे छप्पर कौलारू असून जमीन फरसबंदी आहे. आवार चिरेबंदी असून आवाराची तटबंदीही चिऱ्याचीच आहे. अशा या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी दरवर्षी असंख्य भक्तगण येत असतात.
– सतीश पाटणकर
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)