Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; मात्र, दक्षिण आफ्रिकेने झुंजवले

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; मात्र, दक्षिण आफ्रिकेने झुंजवले

अबुधाबी (वृत्तसंस्था) : सहाव्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीमध्ये ग्रुप १मध्ये ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. तरी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांना चांगलेच झुंजवले.

गोलंदाजांनी गाजवलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी सरस ठरली. त्यांनी द. आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद ११८ धावांमध्ये रोखताना विजय सुकर केला. मात्र, प्रतिस्पर्ध्यांचे ११९ धावांचे आव्हान गाठताना कांगारूंना १९.४ षटके टाकावी लागली. स्टीव्हन स्मिथने (३४ चेंडूंत ३५ धावा) महत्त्वपूर्ण योगदान देत विजयात खारीचा वाटा उचलला. त्याच्यानंतर मार्कस स्टॉइनिस (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) मॅथ्यू वॅडे (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) धावून आले.

ऑस्ट्रेलियाने ५ विकेट आणि २ चेंडू राखून द. आफ्रिकेवर मात केली तरी त्यांच्या आघाडी फळीने निराशा केली. वेगवान गोलंदाज अॅन्रिच नॉर्ट्जेने वैयक्तिक पहिल्या आणि डावातील दुसऱ्या षटकात कर्णधार आरोन फिंचला माघारी धाडले. पाच चेंडू खेळूनही तो खाते उघडू शकला नाही. अन्य सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (१५ चेंडूंत १४ धावा) आणि तिसऱ्या क्रमांकावरील मिचेल मार्शनेही (१७ चेंडूंत ११ धावा) निराशा केली.

आठव्या षटकातील ३ बाद ३८ धावा अशा बिकट स्थितीत स्मिथ, स्टॉइनिस तसेच वॅडेने विजयी नौका पार केली. तरीही पहिल्या विजयाचे क्रेडिट त्यांच्या गोलंदाजांना जाते. कांगारूंच्या पाचही गोलंदाजांनी अचूक मारा केला. वेगवान दुकली मिचेल स्टार्कसह जोश हॅझ्लेवुड तसेच फिरकीपटू अॅडम झम्पाने प्रत्येकी दोन विकेट तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, अप्रतिम स्पेल टाकणाऱ्या हॅझ्लेवुड (४-१-१९-२) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -