Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीतुर्कीत हाहाकार! १३०० हून जास्त लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त

तुर्कीत हाहाकार! १३०० हून जास्त लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त

अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती

भूकंपाच्या ३ धक्क्यांनी तुर्की, सीरिया, लेबनॉन, इस्रायल हादरले

४ देशांमध्ये खूप मोठा विध्वंस

अंकारा : तुर्की आणि सिरियाला या दशकातील सर्वात मोठ्या भूकंपाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलं असून त्यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी १.२४ मिनीटांनी दुसरा धक्का बसला असून यामध्ये तुर्की आणि सिरीयातील शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. लागोपाठ झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे सहा हजार लोक जखमी झाले आहेत. राजधानी अंकारा, नुरदगी शहरासह १० शहरांमध्ये यामुळे प्रचंड मोठा विध्वंस झाला. याशिवाय सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. सिरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे त्या ठिकाणच्या सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सिरियामध्ये आतापर्यंत ३२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तुर्कीमध्ये आतापर्यंत ९०० हून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुर्कीत झालेल्या या भूकंपाचे केंद्र हे गाझियानटेप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक दबले गेल्याने दोन्ही देशांतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या लेबनॉन आणि इस्रायलकडून कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे नुसार, पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कहरामनमारस प्रांतातील गझियाटेप शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून सुमारे २४ किलोमीटर खाली होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता हा भूकंप झाला. ११ मिनिटांनंतर ६.७ रिश्टर स्केलचा दुसराही भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून ९.९ किलोमीटर खाली होते. दुसऱ्या भूकंपानंतर १९ मिनिटांनी ५.६ रिश्टर स्केलचा तिसराही भूकंप झाला. त्यामुळे अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -