ठाणे: येत्या काही महिन्यातच ठाणेकरांना अद्ययावत स्थानक उपलब्ध होणार आहे. कारण रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्थानकच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत निविदा प्रक्रिया खुली होत असून ३१ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ठाणे शहर भाजपच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेतली होती. राज्यसभेचे तत्कालीन सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील तत्कालीन गटनेते मनोहर डुंबरे, सुजय पत्की यांचीही उपस्थिती होती.
त्यामुळे ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाप्रमाणे नवीन ठाणे स्थानकाच्या कामासाठी पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठाणे शहराला कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचेही डावखरे यांनी नमूद केले.