Saturday, June 29, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सGanesh Pandit : ‘ओक्के हाय एकदम’

Ganesh Pandit : ‘ओक्के हाय एकदम’

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

गणेश पंडित हा शांत, मनमिळावू स्वभावाचा, प्रसिद्धीपासून दूर असणारा लेखक व दिग्दर्शक आहे. गणेशचे बालपण गिरगावात गेले. जी. ए. रानडे हायस्कूल व विलेपार्ले येथील प्रार्थना समाज येथे त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे कॉलेज शिक्षण करीत असताना त्याला लिखाणाची संधी मिळाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीतर्फे एकांकिका स्पर्धा घेतल्या जायच्या. त्यामध्ये तो भाग घ्यायचा. स्क्रिप्ट उपलब्ध होत नसल्याने शेवटी त्याने स्वतः स्क्रिप्ट लिहिण्याचे धाडस केले. She is normal ही पहिली एकांकिका त्याने लिहिली. ती सायकॉलॉजीकल थ्रिलर एकांकिका होती. ती उर्दू भाषेत एकांकिका होती. ती एकांकिका प्रथम आली. त्याचे दिग्दर्शन त्याने केले होते. गणेशला उत्कृष्ट लेखकाचे बक्षीस देखील मिळाले. तेव्हा त्याला कळून चुकले की, त्याला लिखाणाचे अंग आहे. त्यानतंर दुसऱ्या वर्षी त्याने लिहिलेल्या ‘नानी अम्मा’ या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला.

प्रख्यात दिग्दर्शक नीरज वोराकडे सहाय्यक लेखकाचे त्याने काम केले. फॅमिलीवाला, हलचल, हेराफेरी, गोलमाल १ या चित्रपटासाठी सहाय्यक लेखनाचे काम केले. त्यानंतर त्याने स्वतंत्रपणे चित्रपट लेखनाला सुरुवात केली. मुन्नाभाई एस. एस. सी., सद्रक्षणाय, हॉर्न ओके प्लीज, बालक-पालक, येलो, जग्गू व ज्युलियट या चित्रपटाचे लेखन केले.

गणेशच्या जीवनातला टर्निंग पॉइंट कोणता आहे? असे विचारले असता तो म्हणाला, “मी व अंबर ‘हडप’ मालिकेचे लिखाण करीत होतो. त्यावेळी अंबरच्या डोक्यातून एक कल्पना आली व ती त्याने वहीवर लिहून काढली. मला वाटलं त्यावर एक चांगलं नाटक बनविण्यात येईल; परंतु त्यावर एक चित्रपट बनला, त्याचे निर्माते अभिनेते रितेश देशमुख होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘बालक पालक.’ हा चित्रपट खूप चालला. प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला. हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमारला त्यावेळी विचारण्यात आले होते की, मराठीतील कोणता चित्रपट तुम्हाला डब करून हिंदीत आणावासा वाटेल? त्यावर त्याने उत्तर दिले होते, ‘बालक पालक.’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी अंबर व मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्यांना या चित्रपटाची प्रोसेस जाणून घ्यायची होती. पाच ते सहा तास आम्ही गप्पा मारल्या. या चित्रपटावर भरपूर लिहिले गेले. महेश लिमये यांची या चित्रपटाची सिनेमाटोग्राफी चांगली झाली. शूटिंगच्या वेळी आम्ही सेटवर हजर असायचो. अशा प्रकारे हा चित्रपट माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला.”

त्यानतंर ‘हिचकी’ या हिंदी चित्रपटाचेदेखील लिखाण करण्याची संधी त्याला मिळाली. अमेरिकेतील जॉन कोहिन या मनुष्याचे ‘इन फ्रंट ऑफ दी क्लास’ हे पुस्तक आहे. त्याच्या अडखळत बोलण्यावरून त्याला तेवीस शाळांमधून शिक्षक बनण्यासाठी नाकारले गेले. यशराज फिल्म्सने जेव्हा ‘हिचकी’ बनविण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी अमेरिकेत जाऊन त्या व्यक्तीच्या घरी दहा दिवस राहून आली होती. बालक पालक २ या चित्रपटाचे काम सुरू आहे.

सध्या ‘Okk हाय एकदम’ हे नवीन नाटक सुरू आहे. या नाटकाचे लेखक सुधाकर पोटे व गणेश पंडित आहेत. या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा गणेश पंडितने सांभाळलेली आहे. या नाटकाची निर्मिती, संकल्पना व संशोधन सावित्री मेधातुल यांची आहे. श्रीकांत तटकरे हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. या नाटकामध्ये कोरोनाच्या काळात लोक कलावंतांची झालेली वाताहत पाहायला मिळेल. आजपर्यंत लोककलावंतांनी (तमाशा कलावंतांनी) वगनाट्यातून इतर लोकांच्या समस्या सांगितलेल्या आपण पाहिलेले आहे. या नाटकात प्रथमच ते स्वतःबद्दल सांगत आहेत. या नाटकात त्यांचे जगणे कसे असते, हे दाखविण्यात आलेले आहे.

आतापर्यंत आपण तमाशा कलावंतांच्या दुरवस्थेबद्दल ऐकून होतो. त्यांची बातमी ऐकली व पाहिली होती, पुढे त्या कलावंतांचे काय होते? हे आपल्यापैकी कोणालाच माहीत होत नाही. जोपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहतील, तोपर्यंत लोककलावंतांचे जगणे लोकांसमोर राहील, त्यावर बोलले जाईल, त्यावर चर्चा होईल. त्यामुळे या नाटकाचे जास्तीत-जास्त प्रयोग होण आवश्यक आहे. प्रेक्षकांचा या नाटकाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -