Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजविनोबाजींचा साहित्यविचार

विनोबाजींचा साहित्यविचार

वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त विनोबाजींच्या साहित्य विचारावरील लेख.

विनोबाजींचे व्यक्तित्व बहुआयामी होते. चिंतनशील होते. भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेशी नाते सांगणारे होते. गेल्या शतकाच्या सहाव्या दशकात त्यांनी भूदान चळवळ चालवली. यानिमित्ताने देशभर फिरत असताना त्यांनी साहित्यिकांशी आवर्जून चर्चा केली. या चर्चांमधून साहित्य, साहित्य व्यवहार, साहित्याचे प्रयोजन, साहित्य आणि जीवन अशा अनेक अंगांनी त्यांनी आपले विचार मांडले. लघुरूपात, सूत्ररूपात, तरीही आशयघन असे हे विचार आहेत. वर्तमान संदर्भात त्यांचे महत्त्व आणि संयुक्तिकता अधिकच जाणवते.

‘साहित्यिकांशी हितगुज’ या शीर्षकाने त्यांचे हे विचार प्रकाशित झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथील साहित्यिकांपुढे त्यांनी दिलेली भाषणे यात आहेत. तसेच माटे यांच्या ‘देवदूत’ या पुस्तकाला आणि कोलते यांच्या ‘जीवनगंगा’ या कविता संग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनाही यात आहे. याशिवाय साहित्यिकांशी झालेली प्रश्नोत्तरेही अखेरच्या प्रकरणात समाविष्ट आहेत. १३ जुलै १९५२ रोजी काशी विद्यापीठात, २३ ऑक्टोबर १९५५ रोजी पाटणा येथे, ३ ऑगस्ट १९५३ रोजी गया येथे, १९ जानेवारी १९५५ रोजी बलरामपूर येथे, ६ फेब्रुवारी १९५६ रोजी बालेश्वर येथे, २६ मार्च १९५६ रोजी पुरी येथे त्यांनी केलेली साहित्यविषयक भाषणे त्यात आहेत.

साहित्याबद्दल मूलभूत विचार मांडताना ते म्हणतात – ‘साहित्य हा शब्दच सांगतो की ती निरपेक्ष वस्तू नाही. ती कोणाच्या तरी ‘सह’जाणारी वस्तू आहे. जीवननिष्ठेचे प्रकाशन करणे हे साहित्याचे काम आहे. जीवननिष्ठा व साहित्य एकरूप झाले पाहिजे. साहित्यामुळे जीवनाची प्रभा फाकते. त्यांचा संबंध सूर्य आणि किरण यांच्यासारखा आहे. दोन्ही अभिन्न असले तरी प्रचारकाचे काम किरणच करतात. साहित्य जीवनाच्या प्रभेच्या रूपाने प्रकट होते.’ जीवनासाठी कला (साहित्य हीदेखील कलाच) की कलेसाठी कला या वादात विनोबाजी स्पष्टपणे जीवनासाठी कला या बाजूने उभे राहतात. आज होणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेत जीवननिरपेक्ष अभिव्यक्ती गृहीत धरली जाते किंवा श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न होतो. त्या पार्श्वभूमीवर विनोबाजी वेगळे ठरतात.

याच भाषणात जीवनाविषयी ते म्हणतात, लोकांत जर सौहार्द असेल, प्रेम असेल, तर विविधतेतूनही एक सुरेल संगीत निर्माण होईल. भेदाविरुद्ध माझा प्रचार चालू असला तरीही, मी विविधता नष्ट करू इच्छित नाही. विविधता नाहीशी झाली, तर जीवनच निरस बनेल. वर्गविरोध, संघर्ष इत्यादी शब्दांहून वेगळे शब्द मी वापरतो. वर्गभेद मला दिसत नाही.’ स्पष्टच आहे की, भांडवलशाही आणि साम्यवाद वा समाजवाद यांना अभिप्रेत असलेली समता विनोबाजी फेटाळून लावतात. व्यास, वाल्मिकी, शंकराचार्य, गांधीजी, रवींद्रनाथ टागोर हे सगळे सत्यान्वेषी, जीवनाला उन्नत करणारे श्रेष्ठ साहित्यिक असल्याचे मतही विनोबाजी नोंदवतात.

साहित्यिकांना देवर्षी असे संबोधून एका ठिकाणी ते म्हणतात, शब्दांनी न्यून भाव, अतिरिक्त भाव आणि विपरीत भाव प्रकट करू नये. साहित्याने हे त्रिविध दोष टाळले पाहिजेत. सर्वांबद्दल अंत:करणात प्रेम हे देवर्षींचे लक्षण सांगून ते म्हणतात, सर्वांचे विचार पारखण्यासाठी बुद्धीची तटस्थता, वाणीची निर्विकारता आणि स्वत:ची निरहंकारिता लागते. आपले मत अतिशय परखडपणे व्यक्त करताना विनोबाजी पुढे म्हणतात, ‘ज्या देशाचे लोक मनात आले ते लिहून टाकतात, संपादक बनले आहेत म्हणून कसलाही मजकूर शीघ्र प्रकाशित करू पाहतात, कसेही करून फक्त कॉलम भरण्याची आपली जबाबदारी मानतात, काळ किंवा स्थळ यांची काहीच मर्यादा ओळखत नाहीत; त्या देशात लक्ष्मी स्वप्नवत समजावी. मनन करायला फुरसत मिळाली नसेल, तर एक कॉलम कोरा ठेवता येतो.’ मुद्रित माध्यमे, प्रकाशचित्रवाणीवरील बातम्यांसहित सगळेच कार्यक्रम, सोशल मीडिया, व्यक्त करण्याची प्रचंड
घाई; या पार्श्वभूमीवर विनोबांच्या या विचारांकडे पाहता येईल.

आजच्या काळातही आमच्या देशाने योगी अरविंद घोष यांच्यासारखे ब्रम्हर्षी, रवींद्रनाथ ठाकूर यांच्यासारखे देवर्षी आणि गांधीजींसारखे राजर्षी जन्माला घातले. ते आमचे आदर्श आहेत असे समजून देशाची प्रतिष्ठा वाढेल असे साहित्य आमचे साहित्यिक निर्माण करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.

अर्वाचीन भारतीय साहित्याबद्दल विनोबा म्हणतात, ‘आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात अर्वाचीन भारतीय साहित्याचा उदय बंगालमध्येच झाला. येथील साहित्यिकांची अनेक नावे तुम्ही घ्याल. ती सगळी हिंदुस्थानच्या परिचयाची नाहीत; परंतु बंकिमचंद्र, रवींद्रनाथ, शरच्चंद्र यांची ओळख नसलेले शिक्षित लोक हिंदुस्थानात कुठेच नसतील. बंगालमधल्या इतर मोठ्या लोकांची नावेही हिंदुस्थानात प्रसिद्ध आहेत; परंतु त्यांचा उल्लेख मी येथे करीत नाही. कारण ते अन्य क्षेत्रात ज्ञानी होते. साहित्याच्या क्षेत्रात ही तीन नावे साऱ्या हिंदुस्थानात अजरामर झाली आहेत. त्यातही कालिदासानंतर भारतीय संस्कृतीचे समग्र रूप पाहणारा आणि सम्यक रूपात ते व्यक्त करणारा रवींद्रनाथाहून श्रेष्ठ साहित्यिक क्वचितच झाला असेल. उत्तर प्रदेशचे महाकवी तुलसीदास, महाराष्ट्राचे ज्ञानदेव, दक्षिण भारताचे कंबन इत्यादी दुसरे अनेक महाकवी होऊन गेले; परंतु त्यांची योग्यता वेगळ्या कोटीची होती. ते धर्मपुरुष होते; परंतु साहित्यिक या नात्याने ज्यांनी भारतीय संस्कृतीचे, केवळ धर्मदृष्ट्याच नव्हे तर समग्र जीवनदृष्ट्या सर्व पैलूंचे दर्शन घेतले असे एक रवीबाबूच होते. जीवनाच्या अनेक पैलूंचे ज्यांना सम्यक दर्शन झाले, असे महापुरुष कालिदासानंतर रवींद्रनाथच होऊन गेले.’

‘साहित्यिक आणि राज्याश्रय’ याची चर्चा करताना विनोबाजी म्हणतात – ‘नुकतीच दिल्लीला साहित्य अकादमी स्थापन झाली. संबंध भारतीय साहित्यात अकादमीसाठी काही शब्दच मिळाला नाही का? हिंदुस्थानात १० हजार वर्षांपासून विकसित झालेल्या १०-१२ तरी भाषा आहेत. त्या भाषांमध्ये या विषयासाठी शब्दच मिळाला नाही तर ते काम तरी कसे व्हायचे? विज्ञानाची गोष्ट वेगळी आहे. विज्ञानविषयक शब्द आमच्या भाषात कदाचित सापडणार नाहीत; परंतु साहित्याच्या क्षेत्रात समर्पक शब्द मिळू नये ही गोष्ट मला खटकते. मी विचार केला की, काही का असेना, काम तर होईल. पण काम काय होते आहे? साहित्यिकांना बक्षिसे दिली जातात. आता विचार करा, जगात कधी बक्षिसे देऊन काम होते का? तुलसीदास आणि कबीर यांना कोणते इनाम मिळाले होते? हा, आमच्या रवींद्रनाथांना बक्षीस मिळाले होते खरे. त्याला नोबेल प्राईज म्हणतात. हल्ली प्रत्येक गोष्टीची किंमत पैशामध्ये केली जाते. एखाद्याने उत्तम साहित्य लिहिले, तर त्याला चांगले खाऊपिऊ घातले पाहिजे, असे म्हटले जाते. पण, खाण्यापिण्याचा साहित्याशी काय संबंध? साहित्यिकांच्या उपजीविकेसाठी काही पाहिजे हे मी कबूल करतो; परंतु इनाम देण्याने साहित्यिकांना काय मदत होते? कारण त्यांच्या जीवनाचा मूळ स्त्रोत वेगळाच असतो. ज्यांनी लक्ष्मीला दासी नव्हे तर माता मानले अशाच लोकांकडून हिंदुस्थानात साहित्याची वृद्धी झाली आहे. जे निरंतर साहित्य निर्माण करीत होते ते जनसमाजात मिसळून काम करीत आणि देहधारणेपुरते जे काय मिळेल त्यावर संतुष्ट राहत. त्यांनी राजांची पर्वा केली नाही. पैशाने ते खरीदले जाणारे नव्हते. अशा लोकांमुळेच हिंदुस्थानचे साहित्य वाढले आहे. तुलसीदास, कबीर, पोतना, तुकाराम इत्यादी सर्वोत्तम साहित्यिकांकडे पाहा. ते राज्याश्रीत नव्हते, तर भगवंताश्रीत होते. तुम्ही त्यांचेच वारस आहात.’

भारत श्रेष्ठ का, याची चर्चा करताना विनोबाजी म्हणतात – ‘हिंदुस्थानातील माती अमेरिकेतल्या मातीपेक्षा चांगली आहे असे नाही. तसे पाहिले तर अमेरिकेची माती ताजी आहे. तिच्यात अधिक उत्पन्न निघू शकते. तेथे कितीतरी मोठमोठ्या नद्या आहेत. त्यांच्यापुढे आमच्या गंगा नदीचा काय पाड? हिमालय पर्वत जगात सर्वात उंच आहे खरा; परंतु तो सोडल्यास आमचा हिंदुस्थान श्रेष्ठ आहे, असे म्हणण्यासारखी दुसरी कोणतीही वस्तू आमच्याजवळ नाही. हिंदुस्थानची निसर्गरचना इतर देशातल्या निसर्गरचनेपेक्षा श्रेष्ठ आहे, असे नसले तरीही, हिंदुस्थानातच ब्रम्हविद्या निघाली, असा मात्र माझा दावा आहे. तिच्या तोडीची वस्तू जगामध्ये दुसरी नाही, ही गोष्ट मी अगदी स्वतंत्रपणे तटस्थ होऊन सांगत आहे. जगातल्या पुष्कळशा भाषांचे आणि साहित्याचे अध्ययन मी केले आहे; परंतु ‘तत् त्वम् असि’ (तू ब्रम्ह आहेस) असे निष्ठापूर्वक सांगणारे साहित्य जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. ही ब्रम्हविद्या हेच आमचे बळ. यातच भारताचा गौरव आहे. भारत ‘सारे जहाँ से अच्छा’ आहे, कारण येथे ब्रम्हविद्या आहे.’

एका भाषणात त्यांनी मांसाहाराचीही चर्चा केली आहे. कालिदासाच्या शाकुंतलाचे उदाहरण त्यासाठी त्यांनी दिले आहे. शाकुंतलामध्ये राजा दुष्यंत शिकारीला जातो, तेव्हा आश्रमातील एक मुलगा त्याला सांगतो – हे आश्रमातील हरीण आहे त्याला मारू नको. त्यावर दुष्यंताने त्या हरिणाला सोडून दिले. ही हिंदुस्थानची संस्कृती आहे. हे सारे सांगून विनोबाजी प्रश्न करतात – आज कोणत्या देशाचा मुलगा बादशहाला असे सांगू शकेल? जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाच्या वेळी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली, तेव्हा जो गोंधळ झाला किंवा घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून गोवंश हत्याबंदीचा मुद्दा येतो तेव्हा जो गोंधळ होतो आणि मोठमोठे साहित्यिक, विचारवंतसुद्धा त्या गोंधळात भर घालतात; तेव्हा विनोबाजींचा हा प्रश्न आठवल्याशिवाय राहत नाही.

साहित्य हे आकाशासारखे असते, असे सांगून विनोबाजी म्हणतात, ‘आकाश कितीही पाहिले तरीही कोणाला थकवा येत नाही. त्याचा नील रंगही थकवा आणत नाही. साहित्याने असे असायला हवे. शिवाय साहित्य हे नवनवे अर्थ प्रसवणारे, सदा सृजनशील कामधेनूसारखे असावे. अल्पाक्षरात अधिक अर्थ सांगणारे असावे. भारतीय भाषांएवढी, विशेषत: संस्कृतएवढी काव्यशक्ती जगातील कोणत्याही भाषेत नाही, असेही विनोबांचे मत आहे. साहित्यिकांचे समाजातील स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगतानाच विनोबाजी अपेक्षा व्यक्त करतात की, साहित्यिकांनी विरक्त असले पाहिजे. साहित्यिकांच्या उदरनिर्वाहाची चिंता समाजाने करायला हवी, असे मतही त्यांनी मांडले आहे.

विदग्ध साहित्याची चर्चा करताना विनोबाजी म्हणतात – ‘ज्ञानदेवाने म्हटल्याप्रमाणे – पाणी बुबुळालाही त्रास देत नाही अन् खडकालाही फोडून काढते, तसे – साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, असे विदग्ध वाङ्मयाचे विशुद्ध स्वरूप आहे. रामायण आणि महाभारत ही विदग्ध वाङ्मयाची काळाच्या कसोटीवर उतरलेली उत्तम उदाहरणे आहेत. उलट बरीचशी पुराणे, जरी कथाशैलीने युक्त असली तरीही आज दग्ध होऊन चुकली आहेत. लोकांना काव्य-नाटक-कथादी रोचक होऊ शकते, याचा लाभ घेऊन जे भाराभर साहित्य अनेक भाषात लिहिले जात आहे, ते सारे दग्ध साहित्य आहे. आज ना उद्या जळून जायचे आहे.’

अन्यही पुष्कळ विषयांची चर्चा विनोबाजींनी या भाषणांमधून केली आहे. साहित्याच्या संदर्भात आज अनेक चर्चा होत असतात, अनेक मते मांडली जातात, अनेक बाबींवर खल होतो; त्यावेळी साधक-बाधक चर्चेसाठी विनोबाजींचे हे विचारही मोलाचे ठरू शकतात.

-श्रीपाद कोठे, नागपूर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -