Friday, May 3, 2024
Homeब्लॉगमुक्त वाचनाचा आनंद

मुक्त वाचनाचा आनंद

कल्याण शहराला ज्याप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे कल्याण शहरात शतकोत्तर साजरा केलेल्या सार्वजनिक, सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक संस्था स्वत:च्या मालकीच्या जागेत कार्य करीत आहेत, हे त्याहून आणखी एक वैशिष्ट्य.

त्यातील सार्वजनिक वाचनालय हे १५८ वर्षे जुने आहे. वाचनालयातर्फे वाचन संस्कृती जपण्याचे कार्य तर केले जातेच, पण गेली अनेक वर्षे ही संस्कृती जपण्यासाठी वाचनालयातील कार्यकर्ते, ग्रंथसेविका, ग्रंथपाल गौरी देवळे आदींचे खूप सहाय्य झाले आहे. आताच्या मुक्त वाचनालयाची मूळ कल्पनाही ग्रंथपाल गौरी देवळे यांची आहे. त्याला वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर आदींचे सहाय्य लाभल्याने ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात आली. कल्याणच्या वाचकप्रेमींनी या उपक्रमाचे चांगले स्वागत केले.

कोरोनामुळे गेली अडीच-तीन वर्षे जवळजवळ सर्वच सार्वजनिक कार्यक्रम ठप्प झाले होते. त्याला कल्याणचे हे सार्वजनिक वाचनालयही अपवाद नव्हते. तरीही सुमारे एक वर्षापूर्वी कोरोनाचे नियम पाळून वाचनालय सुरू करण्यात आले. आता कोरोना जवळजवळ पूर्ण गेल्यात जमा असला तरी आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन वाचनालय सुरू झाले आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध दूर केल्याचे जाहीर केले. त्यामुळे सार्वजनिक वाचनालयाने यावेळी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे वाचनालयाच्या प्रवेश दारात ग्रंथगुढी उभारली. त्यावेळी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी ‘वाचनालयात’ मुक्त प्रवेशाची घोषणा केली. मुक्त प्रवेश म्हणजे नेमके काय? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. आतापर्यंत वाचकांनी परत करण्यासाठी आणलेली पुस्तके त्यांची नोंद करून ती बाजूला ठेवली जात असत. त्यातूनच वाचकांनी पुस्तके निवडण्याची, त्यांची देवाण-घेवाण करण्याची प्रथा पडली. जर कुणा वाचकप्रेमीला वेगळे पुस्तक हवे असेल, तर त्याने दोन-तीन पुस्तकांची नावे ग्रंथ सेविकांकडे द्यायची. त्या स्वत: पुस्तक काढून आणून द्यायच्या. पुस्तकापर्यंत वाचक जाऊ शकत नव्हता. या उपक्रमाने आता वाचक वाचनालयातील सर्व भागात मुक्त संचार करून पुस्तकांच्या कपाटातून हवे ते पुस्तक काढून घेऊ शकतो. कपाटातून स्वत:च पुस्तकाची निवड करू शकतो. यामुळे पुस्तकाच्या दुनियेत तो स्वत: मुक्तपणे संचार करू शकतो. पुस्तके हाताळण्याचा आनंद घेऊ शकतो.

कल्याणचे सार्वजनिक वाचनालय हे केवळ वाचनालय नाही. वाचनालयातर्फे मराठी राजभाषा दिन, विविध जुन्या नवीन लेखकांचा परिचय, कवी माधवानुज, दि. बा. मोकाशी पुरस्कार, काव्यविषयक कार्यक्रम, पु. भा. भावे व्याख्यानमाला, लेखकांच्या भेटी, चर्चा, जुन्या कवी, लेखकांवर व्याख्याने, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असे उपक्रमही राबवले जात आहेत.

कल्याणातील रावबहादूर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी पारतंत्र्याच्या काळातच १८६४ मध्ये हे वाचनालय सुरू केले. त्यात अनेक स्थित्यंतरे झालीत. वाचनालयात राम जोशी हे सरचिटणीस होते. त्यांनी वाचकांची आवड ओळखून आपल्या २०-२५ वर्षांच्या काळात विविध पुस्तकांची भर घातली, अलीकडे हिंदी, इंग्रजी विभागही सुरू झाले आहेत. त्यानंतर प्रशांत मुल्हेरकर, ज्येष्ठ साहित्यिक अबदास अग्निहोत्री यांचे जावई, अ. न. भार्गवे यांनी निरनिराळे उपक्रम हाती घेतले. त्याचप्रमाणे प्रशांत मुल्हेरकर यांनीही वाचनालयातील अनेक उपक्रमांना चांगली साथ दिली. त्यानंतर राजीव जोशी, यांच्या अध्यक्षीय काळात शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा झाला. माधव डोळे, जितेंद्र भामरे, सदाशिव साठे, त्यांचे बंधू वामनराव साठे, इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास साठे. अशा अनेक मंडळींनी आपापल्या परीने वाचनालयास निरनिराळ्या उपक्रमातून वाचकवर्ग मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कल्याणातील पत्रकार माधवानुज, त्यांचे चिरंजीव डॉ. भा. का. मोडक भारताचार्य वैद्य, वि. आ. बुवा, कृष्णराव धुळप, दत्ता केळकर, कुसुमताई केळकर, वा. शी. आपटे, गो. बा. टोकेकर, बा. ना. उपासनी, खा. रामभाऊ कापसे, अशी अनेक साहित्यिक मंडळी या वचनालयाशी संबंधित होती.

विशेष मुद्दाम उल्लेखनीय म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विद्यमान प्रशासक-आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मराठी वाचक दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या पार्किंग विभागात या वाचनालयातील जुने ग्रंथ, कल्याणशी संबंधित पुस्तके कल्याणकरांना पाहण्याची, हाताळण्याची संधी उपलब्ध करून दिली.

आज वाचनालयात नवी जुनी ग्रंथसंपदा अत्यंत चांगल्याप्रकारे ठेवली आहे. विशेष म्हणजे त्याची यादी संगणीकृत केल्याने पुस्तक नंबर, लेखकाचे नाव, प्रकाशक, प्रकार, यापैकी कोणतीही एक माहिती दिली तरी केवळ दहा-पंधरा मिनिटांत वाचकाला ते पुस्तक उपलब्ध करून देता येते. आता तर वाचक पुस्तकांच्या कपाटापर्यंत जाऊन आपल्याला हवे ते पुस्तक निवडू शकणार आहे. कल्याणकरांची वाचनाची आवड-निवड त्यातून कळण्यास सहाय्य होऊ शकेल.

विनायक बेटावदकर, ज्येष्ठ पत्रकार (कल्याण)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -