प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

सतीश पाटणकर

शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली, तर त्याचा निश्चितच फायदा होतो. कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कौशल्य व ज्ञान या दोन प्रेरणादायी बाबी आहेत. सध्याच्या वैश्विक परिस्थितीमध्ये ज्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थांकडे उच्च कौशल्य पातळी आहे, ते देश कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतात.

कोणत्याही देशामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमासाठी मुख्यत: युवा पिढीवर लक्ष केंद्रित केले जाते. या संदर्भात आपल्या देशाची स्थिती चांगली आहे. लोकसंख्येमधील एक मोठा गट कृतिशील आहे. यामुळे भारताला सुवर्ण संधी प्राप्त होते; परंतु त्याचसोबत समोर मोठी आव्हाने देखील उभी ठाकतात. जेव्हा आपली लोकसंख्या विशेषत: युवा पिढी निरोगी, सुशिक्षित व कुशल होईल तेव्हाच आपल्या अर्थव्यवस्थेला याचा लाभ होईल.

भारताकडे युवकांची संख्या अतुलनीय आहे ज्यामुळे भविष्यात सामाजिक व आर्थिक विकास वृद्धिंगत होणे निश्चित आहे. आपल्या देशात ६०५ दशलक्ष लोक २५ वर्षांपेक्षा लहान आहेत. रोजगारासाठी उपयुक्त कौशल्य प्राप्त करून युवा पिढी परिवर्तनाचे प्रतिनिधी होऊ शकतात, यामुळे फक्त त्यांचेच जीवन सुधारणार नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात देखील ही युवा पिढी आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात.

नुकतीच मंजूर झालेली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) ही युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मुख्य योजना आहे. या योजनेअंतर्गत, अभ्यासक्रमात सुधारणा, योग्य शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये व्यवहार कुशलता व व्यवहार परिवर्तन याचा देखील समावेश आहे. नवीन स्थापन करण्यात आलेले कौशल्य विकास व उद्योग मंत्रालय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) माध्यमातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करते. या अंतर्गत २४ लाख युवकांना प्रशिक्षण कक्षेत आणले आहे. कौशल्य प्रशिक्षण नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) व उद्योगद्वारा निश्चित केलेल्या मानदंडांवर आधारित असेल. या कार्यक्रमाअंतर्गत तृतीयपक्षी मूल्यांकन संस्थांनी केलेल्या मूल्यांकन व प्रमाणपत्रानुसार प्रशिक्षणार्थींना रोख पारितोषिक दिले जाईल. प्रति प्रशिक्षणार्थी अंदाजे ८ हजार रुपयांचे रोख पारितोषिक असेल.

एनएसडीसीने वर्ष २०१३-१७ या कालावधीसाठी नुकत्याच केलेल्या कौशल्य तूट अध्ययनाच्या माध्यमातून येणाऱ्या मागणीच्या आधारे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. केंद्र व राज्य सरकार, उद्योग आणि व्यावसायिक समूहांसोबत विचारविनिमय केल्यानंतर भविष्यातील मागणीचे आकलन केले जाईल, याकरिता, एक मागणी समूह मंच देखील सुरू करण्यात येत आहे. कौशल्य विकासाचे लक्ष्य निश्चित करतेवेळी नुकतेच लागू केलेले ‘मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान व स्वच्छ भारत अभियान’ या कार्यक्रमांची मागणी देखील लक्षात घेतली जाईल.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत श्रम बाजारात पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्यांवर मुख्यत्वे करून लक्ष केंद्रित केले जाईल आणि विशेषत: १० वी व १२ वीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल. एनएसडीसीच्या प्रशिक्षण भागीदारांद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. सध्या अंदाजे २,३०० केंद्रांवर एनएसडीसीचे १८७ प्रशिक्षण भागीदार आहेत. या व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारांशी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना देखील या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी जोडण्यात येईल. पीएमकेव्हीवाय अंतर्गत सेक्टर कौशल्य परिषद व राज्य सरकारे देखील कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची देखरेख करतील. योजनेअंतर्गत एक कौशल्य विकास व्यवस्थापन प्रणाली (एसडीएमएस) देखील स्थापन केली जाईल. जी सर्व प्रशिक्षण केंद्रांचा तपशील आणि प्रशिक्षण व अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची तपासणी करून त्याची नोंद करेल. जिथे शक्य असेल तिथे प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये बायोमॅट्रिक प्रणाली व व्हीडिओ रेकॉर्डिंगचा देखील अंतर्भाव करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींकडून माहिती (फिडबॅक) जमा करण्यात येईल, जी पीएमकेव्हीवाय योजनेच्या परिणामकारकतेच्या मूल्यांकनाचा मुख्य आधार असेल. तक्रारींच्या निवारणासाठी एक प्रभावी तक्रार निवारण प्रणाली देखील सुरू केली जाईल. याव्यतिरिक्त कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी एक ऑनलाइन नागरिक पोर्टल देखील सुरू केले जाईल.

या योजनेचा एकूण खर्च १ हजार १२० कोटी रुपये असून या योजनेतून १४ लाख युवकांना प्रशिक्षित केले जाईल आणि पूर्व शिक्षण प्रशिक्षणाला मान्यता देण्यावर विशेष जोर दिला जात आहे. यासाठी २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून युवकांना संघटित करून त्यांच्यात जनजागृती निर्माण करण्यासाठी ६७ कोटी रुपयांची तरतूद आहे. कौशल्य मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना संघटित केले जाईल आणि यासाठी स्थानिक पातळीवर राज्य सरकारं, स्थानिक संस्था, पंचायती राज संस्था व समुदाय आधारित संस्थांची मदत घेतली जाईल.

कौशल्य व उद्योग विकास याचा समावेश वर्तमान केंद्र सरकारच्या प्राधान्य सूचित आहेत. ‘मेक इन इंडिया’ अभियानाचे लक्ष्य साध्य करण्यामध्ये नवीन स्थापित कौशल्य आणि उद्योग विकास मंत्रालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. भारताला एक निर्मिती केंद्र म्हणून उदयाला येण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्मिती क्षेत्रासह सर्व क्षेत्रांच्या मागणीनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यामध्ये या मंत्रालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपयुक्त उपाययोजनांना समाविष्ट करून घेण्यासाठी एक नवीन राष्ट्रीय कौशल्य व उद्योग विकास धोरण देखील तयार करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या मनुष्यबळाचा विकास करण्याच्या दिशेने रूपरेखा तयार करण्यात येत आहे. वर्ष २०२२ पर्यंत ५५ कोटी लोकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाअंतर्गत तीन संस्था कार्य करीत आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास प्रयत्नांना धोरणात्मक दिशा प्रदान करून त्यांचा आढावा देखील घेत आहेत. योजना आयोगाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कौशल्य विकास समन्वय, पंतप्रधानांच्या परिषदेच्या नियमांना लागू करण्यासाठीच्या उपाययोजनांवर कार्य करीत आहे.

संपूर्ण विश्वात जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. जगातील तीन महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्थांच्या यादीत लवकरच भारताचा समावेश होईल, अशी आशा आहे. वर्ष २०२० पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र म्हणून देखील आपले स्थान निर्माण करेल. अनुकूल लोकसंख्या आणि दर्जात्मक मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आपला देश जागतिक अर्थव्यवस्थेत विशेष छाप सोडू शकतो. भविष्यातील बाजारपेठेसाठी कौशल्य विकासासह मनुष्यबळ विकसित करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला निश्चितच लाभ होईल. नवीन धोरणांतर्गत अभियान म्हणून लागू केलेली ही नवीन योजना मनुष्यबळ आणि उद्योग विकासामध्ये एका नवीन युगाची सुरुवात करेल.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

सोनाली

कथा : डॉ. विजया वाड

सोनालीला प्रथमच बघायला शंतू येणार अशी शेजारी बातमी पसरली.

परिचय विवाह…! शंतनू डॉक्टर! सोनाली पीएच.डी. शंतनू झाकीत! आपल्याच! शंतनू-सोनाली मात्र स्वस्थ चित्त होती. शंतनू सोनालीला बघून खूश झाला.

चहा-पोहे… झाले. रूढी परंपरा! हो!

“मी नवविचारांचा आहे.” “मीही!”

“मुली बघणे मला पसंत नाही.”

“मलाही.” सोनाली मनापासून म्हणाली.

“तुम्ही डॉक्टर, मी डॉक्टोरेट. मला पन्नास हजार पगार आहे.” सोनाली म्हणाली. “सोनाली, मी लाखभर कमावतो सहज.” “मला पैशांचे विशेष आकर्षण नाही. सुबत्ता मी लहानपणापासून बघितली. कुक पाणके… हाताशी होते.”

“तिथेही मिळतील.”

“यूएसमध्ये जाण्याचा विचार नाही ना? तिथे हातानं काम करावं लागतं. ताई यूएस् मध्येय. रवा कसा दिसतो इथे पण ठाऊक नव्हतं तिला. सर्जन आहे… ती!” “आता सारं येतं.” “शिकलं की सारं येतं.”

“शिकेन… तर!” शिकायची मला नाही हौस.” “आय बेटर थिंक अगेन.” शंतनू. पण विवाह ठरला. सोनाली स्पष्टवक्ती होती.

“हे पाहा, मला देणं-घेणं, व्यवहार पसंत नाही. सह्यांचं लग्न!” “कधी तरी अशी पद्धत, जुळणं महत्त्वाचं.” तो नेटाने म्हणाला. “शंतनू, ग्रेट! आपले विचार जुळतात.”

“भेटीगाठीत अधिक स्पष्ट होईल.” शंतनू म्हणाला.

“नोकरीत पहिले १० हजार मी माहेरी देणं पसंत करेन.” “मला चालेल ४०, तर सासरी देशील ना?”

“नक्की.” “नंतर कटकट नाही ना करणार?” “नाही करणार.” ती म्हणाली. नंतर तो म्हणाला.

“सोनाली, सासर ही स्वतंत्र घटना आहे.” “मला कल्पना आहे. तुझे आई-वडील, योग्य तो मान ठेवीन मी. मला आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्य हवे आहे. मी बसून राहणार नाही… वचन देते! मी दमते… माणूस आहे मी! याची कल्पना सासरी असावी.” “शेवटची …अट काय?”
“पंचवीस वर्षे… हे नाव वापरले. सोनाली राजहंस!” “मग?” “तेच वापरणं आवडेल मला!”
“अॅग्रीड” “ओह! वंडरफूल.” “डॉ. सोनाली! मग?” “सहीचा विवाह. विनाविलंब!”
मित्रांनो, सोनाली राजहंस आणि शंतनू रणदिवे यांचेशी लग्न अखेर ठरले. निवडक मित्र-मैत्रिणी आले होते. फारसा खर्च नाही. इतकी सुंदर पार्टी झाली म्हणून सांगू?
शिणोटा नाही. काही नाही. मान-पान सगळ्यांना फाटा! सोनाली राजहंस डॉ. शंतनूकडे आली. सासूच्या मनोभावे पाया पडली. “बाबा, मी रजा घेऊ शकत नाही.” सासरेबुवा चकित झाले.
“नोकरी जबाबदारीची आहे.”
“मी समजू शकतो,” बाबा म्हणाले.
“बाबा. हे पाकीट सांभाळा. जपून!” पाकिटात १० हजार रुपये होते. ज्या विश्वासाने सांभाळ करायला दिले… ते पाहून म्हणाले, हे बरेच पैसे आहेत.”
“तुमचे माझे वेगळे काही नाही.” सोनाली हसून म्हणाली. “असं?”
“खर्च केले तरी हरकत नाही.” फक्त हिशेब ठेवा. मी विचारत नाही बसणार. अनाठायी! खर्च नको.” सोनाली स्पष्ट म्हणाली. ते कुटुंब सुखी आहे. सोनाली स्वातंत्र्य जपून आहे.
तुम्हाला सासरी काय हवे? स्वातंत्र्य, समता, बंधुता? अगदी तस्से सोनाली राजहंसला मिळाले आह अशी लग्ने व्हावी, असे विवाह व्हावेत..
आपणासही वाटते ना? माझ्या एका मुलीने आपले नाव बदलले नाही… तेच ठेवले… पटते ना! मस्तच!

बांगलादेश-श्रीलंकेसमोर सातत्य राखण्याचे आव्हान

शारजा : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीमध्ये संडे स्पेशल (२४ ऑक्टोबर) दुसऱ्या लढतीत बांगलादेशची गाठ श्रीलंकेशी पडेल. पहिल्या फेरीचा अडथळा मुख्य ड्रॉमध्ये खेळत असलेल्या दोन्ही संघांसमोर सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे.

पहिल्या फेरीत तिन्ही सामने जिंकून श्रीलंकेने सुपर १२ फेरीत दिमाखात प्रवेश केला. बांगलादेशला दोन सामने जिंकता आले. त्यामुळे त्यांना त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, स्कॉटलंडविरुद्धच्या अपयशी सलामीनंतर पुढील दोन्ही सामने जिंकत बांगलादेशने दमदार कमबॅक केले.

उभय संघांची टी-ट्वेन्टी प्रकारातील मागील पाच सामन्यांतील कामगिरी पाहता बांगलादेशकडे ३-२ अशी आघाडी आहे. त्यात मागील दोन विजयांचा समावेश आहे. बांगलादेश सलग तिसरा विजय नोंदवतो की, श्रीलंका त्यांना विजयापासून रोखतो, याची उत्सुकता आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक असल्याने पर्यायी मार्गावर विलंबाने लोकल धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर (मुख्य मार्ग) ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकलफेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटी दिशेला सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी या लोकलफेऱ्या सुरू राहतील.

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेतील जलद लोकलफेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकलफेऱ्या रद्द होतील. तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

मोदींकडून लस उत्पादकांचे कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या भारतीय उत्पादकांची भेट घेतली. भारताने १०० कोटी लसीकरण करून महत्वाचा टप्पा पार केला. या यशोगाथेत या लस उत्पादकांनी मोठी भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मेहनतीचे आणि साथीच्या काळात दिलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक मोदींनी केले. जागतिक स्तराला सुसंगत अशा वैद्यकीय पद्धतींमध्ये सुधारणा करण्याची ही एक संधी आहे, असे ते म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिज्, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासिया बायोटेक या सात लस निर्मात्यांचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हेही यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला आणि सायरस पूनावाला यांनी सरकारने आणलेल्या नियामक सुधारणांची प्रशंसा केली. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सज्ज होण्यासाठी लस उत्पादकांनी सतत एकत्र काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; मात्र, दक्षिण आफ्रिकेने झुंजवले

अबुधाबी (वृत्तसंस्था) : सहाव्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीमध्ये ग्रुप १मध्ये ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. तरी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांना चांगलेच झुंजवले.

गोलंदाजांनी गाजवलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी सरस ठरली. त्यांनी द. आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद ११८ धावांमध्ये रोखताना विजय सुकर केला. मात्र, प्रतिस्पर्ध्यांचे ११९ धावांचे आव्हान गाठताना कांगारूंना १९.४ षटके टाकावी लागली. स्टीव्हन स्मिथने (३४ चेंडूंत ३५ धावा) महत्त्वपूर्ण योगदान देत विजयात खारीचा वाटा उचलला. त्याच्यानंतर मार्कस स्टॉइनिस (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) मॅथ्यू वॅडे (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) धावून आले.

ऑस्ट्रेलियाने ५ विकेट आणि २ चेंडू राखून द. आफ्रिकेवर मात केली तरी त्यांच्या आघाडी फळीने निराशा केली. वेगवान गोलंदाज अॅन्रिच नॉर्ट्जेने वैयक्तिक पहिल्या आणि डावातील दुसऱ्या षटकात कर्णधार आरोन फिंचला माघारी धाडले. पाच चेंडू खेळूनही तो खाते उघडू शकला नाही. अन्य सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (१५ चेंडूंत १४ धावा) आणि तिसऱ्या क्रमांकावरील मिचेल मार्शनेही (१७ चेंडूंत ११ धावा) निराशा केली.

आठव्या षटकातील ३ बाद ३८ धावा अशा बिकट स्थितीत स्मिथ, स्टॉइनिस तसेच वॅडेने विजयी नौका पार केली. तरीही पहिल्या विजयाचे क्रेडिट त्यांच्या गोलंदाजांना जाते. कांगारूंच्या पाचही गोलंदाजांनी अचूक मारा केला. वेगवान दुकली मिचेल स्टार्कसह जोश हॅझ्लेवुड तसेच फिरकीपटू अॅडम झम्पाने प्रत्येकी दोन विकेट तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, अप्रतिम स्पेल टाकणाऱ्या हॅझ्लेवुड (४-१-१९-२) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

‘न्यायालयांबाबतची प्रतिमा अधिक सकारात्मक बनवण्याची गरज’

औरंगाबाद (वार्ताहर) : न्यायालयांबाबतची समाजातील प्रतिमा अधिक सकारात्मक बनवण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. या पार्श्वभूमीवर न्यायालयांसाठी विशेष प्राधान्याने पुरेसे मनुष्यबळ, प्राथमिक, भौतिक सुविधांची उभारणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांसह पीडितांचाच केवळ न्यायालयाशी संपर्क यायला हवा, हा न्यूनगंड आपण दूर करण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो, त्यांनी या संदर्भात नि:संकोचपणे न्यायालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केले.

न्यायालये ही दगडविटांची निर्जीव वास्तू नसून त्यांनी सर्वसामान्यांना न्यायाची एक संवैधानिक हमी द्यावी. न्यायालये ही कायदा व सुव्यवस्थेवर आधारित समाजातील महत्त्वपूर्ण संस्था असून जनसामान्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय देणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा म्हणून तिच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे, असे सांगन देशातील न्यायालयांची तांत्रिक सुविधांच्या त्रुटींबाबतची आकडेवारीही रमणा यांनी सांगितली.

निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही

उंबर्डे – फोंडा रस्ता दुरुस्ती कामाच्या शुभारंभावेळी नितेश राणे यांचा इशारा

वैभववाडी (प्रतिनिधी) : दुरवस्थेमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उंबर्डे – फोंडा रस्ता डागडुजी कामाला सुरुवात होत आहे. या रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारी ही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांची आहे. निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. अशी कामे होत असतील तर ती तात्काळ थांबवा, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या.

उंबर्डे – फोंडा रस्ता डागडुजी कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, किशोर दळवी, आबा दळवी, संताजी रावराणे, संजय सावंत, रज्जब रमदुल, बाबालाल लांजेकर, उमर रमदुल, उदय मुद्रस, दशरथ दळवी, सुनील भोगले, प्रकाश पाटील, तसेच कार्यकारी अभियंता शेवाळे, उपकार्यकारी अभियंता कांबळे, कनिष्ठ अभियंता सुतार, दुडिये, ठेकेदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

उंबर्डे – फोंडा हा रस्ता सर्वांसाठी चर्चेचा विषय राहीला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याने चालणे देखील मुश्कील झाले आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी एकूण ६ कोटींचा निधी मंजूर आहे. परंतु कोरोना काळात अनेक अडचणीमुळे हे काम थांबले होते. प्रत्येक बैठकीत काम मंजूर आहे इतकं उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात होते.

या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची रस्ते दुरवस्थेबाबत बैठक घेतली. या बैठकीत नासीर काझी, भालचंद्र साठे व राजेंद्र राणे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधले. दरम्यान शेवाळे यांनी निधी मंजूर आहे. लवकरच काम सुरू होईल असे तोकडे उत्तर दिले. आमदार नितेश राणे यांनी थेट अधिकाऱ्यांना भुमीपूजनाची तारीख व वेळ दिली. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. उंबर्डे येथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला. काम कधी पासून सुरू करणार? असा प्रश्न नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांना केला. १० नोव्हेंबर पासून काम सुरू करणार असल्याचे ठेकेदार सुधाकर साळुंखे व देवानंद पालांडे यांनी सांगितले.

यावेळी उंबर्डे ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

राज ठाकरे यांच्या आईलाही कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. या माहितीला मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली असता त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरला नाही

सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी पुणे आणि नाशिक दौरे केले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केले. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.

जयंत पाटलांच्या दौऱ्यातून निष्पन्न काय?

दीपक मोहिते

पालघर : शुक्रवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा उद्देश होता की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे. त्यामध्ये जलसंपदा विभागाचा कोणत्याही विषयाचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याचे वर्णन ‘ते आले, मूठभर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला व पुढच्या कार्यक्रमास निघून गेले,’ असे केल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

दिवसभर ते जिल्ह्यात होते. या दरम्यान त्यांनी वाडा तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी शेताच्या बंधावर जाऊन संवाद साधला असता तर जिल्हावासीयांची त्यांच्या पक्षाला नक्कीच आशीर्वाद मिळाले असते. पण शेतकरी ‘किस झाडकी पत्ती’ अशा वृत्तीने वावरणाऱ्या नेत्यांपेक्षा जयंत पाटीलही वेगळे नाहीत, हे काल अनुभवायला मिळाले.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे. संघटनात्मकदृष्ट्या पक्ष कमकुवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा त्यांनी जिंकली होती. कारण समोरचा उमेदवार प्रभावी नव्हता. माजी आमदार व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हाविकासाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याचा फटका त्यांच्या मुलाला या निवडणुकीत बसला व राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षितपणे विजयाची लॉटरी लागली. राष्ट्रवादीचा हा विजय नकारात्मक होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभावी कामगिरी करता आली नाही. डहाणू, विक्रमगड व मोखाडा या तीन तालुक्यांत थोडेफार अस्तित्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई, पालघर, तलासरी व वाडा तालुक्यांत अस्तित्व अत्यंत नगण्य आहे. त्यामुळेच जयंत पाटलांना शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे वाटले असावे. परिणामी शासकीय खर्चाने झालेल्या पक्षीय दौऱ्यातून काय निष्पन्न होते, ते लवकरच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.