कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडल आणि ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश जाधव हा अटल नमो चषकाचा मानकरी ठरला.
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन कल्याण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून शरीर सौष्ठव पटू सहभागी झाले होते. एकूण ७ गटात हि स्पर्धा घेण्यात आली. ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो आणि ८५ किलो या वजनीगटात स्पर्धा पार पडली. यामध्ये प्रत्येक गटात अनुक्रमे मंगेश पाटील, दिपक गुप्ता,सुरेंद्र डगवाल, समीर म्हसकर, बुद्धीराज गायके, राहुल क्षेत्रे आणि गणेश जाधव हे विजयी ठरले. तर बेस्ट पोजर हा किताब विनायक लोखंडे याने तर अटल नमो चषक गणेश जाधव याने पटकावला.
या सर्व विजेत्या स्पर्धकांना कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अटल नमो चषक विजेत्या स्पर्धकाला १५ हजार रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात आला. ग्रामीण भागातील शरीर सौष्ठव पटूना संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली. यावेळी ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे राजेंद्र चव्हाण, माजी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, दीपक गायकवाड आदी मान्यवर देखील उपस्थित होते.