Saturday, May 11, 2024
HomeदेशISRO New Mission : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोकडून खुशखबर

ISRO New Mission : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोकडून खुशखबर

‘एक्सपोसॅट’ मोहिमेचं यशस्वी उड्डाण; ‘यासाठी’ ठरला भारत जगातील दुसरा देश

श्रीहरिकोटा : मागील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) इतिहास रचला होता. त्यानंतर आज नववर्षाच्या (New year) पहिल्याच दिवशी इस्रोने एक मोठी मोहिम फत्ते केली आहे. देशभरात नववर्षाचा जल्लोष आणि उत्साह साजरा होत असतानाच इस्रोने देखील आपली नव्या वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ (Xposat Mission) मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करत जल्लोष साजरा केला.

इस्रोने १ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पीएसएलव्ही (PSLV C58) रॉकेटच्या मदतीने ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ (Xposat Mission) मिशनचं प्रक्षेपण केलं. यानंतर सुमारे २२ मिनिटांमध्ये हा उपग्रह त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, नव्या वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे.

XPoSAT हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेईल. त्यात बसवलेली दुर्बीण रमण संशोधन संस्थेने बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे, जसं की पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा इत्यादी. हा उपग्रह ६५० किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे.

इस्रोने २०१७ मध्ये हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च ९.५० कोटी रुपये आहे. २०२३ मध्ये चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-१ मिशनद्वारे (Aditya L-1 Mission) सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोने यावर्षी अंतराळ क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. यामुळे नववर्षात भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -