‘खान्देश प्रीमियर क्रिकेट’चे आयोजन

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात धुळे, जळगाव, नंदुरबार येथील खान्देशी समाजबांधव रहात असून त्यांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. दिनेश पाटील यांनी रविवारी खान्देश प्रीमियर क्रिकेट या एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत एकूण १० संघांनी प्रवेश घेतला होता. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सर्व तरुण खानदेशी समाज बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे डॉ. दिनेश पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेला आयोजक पराग चितोडकर, एकनाथ बोरसे, शरद खोसरे, डॉ नीलेश, प्रमोद, सुनील भामरे व याच बरोबर नरेंद्र मेहता, सुरेखा सोनार, शंकर विरकर, ध्रुवकिशोर पाटील, मनोज राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

गणेश जाधव ठरला अटल नमो चषकाचा मानकरी

कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडल आणि ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश जाधव हा अटल नमो चषकाचा मानकरी ठरला.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून शरीर सौष्ठव पटू सहभागी झाले होते. एकूण ७ गटात हि स्पर्धा घेण्यात आली. ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो आणि ८५ किलो या वजनीगटात स्पर्धा पार पडली. यामध्ये प्रत्येक गटात अनुक्रमे मंगेश पाटील, दिपक गुप्ता,सुरेंद्र डगवाल, समीर म्हसकर, बुद्धीराज गायके, राहुल क्षेत्रे आणि गणेश जाधव हे विजयी ठरले. तर बेस्ट पोजर हा किताब विनायक लोखंडे याने तर अटल नमो चषक गणेश जाधव याने पटकावला.

या सर्व विजेत्या स्पर्धकांना कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अटल नमो चषक विजेत्या स्पर्धकाला १५ हजार रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात आला. ग्रामीण भागातील शरीर सौष्ठव पटूना संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली. यावेळी ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे राजेंद्र चव्हाण, माजी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, दीपक गायकवाड आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

भाईंदर ते श्रीवर्धन एसटी सुरू करण्याची मागणी

0

भाईंदर : मीरा भाईंदरमधील नवघर नाका येथे भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस सुरू करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी सुमारे ४०० हुन अधिक जणांनी स्वाक्षरी करून श्रीवर्धन एसटी बस सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. याकरता एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.

तरुण वर्ग व कोकणातील चाकरमानी, स्थानिक मनसे सचिव अनिल रानावडे, राजन पवार, अनिल कोटकर, रवी पाष्टे, अभिषेक नांदगावकर, संजय जगताप, उमेश भिऊगडे, विजय काते, निरंजन नवले तसेच समर्थ प्रतिष्ठानच्या महिला व पुरुष पदाधिकारी व मनसे पदाधिकारी यांचा स्वाक्षरी मोहिमेत समावेश होता.

Demand for starting Bhayandar to Shrivardhan ST

मीरा भाईंदर शहरात कोकणामधील चाकरमानी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. यामध्ये भाईंदर ते रायगड मार्गे श्रीवर्धन असा प्रवास करणारे प्रवाशी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनापूर्वी भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस भाईंदर (पूर्व) येथून दररोज सकाळी ६.०० वाजता सुरु होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून शासनाकडून ही एसटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्याकरता खासगी वाहन अथवा बोरिवलीला जावे लागते. यामध्ये खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अवाच्या सव्वा रक्कम घेतात. यामुळे स्थानिकांना नाहक त्रास होत आहे. याकरता भाईंदर ते श्रीवर्धन एसटी बस सेवा पुर्ववत करण्याच्या मागणी करता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले पाच नवीन न्यायाधीश!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींचा शपथविधी आज पार पडला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी त्यांना शपथ दिली. या पाच जणांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंकज मित्तल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पीव्ही संजय कुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अहसानुद्दीन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.

मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या नियुक्तीला अखेर हिरवा कंदील मिळाला. कायदे मंत्री किरण रिजीजू यांनी सातत्याने सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवरून वादग्रस्त वक्तव्यं केली होती. किरण रिजीजू यांच्या वक्तव्यांच्या मालिकेमुळे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलाच वादाचा सामना रंगला होता. अखेर या सर्व प्रकरणाला पूर्णविराम मिळून पाच न्यायमूर्तींचा आज शपथविधी पार पडला.

न्यायमूर्ती पंकज मित्तल

पंकज मित्तल यांचे मूळ कॅडर अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. सरन्यायाधीश पंकज मित्तल यांनी 1985 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश गृहनिर्माण आणि विकास मंडळाचे स्थायी वकील म्हणून काम केले. 1990 ते फेब्रुवारी 2006 दरम्यान ते डॉ बीआर आंबेडकर विद्यापीठ, आग्राचे स्थायी समुपदेशक होते. न्यायमूर्ती मित्तल यांची 7 जुलै 2006 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. 2 जुलै 2008 रोजी त्यांनी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी 4 जानेवारी 2021 रोजी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी सामान्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

न्यायमूर्ती संजय करोल

आज शपथ घेणारे दुसरे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती करोल आहेत, ज्यांचे मूळ उच्च न्यायालयाचे कॅडर हिमाचल प्रदेश आहे. पदोन्नतीच्या वेळी ते पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती करोल यांचा जन्म 23 ऑगस्ट 1961 रोजी झाला. न्यायमूर्ती करोल यांनी उच्च न्यायालयासह विविध न्यायालयात प्रॅक्टिस केली. राज्यघटना, कर आकारणी, कॉर्पोरेट, फौजदारी आणि दिवाणी या विषयांमध्ये त्यांना निपुणता आहे. 1999 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

न्यायमूर्ती करोल हे 1998 ते 2003 पर्यंत हिमाचल प्रदेशचे महाधिवक्ता देखील होते आणि 8 मार्च 2007 रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची उन्नती झाली. त्यांची 25 एप्रिल 2017 पासून न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची 9 नोव्हेंबर 2018 रोजी त्रिपुरा उच्च न्यायालय आणि 11 नोव्हेंबर 2019 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार

न्यायमूर्ती कुमार हे मूळ तेलंगणा उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत. पाच न्यायाधीशांच्या यादीत ते तिसरे आहेत आणि गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी कॉलेजियमने शिफारस केली. नंतर केंद्राने मान्यता दिली तेव्हा ते मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1963 रोजी झाला. हैदराबादच्या निजाम कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आणि 1988 मध्ये दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पदवी प्राप्त केली.

न्यायमूर्ती कुमार यांनी ऑगस्ट 1988 मध्ये आंध्र प्रदेशच्या बार कौन्सिलचे सदस्य म्हणून नावनोंदणी केली आणि 2000 ते 2003 पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले. 8 ऑगस्ट 2008 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून खंडपीठात वाढ झाली आणि 20 जानेवारी 2010 रोजी त्यांनी न्यायालयाचे कायम न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. न्यायमूर्ती कुमार यांनी 14 ऑक्टोबर 2019 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी 14 फेब्रुवारी 2021 रोजी मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला

पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमानुल्ला हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले चौथे न्यायाधीश आहेत. त्यांचा जन्म 11 मे 1963 रोजी झाला. 27 सप्टेंबर 1991 रोजी त्यांनी बिहार राज्य बार कौन्सिलमध्ये नावनोंदणी केली आणि मार्च 2006 ते ऑगस्ट 2010 पर्यंत ते राज्य सरकारचे स्थायी वकील होते. पाटणा उच्च न्यायालयात ते सरकारी वकील होते. 20 जून 2011 रोजी त्याच कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांची बढती झाली. 10 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात आणि 20 जून 2022 रोजी पाटणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

न्यायमूर्ती मनोज मिश्रा

न्यायमूर्ती मिश्रा यांचा जन्म 2 जून 1965 रोजी झाला. त्यांनी 12 डिसेंबर 1988 रोजी वकील म्हणून नावनोंदणी केली आणि 21 नोव्हेंबर 2011 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी 6 ऑगस्ट 2013 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली.

तुर्कीत हाहाकार! १३०० हून जास्त लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त

भूकंपाच्या ३ धक्क्यांनी तुर्की, सीरिया, लेबनॉन, इस्रायल हादरले

४ देशांमध्ये खूप मोठा विध्वंस

अंकारा : तुर्की आणि सिरियाला या दशकातील सर्वात मोठ्या भूकंपाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलं असून त्यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी १.२४ मिनीटांनी दुसरा धक्का बसला असून यामध्ये तुर्की आणि सिरीयातील शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. लागोपाठ झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे सहा हजार लोक जखमी झाले आहेत. राजधानी अंकारा, नुरदगी शहरासह १० शहरांमध्ये यामुळे प्रचंड मोठा विध्वंस झाला. याशिवाय सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सिरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे त्या ठिकाणच्या सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सिरियामध्ये आतापर्यंत ३२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तुर्कीमध्ये आतापर्यंत ९०० हून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुर्कीत झालेल्या या भूकंपाचे केंद्र हे गाझियानटेप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक दबले गेल्याने दोन्ही देशांतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या लेबनॉन आणि इस्रायलकडून कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे नुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस प्रांतातील गझियाटेप शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे २४ किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता हा भूकंप झाला. ११ मिनिटांनंतर ६.७ रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून ९.९ किलोमीटर खाली होते. दुसऱ्या भूकंपानंतर १९ मिनिटांनी ५.६ रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला. त्यामुळे अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

अदानी प्रकरणी काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्रासह देशभरात एसबीआय-एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात असलेल्या भाजप प्रणीत एनडीए सरकार अदानी प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अदानी प्रकरण केवळ देशच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार चर्चेत आहे. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लाऊन धरला आहे. प्रामुख्याने काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक आहे.

छाया :अरूण पाटील

हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा रिपोर्ट आला आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका बसला. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेली कथीत आर्थिक अफरातफर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अदानींच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या सरकारी संस्थांबद्दलही चिंता व्यक्त होते आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षही जोरदार आक्रमक झाला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि संसदेबाहेरही याच मुद्द्यावरुन काँग्रेस आवाज उठवत आहे. काँग्रेस पक्षाने अदानी प्रकरणावरुन आज देशभर आंदोलने सुरु केल आहेत.

काँग्रेस खासदार संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत आहेत. तर एनएसयूआय-युथ काँग्रेस संसद पोलीस ठाणे हद्दीतील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पाने सर्वसमावेशक सकारात्मकता निर्माण केली

0
  • ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भाजपा, रत्नागिरी

नरेंद्र मोदी शासनाच्या विद्यमान टर्ममधील हे अंतिम बजेट, तर निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले पाचवे बजेट. अमृत काळातले हे पहिले-वहिले बजेट. सर्वसमावेशक तसेच अंत्योदयाचे मूळ तत्त्व अधिक फोकस करत असतानाच सर्वसामान्य नागरिकांना आयकर उत्पन्न मर्यादेत वाढ करत सुखावह धक्का दिला. आयकर मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढवताना आयकर रचनेचे स्लॅबही पुनर्रचीत केले. त्यामुळे करदात्यांवरचा कराचा बोजा काही प्रमाणात हलका झाला. महिला सन्मान बचत योजनेने नारी शक्तीला महत्त्व देत मोठी गुंतवणूक करण्याचा मार्ग सुकर केला. बुजुर्ग नागरिकांना बचतीची १५ लाखांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करत आर्थिक स्थैर्य मनमुराद अनुभवण्याची संधी दिली. सर्वसामान्य नागरिकांसाठी अर्थसंकल्पातील ही प्रावधाने सकारात्मक, उत्साही वातावरण निर्माण करणारी आहेत. या अर्थसंकल्पाचे नक्कीच उत्स्फूर्त स्वागत केले आहे हे दोन दिवस येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते.

सन २०१४ मध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या शासनाने केंद्रातील सत्ता स्वीकारली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर क्र.१० वर होती. आज या क्रमवारीत मोठी झेप घेत भारताची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानी पोहोचली आहे. दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक तूट मर्यादेत राखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्गुंतवणुकीचे माध्यमातून जमा होणारे भांडवली उत्पन्न हे भांडवली खर्चासाठी अधिक प्रमाणात वापरले जात असल्याचे दिसत आहे.

पायाभूत सुविधा

गेल्या ९ वर्षांत अनेक बदल झालेले आपण पाहत आहोत. देशभर पसरलेले हायवेजचे जाळे, रेल्वेचे जाळे, विमान सेवांची वाढती संख्या, विकसित होणारे विमानतळ या सर्व पायाभूत सुविधांची निर्मिती देशाच्या प्रगतीची यशोगाथा प्रवाही करत आहे.

आरोग्य क्षेत्रात भरारी

आपण आरोग्य क्षेत्रातही खूप काम होताना पाहतो आहोत. एम्स हॉस्पिटलची वाढलेली लक्षणीय संख्या, नवनवीन मेडिकल कॉलेज, नवनवीन हॉस्पिटल्स या माध्यमातून आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सर्वदूर दिसत आहेत.

डिजिटल व्यवहारात विक्रमी वाढ

डिजिटल पेमेंट पद्धतीने तर विक्रमी काम केले. नोटाबंदीनंतर डिजिटल युगाने खरी भरारी घेतली आणि आज जागतिक क्रमवारीत भारत पहिल्या पाच देशांत समाविष्ट आहे ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतातील डिजिटल आर्थिक व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात प्राप्त झालेले यश हे शासनाच्या डिजिटल व्यवहारांना गतीमानता देण्याच्या धोरणाला जनमानसाने पाठिंबा दिल्याचे द्योतक आहे.

सर्वसमावेशी बँकिंग क्षेत्राशी संलग्नता

सन २०१४ मध्ये सत्तास्थानी आल्यानंतर मोदी शासनाने जनधन खाते काढण्याचा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयचा पुढचा महत्त्वाचा टप्पा होता. १९६९ मध्ये राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर ४०% जनता बँकिंग नेटवर्कचे बाहेर होती. या सर्व जनतेला बँकांजवळ संलग्न करण्याचे महत्त्वपूर्ण काम जनधन माध्यमातून करण्यात आले. ४७.८० कोटींच्या पुढे जनधन खाती उघडण्यात आली. ही संख्या अमृत काळात मार्गस्थ होताना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जनधन खात्यांच्या सुरुवातीनंतर केंद्र शासनाने सर्व मध्यस्त व्यवस्थांना दूर करत थेट या खात्यात लाभार्थींसाठी विविध लाभ यशस्वी आणि प्रभावी पद्धतीने जमा करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे केंद्रांकडून मिळणारा संपूर्ण लाभ हा लाभार्थीपर्यंत थेट पोहोचू लागला. या प्रक्रियेमुळे जनसामान्य, आर्थिक, दुर्बल घटक ही बँकिंग व्यवस्थेशी संलग्न झाले ही एक प्रकारची क्रांती म्हणता येईल. देशाच्या अर्थसंकल्पातून या विषयांचे महत्त्व अधोरेखित होते.

आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रभावी राबवली जावी त्यासाठी पूर्ण आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात दिसून येते. स्टार्टअप सुरू व्हावेत, MSME उद्योगांना भक्कम पाठिंबा द्यावा यासाठी कर सवलत देतानाच नवतंत्रज्ञानाची जोड देत अर्थसहाय्यासाठी मोठी तरतूद या अर्थसंकल्पात करून MSME या प्रमुख उद्योग प्रकाराच्या मागे केंद्रशासन खंबीरपणे उभे आहे हे स्पष्ट करण्यात आले. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १० लाख करोड रुपयांची केलेली तरतूद ही लक्षणीय असून देशाच्या प्रगतीचा पुढचा टप्पा सुनियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी, अर्थचक्र गतिमान करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल या अर्थसंकल्पाला अधिक प्रभावी बनवते. निर्गुंतणकीकरणातून प्राप्त होणारा पैसा पायाभूत सुविधांसाठी अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल केंद्र शासनाने या अर्थसंकल्पा माध्यमातून उचलले आहे.

शेती व मस्त्य व्यवसायासाठी तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा इरादा या अर्थसंकल्पाने केलेला दिसतो. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, संशोधने व्हावीत, नवतंत्रज्ञानाचा किफायती उपयोग मोठ्या प्रमाणावर व्हावा, शेती, बागायती प्रक्रिया, याचबरोबर गोदाम निर्मिती याला महत्त्व देत उचित उपक्रम व तरतुदी खूप उपयुक्त ठरतील. शेती व्यवसायात नवे स्टार्टअप निर्माण व्हावेत.

डिजिटल ग्रंथालय

डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती तसेच अन्य ग्रंथालयाची ग्रामीण पातळीवर निर्मिती यासाठीसुद्धा विशेष प्रावधान लक्षणीय ठरेल. रेल्वेसाठी आतापर्यंतच्या तरतुदीपेक्षा सर्वात जास्त तरतूद करून रेल्वेचा विस्तार वाढवण्याची, दळणवळणामध्ये रेल्वेचे महत्त्व लक्षात घेऊन केलेली तरतूद रेल्वे सेवेला नवा आयात देण्याकडचे पाऊल ठरणार आहे. अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना पुढच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा रोड मॅप स्पष्ट करताना पहिली १० पावले पुढे टाकले आहेत. अंत्योदयाचे तत्व, सर्व समावेशकता, युवा महिला शक्ती जागर, नव उद्योगाला प्राधान्य, कृषी क्षेत्राचे महत्त्व, पायाभूत सुविधांचा विकास या सर्व बिंदूंना अंतर्भूत करत एक चतुरस्त्र अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाचे सर्वसामान्य जनतेने सहर्ष स्वागत केले असून शेतकरी वर्ग, उद्योग जगत यामध्येही उत्साही वातावरण दिसून येते. आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून अग्रनामांकित करण्यासाठी हा अर्थसंकल्प समर्पित राहील.

न्या. चपळगावकरांचे खडेबोल, पण…

प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटल यांचे एक प्रसिद्ध वचन आहे की, कोणत्याही लोकशाहीचा आधार हा स्वातंत्र्य असतो. या वचनाची आठवण होण्याचे कारण निवृत्त न्यायमूर्ती आणि वर्धा येथे भरलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी सरकारला सुनावलेले खडेबोल हेच होते. त्यांनी सरकारला अध्यक्षपदावरून बोलताना बऱ्याच गोष्टी सुनावल्या आहेत. सरकारने साहित्य संमेलन आयोजित करू नये, असेही परखडपणे म्हटले. त्यामुळे साहित्याचे सरकारीकरण होते, हे त्यांचे म्हणणे योग्यच आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी अरिस्टॉटलचे वचनच पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विद्यमान सरकारची ते समजून घेण्याची पात्रता आहे की नाही, याबद्दल काहीच सांगता येणार नाही. न्यायमूर्ती चपळगावकर यांची उच्च प्रतीची साहित्यिक कामगिरी पाहता त्यांना सरकारला सुनावण्याचा अधिकार आहे याबद्दल आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल कुणाचेही दुमत होणार नाही. ते म्हणाले ते शंभर टक्के खरे आहे. पण साहित्यिक सरकारला सुनावतात आणि सरकारी बक्षिसांसाठी तेच सरकारच्या दारी उभे राहत असतात. सरकारला साहित्यिक म्हणून सुनावणे आणि परखडपणा दाखवणे हे अगदी योग्य असले तरीही दुसरीही बाजू आहेच. सरकारच्या सहाय्याशिवाय साहित्य संमेलने आजचा खर्च आणि थाटमाट पाहता साहित्य महामंडळाला स्वतःच्या ताकदीवर भरवणे शक्यच नाही. न्या. चपळगावकर यांनी साहित्याचा संसार गरिबीत चालला तरी चालेल, पण सरकारी सहाय्य नको, असे म्हटले आहे. पण सरकारच्या सहाय्याशिवाय साहित्य संमेलने एखाद्या झोपडीतही आयोजित करणे शक्य होणार नाही. कारण साहित्य क्षेत्राची आज आर्थिक ताकदच नाही. साहित्यिकांच्या वतीने त्यांनी सरकारला सुनावले, हे योग्यच झाले. कारण साहित्यिक हा लाचार नसतो, हे त्यानिमित्ताने सिद्ध झाले. सरकारनेही आपण साहित्यिकांना आर्थिक मदत करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो, असे समजण्याचे काहीच कारण नाही. साहित्य संमेलनासाठी सरकारी अनुदान घ्यावे की नाही, हा वाद पूर्वीही होता. काही साहित्यिकांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून अनुदान घेतले तरीही (ते पंचवीस लाख रुपये असायचे) साहित्यिकांनी सरकारपुढे लाचारी पत्करता कामा नये. त्यातही तथ्य होतेच. कारण सरकार काही आपल्या पदरचे पैसे घालत नाही. पण न्या. चपळगावकर यांच्या या वक्तव्याच्या निमित्ताने चार गोष्टींचा उल्लेख साहित्यिकांबद्दलही करणे आवश्यक आहे. साहित्यिकांचा सिलेक्टिव्ह तडफदार बाणा हा तपासून पाहिला पाहिजे. पक्षीय राजकारणात जायचे नाही. पण जेव्हा केंद्रात किंवा राज्यात उजव्या पक्षांचे सरकार असते तेव्हा साहित्यिकांचा बाणा उफाळून येतो. २०१५ मध्ये उत्तर प्रदेशात दोन घटना घडल्या आणि त्याविरोधात नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी वगैरे ३९ साहित्यिकांनी आपापले पुरस्कार परत करण्याच्या घोषणा केल्या. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणूक व्हायची होती. पण वस्तुस्थितीचा तपास केला असता असे आढळले की, अनेक साहित्यिकांनी केवळ पुरस्कार वापसीच्या घोषणा करून प्रसिद्धी मिळवली. पण त्यांनी पुरस्कार परत केलेच नाहीत, तर काहींनी स्मृतिचिन्हे परत केली नाहीत. धनराशीही आपल्याकडेच ठेवल्या. या ढोंगीपणाबद्दलही कुणीतरी बोलायला हवे. ते एक असो. पण साहित्य संमेलनात चपळगावकर यांच्या परखड वक्तव्यावरून आता वाद होण्याची शक्यता नाही. कारण हल्ली साहित्य संमेलनाचे ग्लॅमर संपले आहे. पण असे वाद पूर्वीपासून चालत आले आहेत. सरकारने साहित्य संमेलनात सहभाग घ्यावे का इथपासून ते साहित्य संमेलने प्रायोजित करावीत का, इथपर्यंत चर्वितचर्वण
झाले आहे.

१९७४ मध्ये पु. ल. देशपांडे यांनी तत्कालीन केंद्रातील कॅबिनेट मंत्री यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर बसणार असतील तर आपण अध्यक्षच होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतरच्याच वर्षी आणीबाणीविरोधात देशभर संघर्ष उभा करणारे जयप्रकाश नारायण हे आजारी असताना त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गा भागवत यांनी दोन मिनिटे मौन पाळण्याची सूचना केली. तेव्हा प्रेक्षकांत बसलेले यशवंतराव चव्हाण यांना नाईलाजाने उभे राहावे लागले. त्यावेळी यशवंतरावांची खुर्ची गेली, अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इतका राजकारण आणि साहित्य चळवळ यांचा निकटचा संबंध आहे. न्या. चपळगावकर यांनी साहित्य संमेलने सरकारने भरवू नयेत, ही घेतलेली भूमिका आक्रस्ताळेपणाची आणि आततायीपणाची आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही. पण तिला व्यावहारिक जोड असली पाहिजे. टोकाच्या भूमिका दोघानीही घेऊ नयेत. सरकारच्या मदतीशिवाय साहित्य संमेलन भरूही शकत नाही, हे सत्य स्वीकारावेच लागेल. साहित्यिकांना सरकारला ठोस सुनावण्याची हीच एक संधी असते. असल्या वादांमुळे खऱ्या साहित्यविषयक चर्चा होत नाहीत. त्यामुळे साहित्य संमेलन आयोजनाचा मूळ हेतूच नष्ट होतो. साहित्यविषयक गंभीर चर्चा, लोकांना साहित्याकडे पुन्हा कसे वळवावे, यावर काहीच चर्चा केली जात नाही. उलट वर्तमानपत्रेही साहित्य संमेलनात जेवणाचे मेनू काय होते वगैरे फालतू तपशिलांनी रकाने भरतात. त्यात वाचकांना कोणत्या गावात कोणत्या सीझनला काय मिळते, याचे ज्ञान होण्यापलीकडे काहीही लाभ होत नाही. आता तर साहित्य संमेलनांना गर्दी प्रचंड होते पण पुस्तक विक्रीला प्रतिसाद मिळत नाही. कारण साहित्यविषयक ग्लॅमर कमी झाले आहे. त्यात मोबाइलचे आक्रमण आहे. साहित्यिक आणि सरकार यांच्यातील वादापलीकडे साहित्य विश्व पुढे जाण्यात या संमेलनांचा काही तरी उपयोग व्हावा. साहित्यविषयक लोकांत आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सरकारला खडेबोल सुनावून काहीच लाभ पदरात पडणार नाही.

मागणीला प्रोत्साहन देणारा विकासवेधी अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच जो २०२३-२४ या वर्षांसाठी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात मागणी वाढवण्याच्या उद्देश्याने बहुसंख्य तरतुदी केल्याचे दिसते. करदाते, रेल्वे, रोजगार निर्मिती आणि भांडवली खर्च या हेतूंना जोरदार प्रोत्साहन अर्थमंत्र्यांनी दिले आहे. मध्यमवर्गाला दिलासाही देताना सुरुवातीला गोंधळच झाला. कारण सुरुवातीला सात लाख रुपयांपर्यंत एकही पैसा कर म्हणून द्यावा लागणार नाही, असा सीतारामन यांच्या वाक्याचा अर्थ होत होता. त्यामुळे मध्यमर्ग आनंदाने उड्याच मारत होता. पण प्रत्यक्षात हा दिलासा सात लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्सरिबेटवर आहे, हे समजल्यानंतर आकाशात उडणारा मध्यमवर्ग जमिनीवर आला. पण नव्या कर संचरनेतही अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रमाणित वजावट (Standard Deduction) लागू करून जुनी कर संचरना जवळपास मोडून काढण्याचेच ठरवले असल्याचे संकेत दिले. अर्थमंत्र्यांचा संपूर्ण अर्थसंकल्प पाहिला असता तर असे दिसते की मागणी वाढवणे हेच त्याचे मुख्य सूत्र आहे आणि कोणतेही अर्थचक्र मागणी असेल तरच चालते. अन्यथा ते एकाच जागी थांबून राहाते. कोरोना काळात मागणी जवळपास ठप्प झाली होती आणि त्यामुळे बाजारात पैसा खेळणे बंद झाले होते. ते चक्र अर्थमंत्र्यांनी हाताने परत फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाने पिचलेल्या मध्यमवर्गाला त्यांनी कर संरचनेत दिलासा दिला आणि त्यामुळे त्या वर्गाच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे आणि त्याची क्रयशक्ती वाढून तो अधिक खरेदी करेल आणि त्यामुळे मागणी वाढेल. उत्पादन वाढेल आणि रोजगार वाढणार, असे हे गणित आहे. त्याचवेळी अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांनी भांडवली खर्च वाढवला आहे ज्याचा अर्थ नवीन रस्ते, प्रकल्प आणि इमारती वगैरे बांधण्याकडे होणारा खर्च असतो. यामुळे अर्थातच गुंतवणूक वाढणार आणि त्यातून पुन्हा रोजगार वाढणार आहेत. शिवाय रेल्वेसाठी दोन लाख कोटी रुपयांचा भांडवली आराखडा दिला आहे. त्यातून रेल्वेचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण यासाठी पैसा दिला जाईल. पण पायाभूत सुविधा, इमारती बांधकामासाठी अधिक तरतूद करण्यामागे पोलादाची मागणी वाढवण्याचा उद्देश आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे पोलादाची मागणी प्रचंड वाढली असून पुरवठ्यात प्रचंड तुटवडा आहे. युद्धामुळे तिकडे पोलाद निर्यात केले जाऊ शकत नाही. देशांतर्गत बाजारपेठेत ६० टक्के पोलादाचा वापर पायाभूत क्षेत्रात केला जातो. पायाभूत प्रकल्पांमुळे पोलादाची शाश्वत मागणीही अर्थसंकल्पात सुनिश्चित केली आहे. अन्यथा पोलाद कारखाने बंद पडण्याची भीती होती. शिवाय रेल्वेच्या विस्तारीकरणामुळे पोलादाची मागणी आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ सुचवलेली नाही. कारण अर्थातच हे इलेक्शन बजेट आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होत असल्याने या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात करवाढ किंवा सामान्यांच्या जीवनातील रोजच्या वस्तू महाग करणे सरकारला परवडणारे नव्हतेच. त्यात काही गैर आहे, असे नाही. विरोधकांनी हे इलेक्शन बजेट आहे, वगैरे जी नेहमीप्रमाणे ठरीव आणि पठडीबाज अशी टीका केली, त्यात काही अर्थ नसतो. कारण प्रत्येक सत्ताधारी पक्ष असेच करत असतो. त्यामुळे भाजपने करवाढ केली नाही किंवा सवंग लोकप्रिय घोषणा केल्या म्हणून विरोधकांनी छाती बडवून घेण्याची काहीच गरज नाही.

महत्त्वाचा वर्ग म्हणजे शेतकऱ्यांचा. त्यांच्यासाठी काही घोषणा आहेत, ज्यात कृषी गतिवर्धक निधीची स्थापना आणि शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्सना प्रोत्साहन या महत्त्वाच्या आहेत. यातून शेती क्षेत्राला फार मोठे सहाय्य होईल, पण त्यांची अंमलबजावणी कितपत कार्यक्षमतेने केली जाईल, यावर ते अवलंबून आहे. वीस लाख कोटी रुपयांची शेती क्षेत्रासाठीची योजना मात्र निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यातून शेतीसाठी महत्त्वाच्या तरतुदी केल्या जातील. पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही साध्य झालेले नाही. शेतकरी वर्गाची विपन्नस्था सुरूच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलामगिरीतून सोडवणारे कायदे मोदी यांनी आणले होते. पण शेतकरी वर्गानेच काँग्रेसच्या बहकाव्यात येऊन त्या कायद्यांना विरोध केला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपला माल कमी किमतीत आडत्यांना विकण्याशिवाय पर्याच नाही. त्यातून शेतकरी आत्महत्या होत असतात. शेतीचा खरा प्रश्न आहे तो शेत पिकाला किमान आधारभूत किमत देण्याचा. म्हणजे आधारभूत किमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याना देण्याचा. तो निर्णय घेण्याची हिंमत कोणतेच सरकार दाखवू शकत नाही. कोणतेही सरकार ते भविष्यातही दाखवणार नाही. पण मत्स्यव्यवसायासाठी ६ हजार कोटी रुपयांची घोषणा कोकणातील मच्छीमार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. जे मच्छीमार खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात, त्यांना डिझेलचा परतावा देण्याची तरतूद कायद्यात आहे. पण हा परतावा मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळण्यास प्रचंड विलंब होत असतो आणि त्यासाठी मच्छीमारांना सतत संघर्ष करावा लागतो. शिक्षणावर यंदा जास्त तरतूद केली आहे हे महत्त्वाचे आहे कारण कोरोना काळात शिक्षणावरील तरतुदीवर मर्यादा आल्या होत्या. मोबाइल फोन्स स्वस्त करणे आणि सिग्रेटवर कर वाढवणे यावर दुमत होणार नाही. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र म्हणजे एमएसएमईसाठी नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद समाधानकारक नसली तरी अपुरीही नाही. या क्षेत्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला होता. बरेच उद्योग बंद पडले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी ही तरतूद महत्त्वाची आहे. एकूण विकासवेधी आणि तरीही सवंग लोकप्रियतेच्या घोषणा न करणारा आणि मागणीला प्रोत्साहन देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.

-उमेश कुलकर्णी

यंदाच्या पालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर

मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पक सूचनांचा विचार करून पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात जास्त भर हा पायाभूत सुविधांवर करण्यात आला आहे. नागरिकांच्या दर्जेदार जीवनमानाकरिता गुणात्मक नागरी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने या वर्षी पायाभूत सुविधांच्या कामांकरिता पालिकेने तब्बल २७ हजार २४७.८० कोटी इतकी तरतूद केली आहे. यात मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा व मलनिस्सारण बोगदे, मिठी नदी प्रकल्प, नद्यांचे पुनरुज्जीवन, आश्रय योजना, रुग्णालयांची विकासकामे असून यांसह हे प्रकल्प लवकर कसे पूर्ण होतील, त्यावर पालिका भर देणार आहे, तर मुंबईचे सौंदर्य वाढवण्यासाठी व तिचे स्वरूप अधिक आकर्षक करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाखाली महापालिकेने मुंबईमध्ये १ हजार ७२९ कोटी इतक्या अंदाजित खर्चाचीही सुशोभीकरणाची अशी विविध कामे हातात घेतली आहेत. नवीन मोठ्या प्रकल्पांची उगाच लोकप्रियतेसाठी घोषणा करण्यापेक्षा जुन्या लोकोपयोगी योजना पूर्ण करण्यावरच यंदाच्या अर्थसंकल्पावर भर देण्यात आला आहे.

रस्ते ही एक महत्त्वाची व पायाभूत सुविधा असते. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाढणाऱ्या वाहतुकीमुळे रस्ते बांधणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत. त्या दृष्टीने रस्ते वारंवार खोदावे लागू नयेत म्हणून चर खोदकाम व पुन्हा पुष्टीकरण प्रक्रियेतही पालिकेने बदल केले आहेत. आतापर्यंत पालिकेने ९९० कि. मी. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले असून २१० किमीचे आदेश गेल्या महिन्यात दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै महिन्यात घेतलेल्या बैठकीमध्ये मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ३९७ कि. मी. लांबीच्या रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, तर उर्वरित रस्त्यांसाठी या वर्षी निविदा मागवण्यात येणार आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण व ज्या रस्त्यावर जास्त खड्डे पडतात, त्या रस्त्यांचे पूर्ण पुष्टीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेट वे ऑफ इंडिया परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार असून ज्यामध्ये गेट वे ऑफ इंडियाच्या कमानीवर असलेली कलाकुसर लक्षात घेऊन त्यानुसार परिसरातील जंक्शनचे सौंदर्यीकरण, पादचाऱ्यांसाठी अनुकूल स्टॅम्प काँक्रीटमधील पदपथ पालिका करणार आहे.

मुंबई शहरातील वाढती वाहनांची सेवा लक्षात घेता पार्किंगची समस्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता लवकरच मॅकेनिकल रोबोटिक प्रणालीने चालवण्यात येणारी पार्किंगची व्यवस्था पालिकेतर्फे सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या पार्क व क्रीडांगणाच्या मोकळ्या जागेत, जमिनीखाली व जमिनीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी मुंबईत ५ ठिकाणांची निवड करण्यात आली असून ही सेवा माटुंगा, पूर्व आणि मुंबादेवी येथे लवकरच सुरू होणार असून वांद्रे, राणीबाग व हब वरळी येथे ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाअंतर्गत सर्व कामे प्रगतिपथावर असून आजपर्यंत ६९ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मोठ्या बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे. तर गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतच्या दुसऱ्या बोगद्याचे कामही ९० टक्के पूर्ण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सागरी किनारा प्रकल्पाअंतर्गत भूमिगत पार्किंग क्षेत्राचे बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे तसेच पुनर्प्रापण सुविधांसाठी ७० हेक्टर क्षेत्र हे मनोरंजन सुविधांसाठी हरितपट्टा म्हणून विकसित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वर्षापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता पूर्ण झाल्यास पूर्व पश्चिम जोडणारा आणखी एक रस्ता उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होईल. नंतर गोरेगाव, पूर्व येथे पेटी बोगदा व जोड बोगदा बनवण्यात येणार आहे. या वर्षी मुंबई महापालिका ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या सर्व प्रमुख रस्त्यांसाठी पदपथ सुविधांचा नकाशा तयार करणार असून जेथे पदपथ नसेल किंवा सुस्थित नसतील तेथे चालण्यासाठी सुलभ अशा पदपथ पृष्ठभागाकरिता आतंरराष्ट्रीय स्तराच्या डिझाइन्ससह जलदगतीने नवीन सिमेंट काँक्रीटचे पदपथ बांधले जातील.मुंबईकरांची सार्वजनिक सुरक्षितता व सोय आणि सार्वजनिक हितासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली असून माहिती तंत्रज्ञान उपाययोजना, वाहतूक चिन्हे रेखांकन आणि सुनियोजित संदेशवहन याद्वारे रस्त्यावरील प्रवासाच्या अनुभवाचा एकूणच दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ही पायाभूत सुविधा भारतात मुंबईत प्रथमच अनुभवता येणार आहे. मुंबई शहरात पुलांची कामे ही प्रगतिपथावर असून एकूण १४ उद्याणपुलांची कामे सुरू आहेत तसेच ६ उड्डाणपुलांची कामे प्रस्तावित आहेत. विद्याविहार स्थानक आणि विक्रोळी रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून डिलाईल रोड येथील रेल्वे पुलाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. ते लवकरच पूर्ण होईल तर इतर उड्डाणपूलही लवकरच सुरू होतील. मुंबई स्वच्छ हवा उपक्रम तीन व्यापक उद्दिष्टासाठी कार्य करणार आहे. मुंबईच्या खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेला रस्त्यांवरील व बांधकामातील धूळ, वाहतूक कोंडी, उद्यान व ऊर्जा क्षेत्र आणि कचरा जाळणे हे चार प्रमुख घटक कारणीभूत ठरतात. मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, वायू प्रदूषकांचे उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने मुंबई पालिकेमार्फत मुंबई स्वच्छ व उपक्रमाअंतर्गत सात योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. मुंबई शहरात सुमारे २० हजार शौचकुपांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुढील वर्षात नवीन २० हजार शौचकुपांची निर्मिती पालिका करणार आहे. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर लोकसंख्येकरिता पुरेशी सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्याकरिता महामार्ग ज्या विभागातून जातो, त्या विभागात पैसे द्या व वापर या तत्त्वावर आधुनिक सोयीयुक्त प्रसाधनगृह पालिका निर्माण करणार आहे.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही जास्त रकमेचा असतो. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र वाढता खर्च व आटलेले उत्पन्न पाहता मुंबईची ही ओळख कायम राहील की, नाही असा प्रश्न पडतो. जकात कर, मालमत्ता कर हे मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या उत्पन्नापैकी महत्त्वाचे स्त्रोत आहेत. त्यातील जकात कर बंद झाल्याने आणि मालमत्ता करवसुली घटल्याने मुंबई महापालिकेसमोर शहरात विकासकामे करण्यासाठी आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. अर्थसंकल्पातील ५० ते ७० टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच खर्च होतो. उर्वरित खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो. तो ही आता कमी होत चालला आहे.

– अल्पेश म्हात्रे