Sunday, April 28, 2024
Homeमहत्वाची बातमीहिंदू नववर्ष! शालिवाहन शके आणि विक्रम संवत म्हणजे काय?

हिंदू नववर्ष! शालिवाहन शके आणि विक्रम संवत म्हणजे काय?

पहिले कॅलेंडर ३१,१२५ वर्षांपूर्वी बनवले, जगभरात ३० पेक्षा जास्त कॅलेंडर, भारतात २० पंचांग

हिंदू कालगणनेत विक्रम संवत आणि शालिवाहन शके या दोन कालगणना महत्त्वाच्या आहेत. एरव्ही आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार गोष्टी करतो. पण अनेक हिंदू सणवार हे या कालगणांनुसारच साजरे केले जातात. ही कालगणना नेमकी कुणी सुरू केली? याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.

जगाची सुरुवात झाल्यापासून काळाचे गणित चालू आहे. याला हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात कालगणना म्हणतात. त्याच्या हिशोबानुसार आजपासून जगाचे १ अब्ज ९७ कोटी २९ लाख ४० हजार १२५ वे वर्ष सुरू झाले आहे. जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत वेगवेगळ्या कालखंडात बनवलेले एकूण कॅलेंडर ३० च्या आसपास आहे. त्याच वेळी, भारतात आतापर्यंत केवळ २० पंचांग तयार करण्यात आले आहेत.

‘संवत्सर (संवत) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास ‘चांद्र वर्ष’ असेही म्हणतात. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.

संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असेही एक कालमापन आहे. शालिवाहन शकाखेरीज अन्य बरीच संवत्सरे आहेत.

६० वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या ५ आणि शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा १/१२ काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ११.८६२६ (सुमारे १२) वर्षे लागतात. म्हणजे १ संवत्सर म्हणजे ०.९८८५५ वर्ष होय. या फरकामुळे ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात. जर संवत्सर आणि वर्षामध्ये एकास एक संबंध जोडायचा असेल तर ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप करावा लागतो.

संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. सम्यक् वसन्ति मासादया:अस्मिन् (ज्यात मास आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात).

शालिवाहन शक (किंवा शालिवाहन संवत्सर) आणि इसवी सन यामध्ये साधारणपणे ७८ वर्षांचा फरक

शक संवत- शक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.

शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळविला. तेव्हापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने त्यावेळचे त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या शकांचा पराभव केला तोही याच दिवशी. त्याने सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यांत प्राण फुंकून हा विजय मिळवला, अशी आख्यायिका आहे. अगदीच शब्दशः अर्थ न घेता कदाचित त्या काळातील मृतवत, थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या समाजातील युवकांना त्याने जागृत करून हा विजय मिळवला असण्याची शक्यता आहे. याच शालिवाहन राजाच्या नावावरून शालिवाहन शके ही त्या काळातील नवी कालगणना अस्तित्वात आली.

हा शालिवाहन कोण होता? आपण मराठी माणसं त्याच्या नावाने कालगणना का करतो? २००० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात असं काय झालं, ज्यामुळे मराठी वर्षाला सुरुवात झाली? असे अनेक प्रश्न आपल्याला कदाचित पडलेही नसतील. आणि याचीच खंत इतिहासकार व्यक्त करत आहे. कारण महाराष्ट्राच्या या सुवर्णयुगाबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.

ठिकाण नाशिक.. वर्ष इसवी सन ७८. मध्य आशियातल्या शकांनी हल्ला चढवला होता. आणि त्यांना परतवून लावण्याचं आव्हान होतं पैठणच्या गौतमीपुत्रासमोर.. आणि त्यानं ते मोठं आव्हान लीलया पेललं.. तेव्हापासूनच.. महाराष्ट्रात.. गौतमीपुत्राच्या शालिवाहन या कुळाच्या नावाने कालगणना सुरू झाली. शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा… प्रतिष्ठान.. म्हणजेच आताचं औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठण ही त्याची राजधानी. आताचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढं त्याचं विस्तीर्ण साम्राज्य होतं. राजकीय स्थैर्यामुळे व्यापार थेट युरोपापर्यंत पोचला होता. महाराष्ट्रातल्या कापडांना आणि वस्तूंना अगदी रोममध्ये मागणी होती. सुमारे ४५० लेण्यांची निर्मिती सुरू होती. पैठणमध्ये सापडलेल्या या नाण्यांवरूनच.. त्यावेळच्या सुबत्तेची कल्पना येते.

शालिवाहन हे महाराष्ट्राच्या सलग इतिहासातलं पहिलं पराक्रमी घराणं. तसंच गौतमीपुत्र या शालिवाहन राजानं संस्कृतपेक्षा प्राकृत. म्हणजेच तेव्हाच्या मराठीच्या रूपाला पहिल्यांदाच चालना आणि राजाश्रयही दिला. पैठणच्या आणि औरंगाबादच्या संग्रहालयात गौतमीपुत्र आणि इतर शालिवाहन राजांच्या काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो.

प्रत्येक युगात ग्रहांची हालचाल बदलत असते, त्यामुळे ऋतूही मागे-पुढे जातात. या कारणास्तव, अचूक वेळ मोजण्यासाठी देखील गणिताची पद्धत बदलत राहिली आहे.

गणना कशी होते

वेळेची गणना करण्यासाठी, सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या हालचाली समजून घेणे फार महत्वाचे आहे. पृथ्वीवरील ऋतू आणि दिवस बदलण्यासाठी सूर्य आणि चंद्र जबाबदार आहेत. पृथ्वी चंद्रासोबत सूर्याभोवती फिरते. या कारणास्तव, तिन्हींच्या हालचाली समजून घेऊनच अचूक वेळेची गणना केली जाऊ शकते. यासाठी ज्योतिषाच्या पुस्तकांमध्ये अनेक सूत्रे आणि तत्त्वे दिली आहेत, ज्यावरून ही गणना केली जाते.

प्रत्येक युगात राजे आपापली कॅलेंडर चालवत

नवीन युग सुरू होणार आहे असा संदेश प्रजेला जावा म्हणून राजा नवीन संवत चालवत असे. प्रत्येक राजा नवीन संवत चालवू शकतो असे नाही, अनेक राजे त्यांच्या काळात जुन्या हिशोबालाच मान्यता देत असत.

परंपरा आणि धर्मग्रंथानुसार, नवीन संवत सुरू होण्यापूर्वी, राजाला त्याच्या राज्यातील सर्व लोकांचे कर्ज फेडावे लागे. त्यानंतरच नवीन संवत सुरू होऊ शकेल.

विक्रम संवत

भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.

दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते सुरुवात

विक्रम संवत्सर हा चैत्र कृष्ण प्रतिपदेला सुरू होतो. हा कृष्णपक्ष शुक्लपक्षाच्या आधी येतो. गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते. विक्रम संवत्सर हे ग्रेगरियन म्हणजे इंग्रजी सनाच्या आकड्यापेक्षा ५६ने अधिक असते. म्हणजेच इ.स. २०२४ हे विक्रम संवत २०८० असेल. विक्रम संवतच्या उत्पत्ती विषयी सुद्धा इतिहासकारांत एकमत नाही, शकांचा एक राजा ओझोझ पहिला त्याने इसविसन पूर्वी ५७व्या वर्षी त्याचा म्हणून एक संवत सुरु केला. त्यालाच पुढे गुप्तवंशीय सम्राट विक्रमादित्य याने शक कुशाणांचा उच्छेद केला तेव्हा पासून लोक विक्रम संवत म्हणून म्हणू लागले. विक्रम संवत आणि शालिवाहन संवत या दोनही राष्ट्रीय संवताचा संबंध भारतीयांनी शक-कुशाणा वर जे विजय मिळवले त्यांच्याच स्मृतीगौरवाशी आहे आणि गुढीपाडवा हे नुसते मराठी नववर्ष नसून समस्त हिंदू नववर्ष आहे.

महाभारत काळातील कॅलेंडर

युधिष्ठिर काळातील ४ प्रकारचे पंचांग

महाभारताचा काळ सुमारे ५००० वर्षे जुना मानला जातो. या काळात ४ संवत्स सुरू झाले.

युधिष्ठिर संवत: युधिष्ठिर इसवी सन ३१३९ मध्ये राजा झाला त्या दिवसापासून हे संवत सुरू झाले. ज्याची सुरुवात माघ महिन्यापासून होते.

काली संवत: श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून काली संवत सुरू झाले.

जय संवत: श्रीकृष्णाच्या मृत्यूच्या ६ महिन्यांनंतर, जेव्हा बृहस्पतिने राशी बदलली तेव्हा जय संवत्सर सुरू झाले. त्याची सुरुवात कोणी केली याचा उल्लेख नाही.

सप्तर्षी संवत: श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी उत्तराखंडमध्ये युधिष्ठिराचा मृत्यू झाला. त्यावेळी सप्तर्षी नावाचा संवत्सर सुरू झाले.

विक्रम संवत

परमार घराण्यातील उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने हे कॅलेंडर सुरू केले. त्याच्या सुरुवातीची तारीख ५७-५८ ईसापूर्व मानली जाते. त्यानुसार हे २०७९-२०८० वर्षे जुने कॅलेंडर आहे.

राजा विक्रमादित्यच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी एक वराहमिहिर हा ज्योतिषी होता. ज्याच्या मदतीने या संवतात अचूक आकडेमोड करण्यात आली. आचार्य वराह मिहीर यांनी अनेक ज्योतिष ग्रंथांची रचना केली होती, जी आजही ज्योतिषाच्या विद्यार्थ्यांना शिकवली जातात.

विक्रम संवतच्या महिन्यांची नावे देव किंवा मानव यांच्या नावावर नसून सूर्य आणि चंद्राच्या हालचालींवर आधारित आहेत. जे ज्योतिषशास्त्राच्या मदतीने बनवले जाते, म्हणून ते वैज्ञानिक आणि प्रामाणिक संवत मानले जाते. वर्षभरातील तीज-उत्सवांच्या तारखा या कॅलेंडरनुसार निश्चित केल्या जातात.

विक्रम संवताची सुरुवात आणि महिन्यांबाबत उत्तर आणि दक्षिण भारतातील फरक

चैत्र शुक्ल प्रतिपदा ही उत्तर भारतात विक्रम संवताची सुरुवात मानली जाते. त्याच वेळी, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो. म्हणूनच उत्तर विक्रम संवत महिन्याला पौर्णिमा म्हणतात.

दक्षिण भारतात कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवत सुरू होते. यामध्ये अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो. म्हणूनच दक्षिण विक्रम संवत महिन्याला अमान्त म्हणतात.

शालिवाहन शकाच्या संवत्सरांची नावे

ही नावे काही विशिष्ट घटनांची त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावीत. (भृगू संहिता – जातक खंड). हा काल दोन ते अडीच हजार वर्षांचा असावा. खाली देण्यात आलेली नावे ‘चांद्र संवत्सरांची’ आहेत. ही एकूण ६० संवत्सरे आहेत. ही साठ वर्षे संपली की (म्हणजे शेवटचे ‘क्षय संवत्सर’ झाल्यानंतर) पुन्हा प्रभव या नावाचे नवे संवत्सर सुरू होते.

संवत्सर
क्रमांक नाव चालू कालचक्र (ग्रेगोरियन) चालू कालचक्र –विक्रम संवत पूर्वीचे कालचक्र १ (ग्रेगोरियन) पूर्वीचे कालचक्र २ (ग्रेगोरियन)
१. प्रभव १९८७-८८ २०४४ १९२७-२८ १८६७-६८
२. विभव १९८८-८९ २०४५ १९२८-२९ १८६८-६९
३. शुक्ल १९८९-९० २०४६ १९२९-३० १८६९-७०
४. प्रमोद १९९०-९१ २०४७ १९३०-३१ १८७०-७१
५. प्रजापति १९९१-९२ २०४८ १९३१-३२ १८७१-७२
६. अंगिरस १९९२-९३ २०४९ १९३२-३३ १८७२-७३
७. श्रीमुख १९९३-९४ २०५० १९३३-३४ १८७३-७४
८. भाव १९९४-९५ २०५१ १९३४-३५ १८७४-७५
९. युव १९९५-९६ २०५२ १९३५-३६ १८७५-७६
१०. धाता १९९६-९७ २०५३ १९३६-३७ १८७६-७७
११. ईश्वर १९९७-९८ २०५४ १९३७-३८ १८७७-७८
१२. बहुधान्य १९९८-९९ २०५५ १९३८-३९ १८७८-७९
१३. प्रमाथी १९९९-२००० २०५६ १९३९-१९४० १८७९-१८८०
१४. विक्रम २०००-०१ २०५७ १९४०-४१ १८८०-८१
१५. वृषप्रजा २००१-०२ २०५८ १९४१-४२ १८८१-८२
१६. चित्रभानु २००२-०३ २०५९ १९४२-४३ १८८२-८३
१७. सुभानु २००३-०४ २०६० १९४३-४४ १८८३-८४
१८. तारण २००४-०५ २०६१ १९४४-४५ १८८४-८५
१९. पार्थिव २००५-०६ २०६२ १९४५-४६ १८८५-८६
२०. अव्यय २००६-०७ २०६३ १९४६-४७ १८८६-८७
२१. सर्वजीत २००७-०८ २०६४ १९४७-४८ १८८७-८८
२२. सर्वधारी २००८-०९ २०६५ १९४८-४९ १८८८-८९
२३. विरोधी २००९-१० २०६६ १९४९-५० १८८९-९०
२४. विकृति २०१०-११ २०६७ १९५०-५१ १८९०-९१
२५. खर २०११-१२ २०६८ १९५१-५२ १८९१-९२
२६. नंदन २०१२-१३ २०६९ १९५२-५३ १८९२-९३
२७. विजय २०१३-१४ २०७० १९५३-५४ १८९३-९४
२८. जय २०१४-१५ २०७१ १९५४-५५ १८९४-९५
२९. मन्मथ २०१५-१६ २०७२ १९५५-५६ १८९५-९६
३१. दुर्मुख २०१६-१७ २०७३ १९५६-५७ १८९६-९७
३१. हेमलंबि २०१७-१८ २०७४ १९५७-५८ १८९७-९८
३२. विलंबि २०१८-१९ २०७५ १९५८-५९ १८९८-९९
३३. विकारी २०१९-२० २०७६ १९५९-६० १८९९-१९००
३४. शार्वरी २०२०-२१ २०७७ १९६०-६१ १९००-०१
३५. प्लव २०२१-२२ २०७८ १९६१-६२ १९०१-०२
३६. शुभकृत २०२२-२३ २०७९ १९६२-६३ १९०२-०३
३७. शोभकृत २०२३-२४ २०८० १९६३-६४ १९०३-०४
३८. क्रोधी २०२४-२५ २०८१ १९६४-६५ १९०४-०५
३९. विश्वावसु २०२५-२६ २०८२ १९६५-६६ १९०५-०६
४०. पराभव २०२६-२७ २०८३ १९६६-६७ १९०६-०७
४१. प्लवंग २०२७-२८ २०८४ १९६७-६८ १९०७-०८
४२. कीलक २०२८-२९ २०८५ १९६८-६९ १९०८-०९
४३. सौम्य २०२९-३० २०८६ १९६९-७० १९०९-१०
४४. साधारण २०३०-३१ २०८७ १९७०-७१ १९१०-११
४५. विरोधकृत २०३१-३२ २०८८ १९७१-७२ १९११-१२
४६. परिधावी २०३२-३३ २०८९ १९७२-७३ १९१२-१३
४७. प्रमादी २०३३-३४ २०९० १९७३-७४ १९१३-१४
४८. आनंद २०३४-३५ २०९१ १९७४-७५ १९१४-१५
४९. राक्षस २०३५-३६ २०९२ १९७५-७६ १९१५-१६
५०. आनल २०३६-३७ २०९३ १९७६-७७ १९१६-१७
५१. पिंगल २०३७-३८ २०९४ १९७७-७८ १९१७-१८
५२. कालयुक्त २०३८-३९ २०९५ १९७८-७९ १९१८-१९
५३. सिद्धार्थी २०३९-४० २०९६ १९७९-८० १९१९-२०
५४. रौद्र २०४०-४१ २०९७ १९८०-८१ १९२०-२१
५५. दुर्मति २०४१-४२ २०९८ १९८१-८२ १९२१-२२
५६. दुन्दुभी २०४२-४३ २०९९ १९८२-८३ १९२२-२३
५७. रूधिरोद्गारी २०४३-४४ २१०० १९८३-८४ १९२३-२४
५८. रक्ताक्षी २०४४-४५ २१०१ १९८४-८५ १९२४-२५
५९. क्रोधन २०४५-४६ २१०२ १९८५-८६ १९२५-२६
६०. अक्षय २०४६-४७ २१०३ १९८६-८७ १९२६-२७

हीच नावे विक्रम संवत्सरांची आहेत, पण त्यांचा सन वेगळा असतो.

शालिवाहन आणि विक्रम संवत यांसह अन्य संवत्सरे (अन्य शक)

  • शालिवाहन शक संवत : इसवी सनाच्या आकड्यामधून ७८ किंवा ७७ वजा केले की शालिवाहन शकाचा आकडा मिळतो.
  • विक्रम संवत : विक्रम संवत्सराचे नवीन वर्ष दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी (कार्तिक शुक्ल प्रतिपदा-बलि प्रतिपदा) सुरू होतो. इसवी सनाच्या आकड्यात ५६ किंवा ५७ मिळविले की विक्रम संवताचा आकडा येतो. विक्रम वजा १३५ = शक संवत.
  • युधिष्ठिर संवत : कलियुग संवताचे पर्यायी नाव. (अन्य मतानुसार, कलियुगाच्या प्रारंभानंतर ३०४४ वर्षांनी युधिष्ठिर शकाची सुरुवात झाली.).
  • राज्याभिषेक संवत : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सुरू झालेला संवत. इसवी सन १६७४ सालच्या जून महिन्यात याचा प्रारंभ झाला.
  • चालुक्य विक्रम संवत : आंध्र प्रदेशातील कल्याणपूरचा चालुक्य सोळंकी राजा ६वा विक्रमादित्य, ह्याने हा संवत सुरू केला. या संवताला चालुक्य विक्रमकाल, चालुक्य विक्रम वर्ष किंवा वीर विक्रम काल अशीही नावे आहेत. या संवताच्या अंकात १०७६ मिळवले की इसवी सन येतो.
  • कलचुरी संवत : यालाच चेदी संवत किंवा त्रैकूटक संवत म्हणतात. गुजरातमधील, कोकणातील आणि मध्य प्रदेशातील शिलालेखांत हा संवत वापरलेला असतो. कलचुरी संवताच्या आकड्यामध्ये २४९ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो.
  • कलियुग संवत : यालाच महाभारत संवत किंवा युधिष्ठिर संवत म्हणतात. ज्योतिष ग्रंथांत आणि शिलालेखांत कलियुग संचत्सराचा उल्लेख असतो. याची सुरुवात इसवी सनपूर्व ३१०२ या वर्षी (१७ फेब्रुवारीला) झाली. इसवी सनाच्या आकड्यात ३१०२, विक्रम संवताच्या आकड्यात ३०४३/४४ आणि शक संवताच्या आकड्यात ३१७९/८० मिळवले की कलियुग संवताचे साल मिळते.
  • गांगेय संवत : हा तामिळनाडूमधील कलिंगनगरच्या कोणा राजाने सुरू केलेला हा संवत आहे. दक्षिणी भारतातील अनेक ठिकाणी हा वापरलेला आढळतो. गांगेय संवताच्या आकड्यामध्ये ५७९ मिळवले की इसवी सनाचा अंक येतो.
  • गुप्त संवत : यालाच गुप्त काल किंवा गुप्त वर्ष किंवा वलभी संवत म्हणतात. गुप्तवंशातील एखाद्या राजाने हा संवत सुरू केला असावा. नेपाळपासून ते गुजराथपर्यंत ह्याचा वापर होत असे. गुप्त संवताच्या सालामध्ये ३२० मिळवले की इसवी सनाचे वर्ष येते.

 

(संकलन – राजेश सावंत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -