Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘ओक्के हाय एकदम’ची थिएटर रेसिडेन्सी...!

‘ओक्के हाय एकदम’ची थिएटर रेसिडेन्सी…!

राजरंग – राज चिंचणकर

रंगभूमीवर नाटक येण्याआधी, त्या नाटकाच्या तालमी करण्यासाठी साधारणतः एखादा हॉल, खोली किंवा तत्सम जागा शोधली जाते आणि कलाकार तिथे कसून तालमी करतात. अशाच एका तालमीचे पण एक आगळे-वेगळे उदाहरण एका नाटकाने कायम केले आहे. केवळ मुंबईतल्या नव्हे; तर महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणांहून मुंबईत येऊन आणि महिनाभर एकत्र वास्तव्य करून कलाकार मंडळींनी नाटकासाठी तालमी केल्या; हे खरे वाटणार नाही. मात्र असे झाले आहे खरे आणि त्यासाठी ‘ओक्के हाय एकदम’ हे नाटक निमित्तमात्र ठरले आहे.

‘ओक्के हाय एकदम’ या नाटकाच्या तालमी याच पद्धतीने केल्या गेल्या आणि त्यासाठी ‘थिएटर रेसिडेन्सी’चे तत्त्व उपयोगात आणले गेले. अर्थात यामागे सक्षमतेने उभ्या होत्या; त्या या नाटकाच्या निर्मात्या सावित्री मेधातुल! महाराष्ट्रभर दौरे केलेल्या या नाटकाच्या तालमी ‘थिएटर रेसिडेन्सी’ या तत्त्वावर त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी करण्यात आल्या. अर्धे कलाकार मुंबईचे आणि अर्धे कलाकार उर्वरित महाराष्ट्रातले, असा या वगनाट्याचा बाज आहे. पण या तालमीसाठी मुंबईतल्या कलाकारांनीही स्वतःचे घरदार सोडून, तालमीच्या ठिकाणी महिनाभर वास्तव्य केले. ‘केवळ नाटक एके नाटक’ हा यामागचा हेतू होता आणि या सगळ्याचा उत्तम परिणाम या नाटकाच्या सादरीकरणात दिसून आला. तमाशा कलाकार हे त्यांच्या वगनाट्यातून सामाजिक किंवा राजकीय गोष्टींवर त्यांच्या पद्धतीने भाष्य करत असतात. हाच फॉर्म वापरायचा; पण त्यात इतर कुणाची तरी गोष्ट सांगण्याऐवजी तमाशातले जे खरे कलावंत आहेत, त्यांचीच गोष्ट त्यांनी सांगायची; अशा पद्धतीने हे नाटक रंगभूमीवर सादर झाले.

सावित्री मेधातुल या लावणी व लोकनाट्याच्या अभ्यासक आणि कलावंत असून, यापूर्वी रंगभूमीवर त्यांनी ‘संगीतबारी’ ही कलाकृती गाजवली आहे. ‘ओक्के हाय एकदम’ हे नाटक करायला घेतल्यावर ‘थिएटर रेसिडेन्सी’ची संकल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी ती मूर्त स्वरूपात उतरवली. या पद्धतीबद्दल बोलताना सावित्री मेधातुल सांगतात, “आमच्या नाटकात अर्धे कलावंत मूळ तमाशातले आणि अर्धे मुंबईच्या शहरी भागातले आहेत म्हणजे अनेक वर्षे ज्यांनी तमाशात काम केले आहेत असे आणि मुंबईचे व्यावसायिक कलाकार असे मिळून आम्ही हे नाटक बसवले. यासाठी मिक्स टीम बनवत, निर्मिती प्रक्रियेमध्ये एक वेगळा प्रयोग केला. त्यासाठी ‘थिएटर रेसिडेन्सी’ असे एक मॉडेल आम्ही वापरले.

सगळ्यांनी एकत्र राहायचे, खायचे, प्यायचे आणि काम करायचे. याचा फायदा असा होतो की, सगळे कलावंत एकाच ठिकाणी असतात. नाटकातल्या दोन वेगवेगळ्या पातळीवरच्या कलावंतांनी एकत्र येऊन शिकणे म्हणा किंवा एकमेकांशी शेअरिंग करणे म्हणा; यात सोपे झाले. एक महिना माझ्या घरी ही सगळी मंडळी एकत्र राहिली आणि आम्ही तालमी केल्या. यामुळे या संपूर्ण संचामध्ये उत्तम केमिस्ट्री तयार झाली. अक्षरशः एखाद्या फडात आम्ही एकत्र असल्यासारखे राहिलो आणि आमचे काम केले. हा सगळा या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेचा भाग आहे.”

पण मुळात हे नाटक करण्यामागची प्रेरणा काय होती, याविषयी सावित्री मेधातुल यांच्याशी संवाद साधल्यावर, रंजक माहिती मिळते. त्या म्हणतात, “हे नाटक करण्यामागचे कारण म्हणजे एक प्रोजेक्ट आहे. मला ‘क्षीरसागर-आपटे फाऊंडेशन’ची फेलोशिप मिळाली होती. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात जे काही घडले, त्याला एक प्रतिसाद म्हणून त्या अनुभवाची मांडणी एका आर्टिस्टिक एक्स्प्रेशनमधून करावी असे, त्या फाऊंडेशनचे म्हणणे होते. त्यांनी प्रपोजल मागितले होते आणि त्यासाठी आम्ही ‘कोरोनाचा तमाशा’ हे वगनाट्य केले होते. त्याचप्रमाणे ‘स्कॉटलंड एडेंब्र फ्रिंज फेस्टिव्हल’ असा स्कॉटलंडमध्ये जो महोत्सव होतो, त्यात एक नवी फेलोशिप लाँच केली गेली. त्यात भारतभरातून पाच लोकांची निवड झाली. त्यात मी होते. त्या फेलोशिपचीही आम्हाला हे नाटक बसवताना खूप मदत झाली.”

‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स’ व ‘भूमिका थिएटर्स’ यांची निर्मिती असलेल्या या नाटकाची संकल्पना व संशोधन सावित्री मेधातुल यांचे आहे. नाटकाचे लेखन गणेश पंडित व सुधाकर पोटे यांनी केले, असून गणेश पंडित यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. सावित्री मेधातुल, वैभव सातपुते, सुधाकर पोटे, सीमा पोटे, पंचू गायकवाड, विनोद अवसरीकर, विक्रम सोनवणे, अभिजीत जाधव, प्रज्ञा पोटे, भालचंद्र पोटे, चंद्रकांत बारशिंगे आदी कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. या नाटकासाठी आकांक्षा कदम यांनी वेशभूषेची; सुमित पाटील यांनी नेपथ्याची; तर विलास हुमणे व इमॅन्युअल बत्तीसे यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. गेले वर्षभर रंगभूमीवर सुरू असलेल्या, या नाटकाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. सध्या या नाटकाने स्वल्पविराम घेतला असला, तरी लवकरच या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू होतील, अशी आशा या नाटक मंडळींकडून वर्तवली जात आहे. साहजिकच, ‘ओक्के हाय एकदम’ असे म्हणायला ही मंडळी कायम सज्ज आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -