Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिककोलाजफुलटाइम प्रेसिडेंट पण...

फुलटाइम प्रेसिडेंट पण…

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

एकशे पस्तीस वर्षांचा इतिहास असलेल्या व देशावर सहा दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगलेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला गेली दोन वर्षे पूर्ण वेळ अध्यक्ष नाही म्हणून पक्षात नाके मुरडली जात आहेत. संघटनात्मक निवडणुका घ्या व पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्या, अशी मागणी पक्षाच्या तेवीस बड्या नेत्यांनी अनेकदा केली. भारताच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून या ग्रँड ओल्ड पार्टीला ग्रहण लागले आहे. पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि मोजक्या राज्यात काँग्रेस सत्तेत भागीदार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने काँग्रेसला पराभवाच्या गर्तेत ढकलून दिले आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव झाल्यावर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या मातोश्रींवरच हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. इतपर्यंतही सारे ठीक होते, पण किती काळ हंगामी अध्यक्ष? सोनिया गांधी दहा जनपथमधून बाहेर पडत नाहीत. पक्षाच्या मुख्यालयात त्यांचे दर्शन नाही. पक्षात नेहमीच सामसूम असते, मग पक्ष कार्यकर्ते सक्रिय तरी कसे राहणार?

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट आणि ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी राहुल गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे असा आग्रह धरला, तेव्हा स्वत: राहुल यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यासंबंधी विचार करू असे म्हटले. याचा अर्थ उघड आहे की, गांधी परिवाराच्या बाहेरील दुसरा कोणी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही.…

मै फुलटाइम प्रेसिडेंट और पुरी तरह सक्रिय हूँ, असे सोनिया गांधींनी कार्यकारिणीच्या बैठकीत बजावून सांगितले तेव्हा त्यांचा रोख जी २३ गटावरच होता. सोनियांच्या वक्तव्यानंतर नेतृत्व बदलाची भाषा करणारे शांत बसतील की, काँग्रेसमधील गटबाजी आणखी वाढेल या कालांतराने समजेल. सोनिया गांधींना उघडपणे विरोध करण्याची पक्षात हिंमत नाही. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे ठरले होते, पण कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली असेही कारण सोनियांनी सांगितले. सोनियांनी आपण फुलटाइम प्रेसिडेंट असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेल्या गुलाम नबी आजाद यांनी सोनियाजींच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही, असे लगेचच स्पष्ट केले.

स्वत: गुलाम नबी आजाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा आदी जी २३ मधील नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा यासाठी आग्रह धरला होता. काँग्रेसचा आलेख सतत घसरत असून पक्षाच्या तळापासून कोणताच बदल होत नाही याविषयी खंत व्यक्त केली होती. राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे गेल्या वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. या वर्षी जतीन प्रसाद भाजपमध्ये गेले. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोट व सचिन पायलट यांच्यात शीतयुद्ध चालूच आहे आणि पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग यांना हटवून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले तरी पक्षातील असंतोष थांबलेला नाही. पक्षाच्या अंतर्गत गटबाजीकडे कोणालाही गांभीर्याने लक्ष द्यायला वेळ नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी होणार म्हणजे वर्षभरात राहुल यांना या पदासाठी कोणाचाही विरोध राहू नये याची दक्षता घेतली जाणार. गांधी परिवाराच्या बाहेरील एकाही नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होत नाही, हेच सोनिया गांधी यांच्या कुटनितीचे गमक आहे. पक्षात त्यांना थेट आव्हान देणारे कोणी नाही. जी २३ मध्ये नेते आहेत तेच काँग्रेसची सत्ता असताना गांधी परिवाराचे डोळे व कान म्हणून भूमिका बजावत होते. आता सत्ता नाही आणि पक्षाचे भवितव्य ठामपणे कुणाला सांगता येत नाही, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत.

मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग, पी. व्ही. नरसिंह राव हे सर्व नेते काँग्रेसीच. पण त्यांच्या नावाचा मोठा जनमानसात दबदबा होता, तसे जी २३ मधील कोणाही नेत्याला वलय नाही. फुलटाइम प्रेसिडेंटला आव्हान देण्याची कोणाचीही क्षमता नाही. त्यामुळे सोनिया गांधींच्या घोषणेनंतर या नेत्यांना आपल्या हातातील शस्त्रे खाली ठेवल्याशिवाय पर्याय नाही. पक्षातील सामान्य काँग्रेस कार्यकर्ता गांधी परिवाराच्या पलीकडे बघायला तयार नसतो. ना बनूंगा, ना बनने दूंगा, या उक्तीप्रमाणे राहुल वागत असले तरी आता मात्र अध्यक्षपदासाठी ते राजी होत आहेत.

भाजपने काँग्रेसवर टीका करताना नेहमीच नामदार विरुद्ध कामदार अशी खिल्ली उडवली आहे. भाजपमध्ये पंतप्रधान आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष एकच आणि एकाच घराण्यातील नसतो. दर दोन- तीन वर्षांनी भाजपचा अध्यक्ष बदललेला दिसतो. अध्यक्षपदाची मक्तेदारी या पक्षात नाही. काँग्रेसमध्ये नेमके उलट दिसते. सोनिया रेकाॅर्ड ब्रेक २३ वर्षे अध्यक्ष आहेत. राहुल गांधींनी भाजप सरकारवर सूट बूट की सरकार किंवा चौकीदार चोर है अशी टीका केली. पण मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, उज्ज्वला गॅस, जनधन योजना अशा किती कल्याणकारी योजना राबवल्यात.

मोदी सरकारचे काम देशातील घराघरांत पोहोचले आहे. त्यामुळेच राहुल यांची टीका मीडियापुरती मर्यादित राहिली. केवळ पाच राज्यांत सत्तेत भागीदारी व अर्धा डझन राज्यात विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची काँग्रेसवर पाळी आली आहे. कन्हैया कुमार, जिन्गेश मेवाणी आणि नवज्योत सिद्धू यांच्या भरवंशावर काँग्रेसची वाटचाल चालू राहणार असेल, तर आम जनता या पक्षावर विश्वास कसा ठेवणार?

लालू प्रसाद यादव यांच्या राजदमध्ये किंवा राम विलास पासवान यांच्या लोजपमध्ये कौटुंबिक वादाने तडे पडले तसे सोनिया गांधी यांच्या परिवारात अजून तरी झालेले नाही. पण सोनिया गांधींच्या काळातच ममता बॅनर्जी, शरद पवार आणि जगनमोहन यांसारखे दिग्गज नेते काँग्रेसपासून दूर गेले व त्यांनी आपली स्वतंत्र ओळख सिद्ध करून दाखवली. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनाही कोणी थांबवू शकले नाही. सोनिया गांधींनी सलग दोन वेळा केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार आणून दाखवले, पण आता मोदी-शहांचे आव्हान पेलणे त्यांच्या आवाक्यात दिसत नाही. तरी त्या म्हणतात, काँग्रेसची फुलटाइम प्रेसिडेंट.…

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -