Saturday, July 20, 2024
Homeक्रीडारिले शर्यतीत महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद

रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद

भोपाळ (वृत्तसंस्था) :मुलींनी चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेतेपदासह महाराष्ट्राने खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ मध्ये येथील ॲथलेटिक्सच्या शेवटच्या दिवसाची सोनेरी सांगता केली. त्याखेरीज महाराष्ट्राला दिवसभरात महेश जाधव याने लांब उडीत रौप्य पदक, श्रावणी देसावळे हिने उंच उडीत रौप्य पदक, तर रिया पाटीलने ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.

महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखविला. हे अंतर त्यांनी तीन मिनिटे ५२ सेकंदांत पार केले.

इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणी हिने उंच उडीत १.६३ मीटर्सपर्यंत उडी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात तिने हे यश संपादन केले. ती सांगली जिल्ह्यातील खेळाडू असून इस्लामपूर येथे विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. “पदक जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता”, असे श्रावणी हिने सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलांकडे देखील खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची क्षमता असते, हे महाराष्ट्राच्या महेश जाधव याने दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील अबदरे या खेडेगावात जन्मलेल्या या खेळाडूने मुलांच्या लांब उडीमध्ये रुपेरी कामगिरी केली. त्याने ७.११ मीटर्सपर्यंत उडी मारली. खेलो इंडिया स्पर्धेतील त्याचे हे वैयक्तिक प्रकारात पहिलेच पदक आहे. त्याआधी त्याने महाराष्ट्रात चार बाय शंभर मीटर्स शर्यतीतही रौप्य पदक मिळवून दिले होते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर त्याने कनिष्ठ गटात ८० मीटर्स अडथळा शर्यत व लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पदके जिंकली आहेत.

क्रीडा प्राधिकरणाच्या चाचणीमध्ये त्याने दाखवलेल्या कौशल्यामुळे त्याची मैदानी स्पर्धांसाठी सांगली येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षण केंद्रात निवड झाली. तेथे ज्येष्ठ प्रशिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ॲथलेटिक्समधील कारकीर्द सुरू झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -