स्वामी चाळिसा

(स्वामी म्हणती) नको घेऊ तू शंका
साऱ्या जगभर माझाच रे डंका ।। १।।
शत्रूची जरी मोठी लंका
मज स्पर्शाने रामाची श्रीलंका ।। २।।
होती रावणाची सोन्याची लंका
हनुमान शेपटीने केली जळकी लंका ।। ३।।
वृथा नको ठेवू उगाच गर्व
मी जाणतो आत-बाहेर सर्व ।। ४।।
तुझ्या झूट गर्वाचा दर्प
तुलाच डसेल तुझाच सर्प ।। ५।।
माझ्या पायातळी तुला रे मुक्ती
कर माझी काम करतानाच भक्ती ।। ६।।
नाही माझी काही सक्ती
तुझ्या चांगुलपणा मागे माझी ती शक्ती ।। ७।।
नको उगाच तू रे भिऊ
राक्षसाला टाकेन मी खाऊ।। ८।।
भूत पिशाच्च सारे होतील मऊ
दत्तगुरू सारे माझे भाऊ ।। ९।।
ब्रह्मा विष्णू महेश
सारे माझेच ते नरेश ।।१०।।
सिंधु सिंधुतला मी आहे बिंदू
जगनिमार्त्याला आपण सारे वंदू।। ११।।
कधी श्रीकृष्णाचा मी बलराम
पार्थ अर्जुनाचे करतो सारे काम ।।१२।।
दिवस-रात्र करा तुम्ही काम
दिन रात्र गाळ तुम्ही घाम ।।१३।।
पहाटे घ्या माझेच नाम
नामातच लपला माझा श्रीराम ।।१४।।
श्रीराम नामाचे तरंगले दगड
लंकासेतू बांधला हनुमान फक्कड।।१५।।
छोटी खारसुद्ध मदतीला फक्कड
नरवानर, बांधला सेतू नुक्कड ।।१६।।
तेथे होती रामनामाची जादू
रावणाची लंका हालली गदगदू।।१७।।
वाळू किनारी शंकराची पिंडी
रामसुद्धा पूजा करी जग दिंडी ।।१८।।
शंख फुकूनी पिटवीली दवंडी
जांभुवंत नलअगंद बांधली तिरडी।।१९।।
राम बाण लागुनी रावण उतरंडी
नरकाला गेला रावण पाखंडी।।२०।।
श्री रामसेवेने रोज दिवाळी दसरा
प्रत्येक दिवस होईल हसरा।।२१।।
नको करू कोणताच नखरा
राम नामाने दूर होईल रोग दुखरा।।२२।।
सर्वत्र जळीस्थळी काष्टी
सर्वत्र चालती माझ्याच गोष्टी ।।२३।।
श्रीराम कबिराचा मी होतो कोष्टी
श्रीकृष्णालाही वासुदेव सांगे गोष्टी ।।२४।।
उत्तम ते जिंकवण्यासाठी मी पराकाष्टी
दुःख, पराभव, जाई समष्टी।।२५।।
मी उडवतो यमाचीही दांडी
अष्टमीला फोडतो मी सुखाची हंडी।।२६।।
श्रीकृष्णाबरोबर खेळतो मी दहीहंडी
दुश:सनाची मी फोडतो मांडी।।२७।।
दुर्योधनाची मी करतो गचांडी
शकुनी मामाची उतरंडी।।२८।।
कंसमामाची फोडतो मी नरडी
द्रौपदीची फुलांनी भरतो परडी।।२९।।
वाटतो मी सांब शिवशंकर
वाटे भोळा साधा शंकर ।।३०।।
तपस्या केली मी भयंकर
देतो एकच भयंकर ।।३१।।
डमरूसह नृत्य तांडव
नाचती सारे यक्ष दक्ष तांडव ।।३२।।
पार्वतीच्या लग्नाला स्मशानात मांडव
त्रिलोक हाले करता तांडव ।।३३।।
स्वामींचा उघडा सदैव तिसरा डोळा
आशीर्वाद घेण्यास भक्त गोळा ।।३४।।
करा रोज नाम जप सोळा
पुण्य करा हो सारे गोळा ।।३५।।
स्वर्गात नेणार नाही रुपये सोळा
शरीराचा होणार पालापाचोळा ।।३६।।
आई-वडील आजी-आजोबा होती गोळा
आशीर्वाद घेऊनी द्या पुरणपोळ्या ।।३७।।
सारे खाली हात आले गेले
पुण्य केले तेच स्वर्गात गेले ।।३८।।
राम नाम स्वामीनाम घेत गेले
स्वामी नामानेच संकटात तरले ।।३९।।
अमर विलास स्वामी सेवा करत आले
स्वामी चालिसा पुरी करत आले ।।४०।।

-विलास खानोलकर

रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद

भोपाळ (वृत्तसंस्था) :मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेतेपदासह महाराष्ट्राने खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ मध्ये येथील ॲथलेटिक्सच्या शेवटच्या दिवसाची सोनेरी सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला दिवसभरात महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक, तर रिया पाटीलने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.

महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे ५२ सेकंदांत पार केले.

इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत १.६३ मीटर्सपर्यंत उडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. “पदक जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता”, असे श्रावणी हिने सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलांकडे देखील खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची क्षमता असते, हे महाराष्ट्राच्या महेश जाधव याने दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील अबदरे या खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने मुलांच्या लांब उडीमध्ये रुपेरी कामगिरी केली. त्याने ७.११ मीटर्सपर्यंत उडी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे वैयक्तिक प्रकारात पहिलेच पदक आहे. त्याआधी त्याने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स शर्यतीतही रौप्य पदक मिळवून दिले होते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर त्याने कनिष्ठ गटात ८० मीटर्स अडथळा शर्यत व लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.

क्रीडा प्राधिकरणाच्या चाचणीमध्ये त्याने दाखवलेल्या कौशल्यामुळे त्याची मैदानी स्पर्धांसाठी सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. तेथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ॲथलेटिक्समधील कारकीर्द सुरू झाली.

आशिया चषकाच्या ठिकाणाबाबत संभ्रम कायम…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षेच्या कारणास्तव आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे अधिकृत यजमानपद असले, तरी सुरक्षेमुळे ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाऊ शकते. शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली. आशिया चषक कुठे होणार? याबाबत मार्चमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे या बैठकीत ठरले. परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठीही बैठकीत उपस्थित होते.

या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचा अधिकृत यजमान आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करू शकत नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाऊ शकते. त्यानंतर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयशी वाद घातला. भारत आशिया चषक स्पर्धेत खेळायला आला नाही, तर पाकिस्तानचा संघही यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती.
आशिया चषक पाकिस्तानात न झाल्यास तो यूएईला हलवला जाऊ शकतो. शेवटचा आशिया चषकही तेथेच झाला होता, ज्याचे यजमान श्रीलंकेत होते. श्रीलंकेतील राजकीय गोंधळामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.
२०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे, आयपीएल सीझन देखील यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. अशा स्थितीत आशिया चषकासाठीही यूएई हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांची शनिवारी बहरीनमध्ये आशिया कप २०२३ संदर्भात पहिली औपचारिक बैठक झाली. यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारताने नकार दिल्यानंतर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर आशियाई क्रिकेट परिषद मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण ठरवेल. या बैठकीत अद्याप कोणताही मोठा निर्णय झालेला नाही. मात्र भारत पाकिस्तानमध्ये न जाण्यावर ठाम आहे.

आशिया चषक सप्टेंबरमध्ये होणार आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानमध्ये आहे. पण मार्चमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत आशिया कप स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावेळी आशिया कप युएईमध्ये होऊ शकतो. श्रीलंका हाही पर्याय आहे, पण युएईचा दावा मजबूत मानला जात आहे.

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

दुबई (वृत्तसंस्था): पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा दुबई येथे निधन झाले. पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने ही माहिती पुढे आली आहे.

परवेज मुशर्रफ यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर २०१६पासून दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. तसेच ते निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी देखील होते. कारगिल युद्धात जनरल मुशर्रफ यांचा थेट सहभाग होता. माजी निवृत्त जनरल परवेज मुशर्रफ यांनी लष्कराप्रमुख असताना बंड करुन पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन ३ नोव्हेंबर २००७ साली देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर २०१३मध्ये देद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.
परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावरच्या उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर ही शिक्षा लाहोरच्या उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचे लाहोर उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट, तीन पुलांची कामे…

खेड(वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसऱ्या जोड पुलाचे काम पूर्ण झाले असून, मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. भरणे येथील उड्डाण पूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभीळ येथील उड्डाणपुलाची कामे पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यांत महामार्गावरील खेड तालुकाच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.

खेड तालुक्याच्या हद्दीतील जगबुडी नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्च २०१३ मध्ये महाकाली ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला भीषण अपघात झाला होता. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस मध्यरात्री नदीपात्रात कोसळली होती. या अपघातात ३७ जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर नवीन पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती.
जगबुडीवरील दुसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे, त्यामुळे जगबुडी पुलावरील आधी किंवा आता असलेला अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे कामही पूर्ण झाले असून आता दोन्ही बाजूच्या अप्रोच रोडचे काम सुरू आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाले की या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असे बांधकाम विभागाचे अभियंता माडकर यांनी सांगितले. भरणे नाका येथील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात असून, मार्चअखेर हे काम पूर्ण होणार आहे. त्याशिवाय दाभीळ येथील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, मार्च-एप्रिल दरम्यान पूर्ण होऊन या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे़.

ठाणेकरांसाठी खुशखबर! रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

ठाणे: येत्या काही महिन्यातच ठाणेकरांना अद्ययावत स्थानक उपलब्ध होणार आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्थानकच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत निविदा प्रक्रिया खुली होत असून ३१ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ठाणे शहर भाजपच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेतली होती. राज्यसभेचे तत्कालीन सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील तत्कालीन गटनेते मनोहर डुंबरे, सुजय पत्की यांचीही उपस्थिती होती.

त्यामुळे ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाप्रमाणे नवीन ठाणे स्थानकाच्या कामासाठी पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठाणे शहराला कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचेही डावखरे यांनी नमूद केले.

दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आग, सर्व कागदपत्रे जळाली

कर्जत: कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटमुळे लागलेल्या या आगीत बँकेतील सर्व दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

या बँकेला पहाटे लागलेली आग तिथून जाणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याच्या निदर्शनास आली. तात्काळ त्याने तेथील स्थानिक ग्रामस्थ यांना कळविले. ग्रामस्थ व कर्जत पोलीस यांच्या मदतीने पहाटे ५ वाजता अग्निशमन दलाच्या कर्जतच्या टीमला पाचारण केले.

आज बँक बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अन् मोठा अनर्थ टळला . यानंतर ही आग विझविण्याचे शर्थीचे पर्यंत सुरू करण्यात आले. ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत बँकेच्या सर्व कागदपत्रांसह इतर सर्व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाची संपुर्ण टीम उपस्थित होती. सदरील लागलेल्या आगीत बँकेचा डेटा ३ ठिकाणी सुरक्षित असून बँकेचा विमा असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर बँकेचे सर्व व्यवहार येत्या चार दिवसात सुरळीत होतील. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे बँकेचे संचालक राजेंद्र हजारे यांनी सांगितले.

मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होणार

मुंबई: मराठी ज्ञानभाषा आहेच. मात्र, आता सगळ्या प्रकारचे शिक्षण मराठीतून मिळेल. परिणामी मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरीत सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या शुभारंभाच्या सत्रात ते बोलत होते.

याप्रसंगी खासदार रामदास तडस व डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, आमदार समीर मेघे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे तसेच प्रदीप दाते व सागर मेघे उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. तसेच या वेळी उपमुख्यांनी शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्याचेही जाहीर केले.

‘मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर आलो’

ठाणे: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंगगडच्या यात्रेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीमलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले व आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी मलंगगडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, स्व. आनंद दिघे साहेबांनी या मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही सुरू ठेवू. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आपल्या शुभेच्छांमुळे कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यात सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात कोविडमुळे निर्बंध होते, सगळे बंद होते. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सव मोठ्या जोमात साजरे करण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मलंगगडावर केलेल्या महा आरतीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कसबा पोटनिवडणूक: महाविकास आघाडीत फूट? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले शिवसेनेनेच…

मुंबई: पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष असलेले हेमंत रासने हे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही जागा शिवसेनेने लढवण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०१४ मध्ये कसबा पेठ जागा काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र ज्यावेळी सेनेनी ही जागा लढवली होती. त्यावेळी सेनेला ६५ हजार मतं मिळाली होतीय त्यामुळे सेनेला आम्ही विनंती केली आहे की, तुम्ही दोन्हीही जागा लढा. कारण कसब्याची जागा काँग्रेस कायम हरत आली आहे. मात्र तिथे सेनेचा बोलबाला आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची नाही. त्यामुळे आम्ही सेनेला दोन्ही जागा लढण्याची विनंती केली आहे. मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे काय भूमिका घेणार ते पाहूयात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बैठक घेऊन ठरवू, असं म्हटलं जात असतानाच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सहयोगी पक्ष वंचितकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शिवसेनेला फूस लावत असल्याचं म्हटलं जात आहे.